32 C
Latur
Monday, March 27, 2023
Homeविशेषफुफ्फुसांची कसोटी

फुफ्फुसांची कसोटी

एकमत ऑनलाईन

मुंबई नगरी सध्या बरीच चर्चेत आहे. अर्थात, मुंबई नेहमी चर्चेत असतेच; पण आता इकडून, तिकडून, चहूबाजूंनी हालचाली वाढल्यात आणि सगळ्यांनीच जमवाजमव सुरू केलीये. विकासकामांची उद्घाटनं म्हणजे प्रचाराचा नारळच, असं म्हटलं जातंय. कुणी नवे सवंगडी शोधण्याच्या तयारीत आहे तर कुणी जुन्यांची चाचपणी करतोय. कुणी प्रचारात कोणते मुद्दे असावेत, याचा विचार करतोय तर कुणी इकडचे तिकडं किंवा तिकडचे इकडं कसे येतील, याचा प्रयत्न करतोय. कुणी भ्रष्टाचाराची नवीन प्रकरणं शोधतोय तर कुणी प्रभावी भाषणासाठी नवाकोरा करकरीत मुद्दा शोधतोय. काँक्रिटीकरणामुळं मुंबईत पावसाळ्यातसुद्धा चिखल होत नाही, पण तरीसुद्धा चिखलफेक मुंबईच्या पाचवीला पुजलीये. यापुढं ती वाढत जाईल आणि वातावरण बिघडत जाईल, असं बोललं जातंय. या सगळ्या घडामोडींच्या मुळाशी आहे मुंबई महापालिकेची संभाव्य निवडणूक. ती नेमक केव्हा होणार याचा अंदाज अजूनही कुणाला लागलेला नाही; पण तयारी असलेली बरी, हे मात्र प्रत्येकानं मनावर घेतलंय. प्रचंड मोठा अर्थसंकल्प असलेली ही महापालिका आपल्याच ताब्यात यावी, म्हणून सगळेच इरेला पेटलेत आणि त्यामुळंच वातावरण ढवळायला सुरुवात झालीये. कुरघोड्यांपासून आरोप-प्रत्यारोपांपर्यंत सर्व हत्यारं परजली जात असल्यामुळं उत्तरोत्तर वातावरण बिघडतच जाईल, असे संकेत मिळतायत.

परंतु या वातावरणाची जितक चर्चा होतीये, तितक मुंबईच्या ख-याखु-या वातावरणाची आणि त्यातल्या बिघाडाची चर्चा होताना दिसत नाही, हे दुर्दैव म्हणावं लागेल. मुंबईतली हवेची गुणवत्ता प्रचंड ढासळल्याच्या बातम्या जानेवारीच्या मध्यापासून येतायत. लखनौ, दिल्ली, नोएडा ही शहरं ज्या कारणांसाठी सतत चर्चेत असतात, त्या कारणामुळं मुंबई चर्चेत आली. दिल्लीपेक्षाही मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण या चारही औद्योगिक क्षेत्रांत हवेची गुणवत्ता आत्यंतिक बिघडल्याचा अहवाल सादर झालाय. धुके, धूर आणि सूक्ष्मकण यामुळे एक गडद थरच हवेत निर्माण झाला असून, व्हिजिबिलिटी खूपच कमी झाल्याचा अनुभव गेल्या काही दिवसांपासून येतोय. तापमानात झालेली घट आणि वा-याचा वेग मंदावणं हेही घटक या परिस्थितीला कारणीभूत आहेत, असं प्रदूषण नियंत्रण मंडळाचं म्हणणं आहे.

नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामअंतर्गत प्रदूषण नियंत्रणाचा एक कृती आराखडा तयार करण्यात आला असून, त्याची कडक अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, असं हा अहवाल सांगतो. हवेची गुणवत्ता खालावल्यामुळं मुंबईकरांमध्ये आजारांचं प्रमाण वाढलंय. विशेषत: श्वसनविकारांनी डोकं वर काढलंय. एखादं लहान मूलसुद्धा दिवसातून दहा सिगारेटी ओढल्याइतकं प्रदूषण फुफ्फुसात सामावून घेत असतं, असं दिल्लीत दिसून आलं होतं. मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षा खालावली म्हटल्यावर कठीण आहे! राजकीय वातावरण आणि प्रदूषण या दोहोंचा विचार करता मुंबईकरांना शारीरिक आणि मानसिक पातळीवर स्वास्थ्य लाभणं अवघड दिसतंय. या दोन्ही गोष्टींचा परस्परसंबंध मात्र कधीच येताना दिसत नाही, ही मजेची बाब होय. कारण प्रदूषणावरून कुणी कुणावर आरोप-प्रत्यारोप किंवा चिखलफेक करत नाही. कुणाच्या कार्यकाळात मुंबईतलं प्रदूषण वाढलं, याचा हिशोब होत नाही.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या