मराठी कवितेमध्ये पाऊस हा महानुभाव संप्रदायापासून अलीकडच्या नवकवितेपर्यंत विविध रूपांत चित्रित झालेला आहे. पावसाच्या कवितेला मराठी वाचकांनीही तितकाच प्रतिसाद दिला आहे. तो नेहमीच चित्रपट, नाटक आणि लिखित माध्यमातून मराठी मनाला चिंब भिजवित आलेला आहे. आज देवदत्त मुंढे यांचा ‘मी, ती आणि पाऊस’ हा दुसरा परिपूर्ण पावसाला वाहिलेला संवेदनशील कवितासंग्रह मराठी साहित्यविश्वामध्ये काव्याच्या प्रांतात नुसत्या पाऊस या एकाच विषयावर एकूण १०६ पानांमध्ये ९० कविता
समाविष्ट आहेत. डॉ. श्रीपाल सबनीस यांची लाभलेली अभ्यासपूर्ण प्रस्तावना ही या पुस्तकाची वाङ्मयीन उंची वाढवणारी तर झालीच आहे परंतु वेदांत पब्लिकेशन यांनी कवितासंग्रहाची केलेली मजबूत बांधणी आकर्षक ठरली आहे. प्रस्तुत कवितेमध्ये पावसाच्या सुंदरतेचा वेध मुळातून घेतलेला आढळतो. साध्या, रसाळ व हृदयाला भिडणा-या शब्दांत अप्रतिम पावसाचे दर्शन कवींनी घडविले आहे.
येथे साकारलेला पाऊस कवीला आयुष्यभर विविध कारणांनी उभारी देणारा आहे.
सकाळचा पाऊस
जणू पाहुणा आला
अंगणात प्राजक्ताचा
सडा टाकून गेला
पहिल्या पावसाच्या स्पर्शापासून सुरू झालेली ही कविता प्रेयसीच्या प्रेतापर्यंत जाऊन थांबते.
अखेरचे चुंबन घेऊन पाऊस
सरण तिचं रचतो आहे
सरणाबरोबर तिच्या
अंगांना पेटतो आहे
अशी एकूण काळजाला स्पर्श करीत काळजाला चिरत जाणारी कविता मुंढे यांची येथे प्रतिबिंबीत झाली आहे. कवितासंग्रहातील सकाळचा पाऊस, तुझा पाऊस सखे, तुझा हट्टी पाऊस, माझा पाऊस माझ्याशी, कुठे लपलास पावसा, आषाढ मेघांनो, श्रावणातला पाऊस, खिडकीतला पाऊस, तुझा कोरडाच पुळक, परतीचा पाऊस, तिचं प्रेत पाहून पाऊस या सगळ्या शीर्षकाच्या कविता वाचनीय झाल्या आहेत.
कवितेतील पाऊस कधी विलक्षण गांभीर्याने तर अन्य वेळी उपरोधिकपणाने आशयाचे निवेदन करीत व्यापक रूप धारण करून विश्लेषणप्रधान शब्दकळांनी एकवटलेला कवितासंग्रहात आहे. उद्ध्वस्त, बिनधास्त रोज नवे रूप धारण करणारा ठळक शैलीमध्ये आशय या कवितेमध्ये आल्यामुळे कविता वाचनीय झाली आहे. कवीच्या मनाला जसा उभारी देणारा पाऊस आहे तसाच शेतक-याच्या जिवावर बेतणारा पाऊस आपणाला येथे दिसतो आहे.
चार अंकुराची हाक
कधी ऐकू रे सख्या
नाही वांझ माझी माती
अन् तू ही लाडक्या
प्रस्तुत कवीचे अनुभवविश्व व्यापक आहे. त्यांनी कवितेत भावनेला स्वयंपूर्णत्व दिल्यामुळे आत्मनिष्ठ प्रबळपणा बळावतो. कवीचे व्यक्तित्व रचनेचे लाघव, लयीचे स्पंदन सा-यांचेच कवितेत मनोज्ञ मिश्रण होऊन काव्याचे दिव्य रसायन म्हणजे ‘मी, ती आणि पाऊस’हा कवितासंग्रह होय.
‘मी, ती आणि पाऊस’
लेखक : देवदत्त मुंढे
वेदांत प्रकाशन, डोंबिवली
किंमत : रु. १७५/-
पृष्ठे : १०६
-प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे
कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय,
बाभळगाव, ता. जि. लातूर