लातूर जिल्ह्याची घोषणा बॅ. अब्दुल रहेमान अंतुले साहेबांनी केली त्यावेळी साहेब आमदार होते. या जिल्ह्याच्या उद्घाटन सोहळ्याचा आनंद साजरा होत असताना साहेब महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते आणि लातूर जिल्हा रौप्यमहोत्सवी वर्षात दिमाखदार पदार्पण करताना साहेब राज्याचे मुख्यमंत्री असणे हा सगळा ऋणानुबंधाचा प्रवास आहे. ऋणानुबंध यासाठी की, साहेबांचे नातेच मुळात लातूरच्या श्वासांशी आहे.
जेव्हा साहेब १९९९ साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी लातूरला शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून विकसित केले. या जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, कृषी, नगररचना, धर्मादाय, सहकार, पशुसंवर्धन, महावितरण, समाजकल्याण, माहिती व जनसंपर्क अशा अनेक खात्यांची विभागीय कार्यालये याच काळात सुरू झाली. शैक्षणिक क्षेत्रात ’लातूर पॅटर्न’चा उदय याच काळात झाला. लातूरमध्ये आज दोन वैद्यकीय महाविद्यालये, दोन अभियांत्रिकी महाविद्यालये, महिला तंत्रनिकेतन आणि राज्यातले पहिले कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू झाले व लातूरची ’एज्युकेशनल हब’ म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली.
ग्रामीण भागात आर्थिक क्रांतीची बीजे याच काळात रोवली गेली. मांजरा साखर कारखाना, विकास साखर कारखाना, रेणा साखर कारखाना, मारुती महाराज साखर कारखाना, जय जवान साखर कारखाना, पानगावचा पन्नगेश्वर साखर कारखाना, साई शुगर्स आदी कारखान्यांनी ग्रामीण भागात परिवर्तनाची लाटच आणली. मराठवाड्यात साखर कारखानदारी उभी राहू शकत नाही हा समज ’मांजरा’ आणि ’विकास’ने सपशेल खोटा ठरविला. आज देशपातळीवर या कारखान्यांनी साखर क्षेत्रातील अनेक पुरस्कार खेचून आणून सहकारी साखर कारखानदारीचा आमचा आलेख उंचावत ठेवला आहे. ग्रामीण भागाचा आर्थिक व सामाजिक कायापालट यातून झाला.
लातूर जिल्हा मध्यवती सहकारी बँकेने तर नावाप्रमाणेच सात मजली यश संपादन केले आहे. शेतक-्यांच्या काळ्या आईशी नाते सांगणारी ही बँक आता त्यांच्या लेकी-बाळींचे हात पिवळे व्हावेत म्हणून शुभमंगल योजना घेऊन मामासारखी त्यांची पाठराखण करीत आहे. अशी पाठराखण करणारी ही देशातील पहिली सहकारी बँक आहे. म्हणूनच साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्ह्याचे सिंहावलोकन करताना वाटते की, साहेबांचे नाते लातूरच्या श्वासांशी!
– सौ. उमादेवी श्रीनिवास देशमुख