24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeविशेषमराठवाडा मुक्तीसंग्राम

मराठवाडा मुक्तीसंग्राम

एकमत ऑनलाईन

१५ ऑगस्ट १९४७ भारताचा स्वातंत्र्य दिवस. असंख्य भारतीयांच्या बलिदानाला आलेले फळ. भारत मातेच्या असंख्य सुपुत्रांनी त्याग आणि पराक्रमाची पराकाष्ठा करून मिळविलेले यश. भारत मातेच्या अनेक सपुतांनी पारतंत्र्याच्या यशवेदीवर पंचप्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य देवतेचा मिळवलेला आशीर्वाद. या स्वातंत्र्य दिनाला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु त्या आधी भारतात छोटे-मोठे ५६५ संस्थान होती तो संस्थानिक त्या प्रदेशाचा राजा होता. आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या प्रदेशाचा कारभार पाहत होता. स्वातंत्र्यानंतर भारत अखंड रहावा असे अनेक नेत्यांना वाटत होते. त्यातही भारताचे त्यावेळेचे गृहमंत्री स्वातंत्र्य सेनानी सरदार वल्लभभाई पटेलांनी अखंड भारताचे स्वप्नं उराशी बाळगलेले होते. ते साक्षात आणण्यासाठी त्यांनी सर्व संस्थानिकांना, राजांना भारतात विलीन होण्याचे आवाहन केले. त्यानुसार ५६२ संस्थानिक स्वत: होऊन भारतात विलिन झाले. परंतु काश्मीर, हैदराबाद आणि जुनागढ हे मात्र आपला हक्क व राजपाट सोडायला तयार नव्हते.

त्यावेळी हैदराबादला निजाम उस्मानअली असफजाहची राजवट होती. त्यावेळी त्याची सत्ता मराठवाडा, तेलंगणा, उत्तर कर्नाटक, आणि विदर्भाच्या काही भागावर होती. निजाम राजवटीत जनता सुखी नव्हती. निजाम ब्रिटिशांसारखीच जनतेकडून अन्यायी वसुली करत होता. महिलांवर अनेक अत्याचार होत होते. बालविवाह, अंधश्रद्धा, अज्ञान, निरक्षरता, पडदा पद्धती अशा अनेक वाईट चालीरितीत महिला अडकल्या होत्या. त्यामुळे लोकांच्या मनात असंतोष होता. त्यातच निजामाने भारताचे विलीनीकरणाचे आवाहन नाकारल्यामुळे जागोजागी लोक आपला रोष आंदोलन, मोर्चा ह्यातून दाखवू लागले. निजाम सक्तीने ते अडविण्याचा प्रयत्न करू लागला. त्याची ‘रझाकार’ही सेना राज्यभर धुमाकूळ घालू लागली.

घरात घुसून लुटमार करणे, जाळपोळ करणे, महिलांवर बलात्कार करणे सुरू झाले. दिवसा ढवळ्या कत्तली सुरू झाल्या. हजारो लोक मारले जाऊ लागले. खेडेगावांपासून ते शहरांपर्यंत भितीचे, दहशतीचे वातावरण निर्माण झाले. हैदराबादला जरी मुस्लीम संख्या जास्त असली तरी इतर भागात बहुसंख्येने हिंदु असल्यामुळे अर्थातच, हिंदूवर अतोनात अत्याचार झाले. अनेक ठिकाणी वेगळी भाषा, वेगळी संस्कृती असल्यामुळे रझाकारांनी घरेच्या घरे उद्ध्वस्त केली.
हे सगळे थांबवण्यासाठी भारत सरकारला कारवाई करणे भाग पडले आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली पोलिस कारवाई सुरू झाली त्या कारवाईस ‘ऑपरेशन पोलो’ म्हणून अ‍ॅक्शनचा काळ म्हणून आजही ओळखले जाते.

मराठवाडाही ह्या संग्रामात अग्रेसर होता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली गोविंदभाई श्रॉफ, देविसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, रवी नारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे, अनंत भालेराव अशा अनेकांनी आपले सर्वस्व पणाला लावले. औरंगाबाद, बीड, वैजापूर, बर्दापूर, उस्मानाबाद अशा अनेक गावातील कुटुंबांनी ह्या लढ्यात सक्रीय सहभाग घेतला. ह्या लढ्यात महिलांचेही योगदान महत्वपूर्ण राहिले. घरातील महिलांनी क्रांतीकारकांसाठी, सैनिकांसाठी जेवण बनविणे जखमी सैनिकांची देखभाल करणे, पत्रके वाटणे, घरात आश्रय देणे हे मनापासून स्विकारले. काही महिला घराबाहेर पडून कार्य करू लागल्या. त्यात काही ठळक नावे म्हणजे आशाताई वाघमारे, सुशीलाताई दिवाण, सुलोचनाबाई बोधनकर, उषा पांगुरीबाई, तारा परांजपे, पानकुंवर कोटेचा, प्रतिभाताई वैशंपायन अशा अनेक महिलांनी ह्या लढ्यात मोलाचे योगदान दिले. हैदराबाद संस्थानातल्या प्रत्येक गावात रझाकार अतिशय क्रुरपणे अत्याचार करत होते आणि गावातले त्यांना तेवढ्याच प्रखरपणे जबाब देत होते. ते किस्से त्या घटना आजही अनेकांच्या तोंडून ऐकावयास मिळतात. अशीच एक घटना आहे… लातूर जिल्ह्यातील पानचिंचोली ह्या गावातील.

तेथील पोलिस पाटील.. स्वातंत्र्य सैनिक गोविंदराव निळकंठराव पाटील. त्यांना जेव्हा समजले की रझाकार जवळ आलेले आहेत आणि एखाद्या दिवशी ते गावात घुसतील तेव्हा त्यांनी गावात दवंडी दिली. रझाकारांना सामना करण्यासाठी गाववाल्यांना तयार रहावयास सांगितले. आणि गावातील सर्व स्त्रियांना आपल्या किल्ल्यासारख्या गढीच्या वाड्यात येण्यास सांगितले. त्यांना आश्रय दिला. गढीच्या फासा आणि दारे भक्कम होती तरीही प्रसंगी आपले आणि इतर स्त्रियांचे अब्रुचे रक्षण करता यावे म्हणून गोविंदराव पाटलांनी आपल्या पत्नी, सुनांना व मुलींना तलवार, बंदुक चालविण्याचे शिक्षण दिले. गाववाल्यांच्या मदतीने दोन दिवस रझाकाराचा सामना केला आणि शेवटी गावातून त्यांना हुसकावून लावले. आजही काही ज्येष्ठ लोक हा अनुभव अभिमानाने सांगतात.

हैदराबाद संस्थानात असा जनतेचा तीव्र जनक्षोभ उसळला होता. भारत सरकारची पोलिस यंत्रणाही कडक कारवाई करू लागली. दिसेल तिथे रझाकारांना निपटून काढू लागले. त्यामुळे तेरा महिन्यानंतर निजामाचा पडाव झाला. त्याने हार पत्करली. हैदराबाद लढ्याला यश आले. हैदराबाद मुक्त झाला. हैदराबादमध्ये तिरंगा फडकू लागला, मराठवाडा मुक्त झाला, तो दिवस होता १७ सप्टेंबर १९४८. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी तिच्या चरणी आपले शीरकमल अर्पण करणारे क्रांतीवीर शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, स्वातंत्र्यासाठी प्राणपणाला लावणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस… ह्यांना त्रिवार वंदन. हजारो लाखोंच्या त्यागातून मिळालेल्या या स्वातंत्र्याचे मोल अनमोल आहे.. ते प्राणपणाने जपणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मंगलमय शुभेच्छा!

वृषाली विक्रम पाटील, लातूर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या