21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeविशेषभेटीगाठी व राजकीय समिकरणांची चर्चा !

भेटीगाठी व राजकीय समिकरणांची चर्चा !

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्याने राज्याच्या विविध भागातील एकेक निर्बंध शिथिल होत आहेत. दुसऱ्या लाटेचा अनुभव व सहा जिल्ह्यातील स्थिती अजूनही नियंत्रणात नसल्याने सरकार सावधपणे पावलं टाकत आहे व ते योग्यच आहे. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असताना थंडावलेले राजकारणही पूर्वपदावर येतेय. मागच्या आठवड्यात झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीने सुस्तावलेल्या राजकीय वर्तुळात काही तरंग उठले.

एकमत ऑनलाईन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्यानंतर राज्य सरकारने एकेक निर्बंध कमी करायला सुरुवात केली आहे. राज्यातील सहा जिल्ह्यातील स्थिती अजूनही पुर्णतः नियंत्रणात आलेली नसल्याने खुली सूट देण्याबाबत सावध पावलं टाकली जातायत व ती योग्यच आहेत. कोरोनाचा धोका अजून पुर्णतः टळला नसला तरी जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येते. जनजीवनाप्रमाणेच राजकारणही पूर्वपदावर येतेय. मागच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची दिल्लीत झालेली भेट व प्रख्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीने गेले काही दिवस शांत असलेल्या राजकारणात तर्क-वितर्काचे तरंग उठले आहेत. राजकीय पंडित या दोन भेटीचे अन्वयार्थ लावण्याचे प्रयत्न करत आहेत. या भेटींमधून नवी राजकीय समीकरणं उदयाला येऊन संभाव्य राजकीय घडामोडींची भाकीतंही काही धाडसी मंडळी करताना दिसत आहेत. त्यापूर्वी फडणवीस-पवार यांच्या भेटीनेही काही दिवस चर्चेची संधी दिली होती. चर्चा व तर्क-वितर्कांना उधाण आले असले तरी सध्याची राजकीय स्थिती व राजकारणातील प्रमुख खेळाडूंचे एकूण रागरंग पाहता नजीकच्या काळात फार काही मोठी उलथापालथ होईल असे दिसत नाही. मात्र अशा भेटींची चर्चा तर होणारच.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेले दणदणीत यश पहाता त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या निवडणुका अनेकांना फडणवीस सरकारला मुदतवाढ देण्यासाठीची तांत्रिक औपचारिकता वाटत होत्या. सर्वसामान्यांचे सोडाच, पण राजकारणात आयुष्य घालवलेल्या अनेक नेत्यांनाही तसेच वाटले होते. त्यामुळे त्यांनीही लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेच्या सावलीत जायचा निर्णय घेतला. पण घडले भलतेच. शिवसेना सोबत असली तरी स्वबळावर १४५ च्या आकड्यापर्यंत मजल मारून केंद्रासारखे येथेही बहुमत मिळवण्याचे भाजपचे स्वप्न भंगले. २०१४ पासून अपमान गिळून भाजपसोबत राहिलेल्या शिवसेनेने अनपेक्षित खेळी करून सर्वांनाच धक्का दिला. भाजपबरोबर राहून सत्तेचा मिळेल तो वाटा स्वीकारण्याची भूमिका सोडून, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने स्वतःची सत्ता आणण्याचा निर्णय घेतला. शिवसेना असा टोकाचा निर्णय घेण्याचे धाडस करणार नाही, काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार नाही, हा भाजपचा अंदाज चुकला व महाराष्ट्राची सत्ता हातातून गेली. हे सरकार अंतर्विरोधामुळे वर्षभरात कोसळेल हा अंदाजही चुकला. ‘ऑपरेशन कमळ’ करून मध्य प्रदेश किंवा कर्नाटकप्रमाणे सत्ता काबीज करण्याची शक्यताही दिवसोदिवस अधिक धूसर होत चालली आहे. यामुळे शिवसेनेसोबत पुन्हा जुळवून घेण्याचा सल्ला काही जुनी जाणती मंडळी देत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मोदी सरकारच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. पश्चिम बंगालच्या कौलही धक्का देणारा होता. त्यामुळे भाजपाने थोडं नरमाईचे राजकारण करण्याचा सल्ला ही मंडळी देत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला स्वाभाविकच अधिक महत्व आले. राजकारणात काहीही अशक्य नसते. पण एका भेटीमुळे गेल्या सात वर्षातली कटुता संपेल का ? आणि केवळ कटुता दूर होण्यामुळे राजकारण बदलेल का ? हा प्रश्नच आहे.

दीड वर्षापूर्वी संधी होती, आता नाही
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेच्या समान वाटपावरून जेव्हा पेच निर्माण झाला तेव्हा हा पेच सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून म्हणावे तसे प्रयत्न झाले नाही. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेव्हा पुढाकार घेतला असता तर मार्ग निघू शकला असता. मात्र तसे झाले नाही. उलट शिवसेनेशी चर्चा करण्याऐवजी राष्ट्रवादीशी युती करण्याचा प्रयत्न झाला. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात शरद पवार यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला होता, असं स्वतः पवार यांनीच सांगितले आहे. पवार यांनी नकार दिल्यानंतर अजित पवारांच्या मदतीने सरकार स्थापनेचा अयशस्वी प्रयत्न झाला. पण तोही फसला. गेल्या दीड वर्षात केंद्रातील मंडळींनी महाराष्ट्राबद्दल किंवा शिवसेनेबद्दल अजिबात ममत्व दाखवलेले नाही. उलट त्यांच्या वाटेत जेवढे अडथळे निर्माण करता येतील तेवढे केले. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना गोवण्याचे प्रयत्न झाले. ही सगळी कटुता एका भेटीत दूर होणारी नाहीय. मुख्य म्हणजे शिवसेनेला माहेरची आठवण यावी एवढा छळ काँग्रेस-राष्ट्रवादीने केल्याचेही अजून ऐकिवात आलेले नाही.

निवडणुकपूर्व आघाडी अवघड, पण अशक्य नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे तर्क-वितर्क सुरू असताना या सरकारचे शिल्पकार असलेल्या शरद पवार यानी महाविकास आघाडीचे सरकार तर पूर्ण पाच वर्षे टिकेलच, पण नंतरच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही आघाडी असेल, असे सुतोवाच केले. लगेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करून टाकले. राजकारणात तीन वर्षे हा फार मोठा काळ आहे. त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय होतील. त्यामुळे आघाडी होणार किंवा नाही होणार असं कोणीही आज ठामपणे सांगू शकणार नाही. आघाडी म्हणजे सत्तेत वाटेकरी व कोणत्याच पक्षाला हे आवडत नाही. त्यामुळे स्वबळावर सत्ता हे प्रत्येक पक्षाचे स्वप्न असते. पण आघाडीत राहून हे स्वप्न पूर्ण करता येत नाही, वाढ खुंटते. त्यामुळेच तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे लढून सर्व प्रमुख पक्षांनी आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. शिवसेना-भाजपाची युती झाली असती तर काँग्रेस-राष्ट्रवादीने वेगळे लढण्याचे, किंवा या दोघांची आघाडी असती तर शिवसेना-भाजपने वेगळे लढण्याचे धाडस केले नसते. याचाच अर्थ समोर प्रबळ प्रतिस्पर्धी असेल तर आघाडीचा पर्याय योग्य ठरतो. पवार म्हणतायत तसे हे सरकार पाच वर्षे टिकले तर लोकसभेला तर नक्की आघाडी होईल व लोकसभेत काय स्थिती राहील यावरून विधानसभेच्या आघाडीच्या बाबतीत पक्षांची भूमिका ठरेल, हे उघड आहे. त्यामुळे आज ही चर्चा मनोबल वाढवण्यासाठी उपयुक्त आहे, एवढेच म्हणावे लागेल.

काँग्रेसला वगळून समर्थ पर्याय अशक्य
प्रख्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी परवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन तब्बल तीन तास चर्चा केली. भाजपाच्या विरोधात प्रबळ प्रादेशिक पक्षांची आघाडी उभारण्याचा प्रशांत किशोर यांचा प्रयत्न असल्याने स्वाभाविकच या भेटीचीही बरीच चर्चा झाली. पश्चिम बंगालची निवडणूक, शेतकरी आंदोलन व कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर केंद्रातील मोदी सरकारबद्दल वाढत चाललेली नाराजी यामुळे गलितगात्र झालेल्या विरोधकांच्या आशेला पालवी फुटली आहे. समर्थ पर्याय दिला तर भाजपासमोर आव्हान उभे करता येऊ शकते, असा विश्वास त्यांना आहे. पण या पक्षांमधील गैरकॉंग्रेसवाद तेवढाच तीव्र असल्याने अनेकांना कॉंग्रेसविराहित आघाडी उभारावी असे वाटते. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आघाडी उभारण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे तर्क प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर व्यक्त करण्यात आले. मात्र राष्ट्रवादीकडून प्रशांत किशोर यांच्याकडे पक्षाने कोणतीही जबाबदारी सोपवलेली नसल्याचा खुलासा करण्यात आला. देशातील सद्य राजकीय स्थिती पाहता कोणाची इच्छा असो वा नसो काँग्रेसला बाजूला ठेवून राष्ट्रीय पातळीवर भाजपाविरोधात सक्षम आघाडी उभी राहू शकत नाही हे वास्तव आहे. प्रशांत किशोर हे नावाजलेले रणनीतीकार असले तरी पवार हे राजकारणातील सर्वात मुरब्बी व अनुभवी नेते आहेत. त्यामुळे तीन तासाच्या चर्चेत किशोर यांच्या रणनीतीत नक्कीच बदल झाला असेल, असं समजायला हरकत नाही.

-अभय देशपांडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या