26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeविशेष‘मानिनी ही ऐसी जगली’

‘मानिनी ही ऐसी जगली’

एकमत ऑनलाईन

सौ. वर्षा डोंग्रजकर यांचे ‘मानिनी ही ऐसी जगली’ हे तिच्या काकूचे चरित्र आहे. ते तिच्या काकू गीताबाई चारठाणकर यांनी लिहिले असते तर ते आत्मचरित्र झाले असते. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. रझाकाराच्या जमान्यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकातील तीन जिल्हे हे निजाम राज्यात होते. त्यावेळेस रझाकार लोक अतिशय जुलूम करत , रयतेला त्रास देत. महिला, मुलींची स्थिती तर विचारूच नका ८०-८५ वर्षांपूर्वी स्त्री ही पूर्णपणे चूल आणि मूल यातच जखडलेली होती. सात-आठ वर्षांची मुलगी झाली की लगेच तिचे लग्न करत. लग्नाचा अर्थही त्या मुलीला कळत नसे. वर्षाताईने तिच्या काकूची म्हणजे माईची व्यक्तिरेखा ठसठशीतपणे वर्णन केली आहे. वयाच्या बाराव्या वर्षी गीताबाई अर्थात माई विनायकरावांसोबत माप ओलांडून घरात आल्या. विनायकराव आधुनिक विचारसरणीचे देशभक्त, समाजकारणासोबत निजामी राजवटीत राजवटीविरोधात कार्य करण्यास सज्ज असलेले युवक. साहजिकच त्यांची इच्छा पत्नीनेही आपल्याला साथ द्यावी या दृष्टीने ते पत्नीला घडवत गेले.

धीटपणा, धाडसीपणा, प्रेमळपणा, दातृत्वाची उदारता, कौटुंबिक आस्था जपणारी अशी संसारी स्त्री माई जशी प्रत्यक्षात होती तसेच तिचे वर्णन केले आहे. हैदराबाद मुक्तिसंग्राम, गोवा मुक्तिसंग्राम अशा अनेक संग्रामात हिरीरीने भाग घेणारी व त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारी वीर महिला गीताबाई चारठाणकर यांच्याबाबतीत लिहिताना कुठेही अतिशयोक्तीचा बाज लेखिकेने आणला नाही. घरातले सगळे सदस्य सख्खे-चुलत, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता सगळ्यांवरच मायेची पखरण केली. १९४९ ते १९५० साली माई अंबाजोगाई येथे मॅट्रिक झाल्या. तिथेही त्यांना भीमराव खेडगीकर, एकनाथराव गुरुजी, दादासाहेब गुरुजी, एस. आर. गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभले. घरातले वातावरण देशभक्ती प्रेमाचे, स्वातंत्र्य सैनिकाचे होते.हैदराबाद मुक्तिसंग्रामात स्त्रियांचे संघटन करणे, पत्रके काढणे, पत्रके वाटणे, सुटकेसमधून, पिशव्यांमधून, वेळ पडल्यास लुगड्याच्या ओच्यातूनही बॉम्ब ठेवून फिरणारी, भूमिगत राहून शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारी, रात्री-बेरात्री न घाबरता वेळ पडल्यास जिवावर उदार होऊन पदराच्या टोकात विषाची पुडी ठेवणारी धाडसी काकू आजच्या काळातल्या सर्व महिला-मुलींसाठी प्रेरणादायी आहे.

त्यांच्याच काळातल्या समविचाराच्या त्यांच्या मैत्रिणी होत्या. ताराबाई परांजपे, सुशीलाबाई दिवाण, आशाताई वाघमारे, कावेरीबाई बोधनकर यांनी महिलांसाठी नांदेडला शिबिर घेतले. संस्कार वर्ग, बालवाड्या काढल्या. विनायकराव आणि गीताबाई एकमेकांना पूरक होते. आपल्या पतीला सामाजिक कार्यासाठी वेळ मिळावा म्हणून स्वत: त्यांनी नोकरी केली. शस्त्रास्त्रे, दारूगोळा पेटीत घेऊन त्यांच्यासोबत तीन-चार जण होते. त्यांना मनमाडहून पुढे जायचे होते पण तिथेच पोलिसांनी त्यांची तपासणी केली तेव्हा गीताबाई स्पष्टपणे म्हणाल्या, स्त्री पोलिस असले तरच माझी तपासणी करा नसता कोणीही माझ्या अंगाला हात लावायचा नाही. एवढे धाडस त्याच दाखवू शकल्या. नसता साधे पोलिसांना बघितले तरी भीतीने गाळण उडते. भूमिगत असताना पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून वेषांतरही करावे लागे. निजाम राज्यापासून मराठवाडा वेगळा झाला. सगळ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या धडपडीला यश आले. विनायकराव यांनी सेलूला वकिली सुरू केली.

लेखिकेचे वडील डॉ. किशनराव यांनीही आपला दवाखाना सुरू केला. लेखिकेची आई म्हणजे राधा अक्का. विनायकरावांची वकिली आणि किशनराव काकांची प्रॅक्टिस चांगली असल्यामुळे एकत्र कुटुंबात भरभराट होती.आम्ही तसे सहा जण पण रोज चार-पाच जण बाहेरचे जेवायला असत. कोणी शिक्षणासाठी, कुणी कामासाठी अशी भरपूर माणसं, नातेवाईक घरात असायचे. दिवसभर कामाला पण माणसं असायची. जावा- जावा मात्र बहिणीसारख्या राहिल्या. सगळ्यांना प्रेम दिलं. आजकाल एक पाहुणा आला तर नको वाटतं. आमच्याकडे दिवसभर लंगर चालू असायचं. आदर्श विचार असणारे अटल बिहारी वाजपेयी, परमपूज्य स्वामीजी, राम मनोहर लोहिया, अनंत भालेराव, मोहन धारिया ही त्यांची श्रध्दास्थानं होती. सेलू महिला मंडळाच्या अध्यक्षा गीताबाई त्यांच्यासोबत हेमलताताई गिल्डा, दुर्गाताई कुलकर्णी, नलिनी देवधर, विजयाताई कोठेकर, वाघोलीकर अशा अनेक जणी होत्या. तिथे महिलांसाठी अनेक उपक्रम चालत . वाचनालय, विविध खेळांचे साहित्य पण होते, नाट्यप्रेमी महिलांसाठी पुरुष पात्र विरहित एकांकिका बसवायच्या, महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे म्हणून शिवण क्लासही चालायचा, राष्ट्र सेवा दलाची शाखा होती. सेलूला महिला समता परिषद घेतली तेव्हा मृणाल गोरे, ताराबाई परांजपे, शैला लोहिया, सुशीलाबाई भालेराव, करुणाताई चौधरी अशा अनेक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

गीताबाई नगरसेविका म्हणून निवडून आल्या पण विनायकरावसुद्धा नगरपालिकेचे अध्यक्ष होते. आजही दरवर्षी १६ जूनला सेलूला एका कर्तबगार महिलेला त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून महिला मंडळाकडून वीर महिला गीताबाई चारठाणकर पुरस्कार दिला जातो. त्याचप्रमाणे दरवर्षी २० नोव्हेंबरला विधिज्ञ विनायकराव चारठाणकर यांच्या नावाने सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील तीन जणांना पुरस्कार दिला जातो. या समितीवर डॉ. राजाभैय्या चारठाणकर, डॉ. बापूसाहेब डोंग्रजकर, सौ. वर्षा डोंग्रजकर, सौ. वरुणा कुळकर्णी, अ‍ॅड श्रीकांत वाईकर, डॉ. आनंद देशपांडे, बाबासाहेब चारठाणकर हे आहेत. कनक वाईकर यांनी मुखपृष्ठाचे रेखाटन केले आहे. एका हातात स्वतंत्र विचाराची समाजसुधारणेची पेटती मशाल तर दुस-या हातामध्ये स्त्रीशिक्षणासाठी नवे विचार घेऊन आलेले पुस्तक आहे. ‘मानिनी ही अशी जगली’ या शीर्षकाप्रमाणे साजेसे मुखपृष्ठ आहे. या चरित्रलेखन पुस्तकाला पुरातत्व व इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. प्रभाकर देव यांची प्रस्तावना तसेच सेलू महाविद्यालयाचे माजी प्राचार्य द. रा.कुलकर्णी यांनी पण पार्श्वभूमी लिहिली आहे. या चरित्रलेखनाची पाठराखण आनंद देशपांडे यांनी केली आहे. या पुस्तकातील गीताबाई, विनायकराव, राधा आक्का, डॉ. किशनराव यांच्याबद्दल वाचताना सगळं चित्र आपल्या नजरेसमोर उभे राहते. एकदा वाचायला सुरुवात केल्यानंतर पूर्णच वाचून काढावे असे वाटते. तो रझाकाराचा जुलमी कालखंड, घरातील वातावरण, एकमेकाबद्दल प्रेम हे सांगताना त्यांनी कुठेही अतिशयोक्ती केली नाही. जे घडले ते वाचकांसमोर ठेवले. खूप दिवसांनी एक धडाडी नेतृत्वाचे पुस्तक वाचायला मिळाले याचा आनंद आहे.
पुस्तक – ‘मानिनी ही ऐसी जगली’
लेखिका – सौ. वर्षा डोंग्रजकर
प्रकाशक – दत्ता डांगे, इसाप प्रकाशन, नांदेड

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या