28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeविशेषमोरंग्या

मोरंग्या

एकमत ऑनलाईन

चित्रात दिसणारा बैल म्हणजे ‘मोरंग्या’! मोरंग्या म्हणजे आमच्या जुन्या गायीचे खोंड. मोरंग्याचा जन्म आमच्या घरच्या गावरान गायीच्या पोटी आमच्या दावणीवर झाला आहे असे अण्णा, आप्पा सांगतात. लहानपणापासून मी मोरंग्याला पाहत आलो आहे. सरपण, धान्याचे पोते, पाणीटंचाईच्या काळात पाणी आणि गोबरगॅससाठी शेणाने भरलेली बैलगाडी घेऊन आल्यावर मी कुतुहलाने त्याच्याकडे पाहत असे. मोरंग्या खुजा आणि लांब आहे. त्याची शिंगे टोकदार आहेत. दृष्ट लागू नये म्हणून बांधलेला काळा दोरा आणि गळ्यातील चंगाळ्यामुळे मोरंग्या ऐटदार दिसतो. मी लहान असताना गोठ्यावर पाहिले, कोवळे आणि हरणासारखे चपळ असणारे ‘लक्षा-पक्षा’ आणि ‘गुण्या-पिण्या’सारख्या पांढ-या तगट बैलांमध्ये मोरंग्या शोभून दिसायचा!

मोरंग्याने त्याच्या ऐन उमेदीत खूप कष्ट केले. लॉकडाऊनच्या काळात या गुणी आणि कष्टाळू बैलाने तरुण बैलाच्या खांद्याला खांदा लावून, तरुण बैलालासुद्धा लाजवेल असे काम केलेले मी पाहिले आहे. १० कोळप्याची दोन बैलजोडीवर सोयाबीन पिकात कोळपणी सुरू असताना एका गड्याची शिकायत होती की, ‘मालक ही बैल नीट चलना वो. मी मगाच्यान बघायलो याचा नखरा.’ गडी शेती कामास तसा नवीनच दिसत होता. बैलांच्या आडमुठेपणाला वैतागला होता बिचारा. मग त्याला मोरंग्या आणि सोबत दुसरा एक बैल दिला तेव्हा कुठे त्याला हायसे वाटले. कोळपणी करताना मोरंग्या शांत, एका लईत आणि धान्य न तुडवता चालतो. कामाला चपळ बैल, मोरंग्याला कासरा लागलेला सुद्धा जमत नाही, चाबूक तर लांबची गोष्ट. मोरंग्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो दावणीवर नवीन माणूस आला की हंबरतो. शांत, न मारणारा बैल असल्यामुळे आप्पांनी लॉकडाऊनमध्ये मोरंग्याची वैरण-पाण्याची जबाबदारी मला दिली होती. तेव्हा मोरंग्याशी माझी चांगलीच गट्टी जमली होती. कधी आप्पांना सकाळी नेहमीच्या वेळेपेक्षा बुडकीवर पोहोचायला उशीर झाला तर, दुरून पाहताच मोरंग्या हंबरतो! तो जणू विचारू पाहतो की, ‘आज उशीर का झाला?’

पोळा आणि इतर सणांच्या दिवशी घरी जेवायला आलेले गडी आणि घरातील मंडळी यांचे जेवून झाल्यावर ढाळजेत पानसुपारी खाताना माणसाच्या बैठकीत मोरंग्या आणि इतर बैलांच्या भीमपराक्रमाच्या कथा सांगताना आप्पा-अण्णा रंगून जात. ‘मोरंग्याला काम करताना त्याच्यापुढी दुसरा बैल जायला भाग नव्हता बघा!’ आमुक बैलाची खोड शेवटपर्यंत मोडली नाही, तमुक बैलाच्या डोळ्याला झालेली जखम सांगताना माणसं आतून हळहळत. आमच्या मोरंग्याचं आता वय झालं आहे. आता तो दावणीवरच असतो. आज मला शाळेत असताना शिकलेली श्री. दि. इनामदार यांची कविता आठवतेय. शेतक-यांसाठी रात्रंदिवस राबलेल्या एका म्हता-या बैलाचे मनोगत कवीने भावपूर्ण शब्दांत व्यक्त केले आहे.

तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, नको करू हेटाळणी आता उतारवयात।।१।। नाही राजा ओढवत चार पाउले नांगर, नको बोलूस वंगाळ नको म्हणूस डंगर।।२।। माझ्या ऐन उमेदीत माझी गायिलीस ओवी, नको चाबकासारखी आता फटकारू शिवी।।३।। माझा घालवाया शीण तेव्हा चारलास गूळ कधी घातलीस झूल कधी घातलीस माळ।।४।। अशा गोड आठवणी त्यांचे करीत रवंथ, मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतीत।।५।। मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एकदा रुजू दे, माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे।।६।। आज ट्रॅक्टरच्या जमान्यात शेतीची कष्टाची कामे सहज, सोपी आणि कमी कालावधीत होत आहेत. ट्रॅक्टरसह विविध यंत्रे आली त्यामुळे शेती कामात बैलांचा वापर दिवसेंदिवस कमी होत आहे. परंतु प्रश्न पडतो आपल्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असणा-या या बैलांना जसा आपण जीव लावतो किंबहुना ही मुकी जनावरे आपल्या मालकावर जशी माया करतात, शेतकरी आणि बैल यांच्यातील नि:शब्द फुलणारे नाते निर्जीव यंत्रासोबत फुलेल काय?

-गोविंद बाळासाहेब कापरे
जवळा (बु.), ता. जि. लातूर मो.:९९६०२ ६६७४४

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या