‘उठा, जागे व्हा’ असा प्रेरक संदेश देणा-या स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन देशात ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताकडे आज नव्या दृष्टीने पाहिले जात आहे. या तरुणाईच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्याचे आव्हान राज्यसंस्थेपुढे आहे. गेल्या काही वर्षांत राजकारणातील तरुण पिढीचा सहभाग वाढताना दिसत आहे.
महाराष्ट्रात मे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आणि ऑक्टोबर महिन्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी पहिल्यांदाच मतदान करणा-या तरुणांची संख्या ४२ लाख ४५ हजारांनी वाढल्याचे दिसून आले होते. तसेच १८ ते ४० या वयोगटातील मतदार महाराष्ट्रात ५० टक्क्यांहून अधिक असल्याचे समोर आले. भारतीय राजकारणात विशेषत: महाराष्ट्रात राजकारणातील तरुणाईचा उल्लेख केला जातो तेव्हा शरद पवारांचे नाव आवर्जून घेतले जाते. काँग्रेसचे सर्वांत तरुण अध्यक्ष होण्याचा मान शरद पवारांनी पटकवला. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे २४ वर्षे. पुलोदचा प्रयोग करून महाराष्ट्रात सरकार स्थापन केले तेव्हा ते देशातील सर्वांत तरुण मुख्यमंत्री झाले. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १९९७ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर म्हणून निवडून आले होते. देशातील सर्वांत तरुण महापौर अशा विक्रमाची नोंद त्यांच्या नावावर होती. अलीकडेच केरळच्या एका तरुणीने २१ व्या वर्षीच महापौर होण्याचा विक्रम केला.
स्वातंत्र्योत्तर काळाचा विचार करता तरुणवर्ग राजकारणात पुढे यावा, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. महाविद्यालयीन निवडणुकांमुळे राजकारणात नवोदित चेहरे समोर येत राहिले. तथापि, सत्तापदांमध्ये त्यांना स्थान देताना प्रस्थापित राजकीय नेत्यांनी आपल्या सग्यासोय-यांनाच पसंती दिली. त्यातूनच घराणेशाहीचा वटवृक्ष तयार झाला. गावा-शहरातील तरुण कार्यकर्ते वर्षानुवर्षे मोजक्या घराण्यांतील नेत्यांमागे झेंडे घेऊन धावताना दिसून आले. ‘निवडून येण्याची क्षमता’ हा निकष राजकीय पक्षांकडून उमेदवारी देताना लावला जाऊ लागला. धनशक्ती, घराणे, बाहुबल्य असणा-यांचीच सद्दी दिसून येऊ लागली. अशा लोकप्रतिनिधींकडून समाजहिताला बगल देत गल्लाभरू आणि सरंजामशाही राजकारण दीर्घकाळ सुरू राहिले. दुसरीकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या बेबंदशाहीमुळे, भ्रष्टाचारामुळे विकासाचे चक्र मागे पडत जाऊन नागरिकांचे प्रश्न बिकट बनत गेले. गुन्हेगारी, अत्याचार, शोषण, अन्याय यांना उधाण आले. परिणामी, तरुण पिढीचा भ्रमनिरास होऊ लागला.
महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईनच – कोरोनाची भीती
साधारण १०-१५ वर्षांपूर्वीचा काळ विचारात घेतल्यास तरुणपिढी राजकारणापासून फटकून वागताना दिसत होती. मतदानाच्या घसरत चाललेल्या टक्क्यांमधून याचे प्रतिबिंब उमटत होते. त्यामुळे राजकीय पक्षांना कार्यकर्ते, नवे चेहरे मिळणे दुरापास्त होऊ लागले. अलीकडील काळात घराणेशाही विरोधातील सूर ठळक होत गेला. दुसरीकडे बदल घडवण्यासाठी, परिवर्तनासाठी आपण व्यवस्थेत सहभागी झाले पाहिजे, हा विचार तरुणाईच्या मनात रुजत गेला. शोषणाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध तरुण पिढी रोखठोकपणे व्यक्त होऊ लागली. काही तरुण-तरुणींनी कुणाच्याही पाठबळाशिवाय मैदानात उतरून प्रस्थापितांना आव्हान देत यश मिळवल्याची उदाहरणे समोर येऊ लागली. मतदारांच्या बदलत्या मानसिकतेचे प्रतिबिंब अशा निकालांमधून उमटत गेले. पाहता पाहता सर्वदूर हे वारे पोहोचले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राम सातपुते, देवेन्द्र भुयार, विनोद निकोले यांसारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणांच्या विजयाने पंचतारांकित राजकारण करणा-यांना स्पष्ट संदेश मिळाला. आता यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकांमधूनही असाच संदेश तरुण पिढीने दिला आहे.
गावगाड्यातील राजकारण, समाजकारण हे शहरी वातावरणापेक्षा खूप वेगळे असते. गावात ठराविक गटांचा, घराण्यांचा दबदबा असतो. सामाजिक विषमताही मोठ्या प्रमाणावर असते. गावातील नवतरुणाईला ती सलत असते. पण कौटुंबिक दबावापुढे ते शांत असतात. अलीकडील काळात गावातून शिक्षणासाठी, रोजगारासाठी शहरांकडे येणा-या तरुणाईचे प्रमाण वाढले आहे. शहरातील मुक्त विचारांच्या वातावरणात वावरताना, विकासाचे इमले पाहताना या तरुणांंना पदोपदी गाव आठवत असतो. गावाच्या विकासाचे स्वप्न दिसत असते. आजवर काही करता न आल्याचे शल्य स्वस्थ बसू देत नसते. या अस्वस्थतेतूनच तरुणांच्या मनात बदलांसाठीची बीजपेरणी होत गेली. गावाचा कायापालट करायचा असेल तर आपण सक्रिय झाल्याशिवाय गत्यंतर नाही, हा विचार मूळ धरू लागला.
अशा विचारांनी प्रेरित झालेल्या अनेकांनी यंदाच्या निवडणुकीत नियोजनाच्या आणि परिश्रमाच्या जोरावर परिवर्तन घडवून आणल्याचे दिसून आले आहे. यातील काहींनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली तर काहींनी नेपथ्य केले. उच्चशिक्षित तरुणांचा या परिवर्तनातील वाटा मोठा आहे, हे लक्षात घ्यायला हवे. रायगडमधील एका ग्रामपंचायतीत एमबीए झालेल्या आणि एका बड्या कंपनीत मॅनेजर असलेल्या तरुणाने बाजी मारली आहे. या ग्रामपंचायतीत उच्च शिक्षित तरुणांनी सत्तांतर घडवून आणले आहे. त्यामुळे तरुणांची आणि सुशिक्षितांची ग्रामपंचायत म्हणून या ग्रामपंचायतीकडे पाहिले जात आहे.
हिंगोली जिल्ह्यातील डिग्रसवाणी या दुर्गम खेड्यातील डॉ. चित्रा कु-हे या नवनिर्वाचित ग्रामंपचायत सदस्या. त्यांनी पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच स्पेनमधील सँटिआगो विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली आहे. निवडणुकीत विरोधी पॅनेलवर टीका न करता केवळ विकासावर भर देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आणि यश मिळवले. लातूर जिल्ह्यातील ३८३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांमध्ये बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये तरुण उमेदवारांनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा ग्रामपंचायतीमध्ये वर्षानुवर्षे सत्तेची फळे चाखणा-या प्रस्थापितांना धक्का देत शिवाजी पवार या तरुणाने उभ्या केलेल्या पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
हेमचंद्र फडके