34.7 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home विशेष महानिर्वाण शताब्दी विशेष : गांधीजी, गोखले आणि लोकमान्य टिळक

महानिर्वाण शताब्दी विशेष : गांधीजी, गोखले आणि लोकमान्य टिळक

एकमत ऑनलाईन

लोकमान्य टिळकांनी देह ठेवला, त्याला १ ऑगस्ट रोजी १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त लोकमान्यांच्या पुण्यस्मृतीला प्रथम माझे वंदन. लोकमान्य टिळक, नामदार गोपाळकृष्ण गोखले आणि महात्मा गांधी या तिघांचेही नाव आणि विचार एका वेळी डोक्यात आणला तर पहिल्यांदा जाणवतो तो मुद्दा म्हणजे, तिघांचेही ध्येय समान होते. मार्गामध्ये कदाचित वेगळेपणा असेल. हा वेगळेपणा म्हणजे मतभेद आहेत; पण मतभेद म्हणजे शत्रुत्व नाही. याचे सगळ्यात मुख्य कारण तिघांचेही ध्येय एकच होते, आज ना उद्या भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळवून देणे.

यापैकी नामदार गोपाळकृष्ण गोखले हे भारताच्या राष्ट्रीय सभेतील नेमस्त गटातले. मवाळ गटातले. नामदार गोखलेंचे सबंध चरित्र आणि चारित्र्य पाहिल्यास ते लोकमान्य टिळकांप्रमाणेच देदीप्यमान. सर्व व्यक्तिमत्त्वाचे समर्पण देशाला. एक काळाचे विलक्षण भान दिसून येते की, समाजाची, देशाची तत्कालीन स्थिती पाहता आपल्याला नेमस्त मार्गाने पुढे सरकले पाहिजे; म्हणजे भारतीयांचे राजकीय हक्क मिळवण्यासाठी अर्ज-विनंत्यांच्या राजकारणाचाच आधार घेतला पाहिजे. त्यांना पूर्ण भान होते की, उद्या कदाचित परिस्थिती बदलली तर अधिक आक्रमक रस्ते स्वीकारता येतील. ते आक्रमक रस्ते दाखवून देण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले.

लोकमान्यांच्या लेखी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या विधानामधला उत्तरार्ध अधिक महत्त्वाचा आहे- आणि तो मी मिळवीनच. ! याचा अर्थ असा की, जन्मसिद्ध हक्क असून भागत नाही तर त्यासाठी लढावं लागतं आणि तो मिळवावा लागतो. लोकमान्यांनी अर्ज-विनंत्यांचे राजकारण नाकारले. मायबाप ब्रिटिश सरकारपुढे आम्ही हात जोडणार नाही. आमचे हक्क लढून, संघर्ष करून मिळवू हा रस्ता त्यांनी स्वीकारला.

Read More  ती धीट मराठी मूर्ती कणखर ताठ….

एका फार महत्त्वाच्या प्रसंगामध्ये टिळक आणि गोखले यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळेपणा फार ठळकपणाने उठून दिसतो. पुण्यामध्ये प्लेगची साथ होती आणि ती आवरण्यासाठी रँड या अधिका-याच्या नेतृत्वाखाली पुण्यावर काहीसे अन्याय-अत्याचार सुरू होते. त्याच्याविरुद्ध टिळकांनी आवाज तर उठवलाच; इतकंच काय अप्रत्यक्षरीत्या चाफेकरांचे प्रेरणास्थानही टिळक होते. त्यावेळी गोपाळकृष्ण गोखले लंडनमध्ये वेलबी आयोगापुढे साक्ष द्यायला गेले होते. त्यावेळपर्यंत गोखलेंची प्रतिमा ही विचारी, प्रगल्भ आणि जबाबदारपूर्वक विधाने करणारे व्यक्तिमत्त्व अशी ब्रिटिशांच्या मनातही होती. गोखलेंना पुण्यातून अनेक पत्रं गेली, ज्यामध्ये ब्रिटिशांनी पुण्यात चालवलेल्या अत्याचारांचे वर्णन होते. त्यात ब्रिटिश सोजिरांनी स्त्रियांच्या अंगावरही हात टाकले किंवा अब्रू लुटली असे संदर्भ होते. गोपाळकृष्ण गोखलेंची ब्रिटनमध्ये व्याख्यानमाला सुरू होती. त्याच्या एका सत्रामध्ये त्यांनी हा उल्लेख केला की, ब्रिटिश गो-या सोजिरांनी पुण्यात स्त्रियांच्या अब्रूवर हात टाकला.

गोपाळकृष्ण गोखलेंसारख्या व्यक्तीने असे म्हटल्यावर प्रचंड गोंधळ माजला. तिकडच्या वृत्तपत्रांनी जाब विचारणे सुरू केले. ही बाब ब्रिटिश संसदेपर्यंत गेली. ब्रिटिश सरकारने गोखलेंपाशी आग्रह धरणे सुरू केले की तुम्ही जे विधान केले आहे त्याचे पुरावे द्या; नाही तर माफी मागा. हे सर्व होईपर्यंत गोखले जहाजावर बसून भारताकडे यायलाही निघाले होते. याच्या वार्ता टिळकांना कळल्या. टिळक आणि गोखले राजकीयदृष्ट्या एकमेकांचे कट्टर विरोधक. पण ब्रिटिश सरकार गोखलेंना माफी मागण्याचा आग्रह धरते आहे हे समजल्यावर इकडे पुण्यामध्ये टिळकांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आणि जहाजावर गोखलेंना तारा मागून तारा पाठवणे सुरू केले की तुम्ही माफी मागू नका, मी तुम्हाला सर्व पुरावे गोळा करून तुम्ही मुंबईत उतराल तेव्हा देतो.

या तारा ब्रिटिश सरकारने गोखले यांना मिळू दिल्या नाहीत आणि जहाजावरच गोखलेंवर दबाव चालू केला की, माफी मागा, अन्यथा मुंबईत उतरताक्षणी तुम्हाला अटक करू. मुंबई बंदरात जहाज आल्यानंतर गोपाळकृष्ण गोखलेंनी माफी मागितली. पण आपण अशा एका वेळी झुकलो, वाकलो; आपण ताठ मानेनं उभं राहिलो नाही, याची तीव्र खंत पुढे सर्व काळ गोखलेंच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दिसून आली. या माफीने आलेली निराशा दूर करून गोखले पुन्हा कामाला लागले; पण त्यावेळी एक वेळ सर्व राजकारण आणि समाजकारण सोडून देऊन योगसाधनेला जीवन अर्पण करावं, असा विचारही गोखलेंनी केला होता. याउलट टिळकांना दोनदा राजद्रोहाच्या आरोपाला आणि तुरुंगवासाला सामोरं जावं लागलं. त्यातला दुसरा म्हणजे राजद्रोहाचा खटला मुंबईला चालला १९०८ मध्ये. त्यावेळी टिळकांवरही प्रचंड दबाव सतत आणला जात होता की, माफी मागा आणि राजकीय जीवनामध्ये पुन्हा दिसणार नाही असे वचन द्या, तर या सर्वांतून मुक्तता करू. पण तेव्हा लोकमान्य टिळक सह्याद्रीचा अभंग आणि अखंड खडकासारखे उभे राहिले. नुसते नाही तर त्यांनी मंडालेचा तुरुंगवासही सोसला.
इतकंच नव्हे तर, मंडालेतील तुरुंगवासादरम्यान गीतारहस्य सारखा विसाव्या शतकातला सर्वश्रेष्ठ मराठी ग्रंथ तयार केला. या त्यागामुळे आणि कणखरपणामुळे लोकमान्यांचे मोठेपण अधिक उभारून दिसते.

Read More  चिंता वाढली : लातूर जिल्ह्यात कोरोनाबळीचे शतक

गोखले आणि टिळक या दोघांचेही गांधीजींशी संबंध आले होते. गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील कामाकडे तर गोपाळकृष्ण गोखलेंचे अत्यंत बारकाईने लक्ष होते. यातून नामदार गोखलेंची फार मोठी दूरदृष्टी दिसून येते. गांधीजी हे भारताचा पुढचा नेता होऊ शकतात, हे त्यांनी ओळखले होते. म्हणून दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजींच्या आंदोलनांना मदत करायला आणि त्यांच्या चळवळीत सहभागी होण्यासाठी गोखलेंनी चार्ली एस. अँड्र्यूज हा ख्रिश्चन मिशनरी आणि जर्मन मिशनरी हार्मान कालेम्बाक यांना पाठवलं होतं. पुढं भारतात त्यांची गरज आहे, हे गांधीजींना गोपाळकृष्ण गोखलेंनीच सांगितले. त्या सूचनेनुसार ९ जानेवारी १९१५ रोजी खरोखरीच गांधीजी भारतात परतले. परतल्यानंतर कुठलेही आंदोलन न करता देशाची स्थिती पाहा आणि मग काम हाती घ्या, असे त्यांनी गांधीजींना सांगितले. त्यानुसार खरोखरच गांधीजींनी एक वर्ष सर्व काम थांबवून देशाची स्थिती पाहिली आणि चंपारण्यपासून कामाला सुरुवात केली होती. त्या एक वर्षाच्या काळात गांधीजींची आणि लोकमान्य टिळकांची गायकवाड वाड्यामध्ये भेट झाली होती. त्या भेटीमध्ये गांधीजींनी आपला अहिंसक मार्गाने पुढे जाण्याचा निश्चय प्रकट केला होता. लोकमान्यांनी त्याला असहमती दर्शवली होती.

लोकमान्य स्वत: सनदशीर मार्गाने चळवळ करत होते. सशस्त्र चळवळींना त्यांचा अजिबातच विरोध नव्हता. उलट त्यांनी एके वेळी अफगाणिस्तानच्या आमिराकडे आपले दूत पाठवून आजमावून पाहिले होते की, भारतात सशस्त्र उठाव करायला अफगाणचा आमिर मदत करेल का ! ऑक्टोबर १९१७ मध्ये बोल्शेविक क्रांती झाल्यानंतर ही काही तरी संपूर्ण जगाला हादरवून सोडणारी आणि भविष्यकाळात जगावर मोठा प्रभाव पाडणारी घटना आहे, असे टिळकांना वाटले. त्यातूनच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी काही सहकार्य मिळू शकते का यासाठी लेनिनकडे टिळकांनी आपले दूत पाठवले होते.
पुण्यातील भेटीमध्ये आपले मतभेद सांगून टिळक गांधींना म्हणाले होते की, तुमच्या पाठिशी लोक यायला तयार असतील तर मी तुमचा पहिला अनुयायी ठरेन. खरं म्हणजे हे विधान करताना लोकमान्य टिळक हे भारताचे अनभिषिक्त सम्राट होते.

भारतीय असंतोषाचे जनक होते. तेल्यातांबोळ्यांचे पुढारी होते. एवढंच नाही तर उत्तर भारतात त्यांचा उल्लेख तेव्हाही आणि आजही – भगवान टिळक असा केला जात असे आणि केला जातो. अशा टिळकांनी गांधीजींना ..तर मी तुमचा अनुयायी असेन असं म्हणणे ही फार मोठी गोष्ट आहे. पुढं गांधीजींनी आपल्या विचारात टिळक आणि गोखले यांचे त्यांना आवडलेले आणि भावलेले वर्णन केले आहे. त्यात गांधीजी म्हणतात की, लोकमान्य टिळक हे एखाद्या उत्तुंग शिखराप्रमाणे आहेत. गोपाळकृष्ण गोखलेंचे वर्णन करताना गोड्या पाण्याचं छान सरोवर जिच्या काठावर पांतस्थ बसून आपली तहान भागवू शकतो किंवा विश्रांती घेऊ शकतो असं गांधीजींनी केलंय. या दोन उपमांचा एक अर्थ असा होऊ शकतो की, टिळकांचं मोठेपण इतकं मोठं आहे की त्याने आपल्याला अवाक् व्हायला होतं. याउलट गोपाळकृष्ण गोखलेंविषयी जवळीक अधिक वाटते.

Read More  ‘कोरोना’यण : घश्याला कोरड पडतिया

आपल्याला असे दिसून येईल की, गांधीजींनी नामदार गोखलेंना आपला राजकीय गुरू मानून भाषा त्यांची वापरली; पण प्रत्यक्षात लोकमान्य टिळकांचा कार्यक्रम अमलात आणला. म्हणजे भाषेच्या बाबतीत गांधीजी नेमस्ताहून नेमस्त; पण कार्यक्रमाच्या बाबतीत जहालाहून जहाल होते. याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे गांधीजींनी केलेला चतु:सूत्रीचा स्वीकार. ही चतु:सूत्री प्रथम दिली लोकमान्य टिळकांनी. पण तिचा राष्ट्रीय पातळीवर आविष्कार करून त्याचे जनआंदोलनांमध्ये रुपांतर गांधीजींनी केले.

स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सेनानी आचार्य जावडेकर यांचा स्वातंत्र्य लढ्यावरचा एक अजरामर ग्रंथ आहे, त्याचं नाव आधुनिक भारत . या ग्रंथाचा उल्लेखही गीतारहस्या नंतरचा मराठीतील सर्वोत्तम ग्रंथ असा होतो. माझ्या वैयक्तिक मते तो खरोखरच तसा आहे. या ग्रंथामध्ये आचार्य जावडेकरांनी साक्षी-पुराव्यांनिशी असे दाखवून दिले आहे की, स्वातंत्र्य चळवळीचा पाया भरला लोकमान्य टिळकांनी. त्या पायावर गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीची इमारत उभी केली.
लोकमान्यांच्या निधनानंतर एकदा गांधीजी पुण्यात आले होते. त्यावेळचं पुणे आणि महाराष्ट्र हे अजूनही टिळकपंथीय होते. त्यामुळे गांधीजींच्या अहिंसा आणि दुसरा गाल पुढे करणे यावर पुणे आणि महाराष्ट्राचा फारसा विश्वास नव्हता. त्यामुळे गांधीजींच्या स्वागतालाही कुणी गेले नव्हते. पण गांधीजी असे चतुर होते की, त्यांनी पुणे स्टेशनवर उतरल्या उतरल्या अशी इच्छा व्यक्त केली की, भगवान टिळक ज्या जागी बसत त्याचं मला दर्शन घ्यायचंय. आता पाहुणा येतोच म्हटल्यावर त्याला नको असे शनिवार- नारायण -सदाशिवही म्हणत नाहीत. त्यानुसार गांधीजी गायकवाड वाड्यावर आले.

लोकमान्यांच्या विचारांचा राजकीय वारसा गेला होता साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण केळकर यांच्याकडे. गांधीजींच्या स्वागतासाठी न. चिं. केळकर केसरी वाड्याच्या उंबरठ्याच्या अलीकडे उभे होते. गांधीजी बग्गीतून उतरतात न उतरतात तोच केळकरांनी त्यांना पहिलं वाक्य ऐकवलं ते म्हणजे सो, यू हॅव कम टू एनिमीज कॅम्प . पण गांधीजी हसले आणि म्हणाले, नो, माय अपोनंटस् कॅम्प! या उत्तरामध्ये लोकशाहीचं बीज आहे. वेगळे विचार म्हणजे शत्रू नसतात. उलटा आदरही असू शकतो; पण मी माझ्या विचारांना पक्का आहे. असा या तिघांचाही लोकशाही वारसा आहे. गोखले, गांधी आणि टिळक या तीनही व्यक्तिमत्त्वांमधला सर्वांत महत्त्वाचा समान धागा म्हणजे भारताच्या अध्यात्म विचारांवरचा विश्वास. ते अध्यात्म रोजच्या जगण्यात आणणे म्हणजे ध्यानधारणा आणि योगसाधना आणि त्यामुळे अध्यात्म विचारांचा सर्वांत उत्तम आविष्कार असलेली भगवद्गीता हे श्रद्धास्थान. अध्यात्म विचार, योग आणि भगवद्गीता हे सुदैवाने आजही भारताचं बळ आहे. या तिन्ही व्यक्तिमत्त्वांकडून आधुनिक काळात आपण जेवढं ते शिकू तेवढा भारताचा भविष्यकाळ अधिक उज्ज्वल घडेल.

अविनाश धर्माधिकारी,
माजी सनदी अधिकारी

शब्दांकन : हेमचंद्र फडके

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,446FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या