22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeविशेषहुतात्मा वसंत राक्षसभुवनकर

हुतात्मा वसंत राक्षसभुवनकर

एकमत ऑनलाईन

हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्यलढ्यामध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेस ही जरी लढ्याचे नेतृत्व करीत असली तरी आर्य समाज, हिंदू महासभा, कम्युनिस्ट पक्ष या विविध संघटनांचाही लढ्यात सक्रिय सहभाग होता. दुर्दैवाने हैदराबाद संस्थानातील या विविध संघटनांच्या कार्याची फारशी दखल घेतली नाही. हैदराबाद संस्थानातील सत्ता एवढी निर्दयी होती की मुक्तिलढ्यामध्ये भाग घेणा-यांपैकी अनेकांचे शौर्य उजळून निघाले. यातील काहींना तर हौतात्म्य प्राप्त झाले. अगदी तरुण वयात कम्युनिस्ट विचारधारेने भारावून गेलेल्या आमच्या बीड जिल्ह्यातील एका स्वातंत्र्यप्रेमी तरुणाला या लढ्यात हौतात्म्य प्राप्त झाले. हा तरुण म्हणजे हुतात्मा वसंत राक्षसभुवनकर. हैदराबादच्या मुक्तिलढ्यात विचारपूर्वक ध्येयप्रेरित होऊन उडी घेणा-या या तरुणाचे पूर्ण नाव वसंत सदाशिवराव राक्षसभुवनकर असे होते. १९२७ ला वसंताचा जन्म झाला. तेव्हा राक्षसभुवनकर कुटुंब बीडला वास्तव्यास होते. त्यांचा वाडा बीडच्या धोंडीपुरा मोहल्ल्यातील बोबडेश्वर गल्लीच्या सुरुवातीला डाव्या बाजूस आहे.

राक्षसभुवनकर कुटुंब हे मूळचे गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन (जि. बीड) येथील होते. तेथे या कुटुंबाचा सराफीचा व्यवसाय होता. मोठा वाडा, शेती होती. व्यवसायामुळे यांना बीडला आल्यानंतर सुद्धा सराफ या नावाने ओळखले जात असे. बीडला सुरुवातीला राक्षसभुवनकर कुटुंबाची आर्थिक स्थिती भक्कम होती. शालेय जीवनात वसंत अत्यंत हुशार होते. मृदू भाषा व हसरा चेहरा त्यामुळे मित्र परिवारात ते नेहमीच प्रिय असत. शालेय जीवनातच ते सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत असत. शाळेत शिक्षण घेत असताना वसंताने सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्यायला सुरुवात केली. गणेश मेळाव्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय विचाराने भारावलेल्या रचना सादर करू लागले. वसंत व त्यांच्या मित्रांनी जनजागरण सुरू केले. यामध्ये प्रामुख्याने वासुदेव खारकर, श्रीपाद माढेकर, विठ्ठल बाब्रस, उत्तम काटकर यांचा समावेश होता. वसंताने पुढाकार घेऊन वाद-विवाद मंडळाची स्थापना केली. त्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे. राष्ट्रीय विचाराच्या वृत्तपत्रांचे वाचन करणे असे कार्यक्रम आयोजित केले जात असत. बीडच्या मदरसे फोकानिया (हायस्कूल) मध्ये वसंताने आठवी ते दहावीचे शिक्षण पूर्ण केले. १९४२ ला ते उत्तम गुणाने दहावी पास झाले होते. पुढे ते शिक्षणासाठी हैदराबादला गेले. उस्मानिया विद्यापीठात प्रवेश घेतला. येथेच समाजवादी व कम्युनिस्ट विचारसरणीच्या नेत्यांशी संपर्क आला. हैदराबादमध्ये वसंताचे अभ्यासात फारसे लक्ष लागत नव्हते. वंदे मातरम् चळवळीने विद्यार्थ्यांत मोठ्या प्रमाणात जागृती झाली होती. हैदराबाद येथेच नांदेडचे नागनाथ परांजपे, कॉ. चंद्रगुप्त चौधरी, कॉ. व्ही. डी. देशपांडे, कॉ. एस. के. वैशंपायन यांच्याशी त्यांचे संबंध प्रस्थापित झाले. एकूणच हैदराबाद मुक्तिसंग्रामात उडी घेतल्यामुळे त्यांनी बी. ए.ला प्रवेश घेतला. येथे त्यांनी समविचारी मित्रांना घेऊन कार्यास सुरुवात केली.

‘यंग कम्युनिस्ट लीग’ची स्थापना केली. दरम्यान त्यांनी हैदराबाद सोडून औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात शेतकरी संघटित करण्याचे व त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे कार्य सुरू केले. ते आता गंगापूरमध्येच वास्तव्य करू लागले. ते गंगापूरला तुळशीराम पाटील यांच्या घरी रहात. कॉ. रामभाऊ फटांगडे व इतर काही तरुण कार्यकर्ते त्यांच्याबरोबर असत. पोलिसांचा जाच असेच. गावात सभा व बैठक होणार आहे असे समजल्यावर पोलिस मागावर असत. शेतक-यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे, अवैध सावकारी करून गरीब शेतक-यांना लुबाडणा-या सावकाराविरुद्ध कारवाई करणे, अशा सावकाराला गाठून त्याच्यावर दबाव टाकून योग्य समझोता घडवणे, शेतक-यांची कुलकर्णी-पाटील यांच्या जाचातून सुटका करणे. त्याचबरोबर रझाकारांशी सामना करणे. आवश्यक तेथे रझाकारांच्या विरोधामध्ये लढा देणे अशी अनेक कार्ये ते करू लागले.आणि अल्पावधीत त्या भागातील शेतकरीवर्गात वसंतराव लोकप्रिय होऊ लागले. एवढेच नव्हे तर कोळी, भिल्ल या आदिवासी जमातीतही ते कमालीचे लोकप्रिय झाले.

हैदराबादच्या सरहद्दीवर अनेक कॅम्प सुरू झाले होते. जैनपूर येथे कॉ. हबीबुद्दीन व कॉ. वसंत राक्षसभुवनकर यांनी वेगळा कॅम्प सुरू केला. या भागात टोका या ठिकाणीही कॅम्प होता. टोका व जैनपूर येथील कॅम्पमध्ये ताळमेळ राखण्याचे काम कॉ. हबीबुद्दीन करत. वसंतराव खेड्यापाड्यांमध्ये सभा घेऊन शेतक-यांची, कार्यकर्त्यांची फौज तयार करणे. जनतेमध्ये जागृती व त्यांच्याकडून पाठिंबा मिळण्याची काम करीत असत. जिवाला जीव देणारे शेकडो नि:स्वार्थ कार्यकर्ते वसंतरावांनी या भागांमध्ये जमवले. यामध्ये प्रामुख्याने काशिनाथ भिल्ल, आसाराम कुमावत, फकीरराव वाबळे, गोपीनाथ गाडेकर, शंकर गंगाराम पाटील, तुळशीदास रोजेकर, रामभाऊ फटांगडे, कुशावर्ती भडके, भाऊसाहेब सायगाव, कचरू मिस्त्री अशा कितीतरी लोकांची नावे सांगता येतील.

प्रवरा संगम येथे एक खोली भाड्याने घेतली होती. तिथे काही कार्यकर्ते बॉम्ब तयार करीत असत. कार्यकर्त्यांचा जनसंपर्क चांगला होता. आजूबाजूच्या खेड्यापाड्यांतून त्यांना पाठिंबा होता. शेतक-यांवर जास्तीची लेव्ही लावली होती. त्या विरोधामध्ये खूप मोठे आंदोलन उभे केले गेले. या काळामध्ये वसंतरावांनी ‘वसंत भालेराव’ असे नाव धारण केले. भिल्ल लोकांना सोबत घेऊन वसंतरावांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या.१६ नोव्हेंबरला भामाठाण येथील करोडगिरी नाक्यावर हल्ला करण्याचे ठरले. निजामी पोलिसांनी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन नाका गावात हलवला होता. पण वसंतराव व त्यांच्या सहका-यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये हल्ला केला. मोहीम तर यशस्वी झाली होती. पण या मोहिमेत आपल्या सैनिकांना वाचवण्याच्या प्रयत्नात वसंतरावांना गोळी लागली. १६ नोव्हेंबर १९४७ रोजी वसंतराव शहीद झाले. ‘हुतात्मा कॉ. वसंत राक्षसभुवनकर चरित्र आणि आठवणी’ या ग्रंथात वसंतरावांच्या जीवनातील अनेक दुर्लक्षित पैलूंवर प्रकाश टाकला आहे. \

-भाऊसाहेब उमाटे
लातूर, मो. ७५८८८ ७५६९९

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या