‘एक मच्छर’ काय करू शकतो, हे नाना पाटेकरांनी पूर्वीच सांगून ठेवलंय. असे असताना अनेक मच्छर एकत्र आले आणि एखाद्या व्हीआयपी पाहुण्याला त्यांनी घेरलं, तर काय पंचाईत होईल हे वेगळं सांगायची गरज नाही. तसं बघायला गेलं तर मच्छर ऊर्फ डास ही कीटक प्रजाती अन्य प्रजातींच्या तुलनेत बरीच समजूतदार असते. पूर्वसूचना न देता डास कधीच कुणावर हल्ला करत नाहीत. ‘सांगून सवरून हल्ला करू,’ असा त्यांचा बाणा असावा किंवा आपल्याच तंद्रीत ‘गुणगुणत’ फिरता-फिरता त्यांना कुणालातरी चावायची लहर येत असावी. यामुळंच कधी-कधी त्यांच्या चावण्यापेक्षा गुणगुणण्याचा त्रास अधिक होतो. एका सुरात भेसूर गाणं म्हणण्याऐवजी त्यांनी थेट येऊन चावावं, असंही काही वेळा वाटून जातं. किमान झोपमोड तरी होणार नाही! परंतु ‘रक्तदान शिबिर’ घेत असल्यासारखे डास मोठा गाजावाजा करून घरात टोळक्यानं घुसतात. त्यांची ही धिटाई माणसाला ब-याच वेळा मोठं मोल द्यायला भाग पाडते.
कधी मलेरिया तर कधी डेंग्यूसारखे भीषण आजार सोंडेत घेऊन ही जमात फिरत असते आणि चावल्या जागी विषाणूंसह सोंड खुपसते. तरी बरं, सकाळच्या वेळी येणारे डास डेंग्यूचे असतात, डेंग्यूवाल्या डासांना फार उंच उडता येत नाही वगैरे बेसिक माहिती आजकाल सगळ्यांना समजलेली आहे. तरीसुद्धा डासांची टोळी हा महाउच्छादच! तर, सांगायची गोष्ट अशी की मध्य प्रदेशातल्या सिधी जिल्ह्यात एका ‘स्पेशल पाहुण्यां’ना डासांनी रात्रभर घेराव घातला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसवर वस्तीला असलेला हा पाहुणा राजकीय क्षेत्रातला असल्यामुळे दिवसा पडलेल्या घेरावांनीच थकला असणार. त्यात रात्री पाठ टेकताच डासांचा उपद्रव! मग काय, सकाळी उठल्याबरोबर ‘स्पेशल पाहुण्यां’नी तक्रार केली. विभागीय अधिका-यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-याला नोटीस बजावून थेट निलंबित करून टाकलं. केवळ डासांमुळं ही परिस्थिती ओढवली.
‘स्पेशल पाहुण्यां’नी उच्चपदस्थांकडे केलेल्या तक्रारीनुसार, गेस्ट हाऊसमध्ये मच्छरदाण्या नव्हत्या. मच्छरविरोधी औषध रात्री अडीच वाजता त्यांच्या खोलीत फवारलं गेलं. त्यानंतर डासांनी हळूहळू काढता पाय घेतला, आणि ‘स्पेशल पाहुण्यां’ना झोप लागणार एवढ्यात पहाटे चार वाजता टेरेसवरची पाण्याची टाकी भरून वाहू लागली. टाकीत पाणी भरणारी मोटर ‘पाहुण्यां’ना स्वत:च्या हातानं बंद करावी लागली, कारण ते विहित कर्तव्य बजावायलासुद्धा गेस्ट हाऊसमध्ये माणूस नव्हता. ‘स्पेशल पाहुणे’ कोण आहेत, हे संबंधितांना ठाऊक नव्हतं की काय, कोण जाणे! ‘स्पेशल पाहुणे’ होते राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान! विभागीय आयुक्तांपर्यंत प्रकरण गेल्यावर ‘जिल्ह्याचं नाव खराब करणा-या’ या घटनेस जबाबदार अधिकारी निलंबित झाला.
खरं तर मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात भलतंच टेन्शन होतं. मध्य प्रदेशात नुकताच एक मोठा अपघात झाला. कालव्यात बस कोसळून ५१ जणांना प्राणाला मुकावं लागलं. मृतांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री सिधी जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची भरपाई त्यांनी जाहीर केली; पण पैशांनी दु:ख कितीसं हलकं होणार! अशा खिन्न वातावरणातून मुख्यमंत्र्यांनी गेस्ट हाऊसवर मुक्कामासाठी यावं आणि बिछान्यावर अंग टाकताच डासांनी त्यांना फोडून काढावं, ही काय शिस्त झाली?
सत्यजित दुर्वेकर
धर्माबाद येथील बीएसएनएल सेवा विस्कळीत