22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeविशेषमेहकरची लढाई आणि मदतगाराचा वध

मेहकरची लढाई आणि मदतगाराचा वध

एकमत ऑनलाईन

आट्टर्गाच्या टोळीने बोळेगाव येथे संभा दरोडेखोराचा वध केल्यानंतर परिसरातील रझाकारांचे धाबे दणाणले तर हिंदू जनतेला आधार मिळाल्याचा आनंद झाला. मेहकरचे रझाकार सदर गुलाबशहा व शेरखान यांनी प्रयत्न करूनही टोळीवाले ऐकत नाहीत हे पाहून या रझाकारांनी वेगळेच कृत्य केले. नरसिंगा नावाचा वयोवृद्ध कलाल दररोज आट्टर्गा येथे येत असे. नागवेलीची पाने विकणे व मारुतीच्या मंदिराची झाडलोट करणे हे त्यांचे काम. मात्र मेहकरच्या रझाकारांनी टोळीचा खब-या समजून नरसिंगाचा खून केला. या घटनेमुळे टोळीवाले अधिकच सावध झाले. आपल्या गावावर कधीही हल्ला होणार हे आट्टर्गेकरच नव्हे, तर परिसरातील गावक-यांना पण समजले होते. आता लढाई अटळ आहे हे पाहून प्रत्येक जण हत्यारे जमविण्याच्या प्रयत्नाला लागला. हत्यार नसलेले लोक कत्ती, बर्चे, कु-हाडी तयार करून घेऊ लागली. प्रत्येकाजवळ गोफण तयार झाली. जुन्या तलवारी घासून धारदार केल्या जाऊ लागल्या. माळवदावर मोर्चे बांधण्यात आले. दगड-गोटे यांचे ढीग साठवले गेले. रात्रीच्या वेळी गस्त घातली जाऊ लागली.

कोंगळी येथे एकनाथराव कारभारी यांनी आपल्या घरी काही निष्णात कारागिरांना बोलवून हत्यारे तयार केली होती. किसान दलाला हत्यारे पुरवावी असे त्यांना वाटले. एके दिवशी त्यांनी टोळीवाल्यांना निमंत्रण दिले. टोळीवाले एकनाथराव कारभारी यांच्याकडे पाहुणचार घेऊन हत्यारासह परत निघाले तेव्हा मेहकरच्या थोडे पुढे येताच जवळपास पाचशे रझाकारांनी टोळीचा पाठलाग सुरू केला. पळून जाऊन लपून बसणे टोळीवाल्यांना मान्य नव्हते. बोळेगावच्या शिवारात असलेल्या ओढ्याच्या पूर्वेला उंच माळावर आल्यानंतर टोळीवाल्यांनी आपले मोर्चे सांभाळले. रझाकारांच्या गोळीबाराला गोळीने प्रतिउत्तर दिले जाऊ लागले. गोफण गुंड्यातून गोळ्यांचा वर्षाव केला जाऊ लागला. पण यावेळी घात झाला …रझाकारांना सळो की पळो करून सोडणा-या यशवंतराव सायगावकर यांच्या पायाला गोळी लागली.

रक्त वाहू लागले. नारायण जाधवने आपला पटका फाडून यशवंतरावांचा पाय बांधला. त्यांची बंदूक दुस-याने घेतली. दोन तरुणांनी यशवंतरावांना आधार देत हळूहळू मागे सरकत बोळेगावकडे नेले. बाकीच्या तरुणांनी अत्यंत निकराने मुकाबला चालू ठेवला. बोळेगावमध्ये यशवंतरावांना आप्पाराव पाटलांच्या वाड्यात आश्रय दिला गेला. डॉ. चनप्पानी औषध लावून यशवंतरावांचा पाय बांधला. टोळीवर संकट आल्याचे पाहताच बोळेगावात एकच खळबळ उडाली. तेथे सारजाबाई या आट्टर्गाच्या लेकमाती होत्या. त्यांनी रान उठविले. गाववाले टोळीच्या मदतीला धावले. त्याचवेळी संगमहून व्यंकटराव मुळे, गणपती बिरादार व त्यांचे साथीदार मदतीला धावून आले. अगोदरच टोळीवाल्यांनी डबघाईला आणलेले रझाकार दोन बाजूने टोळीला नवीन कुमक आल्याचे दिसताच घाबरून गेले. इतक्यात एक रझाकार ठार तर तीन ते चार रझाकार जखमी झाले. आता पळ काढण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. टोळीच्या पन्नास तरुणांनी बोळेगावकरांच्या मदतीने पाचशे-सहाशे रझाकारांचा धुव्वा उडविला. काही लोक मिळालेला विजय मोठा आहे.

आपण रझाकारांचा पाठलाग करू नये असे म्हणू लागले. पण सारजाबाईच्या आग्रहाखातर आता टोळीवाल्यांपुढे दुसरा पर्याय राहिला नाही. बघता-बघता टोळीवाले बोळेगावकर व संगमवाले मेहकरमध्ये शिरले. अनेक रझाकारांनी गढीचा आश्रय घेतला. लढाईला पुन्हा तोंड फुटले. रझाकारांच्या बंदुका माड्यावरून आग ओकू लागल्या. टोळीवाले भिंतीच्या कोप-याचा आडोसा घेऊन मुकाबला करू लागले. मेहकर बंदुकीच्या आवाजाने दणाणून गेले. अटीतटीच्या लढाईत आप्पाराव पाटील बोळेगावकर बिजलोटचा मारा करून रझाकारांना हैराण करत होते. पण माडीवरून मारा करणा-या रझाकाराच्या गोळीने ते धारातीर्थी पडले. तिकडे संगमकराबरोबर आलेला नरसिंग नावाचा तरुणही शहीद झाला. दोघे जण ठार होताच टोळीवाले संतापले. त्यांनी रझाकारांच्या घरांना आगी लावल्या. बघता बघता अग्नीच्या ज्वाला भडकू लागल्या. शेवटी टोळीवाले परत फिरले.

आता निजाम सरकार आपल्याला सोडणार नाही याची टोळीवाल्यांना मनोमन खात्री पटली. रात्रीच गावक-यांनी पाहुण्यांच्या गावांना स्थलांतर सुरू केले. रझाकार चालून आले तर मुकाबला करता येईल या विचाराने गावात फक्त लढाऊ तरुण राहिले. काही दिवसांनंतर अचानक एके दिवशी सकाळी दहाच्या सुमारास तीन ट्रक स्पेशल पोलिस आली. मेहकरच्या रझाकारांनी पोलिसांना टोळीचे ठिकाण दाखवले. अचानक एवढ्या प्रमाणात पोलिस पाहिल्यानंतर लढावे की पळून जावे हे टोळीप्रमुखांना निश्चित करता येईना. अगदी शेवटच्या क्षणी सर्वांना सिंदबनात निघून जाण्याचा सल्ला दिला. पण उशीर झाला होता. कठीण परिस्थिती निर्माण झाली. काही तरुणांनी शेजारच्या माळवदावर उड्या मारून पळून जाण्यास सुरुवात केली. पण यावेळी नऊ तरुणांना अटक झाली. त्यामुळे काही दिवस टोळीवाले शांत राहिले. परत त्यांनी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली. किसान दलाच्या कार्याची गाथा हैदराबादपर्यंत पोहोचली. टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी उच्च स्तरावरून आदेश आले. बिदरचा मदतगार फतेहअली मोठा फौजफाटा घेऊन मेहकरला आला.

दुस-या दिवशी सकाळी मदतगार, अमीन आणि जवळपास तीनशे पोलिस आट्टरग्याच्या दिशेने निघाले. मदतगार, अमीन व तीन पोलिस घोडे घेऊन पुढे निघाले. बाकीचे पोलिस थोडे मागे राहिले. मदतगाराला टोळीला पकडणे खूप सोपी गोष्ट वाटली असावी. अति आत्मविश्वासाने तो एकटाच घोडे पुढे पळवू लागला. पाराजवळ हातात बिजलोट घेऊन यशवंतराव उभे होते. मदतगार सरळ त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला व त्याने त्यांची बंदूक काढून घेतली. कोणीतरी मोठा अधिकारी असावा म्हणून यशवंतराव शांत बसले. त्याने पिस्तूल दाखवून टोळीचे ठिकाण दाखवण्यास सांगितले. काही तरुण श्रीनिवास पटवारी यांच्या माडीवर राहत होते. ते ठिकाण दाखवताच त्याने दारावर लाथा मारण्यास सुरुवात केली. टोळीवाल्यांनी दार काढले नाही. उलट मदतगाराला बंदुका दाखवल्या. त्याला परिस्थितीचा अंदाज आला. तो मागे फिरला व दिशा न समजल्यामुळे माणकेश्वरच्या दिशेने निघून गेला.

-भाऊसाहेब उमाटे
लातूर, मो. ७५८८८ ७५६९९

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या