24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeविशेषदया हेच धर्माचे मूळ -महात्मा बसवेश्वर

दया हेच धर्माचे मूळ -महात्मा बसवेश्वर

एकमत ऑनलाईन

विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी येथे कुम्मे कुळातील शैवब्राह्मण दाम्पत्य असलेल्या मादरस आणि मादलांबिका यांच्या पोटी आनंद नाम संवत्सरामध्ये वैशाख महिनातील अक्षय तृतीया ११३४ या दिवशी विश्वगुरु महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला. अमानवी वर्तनाने असंस्कृत बनलेल्या समाजातील नीच व दुय्यम वागणुकीस प्रतिबंध करून कर्मकांड अस्पृश्यता स्त्री- पुरुष भेद अनेक देवतोपासना इत्यादीविरोधात जाऊन धर्मसुधारणा विशेषत: समाज-सुधारणा केली. याउलट शिवप्रतीक समान लिंग तळहातावर देऊन इष्टलिंगाची उपासना करणा-या भक्तिमार्गाची निवड केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने दीक्षा देऊन लिहिणे-वाचणे शिकवून वचने लिहिण्यास सक्षम केले. अर्थात स्त्री-पुरुष समानता या क्रांतिकारी पुरोगामी चळवळींचे स्वरूप बाराव्या शतकातच झाले. श्रम केल्यानेच पृथ्वीवर स्वर्ग अवतरतो, म्हणून कायक दासोहाचे समर्थन केले.अनुभव मंटप या सांस्कृतिक व जगातील पहिली महासंसद म्हणून केंद्रांची उभारणी बाराव्या शतकात केली. त्यातून मानवतावादी व सामाजिक विचार केवळ व्यक्त न करता प्रत्यक्ष कृतीत, आचरणात आणून दाखविले. तसे पाहता बसवेश्वरांचे अनेक ज्ञानार्जन सामाजिक अष्टपैलू आहेत. त्यातील काही समर्पक पैलू पाहता येतील.

आपण स्वीकारत असलेला जीवनक्रम जीवनाचे सुत्र अनुशासन, नियम आचरणात आणणे या सा-या गोष्टीच्या मूल्यास धर्म म्हटले जाते. ‘अहिंसा परमो धर्म’ असे महावीरांचे सांगणे तसेच ‘दया धर्माचे मुळ’ असे बसवेश्वरांचे सांगणे. प्रत्येकाने श्रध्दापूर्वक आचरणात आणवयाचे आचार-विचार हे सारे ज्याचा ज्याचा धर्म तसे पाहता धर्मा-धर्माची व्याख्या ज्या त्या संतानी आपल्या परीने प्रतिपादन केली. किंबहुना १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी धर्माविषयी अत्यंत साध्या व सुलभ भाषेतून आपल्या शरणाना धर्म कसा असावा. ते सांगितले ते त्याच्या वचनातून ‘दयेविना धर्म कसा होईल देवा सर्व प्राणिमात्रांना दया पाहिजे. दया हेच धर्माचे मुळ आहे अन्यथा कुंडलसंगमदेव जवळ घेणार नाही’ दयेविना धर्म कोणता देव असे हे वाक्य सर्वच धर्म दयाळू दयाभरीत असल्याचे सांगते.बसवेश्वरांची दया केवळ मानवापुरती सीमित नव्हती तर सकल जीविताविषयीही होती. दया मानवांना नसलेली व्यक्ती धर्मवंत नव्हे. दयेविना असलेला धर्मवंतपणा देवालाही मान्य नाही.

धर्माच्या नावाखाली हिंसेचे समर्थन करणा-यांना पाहून एकीकडे राग दु:ख बळी जाणा-या मुक्या प्राण्यांविषयी त्यांना तळमळ वाटते. यज्ञाकरिता बळी देण्यात येत असलेल्या दीनवाण्या बोकडाला पाहून बसवेश्वर आपल्या वचनात म्हणतात. वेदात विधिविधान असल्याने,
तुज मारतात ठार म्हणून
आरे बोकडा तू रड रे
वेदपठण करणा-यापुढे तू रड रे
शास्त्रश्रवण करणा-यापुढे तू रड रे
तुझ्या आक्रोशाने करील योग्य शासन कुंडलसंगमदेव यज्ञ करण्यासाठी मुक्या प्राण्याचा बळी देताना पाहून बसवेश्वर म्हणतात. असा कुठला धर्म सांगतो की, मुक्या प्राण्यांचा जीव देऊन देव प्रसन्न होईल का ? वाईट कर्मकांडाला महत्त्व का देता? ते म्हणतात, वेदशास्त्र सांगणा-यांना नाही मी थोर म्हणत जो कर्मकांडासारखी पूजा सांगतो. जो वेद प्राणिहत्या करायला सांगतो. त्यास मी मानत नाही तथा तो धर्मही नाही होऊ शकत. बसवेश्वर सांगतात सारी माणसे ही एकाच ईश्वराची लेकरे आहेत पण तरीही आपण सतत आपसांत झगडत असतो.

तर कधी धन कधी जात आपल्यातील काही मनुषला उच्चनीच मानून काही धर्ममार्तंडानी त्यांना हजारो वर्षे आपल्यापासून दूर ठेवले त्यांची सावलीदेखील अपवित्र अपशकुनी मानली. त्यांना गावकुसाबाहेर ठेवले ज्याच्यांवर अन्याय होतो ते देखील माणसेच आणि अन्याय करणारीही माणसेच केवळ ही घटना बसवेश्वरांनी हे विदारक सत्य जाणले. त्यानी विषमतेची ही दरी बुजविण्याचा अथांग प्रयत्न केला. चातुर्ष्याचे स्तोम वाढलेले असताना बसवेश्वरांनी ते अडथळे दूर केले. सर्व जातिधर्मांच्या लोकांना दया हाच धर्माचे मूळ असे सांगून आपल्या अनुभवपंथात सामील करून घेतले

धर्मामध्ये देवाची कल्पना मूलभूत आहे आदि मानवापासून आताच्या आधुनिक मानवापर्यंत ही कल्पना खोलवर रुजलेली आहे. किंबहुना बसवेश्वरांना बाहय देवालय रचना हे तत्त्व मान्य नाही देहच देवालय करून घेण्याचे तत्त्व त्यांनी समाजासमोर मांडले . १२ व्या शतकात बहुदेवतपोसनाचे वाढलेले स्तोम देव-देवतांना प्रसन्न करण्यासाठी दूध,तूप इ. मुक्या प्राण्यांचे बळी या गोष्टीला विरोध करतात. न जेवणा-या लिंगापेक्षा जेवणा-या जिवाला जेवण देणे, देवा-धर्मांच्या नावाने उपयुक्त वस्तू नाश न करणे तसेच जेवायला घालताना तहान भागविताना जाति-धर्माचा विचार न करणे यासाठी ते आपल्या वचनातून सांगतात ‘दगडाच्या नागाला दूध घाला म्हणतात. प्रत्यक्ष नाग पाहून मारा म्हणतात. जेवणारा येतो पुढे जा म्हणतात न जेवणा-या देवाला नैवेद्य दाखवितात’. न जेवणा-या देवाला नैवद्य दाखविणारे भक्त भुकेला जेवणा-या माणसाला दारी आलेल्या माणसास त्यास त्यांना वाढण्यास नकार देतात.

अग्नीला देव मानून किती तरी अमूल्य वस्तू त्यामध्ये घालतात तेच भुकेलेला जठराग्नी व्याकुळ होऊन मागतो. तेव्हा व्यर्थ उरलेले पदार्थ देऊन त्यास देतात मानवाच्या नैसर्गिक गुण भूक-तहान यांनी व्याकुळ झालेले असताना जात-धर्म याचा विचार न करता त्याची तहान-भूक भागविली पाहिजे. या अंधश्रध्दात्मक देव-देवतांच्या भक्तीला विरोध करून बसवेश्वरांनी स्वत:च्या सुंदर देहालाच देवालयाची सुंदर कल्पना सुचविली पण विश्वाचे पालन करणारी शक्ती म्हणजे परमेश्वर तो एकच आहे. निराकार व सर्वव्यापी आहे. अर्थात संपूर्ण वृक्ष इवल्याशा बीजात सामावलेला असतो तसेच तळहातावरील इवलेसे इष्टलिंग त्या बीजाप्रमाणे असते. त्याच इष्टलिंगाची तळहातावर ठेवून एकाग्रचित्ताने भक्तीसाधना करावी. हा इष्टलिंगभाव सर्व जाति-धर्मातील स्त्री-पुरुषांसाठी समान आहे. बसवेश्वरांनी इष्टलिंगपूजा स्वीकार व प्रसार करणे हे आपले जीवनध्येय मानले.

– दीपाली गिरवलकर-जट्टे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या