31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeविशेषमाधवराव, राजेशभाई, विलासराव,आर. आर. आबा, पतंगराव, आता अहमदभाई...

माधवराव, राजेशभाई, विलासराव,आर. आर. आबा, पतंगराव, आता अहमदभाई…

एकमत ऑनलाईन

अहमदभाई गेले! ७१ वय हे अलीकडे जाण्याचे नाही. कोरोनाने अनेक चांगली माणसे नेली. जेवढी गेली, त्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहेच. सर्व माणसे कुटुंबासाठी महत्त्वाची आहेतच. पण काही व्यक्ती संस्थेसाठी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. अहमदभाईंना काही संपादकांनी ‘चाणक्य’ म्हटले, ती उपमा चुकीची होती. धनानंद या सत्तांध राजाच्या राजवाड्यासमोर उभे राहून चाणक्याने धनानंद राजाला सत्तेवरून खाली उतरविण्याची शपथ घेतली. शेंडीला गाठ मारली. अहमदभाई असे रस्त्यावर उतरत नव्हते किंवा घडलेल्या राजकीय परिवर्तनामागे अहमदभाई आहेत हे त्यांनी कळूही दिले नव्हते. छत्तीसगडच्या भूपेश बघेल याला राजकारणात आणून ताकद देणे यामागे अहमदभाईच होते. त्याची जाहिरातबाजी करण्याची त्यांना सवय नव्हती. तशी गरजही नव्हती. इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. मनमोहन सिंग या तिघांच्याही मंत्रिमंडळात सलग ३० वर्षे कॅबिनेट मंत्री म्हणून ते मिरवू शकले असते. पण मंत्री होण्यास त्यांनीच नकार दिला होता.

प्रत्येक पक्षात अशी काही व्यक्तिमत्त्वं असतात. अहमदभाई त्यापैकी होते. काहीजणांनी त्यांची तुलना प्रमोद महाजन यांच्याशी तर काहीजणांनी अमरसिंह यांच्याशी केली होती. परंतु या दोन्हीही तुलना अत्यंत चुकीच्या आहेत. प्रमोद महाजन उथळ होते, प्रसिध्दीला हपापलेले होते. अमरसिंग तर भंपकच होते. अमरसिंगची तुलना करायची असेल तर सध्याच्या काँग्रेस पक्षातील राजीव शुक्ला यांच्याशी होईल, अहमदभाईंशी नव्हे. प्रत्येक पक्षात एक तरी अहमदभाई असतोच आणि बिनकामाचे राजीव शुक्ला बरेच असतात. कुटुंब असो किंवा संस्था असो, अडचणी आल्या की त्या सर्व बाजूंनी येतात. गेली १०-१२ वर्षे काँग्रेसच्या दृष्टीने वाईट वर्षे आहेत. काँग्रेसला बळ देऊ शकणारा एक-एक प्रभावी मोहरा काळाने उचलून नेला आणि काँग्रेस पक्ष अडचणीत आला. माधवराव सिंधिया अपघाती निधनाने गेले. दुसरे तडफदार नेते राजेश पायलट अपघातानेच गेले. काँग्रेसचे लोकप्रिय मुख्यमंत्री आंध्रचे वाय. एस. आर. रेड्डी हेही हेलिकॉप्टर अपघातातच गेले. त्यांनी लोकसभा निवडणुकीत आंध्रमधून काँग्रेसचे ३० खासदार निवडून आणले होते. महाराष्ट्राच्या दृष्टीने विलासराव देशमुख यांचे अचानक जाणे महाराष्ट्राला जिव्हारी लागले. पतंगराव कदम अचानक गेल्याने काँग्रेसचे नुकसान झाले. ते असते तर सांगलीमध्ये प्रतीक पाटीलची जागा काँग्रेसने जिंकली असती. राष्ट्रवादीच्या दृष्टीने आणि महाआघाडीच्या दृष्टीने आर. आर. आबांचे जाणे हे सगळे मोठे धक्के आहेत. काँग्रेसचे अतोनात नुकसान झालेले आहे. माधवराव सिंधिया आज देशपातळीवरचे सर्वांत प्रभावी नेते ठरले असते.

वसंतदादांनंतर विलासरावांच्या तोडीचा काँग्रेसमध्ये नेता कोणीच नाही. सोनियाजी त्यांच्या आजारपणामुळे थकलेल्या आहेत. २००९च्या लोकसभा निवडणुकीत ६५ हजार किलोमीटरचा दौरा करून त्यांनी सरकार आणलं होतं, हे विसरता येणार नाही. देशाचे आजचे पंतप्रधान ‘इटालियन लेडी’ अशा शब्दांत त्यांची संभावना करीत असताना लग्न झाल्या दिवसापासून या ‘इटालियन लेडी’चा डोक्यावरचा पदर कधीही ढळलेला नाही. पण, काही शारीरिक व्याधींमुळे त्यांच्या आता मर्यादा आहेत. या स्थितीत अहमदभाई यांचे जाणे काँग्रेससाठी अधिक अडचणीचे आहे. जे २४ नेते काँग्रेस नेतृत्व बदला म्हणतात, त्या २४ पैकी एकाही नेत्याची काँग्रेस अध्यक्ष होऊन पक्ष उभा करण्याची कुवत नाही. यापैकी एकहीजण भूपेश बघेल एवढासुध्दा तगडा नाही. यातल्या २४ च्या २४ जणांनी जी सत्ता मिळवली आणि सत्तेमुळे लोकांसमोर ते राहिले. त्यापैकी कोणत्याही नेत्याच्या मागे १० लोकसुध्दा नाहीत. भाजपमध्ये प्रकाश जावडेकर यांचे जे मूल्य आहे, जावडेकर मंत्री असून पुण्यात आल्यावर त्यांची दखल १० लोकसुध्दा घेत नाहीत. तशीच ही दोन डझन नेतेमंडळी आहेत. सत्ता असताना ते प्रभावी नव्हते, लोकांमध्ये अजिबात प्रभावी नव्हते.

वारस

आता सत्ता नसताना यांना कोण विचारणार? अहमदभाई सत्तेत नसतानाही लोक त्यांच्याकडे जायचे पण त्यांना आपल्या मर्यादा माहीत होत्या. या २४ जणांना आपल्या मर्यादाही माहीत नाहीत. आमचे पृथ्वीराजबाबा माणूस चांगला, पक्षाशी निष्ठावान. पण ५ वर्षे मुख्यमंत्रिपद मिळाल्यावर काँग्रेसचे राज्य त्यांना पुन्हा आणता आले नाही. उलट आमचा भूपेश बघेल, रमणसिंग यांच्यासारख्या भाजपच्या चांगल्या नेत्यांशी टक्कर घेऊन सत्ता नसतानाही काँग्रेसला विजय मिळवून देतो. काँग्रेसला अशा नेत्यांची आज गरज आहे. एकीकडे भाजपा महाराष्ट्रातल्या महाआघाडीला बदनाम करण्यासाठी सर्व प्रयोग करतोय. सरकारी यंत्रणा वापरतोय. ई. डी, सी. डी. देशातल्या कोणत्याही पंतप्रधानांनी सत्तेचा असा दुरुपयोग केला नव्हता. मोदी तो करत आहेत. एक दिवस हे १०० अपराध भरतीलच. त्यादिवशी देशात पर्यायी नेता नसतानाही येथील मतदार भाजपा व मोदींना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. नेत्याशिवाय हा देश कधीही अडलेला नाही. हेच भाजपचे लोक इंदिरा गांधी यांना ‘गुंगी गुडिया’ म्हणत होते. त्याच नेत्यांनी इंदिरा गांधी यांचा गौरव ‘रणचंडिका’ म्हणून केला.

काळ नेता घडवित असतो. राहुल गांधींनी अध्यक्षपद घ्यावे, घेऊ नये हा त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद असल्याशिवायही नेतृत्व करता येत नाही, असे काहीही नाही. काँग्रेसमध्ये आता मोदी सरकारविरुध्द हिमतीने बोलणारे फक्त राहुल गांधीच आहेत. या बे दुणे चार म्हणजे २४ पैकी एकही तथाकथित नेता राहुल गांधींसारखे मोदीविरोधात बोलत नाही. जिथपर्यंत रस्त्यावर उतरून या सरकारच्या खोट्या घोषणा, वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, अंबानी, अदानीला देशाची एक-एक संस्था विकून टाकण्याची प्रवृत्ती याविरोधात रस्त्यावर उतरावेच लागेल. जो कोणी उतरेल, त्याच्यामागे लोक जातील हे लिहून ठेवा. घाट चढताना चढाव असतात, एका टप्प्यावरती पोहोचलो की घाट संपतो. एका उंचीवर गाडी येते. नंतर जो काही असतो तो उतार असतो.

मोदी महाराज अशा उंचीवर आज आहेत की इथून पुढे त्यांचा उतारच सुरू होणार. त्यासाठी नेमके काय केले पाहिजे? याचे राजकीय आकलन होण्याची कुवत अहमदभाईंमध्ये होती. त्यामुळे प्रत्यक्षात रस्त्यावर न उतरता कोणाला कसे आंदोलनात उतरवावे हे त्यांना समजत होते. आज गरज आहे ती प्रत्येक राज्यातला एक एक ‘बघेल’ शोधायची. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर महाराष्ट्रात काँग्रेस आज चौथ्या नंबरवर आहे. चौथा नंबर का? कारण चारच पक्ष आहेत. सत्तेत काँग्रेस पक्ष आज आहे. पण ‘सत्तेत आहोत’ म्हणून लोकांचे प्रश्न उचलायचे नाहीत असे मानण्याची गरज नाही. लोकांचे प्रश्न उचलून रस्त्यावर येईल अशांना प्रदेश अध्यक्ष करा. नाना पटोले हा सर्वोत्तम पर्याय. विधानसभेचे अध्यक्षपद सोडायची त्यांची तयारी आहे. ‘सत्तेचा त्याग’ करण्याची ज्याची तयारी आहे, त्यामागे लोक जातात. नानांचा चेहरा लोकांना आवडणारा चेहरा आहे. काँग्रेसच्या आजच्या ४६ आमदारांत एकट्या विदर्भातील १९ आमदार आहेत. नानांना अध्यक्ष करा. ते एकट्या विदर्भातून ४६ आमदार निवडून आणतात की नाही ते बघा. ८० आमदारांचा आकडा गाठणे अजिबात अवघड नाही.

आ. भारतनाना भालके अनंतात विलीन

जुन्या चेह-यांना जरा बसवा. सर्व जाती-धर्मातील तरुणांना संधी द्या. एकाच दुरडीत सगळ्या भाक-या वाढू नका. फरक पडतो की नाही बघा. सर्व छोट्या-मोठ्या समाजाला जवळ करा. मोदी भावनात्मक मुद्दे मोठे करून लोकांना वेडं करताहेत. आर्थिक मुद्यावर लोक कधीही गर्दी करत नाहीत. गेल्या ५० वर्षांत महागाई, वाढती महागाई हा गर्दीचा विषय कधीच झाला नाही. गंगा नदी, गाय, राममंदिर या विषयाच्या मागे लोक गर्दी करतात. आता ते विषय संपल्यामुळे हुशार भाजपवाल्यांनी मथुरेतील कृष्णमंदिर विषय शिल्लक ठेवलेला आहे. राम-कृष्ण हे विषय संपले की नवे भावनात्मक मुद्दे काढले जातील. देशाचं सगळं राजकारण जात, पैसा, भावनात्मक मुद्यांभोवती फिरत ठेवलं जात आहे. मोदींना ही गोष्ट समजलेली आहे. अंबानी, अदानी आणि तत्सम उद्योगपती हे काही त्यांच्या सत्तेला आव्हान देऊ शकणार नाहीत कारण ते तर त्यांच्या खिशात आहेत. कारण त्यांचा मतलब धंद्यापुरता आहे. दुसरा वर्ग गरीब कष्टक-यांचा. या गरीब कष्टक-यांच्या नावावर ५-६ हजार बँक खात्यात चढवून दिले की तो त्या पैशाची चर्चा ५-६ वर्षे करीत राहतो.

गरीब कष्टकरी भगिनीला गॅसचा पहिला बाटला मोफत दिला की त्यावर होणा-या रसोईची जाहिरात पंतप्रधानांच्या फोटोसह कामाला येते! राहिला मध्यमवर्ग. त्यांच्याकरता गंगा आणि राममंदिर विषय पुरेसे आहेत. मध्यमवर्गाला सातवा वेतन आयोग मिळाला की तो खुश. शिवाय प्रसार माध्यमं कशी हातात ठेवायची, हे मोदींना कळलेले आहे. या प्रसार माध्यमाचं तंत्रज्ञान सॅम पित्रोदा यांची सेवा घेऊन राजीव गांधी यांनी या देशात आणले. राजीव गांधींचे सरकार गेल्यावर त्याच तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन त्यावेळचे टेलीकॉम मिनिस्टर उन्नीकृष्णन यांना हाताशी धरून आधी सॅम पित्रोदांना बदनाम केले आणि त्यांच्या खांद्यावर तलवार ठेवून राजीव गांधींवर वार केले. हे तंत्रज्ञान या देशात आणण्यासाठी केवढा प्रचंड खटाटोप, मेहनत, बुध्दिकौशल्य, सॅम पित्रोदा आणि त्यांची टीम -त्यात विजय भटकरही- आहेत. त्यांचे कौशल्य पणाला लागले. पण सॅम पित्रोदा यांची केलेली बदनामी चवीने वाचण्यात आणि सत्य समजून न घेण्यात मध्यमवर्गच पुढे आहे. (पुढे सॅम पित्रोदा निर्दोष ठरले, उन्नीकृष्णन यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पण तिथपर्यंत भाजपाचे काम होऊन गेले होते) प्रचारात हेच सर्व तंत्र ज्यांना अवगत आहे आणि ज्यांच्या हातात पैसा आहे, तेच आता येथून पुढे राजकारणात यशस्वी होतील. कारण याच तंत्रावर यश मिळतेच हे भाजपला माहीत झालेय. हा चक्रव्यूह भेदण्याची क्षमता ज्यांच्याजवळ आहे तोच भाजपला पराभूत करू शकतो.

अहमदभाईंची आठवण याचकरिता येते की राजकीय चिंतनाचे बुध्दिकौशल्य आणि जिल्हावार माणसांची माहिती त्यांना होती. काँग्रेसकडे आज तसा नेता नाही. नुसत्या भाषणाने विजय मिळणार नाही. सगळ्या युक्त्या वापराव्या लागतील. काँग्रेस नेत्यांच्या पुढे-पुढे करणारे कोण आणि गाव पातळीवर काम करणारे कोण, यातली निवड करण्याची क्षमता नेत्याला हवी आणि म्हणून जे सत्ता सोडायला तयार आहेत, त्यांना पक्षाच्या अध्यक्षपदी आणा. तालुकाध्यक्ष आणि जिल्हाअध्यक्ष त्या-त्या जिल्हा आणि तालुका कार्यकर्त्यांना ठरवू द्या. दिल्लीवाल्यांना नव्हे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर ६ विभागांना ६ कार्याध्यक्ष द्या. सगळ्या जिल्ह्यांचे अध्यक्ष नेमणूक करा. आता किती जागा रिकाम्या आहेत? किती वर्षे रिकाम्या आहेत? सर्व जिल्हा व तालुका अध्यक्षांची प्रांताचे अध्यक्ष विभागवार बैठक महिन्यातून एकदा घेतील. त्या अध्यक्षांना मुंबईत बोलावू नका. संगठन बांधताना या सगळ्या जबाबदा-या घेऊन काम करणारे कोण, हे शोधून काढा.

अहमदभाईंची जागा घेणारे कोणीही नाही. मुकुल वासनिक, अविनाश पांडे माझे मित्र आहेत पण वर्षानुवर्षे संघटनेत राहून काम केल्यावर विदर्भातून ते स्वत:ही निवडून येत नाहीत व त्यांनी दिलेल्या उमेदवारालाही निवडून आणता येत नाही, याचे ऑडिट करा. व्यक्ती समोर न ठेवता पक्ष समोर ठेवा. कोणतेही बदल पक्षात केले तरी पक्षाचे आता जेवढे नुकसान झालेय त्यापेक्षा अधिक नुकसान नक्कीच होणार नाही. म्हणून दोन्ही हातात झाडू घेऊन साफसफाई करण्याची गरज आहे. ज्या पक्षाचे १९५७ साली फक्त दोन खासदार होते. (अटलबिहारी वाजपेयी आणि प्रेमजीभाई आशर). तो पक्ष २८२ वर ४० वर्षांनी पोहोचलाच ना? इस्रायलने वाळवंटाचे नंदनवन केले. इथे जे नंदनवन होते त्याचे वाळवंट का झाले? याचा शोध घेतलाच पाहिजे. सत्ता मिळवण्यासाठी आधी सत्तेचा त्याग करावा लागतो. याला ज्यांची तयारी आहे तेच नेते पक्ष मोठा करू शकतील.

नाना पटोले एक वाक्य छान बोलले. ‘काँग्रेस पक्ष आहे म्हणून मी विधानसभेचा अध्यक्ष आहे’ हे सत्य ज्याला कळले तो पक्ष वाढवू शकतो. चांगले नेते स्वर्गवासी झाल्यानंतर काही दिवसांचा शोक समजू शकतो. धर्मशास्त्रात १३ दिवसांचे सुतक ठेवलेय. १४ व्या दिवशी गोड जेवण करून कामाला लागायचे असते. माधवराव, राजेश पायलट, विलासराव, पतंगराव, आर. आर. आबा, अहमदभाई या सर्वांच्या निधनाने पक्षाचे नुकसान झालेच आहे. पण त्यांच्या जागेला न्याय देतील असे नेते शोधावे लागतील. नवीन पिढीवर विश्वास टाकावा लागेल. तर पक्ष उभा राहणे फार अवघड नाही. काँग्रेसकडे राजकीय पक्ष म्हणून पाहू नका. या सव्वाशे कोटींच्या देशात सर्व धर्म, अनेक जाती, असंख्य पोटजाती, प्रांत, भाषा, पोषाख, संस्कृती, खान-पान एवढी विविधता आहे. या सर्वांच्या मागे एकतेची भावना सव्वाशे वर्षांपूर्वी काँग्रेसने निर्माण केली. हा विचार पक्षात रुपांतरित झाला त्याचे नाव काँग्रेस पक्ष आणि म्हणून हा विचार जिवंत ठेवण्यासाठी जाती, पोटजाती आणि धर्मात देश विभागला जाऊ नये म्हणून या विचाराचे पुरस्कर्ते हीच काँग्रेसची खरी शक्ती आहे.

मधुकर भावे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या