धान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या ५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने अनपेक्षित यश मिळवत भाजपला मोठा धक्का दिला. पाचपैकी ३ जागा आघाडीला मिळाल्या. नाशिक पदवीधरमधून अपेक्षेप्रमाणे सत्यजित तांबे निवडून आले. काँग्रेसने घोळ घातला नसता, थोडा समन्वय ठेवून काम केले असते तर आघाडीला ४:१ च काय ५:० असेही दणदणीत यश मिळाले असते. कोकणात भाजपाला शिंदे गटाचा फायदा मिळाल्याने इथली एकमेव जागा जिंकता आली. शिक्षक व पदवीधर अशा सुशिक्षित मतदारांनी विरोधात दिलेल्या कौलामुळे स्वाभाविकच भाजपातील धुरिणांची चिंता वाढली आहे. ‘सी-व्होटर’ व प्रतिष्ठित ‘इंडिया टुडे’ या वृत्तसमूहाने आज निवडणुका झाल्या तर देशातील जनतेचा कौल काय असू शकेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. देशात पुन्हा भाजपाचेच सरकार सत्तेवर येईल, असा अंदाज वर्तवताना महाराष्ट्रात मात्र भाजप-शिंदेसेनेचे पानिपत होईल, असा अंदाज वर्तविला आहे. सद्य राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडीला राज्यात लोकसभेच्या ३४ तर भाजप-शिंदेंना केवळ १४ जागा मिळतील असा अंदाज या सर्वेक्षणात वर्तविण्यात आला आहे. राज्यातील सत्तांतर व शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे राजकीय समीकरणे बदलतील अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु ‘ऑपरेशन’नंतर झालेल्या ‘कॉम्प्लिकेशन’मुळे राजकीय रागरंग बदलले आहेत. यामुळे अनेकांची झोप उडालेली असताना विधान परिषदेच्या निकालांनी चिंता वाढवली आहे. नागपूरसारख्या बालेकिल्ल्यात पदवीधर पाठोपाठ शिक्षक मतदारसंघातही पराभव झाल्याने चिंता वाटणे स्वाभाविक आहे.
नागपूर शिक्षकबरोबरच अमरावती पदवीधरमध्येही भाजपाला पराभवाचा झटका बसला. विदर्भ हा गेली काही वर्षे भाजपाचा बालेकिल्ला किंवा ‘स्कोअरिंग सब्जेक्ट’ समजला जातो. या दोन्ही जागांवरील पराभवामुळे ही तटबंदी अभेद्य नसल्याची बाब पुढे आली आहे. जनमत चाचण्यांचे अंदाज काही हजार लोकांचा कल जाणून घेऊन व्यक्त करण्यात आले होते. या ५ जागांच्या निवडणुकीत काही लाख लोकांनी कौल दिला. हे सॅम्पल साईज मोठे आहे. शिक्षक किंवा पदवीधरच्या निवडणुकीवरून विधानसभेचे किंवा लोकसभेचे अंदाज बांधून तसेच घडेल असे म्हणणे अतिशयोक्ती होईल. नागपूर पदवीधरची जागा आम्ही सतत जिंकत होतो, पण सत्ता यायला ९५ साल उजाडावे लागले, असा युक्तिवाद एका भाजपा नेत्याने केला. पण राजकारणाच्या बदललेल्या रंगामुळे व वा-याच्या दिशेमुळे वाढलेली चिंता लपत नव्हती. विदर्भात मविआने विजय मिळवत भाजपाला त्यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार धक्का दिला आहे. नागपूर पदवीधरच्या निवडणुकीतही भाजपाने यावेळी प्रथमच पराभवाची चव चाखली होती. त्याचीच पुनरावृत्ती झाल्याने भाजपाच्या विदर्भातील वर्चस्वाला ओहोटी लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. ना. गो. गाणार हे दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. तिस-यांदा त्यांना उमेदवारी दिल्याने भाजपात नाराजी होती. पदवीधरप्रमाणेच ओबीसींची नाराजी यावेळीही दिसली. जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दाही या निवडणुकीत महत्त्वाचा ठरला आहे. आघाडीत सुरुवातीला गोंधळ झाला तरी नंतर मात्र सर्व नेत्यांनी एकदिलाने काम केलेले दिसले.
नागपूरचा पराभव जिव्हारी लागणारा !
नागपूर शिक्षक मतदारसंघात झालेला ना. गो. गाणार यांचा पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला आहे. मागच्या दोन्ही निवडणुकांत गाणार यांनी चांगल्या मताधिक्याने विजय मिळवला होता. यंदा ते विजयाची हॅट्ट्रिक करतील असा राजकीय पंडितांचाही कयास होता. पण तसे झाले नाही. काँग्रेस पुरस्कृत सुधाकर अडबाले यांनी त्यांचा दणदणीत मताधिक्याने पराभव केला. सुधाकर अडबाले यांनी ना. गो. गाणार यांच्यापेक्षा दुप्पट मते घेतली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या नागपूर पदवीधरच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी नागपूरचे माजी महापौर आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी यांचा पराभव केला होता. उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याचा गृह जिल्हा असलेल्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात गेल्या दोन वर्षांत दुस-यांदा भाजपाला पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. मुख्य म्हणजे महाविकास आघाडीने उमेदवारीवरून प्रचंड घोळ घालूनही भाजपाचा पराभव झाला.
मुळात ही जागा काँग्रेस नव्हे शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. आघाडीतील जागावाटपानुसार काँग्रेस नाशिकची व शिवसेना नागपूरची जागा लढवणार होती. पण काँग्रेसमध्ये तांबे पिता-पुत्राच्या बंडखोरीमुळे पेच निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला व त्यामुळे नागपूरची जागा काँग्रेसला मिळाली. त्यानंतर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय घ्यायलाही काँग्रेसने बराच वेळ लावला. शेवटी माजी मंत्री सुनील केदार व विजय वडेट्टीवार यांनी परस्पर त्यांना पाठिंबा जाहीर करून कोंडी फोडली. महाविकास आघाडीचा घटक असलेल्या कपिल पाटील यांच्या लोकभारतीने स्वतंत्र उमेदवार उभा केला. काँग्रेसमधील एका गटाने दुस-याच उमेदवाराला पाठिंबा दिला. एवढा गोंधळ होऊनही आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी झाले. जुनी पेन्शन योजना, सलग तिस-यांदा उमेदवारी मिळालेल्या गाणार यांच्याबद्दल पक्षात व शिक्षकांमध्ये असलेली नाराजी हे मुद्दे महत्त्वाचे ठरलेच, पण भाजपाच्या वर्चस्वाला ओहोटी लागल्याचेही या निकालावरून दिसते आहे. त्यामुळे बालेकिल्ल्याची डागडुजी करण्याचे मोठे आव्हान भाजपापुढे असणार आहे.
अमरावतीतही धक्का !
अमरावती विधान परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले. त्यांनी गेले दोन टर्म आमदार असलेल्या माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला. अत्यंत चुरशीच्या या लढतीत शेवटच्या फेरीपर्यंत मतमोजणी झाली. विधान परिषदेतील अत्यंत अभ्यासू आमदार व अनुशेषाविरुद्धच्या लढ्याचे खंदे शिलेदार बी. टी. देशमुख यांनी सलग पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. माजी राज्यमंत्री रणजित पाटील यांनी २०१० साली त्यांचा पराभव केला. तेव्हापासून तेच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला. त्यांनी शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्षांना सोबत घेऊन उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीचा घोळही काँग्रेसी संस्कृतीनुसार शेवटच्या दिवसापर्यंत सुरू होता. लिंगाडे यांची उमेदवारी जाहीर होईपर्यंत रणजित पाटील यांच्या प्रचाराच्या दोन फे-या पूर्ण झाल्या होत्या. त्यातच मतदानाच्या दोन दिवस आधी लिंगाडे यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल केलेल्या आरोपांची ऑडिओ क्लिप बाहेर आल्याने खळबळ उडाली. परंतु त्याचा मतदानावर परिणाम झाला नाही. भाजपाचा विदर्भातील आणखी एक किल्ला पडला. महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र लढले तर महाराष्ट्रात काय चित्र निर्माण होऊ शकते याची चुणूक या निवडणुकीत दिसली आहे.
नाशिकच्या निकालाने काय शिकवले ?
पाच जागांच्या या निवडणुकीत सर्वाधिक गाजली व अजूनही गाजतेय ती नाशिक पदवीधरची निवडणूक. काँग्रेसचे बंडखोर, अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्याला यावेळी निवडणूक लढवायची नाही, त्याऐवजी आपले चिरंजीव व युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांना उमेदवारी द्यावी अशी इच्छा पक्षनेतृत्वाकडे व्यक्त केली होती. तरीही काँग्रेसने त्यांनाच उमेदवारी दिली. परंतु त्यांनी अर्ज भरलाच नाही. सत्यजित यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवून काँग्रेसने पिता-पुत्रांना पक्षातून काढून टाकले. सत्यजित हे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे असल्याने या बंडखोरीला आणखी वेगळा रंग चढला. भाजपाने येथे आपला उमेदवार न देता सत्यजित तांबेंना मदत केली. काँग्रेसमधला गोंधळ सुरू असताना शिवसेनेने परस्पर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे तेच आघाडीचे उमेदवार झाले. निवडणुकीपर्यंत शांत राहिलेल्या सत्यजित तांबे यांनी नंतर काँग्रेसअंतर्गत राजकारणातून आपला बळी देण्यात आल्याचा आरोप केला आहे. आपल्याला मुद्दाम चुकीचे बी फॉर्म पाठवण्यात आल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. काँग्रेसने त्यांना उमेदवारी का नाकारली हे गूढच आहे. तांबे अपक्ष लढल्यामुळे एक जागा तर कमी झालीच, पण एक तरुण नेताही पक्षाबाहेर फेकला गेला.
-अभय देशपांडे