24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeविशेष‘मिस्टर आयपीएल’

‘मिस्टर आयपीएल’

एकमत ऑनलाईन

आयपीएलमध्ये धावांची बरसात करणारा भारताचा विशेषत: उत्तर प्रदेशचा खेळाडू सुरेश रैना याने क्रिकेटच्या सर्वच प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली. तत्पूर्वी ३५ वर्षीय सुरेश रैनाने १५ ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. सुरेश रैनाने शेवटचा सामना ऑक्टोबर २०२१ मध्ये चेन्नईकडून राजस्थान रॉयल्सच्या विरुद्ध अबुधाबी येथे खेळला. आयपीएलमधील पाच हजार धावा, २००८ च्या आशिया कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा, चपळाईने क्षेत्ररक्षण ही सुरेश रैनाची कमाई. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यातून बोटावर मोजण्याइतपत खेळाडू देशाच्या संघात स्थान मिळवत असताना रैनाचे करिअर प्रदेशातील नव्या खेळाडूंना प्रेरणादायी आहे.

भारताचा फलंदाज सुरेश रैना याने अलीकडेच क्रिकेटच्या सर्वच प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले असले तरी आयपीएलच्या माध्यमातून त्याने खेळपट्टीशी नाळ जुळवून ठेवली होती. निवृत्तीसाठी एखादे कारण लागते असे नाही, परंतु प्रत्येक खेळाडूच्या करिअरमध्ये निवृत्तीचा काळ येतो. रैनाची निवृत्ती घोषणा ही मनाला चटक लावणारी ठरली. इंडियन प्रीमियर लीगमधील यश आणि त्याचे योगदान पाहता रैना हा यापेक्षा अधिक सन्मानाने निवृत्त होण्यास पात्र होता. आयपीएलमध्ये त्याने ५५०० पेक्षा अधिक धावा तडकावल्या आहेत. परंतु सध्याच्या आधुनिक जगात एक कटू सत्य सांगायला हवे आणि ते म्हणजे जोपर्यंत आपण उपयुक्त आहात, तोपर्यंत आपल्यावर कोणीही बोली लावू शकतो. आपला सर्वत्र जयघोष होऊ शकतो. परंतु रैनाला यावर्षी त्याची फ्रेंचाईजी चेन्नई सुपर किंग्जने स्थान दिले नाही आणि अन्य संघाने देखील त्याला विचारले नाही.

कधीकाळी मिस्टर आयपीएल म्हणून ओळख निर्माण करणा-या रैनाचे करिअर संपले आहे, अशी चर्चा सुरू झाली. गेल्या हंगामापर्यंत चेन्नई सुपर किंग्जचा सदस्य असणा-या रैनाची यंदा संघात वापसी झाली नाही. म्हणून जय-वीरू म्हणजेच धोनी आणि रैना यांची जोडी फुटल्याची चर्चा रंगली. एकवेळी रैना हा फ्रंचाईजीचा भविष्यातील कर्णधार म्हणून मानले जात होते. धोनीने क्रिकेटमधून संपूर्णपणे निवृत्ती स्वीकारली तर त्याचा उत्तराधिकारी सुरेश रैनाच असेल. पण असे काही घडले नाही. असे असले तरी भारतीय क्रिकेटचा इतिहास हा सुरेश रैनाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. सुरेश रैना केवळ आयपीएलमध्येच नाही तर सर्वच प्रकारांत चमकला आहे. त्याने आपल्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर कोट्यवधींची मने जिंकली आहेत.
सुरेश रैनाच्या आयपीएल करिअरचा विचार केल्यास त्याने २०५ सामन्यांत ३२.५२ च्या सरासरीने १३६.७३ च्या स्ट्राईकरेटने ५५२८ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि ३९ अर्धशतके आहेत. त्याच्या सर्वाधिक धावा १०० आहेत. त्याने तिन्ही प्रकारांत भारतासाठी शतक ठोकले आहे. रैनाने १८ कसोटी सामने खेळले आहेत. रैना हा २०११ चा विश्वचषक जिंकणा-या संघाचा सदस्य राहिला आहे. त्याने २२६ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात पाच शतके आणि ३६ अर्धशतके आहेत. या जोरावर त्याने ५६१५ धावा केल्या. त्याचवेळी त्याने टी-२० प्रकारातील ७८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि त्यात पाच अर्धशतकांसह १६०५ धावा काढल्या.

सुरेश रैना याच्या करिअरला २०१९ मध्ये उतरती कळा लागली. आयपीएलच्या १७ सामन्यांत तीन अर्धशतकांच्या जोरावर ३८३ धावा केल्या. तर २०२० च्या हंगामात संयुक्त अरब अमिरातीला पोचल्यानंतर काही वादामुळे मायदेशी परतावे लागले. त्याने स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला होता. २०२१ मध्ये तो संघात होता, परंतु फारशी कामगिरी करू शकला नाही. १२ सामने खेळले आणि १७.७७ च्या सरासरीने १६० धावा केल्या. संघ व्यवस्थापनाने त्याला नॉकआऊटच्या सामन्यातही खेळविले नाही. आयपीएल व्यतिरिक्त रैनाचे नाव आणखी एका पराक्रमाबद्दल घेतले जाते. आशिया कपच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या नावावर आहे. २००८ च्या स्पर्धेत त्याने ३७८ धावा केल्या. याच हंगामात सुरेश रैना याने देखील ३७२ धावा केल्या. तो जयसूर्याच्या जवळ जाऊन पोचला, परंतु त्याला मागे टाकू शकला नाही. हे विक्रम अजूनही कायम आहेत. देशात काही काळापूर्वी ग्रामीण भागातून, जिल्हा पातळीवरून क्रिकेटपटू भारतीय संघापर्यंत धडक मारत होते आणि त्या काळात सुरेश रैनाने संघात स्थान मिळविले. क्रिकेटमध्ये करिअर करू इच्छिणा-या ग्रामीण भागातील तरुणांना विशेषत: उत्तर प्रदेशातील खेळाडूंना प्रेरणा दिली. यादृष्टीने देखील त्याचे योगदान अतुलनीय आहे. त्याने फलंदाजीतूनच एकदिवसीय, टी-२०, कसोटी सामन्यांतून धावा केल्या नाहीत तर दर्जेदार क्षेत्ररक्षणातूनही छाप पाडली. म्हणूनच तो जाँटी -होड्स, रिकी पाँटिंग, पॉल कॉलिंगवूडच्या पंक्तीत जाऊन बसला. अष्टपैलू क्रिकेटपटू हा एकीकडे धावा करतो आणि दुसरीकडे क्षेत्ररक्षणातून धावा वाचवतो देखील. हीच गोष्ट गोलंदाजांना देखील लागू होते.

सुरेश रैनाने २००३ मध्ये उत्तर प्रदेशच्या रणजी संघात पाऊल टाकले. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. म्हणूनच रैनाने निवृत्ती जाहीर करताना बीसीसीआयबरोबरच उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे देखील आभार मानले. अर्थात देशातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातून कीर्तिमान स्थापन करणा-या खेळाडूंची संख्या नगण्यच आहे आणि हे कटू सत्य आहे. अशावेळी सुरेश रैनासारख्या मातब्बर क्रिकेटपटूच्या अनुभवाचा लाभ हा उत्तर प्रदेशातील क्रीडा संस्कृती आणखी बळकट करण्यासाठी करता येऊ शकतो. एकेकाळी मोहंमद कैफ, आर. पी. सिंह सारख्या खेळाडूंनी भारतीय संघात स्थान मिळवून उत्तर प्रदेश क्रिकेटमध्ये मागे राहणार नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला. आयपीएलसारखा मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध असूनही दुर्दैवाने उत्तर प्रदेशातील खेळाडू पुढे आले नाहीत. म्हणूनच रैनासारख्या खेळाडूंकडून उत्तर प्रदेशात क्रिकेट संस्कृतीला पुढे नेण्यासाठी अपेक्षा केली जाईल आणि या माध्यमातून स्थानिक क्रिकेटपटूंना दर्जेदार प्रशिक्षणांची सुविधा उपलब्ध होईल. अर्थात तो यादृष्टीने प्रयत्नशील आहे. परंतु सध्या विकसित होणारी सामाजिक संस्कृती पाहता आधुनिक द्रोणाचार्यांकडून शिक्षण घेण्याऐवजी समृद्ध एकलव्याचा शोध घेतला जात आहे.

-नितीन कुलकर्णी,
क्रीडा अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या