34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeविशेषदूध : पूर्ण अन्न

दूध : पूर्ण अन्न

एकमत ऑनलाईन

सस्तन प्राण्यांना नवजात जीवाच्या पोषणासाठी मातेच्या स्तनातून त्यांच्या (नवजांताच्या) जन्मानंतर लगेचच स्त्रवणा-या द्रव पदार्थाला दूध असे म्हणतात. दूध हे पूर्ण अन्न समजले जाते. कारण नवीन जीवाच्या पोषणासाठी व चांगल्यावाढीसाठी अत्यावश्यक असणारे सर्व अन्न घटक दुधामध्ये संतुलीत स्वरूपात असतात. स्तनधारी प्रत्येक प्राण्याच्या बाळाचा प्रथम आहार दूधच आहे. सामान्यपणे गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडी, उंटीण व याक या पाळीव प्राण्याच्या दुधाचा वापर कमी अधिक प्रमाणात होतो. जगामध्ये सर्वात जास्त वापर गाईच्या दुधाचा होतो. दुधामध्ये पाण्याचे प्रमाण पुष्कळ असते व पाण्यामध्ये विरघळणारे अनेक घटक विद्राव्य स्वरूपात असतात. दूध हा स्तनातील ग्रंथीचा स्त्राव आहे. या ग्रंथी कांहीशा तैल ग्रंथीसारख्या असतात. गायीच्या कासेमध्ये चार स्तन असतात प्रत्येक स्तनग्रंथीला दूध बाहेर येण्यासाठी छिद्र असलेले आचळ असते.

प्राणीमात्रांना अन्न म्हणून जसा दुधाचा उपयोग होतो तसाच सुक्ष्मजंतूच्या वाढीसाठी सुध्दा ते उत्तम माध्यम असते. दुधामध्ये असलेले सुक्ष्मजंतू रोगकारक असत नाहीत. शिवाय त्याचे प्रमाणही (प्रत्येक मिलिलिटर दुधामध्ये १००० सुक्ष्मजंतू) बरेच कमी असते. दूध हा आपल्या आहाराचा मुख्य घटक आहे. पुर्वीच्या काळापासून भारतीय संस्कृतीत दुधाला अत्यंत महत्व दिले आहे. आहार शास्त्रात दूध व दुधाच्या पदार्थांना संपूर्ण आहार असे मानले जाते. आयुर्वेदानुसार गायीचे दुध आणि त्यापासून मिळणारे सर्व पदार्थ (दही, ताक, लोणी आणि तूप) हे अमृताचे भांडार आहेत. विशेष म्हणजे केवळ गायीच्याच पाठीच्या कण्यात सुर्यकेतू नाडी असते. इतर प्राणी व मनुष्य सुध्दा ज्यांना ग्रहण करता येत नाही. त्या सूर्याच्या गो- किरणांना सूर्यकेतू नाडी क्रियाशील होऊन पिवळ्या रंगाच्या पदार्थाचे स्त्रवण होते ज्याला स्वर्णक्षार असे म्हणतात. याच महत्वाच्या कारणांमुळे देशी गायीचं दूध, लोणी आणि तूप सुवर्ण कांतीचे असते. त्यामुळे ज्या व्यक्ती आयुष्यभर देशी गाईचे दुध सेवन करतात ते निश्चितच निरोगी, बलवान, शक्तिशाली आणि दीर्घायु होऊन त्यांच्या विचारामध्ये सात्त्विकता राहते. आयुर्वेदामध्ये दुधाला अतिशय महत्वाचे स्थान आहे.

गाईच्या कच्च्या दुधामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजे निरोगी सुक्ष्मजीव भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत होते कारण हे प्रोबायाटिक्स आपल्या पेशी मजबूत करण्याचे कार्य करतात. म्हणून दररोज कमीत कमी १०० मिली दूध अवश्य सेवन करावे. गायीच्या दुधामध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड असतात. जे मेंदूसाठी पोषक असतात. दुधातील पोषण तत्वामुळे आपल्या शरिराला मोठ्या प्रमाणात आरोग्यदायी फायदे मिळतात. ज्यामुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. राष्ट्रिय आरोग्य संस्थेच्या संशोधनानुसार गाईच्या दुधामुळे आपल्या मेंदूच्या कार्यावर मोठया प्रमाणात परिणाम होतो. त्याशिवाय मेंदूच्या अनेक आजारापासून संरक्षण मिळण्यास मदत होते त्यासाठी प्रामुख्याने लहान मुलाच्या आहारात गाईच्या दुधात समावेश करावा. जास्त वेळ बसून काम करण्याची पध्दत, व्यायामाचा अभाव, ड-जीवनसत्वाची कमतरता, फास्ट फुड, संगणकाचा अति वापर इत्यादी कारणांमुळे हाडाचे आजार होऊ शकतात. दुधामध्ये कॅल्शियम, जीवनसत्व-ड, फॉस्फरस, मॅग्नेशियम घटक असतात. जे हाडे मजबूत करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात हाडामध्ये फ्रॅक्चर होण्याची शक्यता सुध्दा कमी असते. दूध हे ऊर्जेचे सर्वोत्तम भांडार मानले जाते. व्यायाम केल्यानंतर शरीरातील ऊर्जा मोठ्या प्रमाणावर कमी होते आणि शरीराला ऊर्जेची गरज असते.

पूजाच्या आई-वडिलांनी पाच कोटी घेतले

ही ऊर्जा भरून काढणारी पोषक तत्वे दुधामध्ये असतात. त्यामुळे व्यायामानंतर दुध अवश्य प्यावे. डोळा हा अत्यंत महत्वाचा व नाजूक अवयव आहे. वाढत्या वयानुसार डोळे अधिक संवेदनशिल होतात व त्यामुळे कमी दिसणे, अंधुक दिसणे अशा समस्या उद्भवतात. डोळ्याच्या आरोग्यासाठी अ-जीवनसत्वाची आवश्यकता असते जे गाईच्या दुधामध्ये विपूल प्रमाणात असते. जीवनसत्व-अ मुळे डोळ्याच्या विविध आजारापासून बचाव होतो व आपली दृष्टी देखील सुधारते. दुधामध्ये वजन नियंत्रीत करण्याचे गुणधर्म आहेत. आपल्या दररोजच्या आहारात दुधाचा समावेश केल्यास वजन अतिशय नियंत्रीत होते व त्याचप्रमाणे वाढलेले वजन कमी होण्यास सुध्दा मदत होते दुधामध्ये असलेल्या प्रथिनामुळे शरीराला पोषण प्रदान होते व तसेच दुधात असलेल्या कॅल्शियममुळे शरीरातील चयापचय क्रिया वाढवते एका संशोधनानुसार बालपणी योग्य प्रमाणात दुध पिल्याने मुलाचे वजन जास्त वाढत नाही. ताप कमी होण्यासाठी दुधासारखे दुसरे औषध नाही. अनेक आजारांची सुरूवात ताप येण्याने होते. त्यासाठी एक लेंडी पिंपळी, एक खारीक, एक वेलदोडा, अकरा काळी द्राक्षे, एकेविस तुळस पत्रे इत्यादी पाव लिटर दुध व अर्धा लिटर पाण्यामध्ये मिसळून मंदाग्नीवर उकळून घ्यावे पाणी आटून गेल्यावर उरलेले मिश्रण दररोज तीन वेळा थोडे थोडे नियमित पणे काही दिवस ताप येणा-या रूग्णाला दिल्यास जीर्ण ताप कमी होतो. हृदयाचे स्वास्थ्य सुदृढ राहण्यासाठी दूध अत्यंत लाभदायक आहे.

दुधामध्ये पोटॅशियमचे प्रमाण विपूल असते त्यामुळे रक्तदाब संतुलीत राहण्यास मदत होते. दुधामध्ये प्रथिनाचे प्रमाण भरपूर असते. यामुळेच स्रायुच्या विकासात दूध सहाय्यक ठरते. विशेष म्हणजे अनेक धावपटू व्यायाम केल्यानंतर दूध पिणे पसंद करतात. ज्यामुळे शरीराला आवश्यक असलेले पोषके मिळतात. दूध हा कॅल्शियमचा स्त्रोत खूपच चांगला आहे. आणि दात निरोगी राहण्यासाठी फक्त आणि फक्त कॅल्शियमची गरज असते. कॅल्शियममुळे दाताचे पोषण चांगले होते. याशिवाय दूध दातांना खड्डे पडणे किंवा सडणे यापासून बचाव करते. त्यासाठी दररोज कमीत कमी एक वेळा एक ग्लास दूध प्यायल्याने दात मजबूत होण्यास फायदा होतो. दुधामध्ये त्वचेसाठी उपयुक्त असलेली सर्व जीवनसत्वे आणि पोषकतत्व असतात. ज्यामुळे त्वचा कोमल, मुलायम व चमकदार बनवण्यास मदत होते. विशेष म्हणजे एक ग्लास दुधामध्ये एक चमचा गुळ मिसळून दूध पिल्यास त्वचेचे सौंदर्य अधिक खुलून दिसण्यास मदत होते. झिंक आणि ड- जीवनसत्व यासारख्या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे केस गळण्याची समस्या निर्माण होते. गायीच्या दुधामध्ये ड-जीवनसत्व आणि झिंक हे पोषण तत्व विपूल प्रमाणात असतात.

हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. या आजारामध्ये वाचन करताना व्यक्तींना जास्त प्रमाणात समस्या निर्माण होतात व मोठी वाक्ये समजण्यात असंख्य अडचणी येतात कारण या आजारामध्ये एकाग्रता कमी होण्याचा धोका असतो. मानसिक आजारापासून दूर राहण्यासाठी ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडची आवश्यकता असते. दूध हा द्रवरूप पदार्थ असल्यामुळे जठर व आतड्यांद्वारे जे जास्त प्रमाणात शोषून घेतले जाते म्हणून रक्ताभिसरण क्रिया वाढण्यास मदत होते. ज्यावेळी हळु-हळु रक्ताभिसरण होते त्यावेळी हात व पायाचे तापमान कमी झाल्यामुळे थंड पडतात पण जेव्हा रक्ताभिसरण क्रिया सुधारते तेंव्हा तापमान वाढल्यामुळे ते उष्ण होतात व रूग्णाचे आरोग्य सुधारून तरतरी येण्यास लाभदायक होते. त्यावर दूध अत्यंत गुणकारी आहे. यावर उपाय म्हणून दररोज दुग्धाहार घ्यावा. टिप:- वनौषधीचा वापर करताना आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या