26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeविशेषआंबा रस - फायदे

आंबा रस – फायदे

एकमत ऑनलाईन

आंबा प्रामुख्याने उन्हाळ्यात येणारे फळ आहे. प्रखर उष्णतेमुळे उन्हाळा ऋतू नको-नकोसा वाटतो. पण आंब्याच्या हंगामामुळे तो प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. तसे पाहिले तर कैरी आणि आंबा दोन आवस्थामध्ये उपलब्ध असलेल्या या फळात भरपूर औषधी गुणधर्म आढळतात. कैरी म्हणजेच कच्चा व हिरवा आंबा आम्लधर्मी स्वरूपाचा असतो. पक्व झालेला अथवा पूर्ण पिकलेला आंबा गोड, मधूर, स्रिग्ध, चवदार, बलवर्धक, सुखकारक, वायुहारक, उत्साहवर्धक आणि पचायला जड असला तरी पोट साफ करणारा आहे. तसेच शरीराची कांती वाढविणारा आणि जठराग्नी प्रदिप्त करणारा आहे. मात्र कैरीची साल उत्तेजक व कशाययुक्त असलेली असते. पिकलेल्या आंब्यामध्ये पिष्ठमय पदार्थ, तंतुमय पदार्थ, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, तांबे व तसेच जीवनसत्व-अ, जीवनसत्व-ब-६, जीवनसत्व-क, जीवनसत्व- ई इत्यादी पोष्टिक घटक असतात. तसेच आंब्याच्या रसात संतृप्त चरबी, कोलेस्टेरॉल आणि सोडियमचे प्रमाण खूपच कमी असते. त्याचबरोबर त्यामध्ये बीटा-कॅरोटिन आणि मँगीफेरीन याचा चांगला स्रोत असू शकतो.

अमृतासमान रूचकर व पौष्टिक असलेल्या व छान पिकलेल्या आंब्यापासून सर्वांना आवडणारा नुसता आमरसच नाही तर अनेक चवदार पदार्थ तयार केले जातात. आंब्याच्या रसापासून आंब्याचा खवरस, आंब्याचे मोदक, आंब्याचे रायते, आंब्याचा फजिता, आंब्याची ऐरोळी, आंब्याची पोळी, आमरसाचं साटं इत्यादी चवदार खाद्यपदार्थ तयार करून खाल्ले जातात. आंबा पित्त व पचनाच्या समस्येवर अत्यंत गुणकारी असून आपल्या त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतो. आंब्याच्या रसाच्या सेवनाने त्वचेचे पोषण सुध्दा उत्तम प्रकारे होते. उपयोग : ४ आंबा किंवा त्याचा रस सेवन केल्याने आपली रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती वाढण्यास फायदा होतो. आंब्याच्या रसामध्ये जीवनसत्व-क, जीवनसत्व-अ आणि विविध प्रकारचे कॅरोटिनाईड व झिंकसुध्दा असते. जीवनसत्व-क मुळे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि झिंकमुळे रोगाचा प्रतिकार करणा-या शक्तीची क्रियाशिलता वाढते व आपले आरोग्य चांगले राहते. जीवनसत्व-अ मुळे हानी पोहेचविणा-या मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण मिळते.

४ मुलांचा विकास: आंब्याचा रस आपल्या घरातील लहान मुलांसाठीही अत्यंत आरोग्यदायी असतो. आंब्याच्या रसामध्ये कॅरोटिनाईड मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे लहान मुलांचा संरक्षणात्मक क्षमता वाढण्यास फायदा होतो. व तसेच बुरशी, जीवाणू व विषाणूच्या संक्रमणापसून संरक्षण मिळते व लहान मुलांच्या मेंदूचा विकास होण्यास मदत होते.
४ डोळ्याची दृष्टी : आंब्याच्या रसामध्ये जीवनसत्व-अ भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे आपली दृष्टी चांगली राहण्यास फायदा होतो. तसेच या रसात बीटा-कॅरोटिन व अल्फा कॅरोटिन सुध्दा मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे दृष्टीमध्ये सुधारणा होण्यास मदत होते त्यासाठी आंबा किंवा त्याच्या रसाचे सेवन केल्यास डोळ्याच्या अनेक समस्या कमी होतात.

४रक्तदाब : आंब्याच्या रसामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जीवनसत्व-क सारखी अनेक पोषक द्रव्ये असतात. या पौष्टिक घटकांमुळे आपला रक्तदाब नियंत्रणात राहण्यास फायदा होतो. व त्याचबरोबर अनेक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. एका संशोधनानुसार आंब्याच्या रसामुळे आपल्या शरीराला पोटॅशियमचा योग्य प्रमाणात पुरवठा होतो ज्यामुळे हृदयाचे ठोके नियमित आणि रक्तदाब संतुलित राहण्यास मदत मिळते त्यामुळे नियमितपणे आंबा किंवा त्याच्या रसाचे सेवन करावे. ४कोलेस्टेरॉल : आंब्याच्या रसामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी स्थिर ठेवण्याचे गुणधर्म आहेत. या रसामध्ये पेक्टिन असल्याने सिरम कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास फायदा होतो. तसेच आंब्याच्या रसात मँगीफेरिन देखील साठवलेले असते ज्यामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते व चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढविण्यास फायदा होतो.

४ छातीत जळजळ : हिरव्या आंब्याचा रस छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हिरव्या आंब्यामध्ये फ्लेवोनॉईडस भरपूर प्रमाणात असतात जे पोटातील गॅस्ट्रिक आम्लता कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे अस्वस्थता, चिडचिड आणि तणाव कमी होऊन आराम मिळतो. त्यासाठी जेवणानंतर कच्च्या आंब्याचा एक ग्लास रस सेवन करावा. ४ मलावस्तंभ : आंब्याच्या रसामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असल्याने व हे सारक असल्यामुळे जुन्या प्रकारचा मलावस्तंभ आजारावर अत्यंत उपयोगी आहे. आंबा किंवा त्याचा रस सेवन केल्याने आतड्यातील घट्ट मल पुढे सरकण्यास मदत होते. पिकलेला आंबा पोट साफ करणारा असल्यामुळे आतड्याचे आरोग्य चांगले राहण्यास फायदा होतो.

४ऊर्जावर्धक : सध्याचे जीवन अत्यंत वेगवान झाले आहे. या वाढत्या गतीमुळे विश्रांती कमी मिळते व त्यामुळे थकवा, अशक्तपणा व झोप कमी मिळाल्यामुळे मानसिक ताण वाढतो. आंब्याच्या रसामुळे त्वरीत ऊर्जा पुनर्माप्त होते व त्यामुळे शरीराला सक्रिय होण्यास मदत होते. प्रामुख्याने विद्यार्थ्यासाठी मेंदूवरील ताण कमी करण्यासाठी आंब्याचा रस फायद्याचा आहे. ४ रक्तवाहिन्याचे आरोग्य: आंब्याच्या रसामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात जी रक्तवाहिन्याच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. आंब्याच्या रसात जीवनसत्व-क मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे पेशीचे पुनरूत्पादन आणि रक्तवाहिन्याच्या लवचिकतेसाठी मदत करतात. त्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होतो.

४ अ‍ॅन्टीऑक्सिडंटस् : आंब्याच्या रसात जवळ-जवळ सर्वच जीवनसत्वे असतात जी वेगवेगळया प्रकारे अ‍ॅन्टीऑक्सिडंटचे कार्य करतात. त्यात प्रामुख्याने हाडांना संरक्षण, संधिवात, स्रायुचे दुखणे, अन्नाचे पचन, प्रतिकार शक्ती इत्यादी कार्याना चालना मिळते. ४पीसीओडी : हा आजार मुख्यत: महिलांमध्ये आढळणारा असून याला स्त्रीबीजाश बिघाडी (पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज) असेही म्हणतात. हा विकार शरीरातील विविध हार्मोन्सच्या प्रमाणात बदल झाल्यामुळे होतो व त्यामुळे स्त्रीबीजाची पूर्ण वाढ होत नाही. शरिरातील पित्त आणि उष्णता कमी जास्त झाल्याने गर्भधारणा होण्यात अडथळे येतात. आंब्याच्या रसात जीवनसत्व-ब-६ मुबलक असते ज्यामुळे हार्मोन्सचे नियमन करण्यात मदत होते. त्यामळे महिलांनी आंब्याच्या रसाचे नियमित सेवन फायद्याचे असते.

४ सावधानता : १) आंबा नैसर्गीक पध्दतीने पिकविलेलाच खावा. २) आंबा पौष्टिक असला तरीही रासायनिक पिकविलेला आरोग्यास घातक असतो. ३) ज्यांना संधिवात किंवा सायनसचा त्रास आहे त्यांनी आंब्याचे सेवन अल्प प्रमाणात करावे. ४) आंब्यात मोठ्या प्रमाणात साखर असते त्यामुळे मधुमेही व्यक्तीनी आंब्याच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे. ५) आंबा हे उष्ण फळ आहे. त्यामुळे त्याच्या अधिक सेवनाने चेह-यावर मुरूम/ फोड येऊ शकतात. ६) अधिक प्रमाणात आंबा खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता असते त्यामुळे लठ्ठ व्यक्तिंनी कमी प्रमाणात खावा. टिप:- वनौषधीचा वापर करताना आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

-प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या