25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeविशेष‘लाडकी’ खलनायिका

‘लाडकी’ खलनायिका

आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या जुन्या जमान्यातील अभिनेत्री शशिकला यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. सत्तरच्या दशकात त्यांनी नायिका आणि खलनायिका रंगविल्या होत्या आणि त्या काळात त्या प्रचंड गाजल्या होत्या. त्यांनी १०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले. सहनायिका किंवा खलनायिका म्हणून चित्रपटसृष्टीत मान मिळवलेल्या मोजक्या कलाकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. नकारात्मक भूमिका साकारुनही प्रेक्षकांची ‘लाडक’ राहिलेल्या शशिकला यांच्याविषयी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी व्यक्त केलेल्या भावना.

एकमत ऑनलाईन

आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या जुन्या जमान्यातील अभिनेत्री शशिकला यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. सत्तरच्या दशकात त्यांनी नायिका आणि खलनायिका रंगविल्या होत्या आणि त्या काळात त्या प्रचंड गाजल्या होत्या. त्यांनी १०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले. शशीकला यांचे संपूर्ण नाव शशिकला जावळकर. त्या मूळच्या सोलापूरच्या. त्यांचे बालपण ऐशोआरामात गेले असले तरी सिनेसृष्टीत संघर्ष करताना त्यांना अनेक चढ-उतार पाहावे लागले. सुरुवातीला त्यांना ४०० रुपये महिना मानधन मिळायचे. शशिकला यांनी १९५९मध्ये सुजाता या सिनेमात खलनायिका साकारली आणि त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली.

त्यानंतर त्यांना खलनायिकेच्याच भूमिका ऑफर होऊ लागल्या. त्यातही त्यांनी वेगळ्या भूमिका असणारे सिनेमे स्वीकारण्यास सुरुवात केली. आरती या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेसचा फिल्मफेअर अ‍ॅवार्डही मिळाला. तर गुमराह सिनेमातील उत्कृष्ट खलनायिकेचा फिल्म फेअर अ‍ॅवार्ड मिळाला. सिनेमातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होते. तसेच त्यांना व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट अ‍ॅवार्ड देऊनही गौरवण्यात आले. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी इगतपुरी येथील मदर तेरेसा यांच्या रुग्णालयात रुग्णसेवा करण्याचे काम केले.

‘बॅड वूमन’ रंगवणारी ‘देवदूत’ : धर्मेंद्र
शशिकला यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अवघे मनोरंजनविश्व शोकाकूल झाले. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करतानाच जुन्या आठवणींना उजाळा दिला. धर्मेंद्र म्हणतात, शशिकला आज आपल्यात नाहीत, हे मला जेव्हा समजले, तेव्हा मला अतोनात दु:ख झाले. आम्ही आमच्या कारकर्दीतील अनेक उत्तमोत्तम कामे एकमेकांसोबत केली आहेत. त्यांच्यासोबत काम केलेल्या सर्वच चित्रपटांची नावे मला एकदम आठवत नाहीत. परंतु माझ्या आवडते तीन चित्रपट म्हणजे ‘अनुपमा’, ‘देवर’ आणि ‘फूल और पत्थर’! या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका खूपच ठळकपणे आठवतात. त्या मला सीनिअर होत्या. मी चित्रपटांत पदार्पण केले, तेव्हा त्यांनी अनेक चित्रपट केलेले होते.

कोरोनापुढे गडकरी हतबल!

मला वाटते ‘अनपढ’ हाच आम्ही एकत्रितपणे केलेला पहिला चित्रपट असावा. माला सिन्हा यांनी त्यात प्रमुख भूमिका केली होती. मदन मोहनसाहेब आणि ललितजी यांच्यामुळे हा चित्रपट आजही रसिकांच्या स्मरणात आहे. जेव्हा मी चित्रपटसृष्टीत नवखा होतो, तेव्हा शशिकला यांनीच माझ्यासाठी वातावरण मोकळे केले होते, ‘ए धरम, ये आमच्यासोबत जेवायला,’ असे म्हणून शूटिंगदरम्यान त्या मला दुपारच्या जेवणासाठी बोलावत असत. एखाद्या नवागताला वरिष्ठ सहका-याने दिलेले असे प्रेम अविस्मरणीय असते. चित्रपटक्षेत्रात पदार्पण करणा-याशी चांगले कसे वागावे, हे मी शशिकला यांच्याकडूनच शिकलो. शशिकला यांची प्रतिमा ‘व्हॅम्प’ भूमिका साकारणा-या कलावंत अशी होती आणि अशा प्रकारची सर्वाधिक गाजलेली भूमिका त्यांनी माझ्यासोबत ‘फूल और पत्थर’मध्ये साकारली. ‘जिंदगी में प्यार करना सीख ले’ हे त्यांचे गाणे कमालीचे लोकप्रिय झाले.

विशेषत: ‘फिशिगला फिशिगला’ हे त्यातील पालुपद तर खूपच लोकप्रिय झाले. हृषिकेश मुखर्जी यांनी ‘अनुपमा’ चित्रपटाद्वारे शशिकला यांची प्रतिमाच बदलून टाकली. हा चित्रपट माझ्या सर्वाधिक आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. सकारात्मक भूमिकेत त्यांना पाहणे सुखद होते. अशाच आणखी काही भूमिका त्यांनी का केल्या नाहीत, याचे मला आश्चर्य वाटते. वास्तविक जीवनात त्या अत्यंत चांगल्या स्वभावाच्या होत्या. परंतु भूमिकांच्या बाबतीत प्राण साहेबांप्रमाणेच त्यांनाही ‘टाइपकास्ट’ करून टाकले गेले. कालांतराने शशिकला यांनी चित्रपटसृष्टीशी संबंध कायमचा तोडून टाकला आणि आपल्या कुटुंबीयांसमवेत त्या पुण्याला राहायला गेल्या. सुदैवाने त्यांना ललिता पवार यांच्यासारखा एकाक मृत्यू आला नाही. ललिता पवार यांचा मृतदेह त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दिवसांनी त्यांच्या घरात खराब झालेल्या अवस्थेत आढळला होता. ‘फेम’ महत्त्वाची आहेच; पण ‘फॅमिली’ त्याहून अधिक महत्त्वाची!

भूमिकेत जान भरणा-या शशिकला : शर्मिला टागोर
ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनीही शशिकला यांच्या निधनाविषयी बोलताना जुन्या काळातील काही क्षणांना उजाळा दिला. त्या म्हणतात, ‘अनुपमा’ हा चित्रपट आम्ही एकत्रितपणे केला, तेव्हा शशिकलाजी खूपच अनुभवी होत्या आणि तुलनेने मी नवखी होते. हृषिकेश मुखर्जी यांनी त्यांना प्रथमच सकारात्मक भूमिका दिली होती. हृषिदा प्रत्येक माणसात चांगला माणूस शोधत असत, हेच त्यामागील कारण असावं. एरवी शशिकला यांची प्रतिमा नकारात्मक भूमिका किंवा व्हॅम्प साकारणा-या कलावंत अशीच होती. त्यांच्या त्या भूमिकांचा समाजावर एवढा पगडा होता की, आउटडोअर शूटिंगच्या वेळी स्थानिकांच्या घरातील बाथरूम वापरण्याची परवानगी अन्य महिला कलावंतांना मिळत असे; पण शशिकला यांना ती नाकारली जात असे, हे ऐकून मला धक्का बसला होता. ‘बॅड वूमन’च्या भूमिकेत शशिकला कशी जान भरत असत आणि प्रेक्षकांना त्यांची भूमिका किती जिवंत वाटत असे, याचा हा ढळढळीत पुरावा होय. कलावंताची पडद्यावरची प्रतिमा लोकांच्या मनात पक्की बसलेली असते. एकदा मी शूटिंगदरम्यान शॉट ओके केला आणि सहज म्हणून विग काढला. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांच्या तोंडून आश्चर्याचे उद्गार ऐकू आले.

अनुपमा चित्रपटात शशिकला यांनी सहृदयी, बोलक्या महिलेची भूमिका उत्तमरीत्या साकारली. त्यांनी माझ्या अभिनयाचेही कौतुक केले. अन्नपूर्णा आणि देवर या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान आमच्या नेमक्या काय गप्पा झाल्या हे मला आज आठवत नाही. हे थोडं विचित्र असलं तरी खरं आहे. आम्ही एकत्रितपणे आउटडोअर शूटिंगसाठी नियमितपणे जात होतो. ‘छोटी बहू’ या आणखी एका चित्रपटात शशिकलाजींनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात मी नायिकेची भूमिका केली होती. परंतु त्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान निरुपा रॉय यांच्याशी झालेल्या चर्चा जास्त आठवतात, कारण त्यांच्या मुलाने नुकताच डोळा गमावला होता. परंतु शशिकलाजींसोबत अशा गप्पा झाल्याच्या फारशा आठवणी नाहीत.

शशिकलाजींनी त्यांच्या चित्रपटातील करिअरचा दुसरा टप्पा मात्र मला आठवतो. त्या नंतर पुण्याला स्थायिक झाल्या आणि स्वत:च्या मराठी चित्रपटाची यशस्वीपणे निर्मिती केली. बंगाली चित्रपटाप्रमाणेच मराठी चित्रपटालासुद्धा साहित्यिक रसायन मोठ्या प्रमाणावर लाभले आहे. मराठीत शशीकलाजींना खूप वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका मिळाल्या आणि मला त्यांनी मराठी चित्रपटांत केलेले काम खूप आवडले. हिंदी चित्रपटांत त्यांना ‘टाइपकास्ट’ केले गेले हे योग्य नव्हते; परंतु चित्रपटसृष्टीतील तेच वास्तव आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या