24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeविशेषमहागणपती

महागणपती

एकमत ऑनलाईन

अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे.अष्टविनायकांपैकी सर्वांत शक्तिशाली असे हे महागणपतीचे रूप आहे. रांजणगाव येथील महागणपतीची स्थापना भगवान शंकरांनी केली असे म्हटले जाते. मंदिर पूर्वाभिमुख असून इंदूरचे सरदार किने यांनी सभामंडप तर गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधला आहे. येथील ओव-या पेशव्यांचे सरदार पवार व शिंदे यांनी बांधल्या आहेत. मंदिर बांधताना स्थापत्य कलेचा आधार घेत उत्तम दिशा साधन साधल्यामुळे उत्तरायण आणि दक्षिणायन यांच्या मधल्याकाळी सूर्यनारायण किरणरूपी सहस्त्रभुजांनी गणेश मूर्तीच्या गाभा-यात प्रवेश करून मूर्तीवर तेजाचे जणू अभिषेकच करताना भासतात.

दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे. अशा वेळी शेंदूर लावलेली महागणपतीची मूर्ती अधिकच आकर्षक भासते. गाभा-यातील मूर्ती पूर्वाभिमुख, रुंद कपाळाची, डाव्या सोंडेची, आसन घातलेली आहे. दोन्ही बाजूस रिध्दि-सिद्धि उभ्या आहेत. मूळ मूर्तीला ‘महोत्कट’ असे नाव असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, ती तळघरात ठेवलेली आहे. सभामंडपातून आत गेल्यावर गाभा-यात गणेशाची डाव्या सोंडेची आसन घातलेली रेखीव मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ रुंद असून दोन्ही बाजूंना रिद्धी-सिद्धी आहेत. या मूर्तीच्या खालच्या बाजूला तळघर आहे.

भाद्रपद महिन्यात येथे घरोघरी गणेशाची स्थापना करण्याची प्रथा नाही तर मंदिरातील गणेशाची पूजा केली जाते. श्री व्यंकटेश हात्रीच, पुणे यांच्या वतीने रोज सकाळी शिरा वाटप करण्यात येतो. अष्टविनायकांतील सर्वांत शक्तिमान असे मानल्या जाणा-या महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन पद्धतीचे आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की उत्तरायण व दक्षिणायन याच्या मधल्या काळात सूर्याची किरणे महागणपतीच्या मूर्तीवर पडतात. मंदिराचे प्रवेशद्वार भव्य असे असून प्रवेशद्वारावर जय-विजय हे द्वारपाल आहेत. मंदिराचे स्थान इ. स. दहाव्या शतकातील आहे.

श्री विघ्नेश्वर
ओझरचा विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे. देवालय पूर्व दिशेकडे तोंड करून आहे. देवालय चारही बाजूंनी दगडी तटाने बंदिस्त करून टाकलेले आहे. या दगडी तटावरून चालण्यासाठी पायवाटही आहे. देवाच्या मूर्तीसमोर दहा फुटी ऐसपैस मंडप आहे. मंडपाच्या दारातून बाहेर पडले की काळ्या पाषाणातला उंदीर आहे. या मंडपाला लागूनच दुसरा ऐसपैस असा सभामंडप आहे. त्यापुढे आणखीन एक दहा फुटांचा सभामंडप आहे. त्याच्यापुढे दगडी फरशीचे विस्तृत पटांगण आहे. या पटांगणात दोन दीपमाळा आहेत. देवळाचा घुमट मोठा कलाकुसरीचा आहे. त्यावर शिखर आणि सोनेरी कळस आहे. देवालयाचा परिसर फारच रमणीय आहे.

श्रींची मूर्ती लांब-रुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वांत श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. विघ्नहराची मूर्ती महिरपी डौलदार अशा कमानीत आहे. भाद्रपद व माघ चतुर्थी या दिवशी उत्सव साजरे होतात. अष्टविनायकांतील सर्वांत श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जाणारा व विघ्नाचे हरण करणारा विघ्नेश्वर कुकडी नदीच्या तीरावर वसलेला असून ते गणपतीचे एक जागृत स्थान आहे. वसईचा किल्ला जिंकून परत येत असतानाच, चिमाजी अप्पांनी या देवालयाचा जीर्णोद्धार करविला. श्रीमंत बाजीराव पेशवे हे देखील या विघ्नेश्वराचे महान भक्त होते. मंदिराला दगडी तटबंदी आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराचा कळस व शिखर सोन्याचा आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दगडात कोरलेले भालदार-चोपदार आहेत. महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन उंच दीपमाला नजरेस पडतात. मंदिरात एकात एक अशी सभामंडपाची रचना असून प्रवेशद्वारातन प्रवेश करताच काळ्या पाषाणातील उंदराची मूर्ती आहे. मंदिराच्या भिंतीवर चित्रकाम केलेले आहे. दोन सभामंडपांतून आत गेल्यावर देवाचा गाभारा आहे. गाभा-यात डौलदार कमानीत बसलेली पूर्णाकृतीतील विघ्नेश्वराची डाव्या सोंडेची मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यांत माणके तसेच कपाळावर व बेंबीत हिरे आहेत. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पितळाच्या मूर्ती आहेत.

 

श्री गिरिजात्मक
अष्टविनायकांपैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक आहे. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीव काम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पाय-या आहेत. जुन्नरजवळ लेण्याद्री हा लेणी असलेला पर्वत असून गिरिजात्मकाजाचे मंदिर डोंगरावरील आठव्या गुहेत आहे. देवळात जाण्यासाठी ३६७ पाय-या आहेत. डोंगरात कोरलेले हे मंदिर अखंड अशा एकाच दगडात कोरलेले असून दक्षिणाभिमुख आहे. दालनात गणपतीची प्रतिमा असून त्याला एकही खांब नाही. तसेच दालन आकाराने मोठे आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या गिरिजात्मजाच्या मूर्तीवर उजेड असतो.

मंदिरात दगडात खोदलेली गिरिजात्मजाची उत्तराभिमुख व ओबडधोबड मूर्ती असून गणेशाची मान डाव्या बाजूला वळलेली असल्याने गणपतीचा एकच डोळा दिसतो. अष्टविनायक ही आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती मंदिरे आहेत. महाराष्ट्रातील आठ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना, मूर्तींना विशेष महत्त्व आहे. या आठ ठिकाणच्या श्री गणपतीच्या मंदिरांना मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या