18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeविशेषसुयोग्य गुंतवणुकीने करा सीमोल्लंघन

सुयोग्य गुंतवणुकीने करा सीमोल्लंघन

एकमत ऑनलाईन

सध्या नवरात्रीची लगबग चालू आहे. दोन दिवसांवर दसरा आला आहे. कोरोनाची तीव्रता कमी झाल्यामुळे यावर्षी सीमोल्लंघन उत्साहात व जोशामध्येच होणार आहे. नवरात्रीच्या काळात अनेक महिला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करतात. त्याचप्रमाणे त्यांची गुंतवणूक ही साडीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या रंगाची, उपयोगाची असायला हवी. अनेक महिलांच्या घरातील कपाटात साड्यांचा पोर्टफोलिओ हा आकर्षक व वेगळ्या प्रकारचा असतो. तशा प्रकारचा आग्रह धरीत असतात. अशा महिला अथवा पुरुष गुंतवणूक करीत असताना, वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक, वेगवेगळ्या योजनेमध्ये, वेगवेगळ्या उद्दिष्टासाठी, घरातल्या वेगवेगळ्या मेंबरसाठी करायला हवी.

तशी गुंतवणूक क्वचितच बोटावर मोजण्याइतपतच काही व्यक्तींची असते. यासाठी अशा सणाच्या काळात गुंतवणूकदाराने गुंतवणूक करीत असताना गुंतवणुकीचे सीमोल्लंघन करायला हवे. अनेक गुंतवणूकदार पगारदार वर्ग किंवा व्यावसायिक असो, म्युच्युअल फंडामध्ये दरमहा थोडी थोडी रक्कम भरण्याचा सर्वोत्तम सोयीचा पर्याय सध्या उपलब्ध आहे. अशा लोकप्रिय पर्यायांमध्ये अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनला सर्वांचा प्राधान्यक्रम उपलब्ध असतो.

शेअर बाजारातल्या गुंतवणुकीतील जोखीम मर्यादित करून जास्त फायदा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार एस. आय. पी. द्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करीत असतात. अनेक वेळा जुन्या गुंतवणूकदारांसोबतच नवीन गुंतवणूकदारांचा यामध्ये प्रवेश होतो. अनेक वेळा नवीन गुंतवणूकदार अपु-या माहितीमुळे, उद्दिष्टरहित गुंतवणूक केल्याने गुंतवणुकीचा सर्वोत्तम फायदा मिळण्यापासून वंचित राहतात. यासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराने एस. आय. पी. द्वारे गुंतवणूक करीत असताना काही चुका टाळल्यास, त्यांची गुंतवणूक ही सर्वोत्तम नक्कीच ठरू शकते.

नवीन गुंतवणूकदार हा शेअर बाजारामध्ये जेव्हा तेजी असते तेव्हा प्रवेश करतो. अशा प्रकारच्या बातम्या विविध वृत्तपत्रांत येतात, टीव्हीवर अशा बातम्या ऐकल्या जातात. त्याचा प्रभाव सामान्य गुंतवणूकदारावर जास्त होतो. नवीन गुंतवणूकदार अशा अपु-या माहितीद्वारे भावनिक स्वरूपाची गुंतवणूक करीत असतात. नवीन गुंतवणूकदारांना तेजीचा जास्त प्रभाव होतो. बाजारात जेव्हा जास्त तेजी असते, तेव्हाच ते प्रवेश करतात. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये संयम व शिस्तीची गरज भासते. नवीन गुंतवणूकदारात गुंतवणूक करण्याचा प्रभाव ही चूक ठरण्याची शक्यता असते. अशा गुंतवणूकदारांनी फंडामध्ये गुंतवणूक करीत असताना थोडी थोडी गुंतवणूक करावी.

मग तेजी असो किंवा मंदी. त्या परिघाच्या बाहेर जाऊन एस. आय. पी. द्वारे गुंतवणूक केल्यास गुंतवणूक ही फायदेशीर ठरत असते. अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारांमध्ये मंदी आल्यास भावनिक स्वरूपाचा निर्णय घेऊन गुंतवणूक मोडत असतात. त्यात त्यांचे स्वत:चे नुकसान होते. वास्तविक पाहता कमीला खरेदी व जास्तीला विक्री या मूलभूत सिद्धांताविरुद्ध त्यांचे वर्तन असते. मेहनतीने उत्पन्न मिळवत असताना कमवलेली रक्कम अशा वर्तनामुळे तोट्यात जाऊ शकते, अथवा आर्थिक फटका त्यांना बसू शकतो. मंदीच्या काळामध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक चालू असेल तर गुंतवणूक मोडण्याचा विचार करू नये.

सामान्य गुंतवणूकदार, नवीन गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करीत असताना त्यांच्या आर्थिक गरजा विचारात घेत नाहीत. माझ्या मित्राने गुंतवणूक केली म्हणून मी गुंतवणूक करतोय. असे सातत्याने बोलले जाते. त्यातून नुकसान होण्याची शक्यता असते. आर्थिक उद्दिष्टाशिवाय केलेली गुंतवणूक म्हणजे ब्रेक नसलेल्या वाहनाने हायवेवरील प्रवास होय. ब्रेक नसलेले वाहन हायवेवर वेगवेगळ्या वळणावर धावत असेल तर, अपघात हा नक्कीच होणार. गुंतवणूक करीत असताना आर्थिक उद्दिष्टाशिवाय केलेली गुंतवणूक ही चुकीची ठरू शकते. उद्दिष्टाशिवाय केलेली गुंतवणूक चुकीच्या म्युच्युअल फंडामध्ये, चुकीच्या योजनेमध्ये होत असते. त्यामुळे संबंधित गुंतवणूकदाराला जास्त फायदा मिळविता येत नाही. हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अशा प्रकारची चूक नवीन गुंतवणूकदार करीत असतो.

सामान्य गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करीत असताना स्वत:ची जोखीम क्षमता किती आहे? हे समजून न घेता एखाद्या फंडामध्ये गुंतवणूक करीत असतो. त्यामुळे गुंतवणुकीमध्ये तोटा जास्त होण्याची शक्यता असते. वास्तविक पाहता गुंतवणूकदाराची जोखीम क्षमता, आर्थिक गरजा, गुंतवणूकदाराचे वय, गुंतवणूकदाराची मानसिकता, गुंतवणूकदाराची आर्थिक संपन्नता म्हणजे तो श्रीमंत वर्गातला आहे काय? मध्यमवर्गातील आहे काय? गरीब वर्गातील आहे? याचा विचार करूनच सुयोग्य गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीतील चूक व तोटा टाळता येऊ शकतो. तरुण वर्गाने गुंतवणूक करीत असताना इक्विटीमध्ये गुंतवणूक करावी. अशा वर्गाकडे जास्त जोखीम स्वीकारण्याची क्षमता असते. ज्येष्ठ नागरिकांनी मात्र गुंतवणूक करीत असताना कमी जोखीम योजनेमध्ये गुंतवणूक करावी. अल्प ते मध्यम काळात गुंतवणूक ही फायदेशीर ठरू शकते. पंच्याहत्तरीपेक्षा जास्त वय असणा-या ज्येष्ठ व्यक्तींनी दीर्घकालीन गुंतवणूक करू नये. असे केल्यास गुंतवणुकीचा फायदा त्याला कमी परंतु वारसदाराला जास्त मिळतो. हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

एका योजनेतून दुस-या योजनेमध्ये उड्या मारायची सवय अनेक गुंतवणूकदारांना असते. जसे झाडावरील चढलेले माकड एका फांदीवरून दुस-या फांदीवर उड्या मारते. गरज नसताना असे वर्तन जर करत असाल तर, गुंतवणुकीमधील फायदा कमी मिळतो. त्यातून तोटा किंवा आर्थिक फटकाच जास्त बसतो. असा नवखा वर्ग हा मित्राचे, इतरांचे अनुकरण जास्त करीत असतो. तशा प्रकारच्या गुंतवणुकीची गरज मला आहे काय? हा विचार त्यांच्या मनाला स्पर्श करीत नाही.सामान्य गुंतवणूकदाराने लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते, त्यानुसार कुटुंबातल्या गरजा वेगवेगळ्या असतात, त्यानुसार आर्थिक उद्दिष्टे देखील वेगळी असतात. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदाराने स्वत:च्या खिशाला परवडेल, पचेल अशा स्वरूपाची गुंतवणूक करणे गरजेचे असते. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक जर झाली असेल तर भविष्यकाळातील तिमाही अथवा अल्प काळातील फंडाचे मूल्य बदलते. पूर्वीच्या कामगिरीच्या तुलनेत भविष्यातील कामगिरी सुमार स्वरूपाची आढळते. त्यातून गुंतवणुकीचा भावनिक निर्णय घेतला जातो. ज्यामुळे अधिक तोटा होत असतो. अशा प्रकारचा तोटा टाळता येऊ शकतो. यासाठी गुंतवणूकदाराने थोडीशी वाट पाहावी लागेल. अशा गुंतवणूक योजनेस थोडासा वेळ द्यावा लागेल.

अनेक गुंतवणूकदार एसआयपीमध्ये सातत्याने गुंतवणूक करित नाहीत. हीच गुंतवणूक अर्ध्यामध्ये मोडत असतात. त्यामुळे अशा गुंतवणुकीमधून मिळणारा फायदा दुस-याकडे जातो. स्वत: मात्र तोटा करून घेतो. यासाठी गुंतवणूकदाराने गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत एसआयपीमध्ये खंड पडू देऊ नये. सामान्य गुंतवणूकदारांनी एसआयपीचा सखोल अभ्यास केल्यास जास्त फायदा यातून मिळविता येतो. बदलत्या काळानुसार एसआयपीमध्ये गुंतवणूकदारांची गरज लक्षात घेऊन, त्यात बदल होत आहेत. अशा बदलांना गुंतवणूकदारांचा प्रतिसाद जास्त आढळतो. असे बदल नवीन गुंतवणूकदाराने माहिती करून घेऊन त्याचा अधिक फायदा उठवायला हवा. जसे स्टेप-अप पर्याय, वाढती एसआयपी इत्यादी पर्यायांचा अधिक अभ्यास करावा.

एकंदरीतच या नवरात्रीच्या काळात गुंतवणूकदाराने आपला पोर्टफोलिओ हा वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या योजनेमध्ये, वेगवेगळ्या उद्दिष्टासाठी, वेगवेगळ्या जोखीम लक्षात घेऊन गुंतवणूकदारास गुंतवणूक केल्यास यातून जास्त फायदा मिळू शकतो. गुंतवणूक करीत असताना सामान्यत: होणा-या गुंतवणुकीतील चुका टाळून, नवीन विचाराच्या गुंतवणुकीचे सीमोल्लंघन करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वत:ची आर्थिक क्षमता वाढीस लागून गुंतवणूकदारांच्या कुटुंबातील सदस्य आनंदाचा गरबा खेळून प्रगतीचे नृत्य करतील. त्यातून आनंद, उत्साह व समाधान घरामध्ये नांदेल. त्याचप्रमाणे सर्वांचा सर्वांगीण विकास होऊ शकेल. यासाठी सकारात्मक विचारांचे सीमोल्लंघन करायलाच हवे.

प्रदीप गुडसूरकर
लातूर, मोबा.: ७०२०१ ०११४२

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या