चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या ठिकाणी मी बी. एड. चे शिक्षण घेत होतो. त्याच दरम्यान विलासरावजी देशमुख साहेब राज्याचे प्रथमच मुख्यमंत्री झाले. मला आनंद गगनात मावत नव्हता. साहेबांचा जंगी सत्कार राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केला होता. त्या कार्यक्रमास जाण्याची तीव्र इच्छा मनात होती. मात्र प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू असल्याने मोठा पेच माझ्यासमोर निर्माण झाला होता.
तरी सरळ लातूर गाठले आणि ऐतिहासिक असा सत्कार सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ मी पाहिला. माझे दोन पेपर बुडाले तरी जो आनंद मिळाला तो लाख मोलाचा होता. विशेष म्हणजे मी जेव्हा परत चंद्रपूरला गेलो तेव्हा वातावरणच बदलून गेले होते. मी मुख्यमंत्र्यांच्या गावचा असल्याने अनेकांचा दृष्टिकोनच बदलून गेला. लातूर म्हणजे भूकंपवाले अशी असलेली ओळख जाऊन मुख्यमंत्र्यांचे गाव अशी नवी ओळख निर्माण झाली. काही मित्र तर मला काय मुख्यमंत्री असे म्हणून हाक मारू लागले होते. अशा वेळी माझी छाती आनंदाने भरून यायची. लातुरातील प्रत्येकालाच आपण मुख्यमंत्री झाल्याचा आनंद वाटायचा. याचा उल्लेख साहेबांनी त्यांच्या सत्कार प्रसंगीच्या भाषणात केला होता.
२००६ साली जिल्हा परिषद, लातूरमध्ये विषयतज्ज्ञ पदासाठी मुलाखती झाल्या. माझ्यासह ६२ जणांची निवड झाली मात्र तरी ऑर्डर मिळत नव्हती. आम्ही सारे मुंबईला गेलो. साहेबांना गडबडीतच भेटलो. अडचण सांगितली. काळजी करू नका. होऊन जाईल काम असं साहेब म्हणाले. सोबतच्या मित्रांना वाटलं साहेबांनी फार मनावर घेतलं नाही. परंतु काही तासांतच जिल्हा परिषदेतून आम्हाला फोन आला की, तुमच्या ऑर्डर तयार आहेत. साहेब किती मोठ्या मनाचे होते हे माझ्या सहका-यांना तेव्हा समजून आले.
-विवेक सौताडेकर, जिल्हाध्यक्ष,
जगद्गुरू संत तुकोबाराय साहित्य परिषद, लातूर