24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeविशेषसुटलेले शब्द, तुटलेले मन

सुटलेले शब्द, तुटलेले मन

एकमत ऑनलाईन

‘‘असे म्हटले जाते की काठी आणि दगडांनी झालेल्या जखमा भरून येतात पण शब्दांनी झालेल्या जखमा भरून यायला खूप वेळ जातो.’’ कदाचित त्या शेवटपर्यंत भरल्या जातीलच असेही काही नाही. मुलांच्या वाढीमध्ये जेव्हा आपण प्रामुख्याने भाषेचा विचार करतो, तेव्हा नैसर्गिकरीत्या शब्दांचे अस्तित्व आपसूकच तेथे येते. संतश्रेष्ठ तुकोबाराय यांनी देखील शब्दांना खूप बारकाईने समजून घेत म्हटले आहे, ‘आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू।। निसर्गाने प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी शब्दशक्ती बहाल केली आहे. तेव्हा त्या शक्तीचा यशायोग्य वापर आपल्या मुलांच्या संगोपनातही करणे आवश्यक आहे.

एखादा शब्द किंवा विचार यथार्थपणे व्यक्त होण्यासाठी कसा, कधी वापरावा यावर त्याचे सर्व सामर्थ्य अवलंबून आहे. कवी मंगेश पाडगांवकर म्हणून म्हणतात, ‘शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी.’ शब्द तसे अलवारच, बकुळीच्या गंधासारखे चिरंतन, सुवास देणारे. आपल्या अंगच्या अलौकिक गंधाने ऐकणा-यांच्या मनाचा ठाव घेणारे. पण याच शब्दांची लय, जागा, तीव्रता, चुकली की, ते वणव्यामध्ये रुपांतरित होण्यास वेळ लागत नाहीत.

जुई साधारण १० वर्षांची आहे. तिचा रंग सावळा आहे, सुबक चेहरा जणूकाही दुर्मिळ असा तिचा रंग तिला अत्यंत शोभून दिसणारा. काल जुईच्या घरी शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या, ‘‘कुठे गेली आमची काळूबाई…!!!’’जुईने हे ऐकले आणि ती त्यांना न बोलताच घरात निघून गेली. असं कधीही कोणाशी न वागणारी जुई अशी का गेली म्हणून सर्वांनाच थोडं आश्चर्य वाटलं. नंतर जेव्हा जुईच्या आजीने तिला प्रेमाने जवळ घेत विचारलं, ‘‘बेटा काय झालं? तू काकूंना न बोलताच मघाशी आत का गेलेली?.’’तेव्हा जुई म्हणाली, ‘‘आजी जेव्हा मला त्या काकू काळूबाई म्हणतात तेव्हा मला त्यांचा खूप राग येतो. तू त्यांना सांग आमच्या घरी येत जाऊ नका आणि आलात तर मला काळूबाई म्हणू नका. मी इतकी काळी आहे का गं..?’’

साधारण कोणती वाक्ये मुलांना हर्ट करू शकतात ती पाहूयात…
‘‘तुला जन्माला घालूनच चूक झाली आमची…’’
‘‘मी तुला खरंच होस्टेलला टाकणार आहे !’’
‘‘हं बस गिळायला, खायला येत जा तेवढे वेळेवरती बाकी काही करू नको आयुष्यात..’’.
‘‘तुला जन्माला घालणं माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक आहे.’’
‘‘तू ना! पक्का तुझ्या बापावरती/आईवरती गेलायस!’’
‘‘तू जा इथून. तुझं तोंडसुध्दा पाहण्याची मला अजिबात इच्छा नाही….!’’

यासारखी असंख्य उदाहरणे आपल्याला आजूबाजूला ऐकायला मिळतात. अनेकदा मुलांना आईवडील, शिक्षक किंवा जवळच्या नातलगांकडून सुध्दा अशीच मनावरती आघात करणारी वाक्ये ऐकायला मिळतात. खरं तर मुलं या शब्दांची भयंकर मोठी भावनिक किंमत मोजत असतात. अभ्यासकांच्या मते हा मुलांवरती होणारा मानसिक आघात आहे ज्याची झळ त्या मुलांना सर्वांत जास्त बसत असते. खरं तर मूल कितीही खोडकर अथवा कसंही असो ते आपलं मूल आहे म्हटल्यानंतर पालकांनी त्याला स्वीकारलेलं असतं पण कधीतरी पालकांच्याही सहनशीलतेचा बांध तुटत असतो. त्यांनाही अजागृतपणे बोललेल्या शब्दांचा पश्चाताप होतो. कोणत्या तरी परिस्थितीच्या दबावामुळे, कधी मुलांना नेमकं कसं हाताळावं, त्यांना समानुभूती (ऐस्रं३८) नक्की कशी द्यावी, कोणते शब्द मुलांना प्रेरित करणारे आहेत याचं पुरेसं आकलन नसल्यामुळे, आपल्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्यामुळे, तर कधी आपल्या मुलांमध्ये नेमकी कोणती कौशल्ये आणि क्षमता आहेत यांचा नेमका अंदाज नसल्यामुळे असं मुलांना भावनिक इजा करणारं वर्तन होतं.

आता खरं म्हणजे प्रश्न आहे आपण पालक म्हणून काय करायला हवं.. मुलांना शांतपणे ऐकून घ्या. मान्य आहे ती खोडकर किंवा त्रासदायक वागली असतील पण त्यांचा हेतू तुम्हाला त्रास व्हावा हा कधीच नसतो. मुलांच्या कृती चुकीच्या असू शकतात.. मूल नाही. मुलांसमोर आपण शब्दांची निवड अत्यंत काळजीपूर्वक केली पाहिजे. पालक म्हणून आपणच जर कोणतेही शब्द कसेही वापरत असू तर मुलांना त्याची कॉपी करायला मुळीच वेळ लागत नाही. नेहमी हे ध्यानात असू द्यावे की, सारखे मुलांवरती किंचाळणे, ओरडणे हे काही आतापर्यंत तरी फार प्रभावी उपाय राहिलेले नाहीत. याला छान समंजस पर्याय असू शकतो. उदा. आपण पालक म्हणून आपल्या चुकांची जबाबदारी घ्यायला लागलो तर मुलं देखील तशीच जबाबदारी हळूहळू घ्यायला शिकतात. मुलांना जवळ घ्या. शब्दांपेक्षा स्पर्श अधिक बोलका असतो. त्याला स्पर्श करत म्हणा, ‘‘मला माफ कर हं. मी तुला मघाशी खूप जोरात बोललो किंवा मी तुला जे काही मघाशी बोललो त्याबद्दल प्लीज मला माफ करशील… ’’ही वाक्ये ऐकताच मुलांचे चेहरे पहा किती फुलतील.

माझ्यावरती प्रेम करणारे माझे आई-बाबा किती छान आहेत असं त्याला वाटेल. मूलसुध्दा तुम्हाला लगेच माफ करेल.. मुलांशी संवाद साधता येणं ही देखील एक आर्ट आहे. ह्र३ँङ्म४३ २ं८्रल्लॅ ं हङ्म१ िनावाचे कासिया वेझोवस्की नावाच्या लेखकाने एक पुस्तक लिहिले त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ‘‘तुम्ही खरं बोलत आहात की, खोटं हे तुमची देहबोली तुमच्या आधी स्पष्ट करते. आणि तुमची मुलं तुमचे उत्तम भाष्यकार असतात.’’म्हणजे काय की आपल्या मुलांना आपल्या स्पर्शातून हे नक्की कळते की, आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे. आपण प्रौढत्वाच्या नात्याने मुलांना कुठल्याही प्रकारे इजा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आपल्या अपसेट मूडला ठीक करण्यासाठी अनेक संधी मिळतील पण आपल्या चिमुकल्याचं मन मोडलं तर ते जुळून येण्यासाठी कदाचित खूप जास्त वेळ लागेल तेव्हा गांधीजी म्हणतात तसं, आपण प्रयत्न करूयात. ‘‘जो बदलाव तुम दुनिया में देखना चाहते हो, वह खुद में लेकर आओ।’’

प्रा. पंचशील डावकर
मो. ९९६०० ०१६१७

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या