26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeविशेषया मृत्यूचा न्याय व्हावा!

या मृत्यूचा न्याय व्हावा!

एकमत ऑनलाईन

लातूर : निसर्गास छोट्या मुंगीपासून ते अजस्त्र हत्तीपर्यंत, छोट्या पक्ष्यापासून ते माणसापर्यंत सगळे प्रिय असतात. सृष्टी हीच शक्ती आणि सगळी तिची लेकरे तिच्यासाठी समान. हा न्याय निसर्गातील सगळे प्राणी पाळतात फक्त माणूस सोडून! कुठलाही प्राणी भूक नसताना दुसºया प्राण्यावर हल्ला करीत नाही; पण स्वत:च्या महत्वाकांक्षेसाठी आई- बापाच्या डोक्यात दगड घालणारी क्रूर हंडगी जात फक्त माणसाची असते! त्याला हत्तीच्या जीवाचं काय पडतंय! नदीच्या मधोमध निश्चल उभी राहिलेल्या हत्तीचा फोटो सोशल मीडियावर फिरतोय. त्या फोटोबाबतची कहाणी अत्यंत करूण आहे.

केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील वेल्लीयार नदीत उभा राहिलेल्या गर्भवती हत्तीणीचा तो फोटो आहे. २७ मे २०२० ला केरळ राज्यातील फॉरेस्ट ऑफिसर मोहन कृष्णनने माफ कर बहिणी म्हणून एक पोस्ट त्याबद्दल शेअर केली! सायलेंट व्हॅलीमधून एक हत्तीण पलक्कड जिल्ह्यात भुकेने व्याकुळ होऊन फिरत होती. तिला कुणीतरी फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घातला. फटाके तोंडात फुटल्यामुळे तिचे तोंड आणि जीभ फाटली. त्याही अवस्थेत तिने आजूबाजूच्या कुठल्याही माणसाला मारले नाही, कुठल्याही इमारतीला इजा केली नाही, रागाने कसली नासधूस केली नाही, शांतपणे पाण्याच्या शोधात ती चालत राहिली! शेवटी तिला नदी दिसल्यावर नदीच्या मधोमध जाऊन ती शांत उभी राहिली.

वन विभागाला माहिती कळल्यावर मोहन कृष्णन तिथे पोहोचले. हत्तीणीने बाहेर यावं म्हणून दोन हत्तीसुद्धा पाण्यात सोडले गेले तिला वाट दाखवण्या करिता; पण ती बाहेर आली नाही. पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली! दिवसभर वन विभागाने प्रयत्न केले; पण ५ च्या सुमारास तिने जलसमाधी घेतली. पोस्टमोर्टममध्ये कळलं ती गर्भवती होती. मोहन कृष्णने लिहिलंय आम्ही तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होतो तिने तो नाकारला! माणसाच्या कृतीचा तिने केलेला तो निषेध होता! तिला त्यांच्यावर विश्वास ठेवावा वाटला नाही! तिने नदीतून बाहेर येण्याचं नाकारलं.

२० महिने लागतात एका हत्तीणीचं बाळ बाहेर यायला. नदीत उभी राहिली तेव्हा काय भावना असतील तिच्या? तिच्या पोटातल्या बाळाला फटाक्याच्या वेदना होऊ नये म्हणून बाहेर नसेल का आली ती? वेदना सहन करण्याच्या पलीकडे गेल्या म्हणून बाळ सुरक्षित राहील पाहिजे म्हणून पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली असेल का ती? १२०० फुटांचा कडा हिरकणी फक्त बाळाला दूध पाजता यावं म्हणून चढून गेली होती. आईपण निभावण्यासाठी आई स्वत: चे प्राण पणाला लावते मग ती माणसातली आई असो नाहीतर प्राण्यांमधली! एका गर्भार हत्तीणीला फटाके चारून काय मिळवलं आपण? असं समजू नका तुम्ही घरात बसला आहात म्हणून तुम्ही जबाबदार नाही!

माणूस म्हणून केलेल्या असल्या हीन अत्याचाराची फळे सामूहिक नशिबाच्या रुपाने प्रत्येक माणसाच्या वाट्याला भोगायला येतात! कोरोना, चक्रीवादळ, आग ही सगळी प्रलयाची रुपे भूतकाळात केलेल्या पापांची गोळाबेरीज असेल का? असा प्रश्न मी फालतू म्हणून उडवून लावणार तेवढ्यात नदीच्या पाण्यात निश्चल उभा राहिलेल्या हिरकणी हत्तीणीचा चेहरा माझ्या समोर येतो! डोळ्यात खळणारं पाणी थांबवण मुश्किल होऊन जातं! एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय कदाचित माणसांनी बनवलेल्या कोर्टात होणार नाही; पण लक्षात ठेवा जेंव्हा निसर्ग न्याय करायला उतरेल तेव्हा तुमच्या गर्वाची, मिजासखोरीची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही! या मृत्यूचा न्याय व्हावा!

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या