19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeविशेषकोजागरीचा भावार्थ

कोजागरीचा भावार्थ

एकमत ऑनलाईन

कोजागरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी प्रत्येक घरात जाऊन ‘को जागर्ती’ म्हणजेच कोण जागं आहे?’ अशी विचारणा करते. तसेच या दिवशी जागं असणा-यांना तिचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. पौराणिकतेपलीकडे जाऊन पाहताना हे जागं असणं म्हणजे आपल्यामध्ये जागृती असणं असा अर्थ घ्यायला हवा. केवळ स्वत:पुरताच विचार न करता समाजातील इतर घटकांचाही विचार झाला पाहिजे, त्यांच्या सुख-दु:खात आपणही सामील असले पाहिजे, आपल्या मनामध्ये विविध गोष्टींबद्दल जागृती असली पाहिजे हा याचा खरा अर्थ. अलीकडे, कोजागरी साजरी करणे म्हणजे एक सेलिब्रेशन बनले आहे. पण प्रकार कोणताही असला तरी या दिवसाचे चंद्राचे शीतल चांदणे प्रत्येकाला अनुभवायचे असते. या चंदेरी प्रकाशात न्हाऊन निघायचे असते हेच खरे.

अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा अवघ्या महाराष्ट्रभर साजरी केली जाते. नवरात्र नुकतेच संपलेले असते. यादिवशी नभांगणातील पूर्ण चंद्राच्या शीतल प्रकाशाने अवघी सृष्टी तेजोमय झालेली असते. आकाशभर चंद्रकिरणांचा आणि चांदण्यांचा सडा पडलेला असतो. स्वच्छ, नितळ प्रकाशात अवघी धरती न्हाऊन निघत असते. चंद्राच्या या किरणशलाका अतिशय आल्हाददायक आणि मोहक असतात. कोजागरी पौर्णिमेला जागरण करण्याची पद्धत आहे. या दिवशी रात्री लक्ष्मी घराघरांत डोकावून बघत असते आणि कोण-जागं आहे असे ती विचारत असते. जेथे लोक जागे असतात तेथे ती प्रवेश करते, त्यांना समृद्धी देते असे मानले जाते. त्यामुळेच यादिवशी लक्ष्मी, कुबेर, आणि इंद्र यांची एकत्रित पूजा करण्याचीही पद्धत आहे.

पाटावर चंदनाचा प्रतीकात्मक चंद्र काढायचा आणि लक्ष्मी, कुबेर म्हणून सुपारी ठेवायची तर इंद्र म्हणून तांब्याचा कलश ठेवून त्यात आंब्याची पाने ठेवावीत त्यांची मनोभावे पूजा करावी. या पूजेमुळे घरात अक्षय लक्ष्मी नांदते अशी समजूत आहे.
भारताच्या काही भागात लोक या दिवशी उपवास ठेवतात. तांब्यावर अथवा मातीच्या घटावर वस्त्रात झाकलेली लक्ष्मीची प्रतिमा ठेवतात. त्याची पंचोपचार पूजा करतात. त्यानंतर संध्याकाळी चंद्रोदयानंतर सोने, चांदी अथवा मातीचे १०० दिवे तुपाने भरून प्रज्ज्वलित केले जातात. खीर करून ती चंद्राच्या प्रकाशात ठेवतात. एक प्रहरानंतर म्हणजे तीन तासांनंतर लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवतात. नंतर खिरीचा प्रसाद देतात. मंगल गीत गाऊन रात्री जागरण करतात. अशा प्रकारे दरवर्षी हे व्रत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केले जाते.

खानदेशाकडील काही भागात या दिवशी गुलाबाईचे पारणे असते व दुस-या दिवशी विसर्जन असते. अनंत चतुर्दशीच्या दुस-या दिवशी घराघरांतून कुमारिका गुलाबाईची स्थापना करतात. गुलाबाई म्हणजे पार्वती. शंकर, पार्वती आणि गणपती यांची एकत्रित मूर्ती तयार केली जाते. यात भरपूर विविधता असते. कमळावर, नागावर, सिंहासनावर बसवलेली गुलाबाई असे प्रकार असतात. आपल्या इच्छेनुसार मूर्ती आणून घरात तिची स्थापना करायची. कोजागरी पौर्णिमेपर्यंत म्हणजे महिनाभर मुली एकमेकींच्या घरी जाऊन गुलाबाईची गाणी म्हणतात. झिम्मा खेळतात, खिरापत वाटतात, पौर्णिमेला याचे पारणे करतात. रात्री सा-याजणी आपापल्या गुलाबाईची मूर्ती घेऊन एके ठिकाणी जमतात. तेथे वेगवेगळी खिरापत प्रसाद म्हणून आणतात. दूध, आटवून ते चंद्रप्रकाशात ठेवतात आणि रात्रभर गाणी, खेळ खेळतात. मग खिरापत खाऊन आणि दूध पिऊन आपापल्या घरी जातात. दुस-या दिवशी मूर्तीचे विसर्जन करतात. गुलाबाई म्हणजे पार्वती महिनाभर माहेरी आलेली असते, असे मानतात. तिला रोज वेगवेगळे नैवेद्य दाखवतात. हा संपूर्ण महिना घराघरांतून कुमारिकांचा चिवचिवाट ऐकायला मिळतो.

अशा प्रकारे कोजागरी पौर्णिमा साजरी करण्याच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत. पद्धती वेगळ्या असल्या तरी कोणत्याही रूपात देवीची पूजा करणे हाच यामागचा हेतू आहे. कोजागरी पौर्णिमा म्हटली की आठवते ती शिवाजी महाराजांच्या काळातील हिरकणीची गोष्ट. तो दिवस कोजागरीचाच होता. महाराजांनी रायगडाच्या सभोवतालच्या गावातील लोकांना शक्य तेवढे दूध गडावर पोचवण्याची आज्ञा दिली होती. गडपायथ्याच्या गावातील गवळणी दूध पोचवायला गडावर पोचल्या. हिरकणी आपल्या तान्हुल्याला घरी निजवून गडावर आली होती. दूध दिल्यानंतर गडावरचे वैभव बघताना तिला परतायचे भान राहिले नाही. परतीचा रस्ता धरला तेव्हा गडाचे दरवाजे बंद झाले होते. नियमानुसार ते सूर्योदयाच्या वेळीच उघडणार होते. सह्याद्रीची ही कन्या आपल्या मातृत्वाखातर गडाच्या अत्यंत अवघड कड्यावरून खाली उतरत आणि पळत आपल्या तान्हुल्याजवळ गेली व त्याला छातीशी धरले. महाराजांना ही गोष्ट दुस-या दिवशी समजल्यावर त्यांनी हिरकणीला बोलावून तिचा सत्कार केला आणि कड्याला तिचे नाव दिले. कोजागिरीची ही आठवण इतिहासाच्या पानांवर कायमची उमटली गेली आहे.

महाराष्ट्रातील पुणे व त्या जवळच्या भागात नवरात्रीपासून कोजागरी पौर्णिमेपर्यंत भोंडला साजरा केला जातो. पाटावर हत्ती काढून त्याभोवती स्त्रिया, मुली फेर धरतात. भोंडल्याची गाणी म्हणतात. खिरापत वाटतात. कोजागरी म्हणजे हमखास जागरण, मनसोक्त गप्पा आणि सोबतीला मसालेदार दुधाचा आनंद. या दिवसात पावसाळा संपून गुलाबी थंडीला सुरुवात झालेली असते. या दिवसांत अगस्त ता-याचा उदय होतो. या ता-याच्या किरणस्पर्शाने तळी, नद्या, विहिरींचे पाणी शुध्द होऊन पिण्यायोग्य होते, असा समज आहे. या दिवसांत काय करावं हे आपल्या परंपरेत सांगण्यात आलं आहे. शरद ऋतूमध्ये पित्ताचा त्रास होतो. तो होऊ नये म्हणून सुवासिक जल, थंड पेयं घ्यावीत, चंद्रप्रकाशात बसावं, मोत्यांच्या माळा धारण कराव्यात असे सांगण्यात आले आहे. यातूनच या पौर्णिमेच्या रात्री शीतल दूध घेण्याची परंपरा सुरू झाली असावी.

अलीकडच्या काळात टीव्हीसह घरातच मनोरंजनाची अनेक साधनं उपलब्ध आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण होते. पण पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळेच कोजागरीच्या निमित्ताने रात्री उशिरापर्यंत जागण्याची पध्दत रूढ झाली. या रात्री लक्ष्मी प्रत्येक घरात फिरते आणि ती ‘को जागर्ती’ म्हणजेच ‘कोण जागं आहे?’ असा प्रश्न विचारते. जागं असणा-यांना तिचा आशीर्वाद मिळतो, अशी कथा आहे. हे जागं असणं म्हणजे आपल्यामध्ये जागृती असणे असा अर्थ घ्यायला हवा. केवळ स्वत:पुरताच विचार न करता समाजातील इतर घटकांचाही विचार झाला पाहिजे, त्यांच्या सुख-दु:खात आपणही सामील असले पाहिजे, आपल्या मनामध्ये विविध गोष्टींबद्दल जागृती असली पाहिजे हा याचा खरा अर्थ.

कोजागरी म्हणजे केवळ आपली प्रिय झोप सोडून केलेले जागरण नसून आपल्या ऋतुबदलांची, बाहेरच्या वातावरणात झालेल्या फरकाची नोेंद कोणी घेतली आहे का हे पाहणे म्हणजे खरी जागृती. ऋतुबदलाप्रमाणे आपल्या आहारात आणि दिनचर्येत काही बदल करणे आवश्यक असते. मसाले, तिखट पदार्थ आहारातून कमी करणे या दिवसांत आवश्यक असते. कोजागरीच्या रात्री दूध पिण्याची पद्धत आपल्याकडे आहे. त्यामागेही एक विशिष्ट कारण आहे. या दिवसांत हवामानात बरेच बदल घडून येत असतात. या दिवसांत हिवाळा सुरू होतो. दिवसा गरम होते आणि रात्री थंडी पडते. दूध पिल्यामुळे पित्तप्रकोप कमी होतो. या दिवशी काही घरांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, काव्यवाचनाच्या मैफिली रंगतात. या निमित्ताने आपल्यातील प्रतिभाही जागृत होते.

– कीर्ती कारखानीस

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या