23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeविशेषमांगल्याचा उत्सव

मांगल्याचा उत्सव

एकमत ऑनलाईन

गणेशोत्सवाचा काळ हा सर्वांसाठीच मांगल्याचा, आनंदाचा असतो. कलाक्षेत्रात गणेश वंदनाला मोठे महत्त्व आहे. प्रख्यात शास्त्रीय गायिका सावनी शेंडे गणेशोत्सवाविषयी बोलताना सांगते, सरस्वती देवी ही कलेच्या दृष्टीने महत्त्वाचे दैवत आहे, तसेच गणपती हादेखील कलेचा अधिपती आहे. कलाकारांचे ते आद्यदैवत आहे. गणराजाचे स्मरण करूनच आम्ही कुठल्याही मैफिलीची सुरुवात करतो. नृत्यांगना, गायिका किंवा चित्रकार ही सर्व कलाकार मंडळी गणेशाला नमन केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. त्यामुळे कलाकारांच्या दृष्टीने गणपती आणि गणेशोत्सवाचेही वेगळेच महत्त्व आहे. आमच्याकडे अगदी लहानपणापासून गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपतीबद्दलची एक आगळीवेगळी श्रद्धा मनामध्ये तेव्हापासून रुजलेली आहे. माझ्या सासरीसुद्धा दीड दिवसाचा गणपती असतो. लोकमान्य टिळकांनीही समाजाला संघटित करण्यासाठीच हा उत्सव सुरू केला. देशाने एकत्रित येण्याचा उदात्त हेतू त्यामागे होता. गेल्या काही वर्षांमध्ये या उत्सवाचे स्वरूप बदलले असले तरी लोकांमध्ये पुन्हा एकदा नव्याने जागृती आलेली आहे. चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करण्याची इच्छा लोकांमध्ये दिसू लागली आहे.

आमच्या घरी गणपती येत असल्यामुळे आम्हा सा-यांनाच हा उत्सव म्हणजे मोठी पर्वणीच वाटते. दोन दिवस आधीपासूनच पूजेसाठी लागणा-या वस्तू आणण्याची लगबग सुरू होते. उपरणे, आसन, पूजेची भांडी, त्यांची स्वच्छता या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आदल्या दिवशी सगळेजण एकत्रपणे जागून गणपतीसाठी आरास करतात. मी आणि सासूबाई बाजारात जाऊन सगळ्या वस्तू मोठ्या उत्साहात आणतो. मंडईत जाऊन फुले आणण्यापासून प्रत्येक गोष्ट आम्ही एन्जॉय करतो. या सणामुळे एरवी कामात गर्क असणारी घरातील सगळी माणसे पुन्हा आनंदाने एकत्र येतात. ज्याप्रमाणे दिवाळी हा सण सा-यांना उत्साहित बनवतो, आनंद देतो त्याचप्रमाणे गणेशोत्सवही घराघरांमध्ये आनंद आणि स्नेह निर्माण करतो. या उत्सवाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाण्यातून पुन्हा एकदा सगळ्यांची मने नव्याने जुळून येतात.

अलीकडच्या काळात मोबाईल, व्हॉटस्अ‍ॅप यासारख्या तंत्रज्ञानामुळे परस्परांतील संवाद कमी झालेला दिसतो. पण गणेशोत्सवात मात्र तसे दिसत नाही. या सर्व आधुनिक साधनांचा जोर असला तरीसुद्धा या दिवसांत लोक एकमेकांच्या घरी जातात, एकमेकांना भेटतात, संवाद साधतात. मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर टाकला तरीही अजून तरी आपण व्हॉटस्अ‍ॅपवरील प्रतिमेद्वारे देवाचे दर्शन घेत नाही. ते घेण्यासाठी प्रत्यक्षच जातो. ही भावना मनामनांत जागी राहणे, हेच महत्त्वाचे आहे. कितीही अत्याधुनिक तंत्रज्ञान आले तरी परंपरेने चालत आलेल्या गोष्टी आपण जोपासायलाच हव्यात. सण, उत्सव हे या परंपरांचे पालन करण्यासाठीची पर्वणी असते. परस्परांमधील मतभेद, हेवेदावे दूर सारून माणसाने माणसाला भेटणे, परस्परांतील स्नेह वाढवणे हेच या सणांमागचे उद्देश आहेत, ते आपण साध्य केले पाहिजेत. गणपती हा मंगलमूर्ती आहे, तसाच तो विघ्नहर्ता आहे. त्यामुळे सर्वांच्याच विघ्नांचे हरण व्हावे, ती दूर व्हावीत हीच गणेशचरणी प्रार्थना करूया. मंगलमूर्ती मोरया !!
तू सुखकर्ता…
तू दु:खहर्ता…
अभिनेत्री तेजस्वी पंडितही गणेशोत्सवाविषयी भरभरून बोलते. ती म्हणाली, आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो. आमच्या घराण्याचा म्हणजे पंडितांचा हा वैशिष्ट्यपूर्ण गणपती आहे. ११३ वर्षे जुना असणारा हा गणपती नवसाचा आहे असे आम्ही मानतो. कारण याच्यामुळेच आमच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होत आल्या आहेत अशी आमची श्रद्धा आहे. त्यामुळे या गणपतीच्या दर्शनासाठी आमचे सर्व नातेवाईक इतकेच नाही तर आमचे शेजारीसुद्धा येतात. खास सारस्वत पद्धतीचा नैवेद्य असतो. त्यामध्ये खन्नागोळे, आंबट बटाटे, तिखट पंचामृत, पातोळ्या, कणसाची आणि अळूची मिक्स भाजी अशा पदार्थांचा समावेश असतो. दीड दिवस सर्व नातेवाईक गणपतीच्या स्वागतासाठी हजर असतात. आरती झाल्यानंतर गणपतीला गा-हाणे घातले जाते. यावेळी प्रत्येकजण आपल्या मनातील इच्छा आणि त्याचबरोबर झालेल्या चुका देखील गणपतीसमोर मांडतो. गा-हाणे घातल्यानंतर प्रसाद म्हणून सुक्यामेव्याची पाकिटं आणि नारळ प्रत्येकाला दिला जातो.

आमचे नातेवाईक वेगवेगळ्या ठिकाणी, शहरांमध्ये इतकेच नव्हे तर परदेशातही आहेत. पण, गणपतीच्या निमित्ताने सर्वजण एकत्र जमतात. ज्यांना शक्य होत नाही त्यांच्यासाठी आम्ही इंटरनेट या आधुनिक सुविधेचा वापर करतो. इंटरनेटद्वारे आरती आणि गणेशाचे दर्शन हे सर्वजण घेतात आणि देवापुढे नतमस्तक होतात. आमच्याकडच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक वर्षांपासून आमचा एकच मूर्तिकार आहे. त्याच्याकडून ही मूर्ती बनविली जाते. ती एकाच आकारातील आणि तशाच चेह-याची असते. त्यामध्ये कोणताही फरक होत नाही. शूटिंगमुळे मी व्यस्त असले तरीही गणपतीसाठी दीड दिवस काढते आणि या सोहळ्याचा आनंद घेते. मला आठवतोय लग्नानंतरचा माझा पहिला गणपती उत्सव. माझे सासर मूळचे गोंदियाचे. पण मी, माझा नवरा, दीर आणि जाऊ आम्ही पुण्यात असतो. त्यामुळे तेव्हापासून आम्ही घरीच गणपती बसवायला सुरुवात केली. घरच्या गणपतीच्या निवडीपासून डेकोरेशनपर्यंत सर्व जबाबदारी माझ्यावरच असते. गणपतीची असंख्य श्रवणीय आणि मन तल्लीन व्हावी अशी गाणी आणि आरत्या आहेत. गणपतीच्या दिवसांमध्ये हीच गाणी आणि आरत्या लावल्या गेल्या पाहिजेत. बदल हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे.

-सावनी शेंडे, तेजस्विनी पंडित

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या