22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeविशेषआघाडीची ‘ममतानीती’; केंद्र-राज्यातील संघर्ष वाढणार !

आघाडीची ‘ममतानीती’; केंद्र-राज्यातील संघर्ष वाढणार !

सर्वशक्तिमान भाजपाला आपली सगळी ताकद पणाला लावूनही पश्चिम बंगालमध्ये यश मिळवता आले नाही. ममता बॅनर्जी यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत भाजपाचे आक्रमण थोपवले. राज्यातील आघाडीचे नेतेही याच ममतानीतीचा अवलंब करताना दिसत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांची नजरेत भरणारी सक्रियता, भाजपाच्या प्रमुख नेत्यांची आक्रमकता व नवभाजपाईंच्या आक्रस्ताळेपणाविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह आघाडीचे नेते मागच्या आठवड्यात आक्रमक झालेले दिसले. सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आल्यामुळे वाढलेला आत्मविश्वास व ‘मिनी विधानसभे’च्या आगामी निवडणुका यामुळे हा संघर्ष आणखी वाढणार अशीच चिन्हं आहेत.

एकमत ऑनलाईन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला पुढच्या महिन्यात दोन वर्षे पूर्ण होत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठी उलथापालथ होऊन कोणाच्या कल्पनेत नसलेली शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची महाविकास आघाडी तयार झाली. प्रशासनाचा, विधिमंडळ कामकाजाचा कोणताही अनुभव नसलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार फार काळ चालणार नाही. तीन चाकांची रिक्षा केव्हाही पालथी होईल, असे दावे केले जात होते. परंतु सगळे अंदाज चुकवत, सगळी भाकितं खोटी ठरवत सरकारने दोन वर्षांचा पल्ला गाठला आहे. सत्तेत आले तेव्हापेक्षा आता त्यांची मांड अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे स्वाभाविकच विरोधक अधिक आक्रमक झालेले दिसत आहेत.

केंद्र व राज्य सरकारमधील संघर्ष पराकोटीला गेला आहे. केंद्रीय यंत्रणा महाराष्ट्रात अधिक सक्रिय झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही आक्रमक प्रत्युत्तर देणे सुरू केले आहे. मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्व शक्ती पणाला लावूनही ममता बॅनर्जी यांनी अत्यंत आक्रमकपणे याचा मुकाबला करून पुन्हा सत्ता काबीज केली. त्याच मार्गाने जाण्याची भूमिका राज्यातील आघाडीच्या नेत्यांनी घेतलेली दिसते आहे. विधानसभा निवडणुकीला अजून भरपूर वेळ आहे. परंतु सहा महिन्यांनी होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मिनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे राजकारण तापले आहे. हा संघर्ष आणखी कुठल्या पातळीवर जाणार, त्याचा कोणाला फायदा होणार? हे लवकरच कळेल. पण मध्यंतरी सुरू झालेली शिवसेना-भाजपची पुन्हा एकत्र येण्याची पतंगबाजी यामुळे थांबेल एवढे मात्र नक्की.

मुख्यमंत्री आक्रमक !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मवाळ व मृदुभाषी म्हणून ओळखले जातात. सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यांतच कोरोनाचे संकट आले व याचा मुकाबला करण्यातच सरकारचे दीड वर्ष गेले. कोरोनाचे संकट, केंद्राचे सहकार्य, भाजपासारख्या बलाढ्य विरोधकांचे आव्हान यातून वाटचाल करताना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागली. तारेवरची कसरत करताना त्यांनी आपला तोल कधी जाऊ दिला नाही. भरपूर टीका होऊनही विरोधकांच्या आक्रमणांना ते शांतपणे सामोरे गेले. शक्य तोवर सामंजस्याने, सहमतीने काम करण्याची भूमिका घेतली. परंतु त्याला समोरून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आता त्यांची भाषाही आक्रमक होताना दिसते आहे. सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असल्याने स्वाभाविकच आत्मविश्वासही आला आहे. परवाच्या दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणातून राजकारणाची गाडी आता गियर बदलतेय याचे संकेत मिळाले आहेत.

ईडी, आयकर विभाग, सीबीआय या तपास यंत्रणांनी आपले सगळे लक्ष महाराष्ट्रावर केंद्रित केले आहे. आघाडीच्या नेत्यांवरील कारवायांना वेग आला आहे. किरीट सोमय्या यांनी आघाडीच्या नेत्यांविरुद्ध आघाडी उघडली आहे. त्याबद्दल त्यांना दोष देता येणार नाही. सत्तेत बसलेल्यांनी काही चुकीचे केले असेल तर ते खोडून काढणे, जनतेसमोर आणणे हे विरोधी पक्षांचे कर्तव्यच आहे. पण शिवसेनेबरोबरची युती तुटली नसती किंवा रात्रीच्या अंधारात सत्तेवर बसलेले औटघटकेचे सरकार टिकले असते तर सोमय्या यांना आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी, मुभा त्यांच्या नेत्यांनी दिली असती का? याबद्दल शंकाच आहे. पण यामुळे आघाडीच्या तंबूत घबराट पसरण्याऐवजी प्रतिकार सुरू झालाय. मागे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्यामागे लागलेल्या चौकशीला वैतागून पुन्हा भाजपाबरोबर जाण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला होता. पण आता चित्र बदललेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना भाजपवर जोरदार प्रहार केले. छापा-काटा खेळ असतो तसा ‘छापा’ टाकून ‘काटा’ काढण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. पण ही थेरे फार काळ चालणार नाहीत, असा इशारा दिला. स्वातंत्र्यलढ्यात ज्याप्रमाणे लाल-बाल-पाल यांनी इंग्रजांच्या सत्तेला आव्हान दिले त्याप्रमाणे पश्चिम बंगाल, महाराष्ट्र व पंजाब केंद्रातील तुमच्या सत्तेला सुरुंग लावील, हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य त्यांच्या राजकारणाची पुढील दिशा अधिक स्पष्ट करणारे होते.

फडणवीस विरुद्ध पवार !
विधानसभा निवडणुकीत युतीला बहुमत मिळूनही बदललेल्या राजकीय समीकरणामुळे देवेंद्र फडणवीस यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यातच अजित पवारांच्या मदतीने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न फसल्याने त्यांच्या प्रतिमेलाही तडा गेला. पण यामुळे खचून न जाता गेलेली सत्ता परत आणण्यासाठी ते पहिल्या दिवसापासून कामाला लागले आहेत. तेव्हापासून ते एक दिवस घरी बसलेले नाहीत. पण कधी कधी त्यांची अतिआक्रमकता फायद्याऐवजी तोट्याची तर ठरत नाही ना? अशी शंका उपस्थित करते. मध्यंतरी भाजपाच्या एका नेत्याने खाजगीत बोलताना सरकारच्या स्थिरतेबाबत अचूक विश्लेषण केले. जोपर्यंत आम्ही पायात पाय घालून पाडण्याचे प्रयत्न करतोय, तोवर आघाडीतील तीन पक्ष हातात हात घालून चालत राहतील. आम्ही शांत बसलो तर तेच एकमेकांच्या पायात पाय घालतील, असे त्यांचे ठाम मत आहे. सरकार दोन वर्षे पूर्ण करताना ते पटतेही. पण त्यांच्या पक्षातील इतरांना तसे वाटत नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह काही नेते रोज सरकारवर टीका व आरोपांचा भडिमार करताना दिसतात.

एकीकडे तपास यंत्रणांची नजरेत भरणारी सक्रियता, दुसरीकडे भाजपाच्या प्रमुख नेत्यांची आक्रमकता व तिसरीकडे भाजपात नव्याने आलेल्या लोकांचा आक्रस्ताळेपणा यामुळे सत्ताधा-यांची अडचण होण्याऐवजी त्यांच्याबद्दलची सहानुभूती तर वाढत नाहीय ना? अशी शंका राजकीय जाणकारांना येतेय. शरद पवार सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. ‘मी पुन्हा येणार’ या त्यांच्या वक्तव्याची अजूनही खिल्ली उडवली जाते. ‘लोकांच्या प्रेमामुळे अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते’, या त्यांच्या परवाच्या वक्तव्याचीही अशीच खिल्ली उडवण्यात आली. सत्ता गेली की लोक पाठ फिरवतात, आपल्याबाबतीत तसं झालं नाही, एवढंच त्यांना म्हणायचं होतं. पण त्यावरूनही टर उडवली गेली. त्यामुळे फडणवीस यांना प्रत्युत्तर द्यावे लागले. हा संघर्ष पुढील काळात आणखी तीव्र होत जाणार हे नक्की. या राजकीय संघर्षाचा कोणाला फायदा होणार हे मुंबईसह १८ महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालात दिसेलच.

अभय देशपांडे

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या