लॉकडाऊनचा काळ हा मानवाला आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारा काळ आहे. प्रत्येकजण घरात कोंडला गेला आहे. नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती चोहोबाजूने कोसळत आहेत. कोविड-१९ चा प्रादुर्भाव, भूकंप, त्सुनामी, पूरग्रस्त स्थिती, ओला/कोरडा दुष्काळ आणि सोबत युद्धजन्य सभोवतालच्या परिस्थितीत आज आपण जगत आहोत.
या लॉकडाऊनच्या काळात घरातील साफसफाईसोबत मनावरची जळमटंही काढून टाकण्याचा हा कालावधी असावा. त्याचं झालं असं की मी माझे कपड्याचे कपाट आवरायला घेतले. एरवी कोणत्याही लग्नसमारंभात जाण्यासाठी जेव्हा जेव्हा कपाट उघडले त्या प्रत्येक वेळी असं वाटायचं की, ‘कोणती साडी नेसू’? वाटायचे की साड्या घ्यायला हव्यात.
आपल्याकडे साड्याच नाहीत. (असं प्रत्येक भारतीय स्त्रीला वाटतं) आज मात्र माझं मलाच आश्चर्य वाटलं, मनात विचार आला. ‘इतक्या साड्या’ काय करू मी इतक्या साड्यांचे? साड्यांच्या ढिगाकडे पाहत मनात विचारांनी गराडा घातला. जगताना जणू काही मी अमर्त्य आहे, आणि कायम या पृथ्वीवर वास्तव्य करण्यास आलो आहोत, असे वागणारे आपण आज खरंच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
किती अनावश्यक गोष्टींची गर्दी करण्यात आपण गुंतलो आहोत. अनावश्यक वस्तू, अनावश्यक विचारामुळे आपले जीवन अनावश्यक गोष्टी करण्यातच आपण घालवत आहोत. आज या लॉकडाऊनच्या काळात लक्षात येते की खरंच आपल्या गरजा किती आहेत? आपण कमावतो किती? आणि साठा करून ठेवतो किती? घरामध्ये जसा अनावश्यक वस्तूंचा साठा दिसतो आहे, त्यापेक्षा जास्त साठा आपल्या डोक्यात अनावश्यक विचारांचा आहे. आपापसांतील मतभेद, भांडण, हेवा, मत्सर, द्वेष यामध्ये कुठेतरी स्वत:चे अस्तित्व हरवत चाललो आहोत. प्रत्येकाला पुढे जाण्याची ओढ आहे. प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रात ‘नंबर वन’ होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मग मिळेल त्या मार्गाचा अवलंब करणे. या सर्वामध्ये माणूस भरकटत चालला आहे. त्याच्यातील माणूसपण हरवत चाललं आहे. याचमुळे आज अनेक घटनांमधून त्याच्यातील पशू-अमानुषता दिसते आहे.
Read More होमिओपॅथीचा दुस्वास का?
माणूस धडपडतो, कमावतो ते घरच्यांच्या आणि स्वत:च्या सुखासाठी; पण या सगळ्या धावपळीत तो फक्त पळत सुटला आहे आणि धावता धावता हे ही विसरला की तो का पळतो आहे? षड्रिपूंनी ग्रस्त मानवाचे भान हरपले आहे. यामुळे बेधुंद झालेल्या मानवाने स्वत:च्या जीवनाबरोबरच निसर्गाची खूप मोठी हानी करण्यास सुरुवात केली. माणूस विसरलाय, त्याला काय हवं आहे? आणि तो काय करतो आहे? मानवाने सतत निसर्गात लुडबुड सुरू केली, निसर्गाची न भरून निघणारी हानी करण्यास सुरुवात केली. आजची भयावह परिस्थिती म्हणजे एकीकडे कोरोनाचा डॅÑगन पिच्छा पुरवतो आहे, त्याच वेळेस अतिवृष्टी, ‘अम्फान’, ‘निसर्ग’ सारखी चक्रीवादळे, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींनी मानव भयभीत झाला आहे. या सर्वांवर चिंतन होण्याची वेळ आली आहे.
पृथ्वीला आपण धरतीमाता म्हणून पुजतो. धरतीमाता सर्व मानवजातीची माता आहे. मनात विचार आला की काम करत असताना मूल जर मध्येमध्ये सतत लुडबुड करत असेल तर आई आपल्या बाळाला तिचे काम पूर्ण होईपर्यंत जसे एखाद्या झोळीत किंवा पाळण्यात अडकवून टाकते आणि आपली कामे करते तसे या वसुंधरेनं तर केलं नाही? म्हणजे मानवाची निसर्गातील लुडबुड थांबविण्यासाठी संपूर्ण मानवजातीला घरात कोंडून ठेवलं आणि आपली कामं पूर्ण केली. जसे हवा शुद्ध करणे, नदीचे पाणी शुद्ध करणे, प्रदूषण कमी करणे, आॅक्सिजनची पातळी वाढविणे वगैरे वगैरे, जी तिच्या बाळासाठी योग्य होती. वेळेवर आलेला मान्सून याची साक्ष देतो आहे. अशा अनेक ठिकाणी जिथे कायम कोरडा दुष्काळ पडत असे तिथे मान्सूनच्या पहिल्या टप्प्यातच योग्य प्रमाणात पाऊस पडताना आपण पाहतो आहोत. अनेक वर्षांपासून कोरडा दुष्काळ सहन करणा-या तिच्या संततीची गा-हाणे ऐकून त्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तर सर्वांना घरात बंद करून ठेवले नसेल .
बालपणी ऐकलेली गोष्ट आठवत आहे. एक मादी माकड एकदा पुराच्या पाण्यामध्ये आपल्या पिल्लाला कडेवर घेऊन उभी होती. पिल्लाला पुराच्या पाण्यापासून वाचविण्यासाठी ती आटोकाट प्रयत्न करताना दिसते. जेव्हा पुराचे पाणी कमरेच्या वर जाते तेव्हा ती पिल्लाला वाचविण्यासाठी खांद्यावर घेते, जेव्हा पाणी खांद्याच्या वर जाते तेव्हा ती पिल्लाला डोक्यावर घेते आणि त्या पिल्लाचा जीव वाचविते. परंतु जेव्हा मादी माकडाचे नाक पाण्यात बुडून जीव गुदमरायला लागतो तेव्हा डोक्यावर घेतलेल्या पिल्लाला आपल्या पायांखाली घेते आणि स्वत:चा जीव वाचविते. असं वाटतं या गोष्टीचे जे तात्पर्य आहे तेच आपण आज अनुभवत आहोत.
Read More लातूर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट तब्बल ३४ रुग्ण पॉजिटीव्ह
मानवजातीचा जीव वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी धरतीमाता तिच्या खोडकर बाळाच्या खोड्यांमुळे त्रस्त होऊन स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पिल्लाला पायाखाली तर घेत नाहीये? अनेक प्रकारे संकेत देऊनही जेव्हा मानवजातीने तिच्या वेदना ऐकल्या नाहीत, तेव्हा धरतीमातेने सर्व बाजूने स्वत:च स्वत:चे रक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि ती कामाला लागली. अशी ही वसुंधरा, धरतीमाता जिचे रौद्ररूप आपण आज पहात आहोत. या सर्वातून एकच ध्यानात घेण्यासारखी गोष्ट ती म्हणजे आज आपण आपल्या अनावश्यक गरजा कमी करून तिची (धरतीमाता) हाक ऐकणे गरजेचे आहे असे वाटते. आज जर तिची हाक ऐकली नाही तर….