23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeविशेषमनभावन श्रावण

मनभावन श्रावण

एकमत ऑनलाईन

श्रावणाची रुपं तरी किती न्यारी! त्याच्या आगमनाबरोबर मनाच्या हिंदोळ्यावर आठवणींचे झुलू लागतात. बालपणापासूनचा श्रावण आठवायला लागतो. त्याचं वर्णन करायला शब्दवैभवही अपुरं पडतं. मनाच्या गाभाºयात एक वेगळंच चित्र तयार होतं. या चित्रात सर्वात लक्ष वेधून घेतो तो मनभावन श्रावण!

आपल्या संस्कृतीत सहा ऋतुंचे सहा सोहळे सांगितले आहेत. प्रत्येक ऋतुचं वैभव काही वेगळंच. शब्दवैभवांनी हे ऋतुंचं सौंदर्यवैभव साकारायला गेलं तर ते कधीच शक्य होणार नाही. पण अनेक शब्दप्रभूंनी हे वैभव चितारण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी कालिदासापासून ते अलीकडच्या मंगेश पाडगावकरांपर्यंत अनेक शब्दसम्राटांनी आपापल्या परीने ऋतुंचे हे सो़हळे मनाच्या गाभा-यातून मोकळे केले आहेत. प्रत्येक सोहळ्याचं वेगळं वैभव असलं तरी वर्षाऋतुचं सौंदर्य काही आगळंच. सा-या ऋतुंची ही सम्राज्ञी तेवढ्याच दिमाखात येते आणि आपल्या अस्तित्त्वाचे मोहरे मागे ठेवून निघून जाते.

तिच्या पाऊलखुणा धुंडाळताना पहिलं दर्शन होतं ते श्रावणाचं. त्याचं आगमन झालं क वर्षाराणी हजर होत असल्याची जाणीव होते. युगानुयुगं लोटली तरी श्रावणाचं आणि त्याच्या बरोबरीने येणाºया वर्षाराणीचं कौतुक काही कमी झालेलं नाही. एखादा राजा जेवढ्या जल्लोषामध्ये दरबारात येतो त्याप्रमाणेच श्रावणही येतो. आपल्या आगमनाने तो रसिकांना झपाटून टाकतो. श्रावणाच्या आगमनाबरोबर ज्याच्या डोळ्यात आणि चेहºयावर आनंदाच्या लाटा उमटत नाहीत तो रसिकच नव्हे. आज इतर गोष्टींबरोबरच निसर्गही बदलल्याच्या गप्पा अनेकजण करतात. पण श्रावण मात्र आपलं रुप तसंच ठेवून आहे. निसर्ग किती का बदलेना पण आपण बदलायचं नाही असं जणू श्रावणाने ठरवूनच ठेवलेलं असावं.

श्रावण आला क तो रसिक मनाला साद घालतो. खरंतर त्याने साद घालायचीही आवश्यकता नाही. त्याच्या आगमनाबरोबर रसिक मनाच्या लेखण्या, चित्रकारांचे ब्रश काम करायला लागतात. आपोआपच ते त्याच्या या मनभावन रुपाकडे आकर्षित होतात. त्यांच्या लेखणीतून श्रावणाचं कौतुक वहायला लागतं आणि उत्कट निर्मितीचा आनंद त्यांना मिळतो. श्रावणामध्ये असं नेमकं आहे तरी काय असं आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही. सृष्टीचं सौंदर्य आणखीन वाढवण्याचं कसब त्याच्यामध्ये आहे. सृष्टीचं रुप कसं खुलवायचं हे त्याच्याकडूनच शिकावं.

Read More  रेणापूर शहरातील १८ स्वॅब तपासणीसाठी पाठवले

श्रावणराजा येताना त्याने सृष्टीसाठी हिरव्या शालूची भेट आणलेली असते. हा शालू तिने परिधान केला क तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. साºया सृष्टीत जणू हिरवाई पसरली आहे, असा भास होतो. श्रावणाने दिलेल्या या नवलाईचं वर्णन करण्यासाठी शब्दांचा खजीनाही अपुरा पडावा. असंख्य आठवणींचा नजराणा घेऊन श्रावण येतो आणि अनेकांना घायाळही करतो. बालपणीचा श्रावण, शाळेतला श्रावण, महाविद्यालयातला श्रावण, प्रौढ वयात भेटलेला श्रावण अशी कितीतरी रुपं मनाच्या कुपीतून बाहेर येऊ लागतात. कितीही वर्ष लोटली तरी या कुपीचा सुगंध काही कमी होत नाही. मनोदेवतेला प्रसन्न करण्यासाठी हा सुगंध पुरेसा असतो. तरी आठवत राहतो तो तारुण्याच्या वाटेवर भेटलेला श्रावण.

या श्रावणाचं वर्णन काय करावं? ग्रीष्माची पानगळ केव्हाच थांबलेली असते. वसंताच्या वैभवाची रुपं सगळ्यांनीच अनुभवलेली असतात. यामुळे सृष्टीचं सौंदर्यवैभव बहरलेलं असतं. तरीही त्यामध्ये कोठेतरी अपुरेपणा असतो. तो भरुन काढण्याचं काम श्रावण करतो. या श्रावणावर आजपर्यंत काय लिहिलं गेलं नाही? अन्य कोणत्याही ऋतुवर जेवढं लिहिलं गेलं नसेल एवढं श्रावणावर लिहिलं गेलं आहे. कथा, कविता, कादंबºया, चित्रपट अशा अनेक माध्यमातून श्रावणाची विविध रुपं आपल्यासमोर आलेली असतात.

जुन्या काळातील कोणतेही चित्रपट पहा, त्यामध्ये श्रावणाचं चित्र असतंच. श्रावणाच्या या मनभावन रुपामुळे त्याच्याविषयी कोणाला लिहावं असं वाटणार नाही? अगदी ‘श्रावणात घननीळा बरसला’ पासून ‘सावन का महिना पवन करे सोर’ पर्यंत अनेक गीतांमधून श्रावण साकारला आहे. श्रावणाच्या आगमनाबरोबर अशा अनेक गाण्यांच्या ओळी ओठावर येतात आणि श्रावणाचं कौतुक करण्यात आपण मग्न होतो. श्रावण म्हणजे मनाचे रेशमी बंध जोडणारा महिना. विविध सणांची भेट घेऊन हा सण येतो. नागपंचमीपासून राखी पौर्णिमेपर्यंत अनेक सणांची भेट त्यामध्ये असते. निसर्गाशीही कसं नातं जोडावं हे श्रावणाकडूनच शिकावं. त्यामुळेच ‘मनभावन हा श्रावण’ असं त्याचं वर्णन करायला हवं.

Read More  जळकोट ते जांब राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीस होतोय प्रचंड त्रास

श्रावणात सृष्टीला एवढं चैतन्य येतं मग मनाला का येणार नाही? श्रावणात मनाला नवी पालवी फुटते. एक नवा बहर येतो आणि श्रावणासारखंच मनही हिरवं होतं. म्हणूनच हा मनभावन श्रावण मनाच्या एका कप्प्यात ठाण मांडून बसलेला असतो.
तरुणाईच्या मोक्याच्या वळणावर मदरंगी श्रावण भेटला क या वळणाला एक वेगळीच रंगत येते. प्रियसखा असणा-या श्रावणाच्या आगमनाबरोबरच जीवाच्या प्रियसख्याला किंवा सखीला भेटण्याची ओढ अनावर होते. श्रावण जसा वर्षाराणीच्या भेटीसाठी व्याकूळ होऊन आलेला असतो तसंच आपणही आपल्या जीवलगाला भेटावं हे काहूर प्रत्येकाच्या मनात गुंजन करु लागतं आणि श्रावणाच्या साक्षीने या भेटी होतातही. अन्य ऋतुत आपल्या जीवलगाला भेटण्यापेक्षा वर्षा ऋतुत भेटण्याची मौज काही आगळीच असते. त्यामुळे श्रावण हाही आपल्या जीवाचा सखा बनतो.

या ऋतुत सृष्टीला एक नवचैतन्य आलेलं असतं. तिचं रुप क्षणोक्षणी बदलत असतं. रिमझीम बरससणाºया सरींनी श्रावण या रुपात आणखी भर घालत असतो. सारं आभाळ त्याचं आणि सृष्टीचं हे देखणं रुप निरखित असतं. त्यांच्या रुपाचं कौतुक करावंसं वाटलं क वरुण राजा रिमझीम सरींचा नजराणा त्यांच्यासाठी पाठवत असतो. ज्या व्यक्त नेहमी कोणत्या ना कोणत्या ठिकाणी फिरण्यासाठी बाहेर पडत असतात, त्यांना विचारा. कोणत्याही निसर्गरम्य ठिकाणी जायचं असेल तर श्रावणासारखा दुसरा महिना नाही असं ते सांगतील. अशा ठिकाणी गेल्यावर ‘ऋतु हिरवा, ऋतु बरवा’ अशी गीतं ओठावर आली नाहीत तरच नवल. या बरव्या ऋतुशी कोणत्याही ऋतुची बरोबरी होणार नाही.

रिमझीमणाºया या श्रावणात मनाच्या हिंदोळ्यावर असंख्य आठवणींचा झुला झुलू लागतो. त्यापैक कोणती आठवण पकडून ठेवावी आणि कोणती सोडून द्यावी असा प्रश्न आपल्याला पडतो. एखाद्यावेळी याच श्रावणात कोणीतरी भेटल्याची आठवण असते तर कधी याच दिवसात कोणाचा तरी विरह झाल्याच्या आठवणीही असतात. या आठवणीनी डोळ्यांच्या कडा ओलावतात. श्रावणातील रिमझीमणाºया सरींप्रमाणेच आपल्याही डोळ्यातून सरी ओघळू लागतात आणि हे पहायला श्रावणच आपल्यासमोर असतो. त्यामुळे तो अगदी जीवाभावाचा सखा बनतो. मनाच्या विकल अवस्थेत पाठीवरुन हात फिरवणारा आणि उत्फुल्ल अवस्थेत आपल्या आनंदात सहभागी असणारा श्रावणच असतो. त्यामुळेच त्याचं हे मनभावन रुप आपल्या डोळ्यासमोर कायमचं कोरलं गेलेलं असतं.

मन गाभारा
अभिलाषा चांदोरकर

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या