22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeविशेषहुतात्मा श्रीधर वर्तक

हुतात्मा श्रीधर वर्तक

एकमत ऑनलाईन

हैदराबाद मुक्तिसंग्रामात सीमावर्ती भागात उभारण्यात आलेल्या बॉर्डर कॅम्पचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात चिंचोली, आगळगाव, गौडगाव अशा अनेक गावांत लढाऊ कॅम्प उभारण्यात आले होते. चिंचोली कॅम्प हा बार्शी तालुक्यात होता. या कॅम्पमधील सैनिकांनी अपसिंगा (जि. उस्मानाबाद) येथील रझाकार केंद्रावर केलेल्या हल्ल्यात श्रीधर वर्तक यांना हौतात्म्य प्राप्त झाले. आज आपण अपसिंग्याची लढाई आणि हुतात्मा श्रीधर वर्तक यांच्या कार्याची ओळख करून घेणार आहोत. श्रीधर वर्तक हे मूळचे हैदराबादचे. त्यांचा जन्म ५ जुलै १९२४ ला एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील काशिनाथराव वर्तक हे हैदराबाद येथे टांकसाळीत (मिंट) सुपरवायझर होते. श्रीधर यांचे बालपण अत्यंत आनंदात गेले. ते स्वभावाने खेळकर, विनोदी, सालस होते. तसेच बाणेदार आणि स्वाभिमानी होते. स्वत:हून कुणाच्याही वाटेला जायचे नाही पण अन्याय सहन करायचा नाही हा त्यांचा मूलमंत्र होता. ते आपल्या मित्रपरिवारात अत्यंत प्रिय होते.

शरीरयष्टी सडपातळ असली तरी एक प्रकारचा चिवटपणा त्यांच्यामध्ये होता. त्यांचे शालेय शिक्षण हैदराबादमधील सुप्रसिद्ध विवेकवर्धिनी हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून मद्रास विद्यापीठाची बी.ए. ची पदवी मिळवली. तसेच पुणे विद्यापीठातून एलएल. बी. पदवी मिळवली. आवश्यक शिक्षण झाले होते. मुलाने सरकारी नोकरी करावी असे आई-वडिलांना वाटत होते. पण श्रीधरराव सरकारी नोकरी किंवा लग्नाबद्दल काहीच बोलत नव्हते. त्यांच्या मनामध्ये प्रचंड खळबळ चालू होती. काय करावे? याबद्दल मनाचा निर्णय होत नव्हता. शेवटी त्यांनी विवेकवर्धिनी हायस्कूलमध्ये नोकरी पत्करण्याचे ठरवले. २४ जून १९४६ रोजी त्यांची नेमणूक विवेकवर्धिनी शाळेत शिक्षक म्हणून झाली. अल्पावधीत शाळेतील सर्वांचे ते आवडते शिक्षक झाले. एकीकडे भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि निजामी राज्यात पोलिसांचा, रझाकारांचा अन्याय-अत्याचार मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता. रोज नव्या नव्या वार्ता कानावर येत होत्या. एरवी शांत आणि आनंदी दिसणारे वर्तक गंभीर होऊ लागले. त्यांच्या अंतर्यामी काहीतरी मंथन चालू होते. मनातली खळबळ आता चेह-यावर दिसू लागली होती. आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटत होते. पण काय करावे हे मात्र समजत नव्हते. आता त्यांचे मन शाळेत लागेना.

कानावर येणा-या अत्याचारांच्या बातम्यांनी ते विचलित होऊ लागले. रझाकार संघटना, निजामी पोलिस आणि सैन्याला धडा शिकवण्यासाठी आपल्याला काय करता येईल? असा प्रश्न ते स्वत:ला विचारू लागले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर या अत्याचारांच्या बातम्यांनी गंभीर जखम केली होती. शेवटी त्यांनी निश्चय केला आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामात एक मुक्तिसैनिक म्हणून उत्साहाने झेप घेतली. आईवडिलांचे स्वप्न त्यांनी आता बाजूला ठेवले आणि ते रझाकारांच्या अत्याचाराविरोधात सुरू असलेल्या सशस्त्र लढ्यांमध्ये सहभागी झाले. श्रीधर वर्तक चिंचोली कॅम्पमध्ये दाखल झाले. श्रीधर वर्तक यांच्यासारखे अनेक उत्साही, धाडसी, सळसळत्या रक्ताचे तरुण सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने रामचंद्रजी मंत्री, श्रीधर वर्तक, चंद्रशेखर बाजपेयी, बापूसाहेब वाघमारे, अमृतराव मास्तर, साळुंखे गुरुजी यांचा समावेश होता. बाबासाहेब परांजपे, व्यासाचार्य संदिकर यांच्यामार्फत त्यांना लढण्यासाठी आवश्यक साहित्य पुरवले जात होते. आता त्यांना जोखमीचे कार्य करण्याची इच्छा होती. त्यांचे हात शिवशिवत होते. लवकरात लवकर ही अन्यायी, अत्याचारी राजवट संपुष्टात आली पाहिजे असे त्यांना वाटत होते आणि त्यासाठी जबरदस्त धडक देण्याची इच्छा ते मनाशी बाळगून होते. हा कॅम्प शस्त्रसज्ज झाला होता. कृति समितीच्या आदेशाप्रमाणे कृती करायची हे त्यांनी निश्चित केले. आगळगाव येथील कॅम्पने बर्दापूर पोलिस ठाणे काबीज केले होते.

ही रोमांचकारी घटना चिंचोली कॅम्पमधील या उत्साही तरुणांना समजली. आपणही त्याच पद्धतीने एखादे पोलिस ठाणे जिंकावे वा करोडगिरी नाक्यावर हल्ला करावा असे त्यांना वाटू लागले आणि मग त्यातून त्यांनी शेंद्री येथील पोलिस ठाण्यावर हल्ला करण्याचे नियोजन केले. मात्र त्यासंबंधीची फारशी पूर्वतयारी केली गेली नव्हती आणि म्हणून ही योजना मागे पडली. आता दुसरी एखादी योजना कार्यान्वित करावी असे वाटू लागले. गौडगाव कॅम्पला अपसिंगा या ठिकाणच्या रझाकार केंद्राची माहिती मिळाली होती. तेथे एका टेकडीवर रझाकार केंद्र असून येथे ५० पोलिस व १०० रझाकार आहेत अशी माहिती होती. या रझाकार केंद्रावर चिंचोली, गौडगाव, केसापुरी व आगळगाव कॅम्पच्या निवडक सैनिकांनी हल्ला करावा असे ठरले. योजनेप्रमाणे तीन तुकड्या केल्या गेल्या. रझाकार केंद्रावर हल्ला करणा-या तुकडीचे नेतृत्व श्रीधर वर्तक यांच्याकडे होते. सर्व सहकारी त्यांना शास्त्रीजी म्हणून ओळखत. रझाकार केंद्रावर हल्ला करण्यात आला. वास्तविक पाहता या हल्ल्याची बातमी अगोदरच रझाकारांना लागली होती. त्यामुळे त्यांनी केंद्र खाली करून टेकडीवरील दर्ग्याजवळ आडोसा शोधला होता.

सर्व सैनिक मैदानात येताच रझाकारांनी गोळीबार चालू केला. रझाकारांच्या या गोळीबाराला उघड्यावर असणा-या सैनिकांनी चिवटपणे झुंज देण्यास सुरुवात केली. यात श्रीधर वर्तक यांचा मारा सर्वांत प्रभावी होता. पण त्यांच्याकडे असलेली स्टेनगन बंद पडली. ती बदलण्याच्या प्रयत्नात त्यांनी डोके वर काढले. तोच एका गोळीने त्यांच्या मस्तकाचा वेध घेतला. झुंजार सेनानी श्रीधरराव वर्तक धारातीर्थी पडले. आता रझाकारांनी सर्व बाजूंनी मुक्तिसैनिकांना घेरण्यास सुरुवात केली. त्याच वेळी रझाकारांना तुळजापूर व उस्मानाबादहून मदत येत असल्याची बातमी आली.रामचंद्रराव मंत्री यांनी सर्व मुक्तिसैनिकांना मागे फिरण्याचा आदेश दिला. चहूकडून रझाकारांनी घेरल्यामुळे नाइलाजाने वर्तकांचा मृतदेह तेथेच सोडून सैनिकांना परतावे लागले. वर्तकांचे शव उस्मानाबादच्या डी. एस. पी.ने मोटारीच्या मागे बांधून खरडत नेले व त्याची होईल तेवढी विटंबना केली. या कारवाईत पोलिस व रझाकार मिळून नऊजण ठार झाले. श्रीधर वर्तक यांनी आपल्या हौतात्म्याने उस्मानाबाद परिसरातील अनेक तरुणांना हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात सहभागी होण्यास प्रेरित केले. निजामाच्या दफ्तरी वर्तक यांची नोंद मिलिटरीतील सैनिक अशी झाली हे एका अर्थाने योग्यच झाले. कारण श्रीधरराव एका सैनिकाप्रमाणे शेवटपर्यंत झुंजत राहिले आणि सैनिकाप्रमाणेच ते शहीद झाले.

-भाऊसाहेब उमाटे
लातूर, मो. ७५८८८ ७५६९९

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या