23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeविशेषश्री सिद्धिविनायक

श्री सिद्धिविनायक

एकमत ऑनलाईन

श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अष्टविनायकांतील एक प्रसिद्ध स्वयंभू स्थान. ते श्रीगोंदे तालुक्यात भीमा नदीकाठी दौंडच्या उत्तरेस सु. १९ कि.मी. वर वसले आहे. गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरूड यांच्या प्रतिमा आहेत. चौंडी हे अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान या गावाजवळच आहे. अख्यायिका : गावाच्या नावाविषयी एक पौराणिक कथा प्रचलित आहे. मधू आणि कैटभ या दोन दैत्यांनी ब देवाच्या सृष्टिरचनेत व्यत्यय आणला. तेव्हा बह्माने दैत्यांच्या नाशार्थ विष्णूकडे धाव घेतली. त्याने अनेक युद्धे करूनसुद्धा ते नष्ट झाले नाहीत, म्हणून विष्णूने शंकराची याचना केली. त्याने हे काम विनायक करेल असे म्हणून त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी षडाक्षरी मंत्र दिला. त्या मंत्राचे अनुष्ठान विष्णूने एका टेकडीवर केले. विनायक प्रसन्न झाला आणि दैत्यांचा संहार झाला. तेव्हा विष्णूने तिथे गंडकी शिळेची गजाननाची मूर्ती स्थापन केली. विष्णूला त्या टेकडीवर सिद्धी मिळाली म्हणून या क्षेत्राला ‘सिद्धक्षेत्र’ किंवा ‘सिद्धटेक’व विनायकाला ‘सिद्धिविनायक’ ही नावे पडली.

येथील मंदिर उत्तराभिमुख असून वेशीपासून मंदिरापर्यंत हरिपंत फडके १७२९-७४ यांनी बांधलेला फरसबंदी मार्ग आहे. त्यांचा मंदिराजवळ वाडा आहे. त्यांचे देहावसान येथेच झाले. मंदिराचा चौरस गाभारा अहिल्याबाई होळकरांनी १७६६-९५ बांधला. गाभा-यात शेजघर आहे. बाजूस शिवपंचायतन आहे. बाहेरच्या बाजूस सभामंडप असून महाद्वार व त्यावर नगारखाना आहे. तेथे त्रिकाळ चौघडा वाजतो. जवळच मारुती मंदिर व पश्चिमेस शिवाईदेवी व शंकर यांची छोटी मंदिरे आहेत. शिवाय नदीजवळ काळभैरवाचे देवस्थान आहे. सिद्धिविनायकाची स्वयंभू पाषाणमूर्ती असून सोंड उजवीकडे झुकली आहे. गजानन ललित आसनात बसला असून त्याच्या मांडीवर ऋद्धि-सिद्धी बसल्या आहेत. सिद्धिविनायकाच्या गाभा-यातील मखर पितळेचे असून त्यावर चंद्र, सूर्य, गरूड, नागराज यांच्या आकृती कोरलेल्या असून दोन्ही उजव्या-डाव्या बाजूस जय-विजयांच्या भव्य मूर्ती आहेत. सिंहासन दगडी आहे. देवस्थानची वहिवाट चिंचवडकर देव जहागीरदार हे पाहतात. भाद्रपद शुद्ध १ ते ५ व माघ शुद्ध १ते ५ या तिथ्यांना वर्षातून दोन मुख्य उत्सव साजरे केले जातात. हे कडक दैवत मानले जाते. श्री मोरया गोसावी यांनी प्रथम येथेच उग्र तपश्चर्या केली होती व नंतर ते मोरगावी गेले.

पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले, तेव्हा हरिपंत फडके यांनी याच मंदिराला २१ प्रदक्षिणा मारल्या होत्या व नंतर लगेचच २१ दिवसांनी त्यांना त्यांचे सरदार पद मिळाले होते. म्हणून या मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची प्रथा आहे. प्रदक्षिणेचा मार्ग खूप मोठा आहे. एक प्रदक्षिणा मारण्यासाठी ५ किलो मी. चालावे लागते. भीमा नदीकाठी हे सिद्धिविनायकाचे मंदिर वसलेले आहे. येथील दक्षिणवाहिनी असणा-या भीमा नदीला पूर आला तरी परिसरात नदीच्या प्रवाहाचा आवाज होत नाही. या नदीवरील दगडी घाट अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. गणेशास सकाळी खिचडी, दुपारी महानैवेद्य, संध्याकाळी दूध-भात, व रात्री भिजलेल्या डाळीचा नैवेद्य असतो. हे मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या महाद्वारावर नगारखाना आहे. महाद्वारातून आत गेल्यावर सभामंडप असून त्यापुढे गाभारा आहे.

‘श्री चिंतामणी’
अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. गणपतीचे मंदिर हे धरानिधर महाराज देव यांनी बांधले. १०० वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला ४० हजार रुपये लागले होते. युरोपीयांकडून पेशव्यांना पितळेच्या २ मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. मुळा व मुठा नद्यांनी वेढलेल्या या थेऊर गावाला पूर्वी कदंब तीर्थ वा चिंतामणी तीर्थ म्हटले जात असे. कदंब वृक्षाच्या खाली हे मंदिर वसलेले आहे. या उत्तराभिमुख मंदिराच्या महाद्वारात प्रवेश केल्यानंतर प्रशस्त आवारात मोठी घंटा असून तेथे शमी व मंदार वृक्ष आहेत. पुढे सभामंडपात यज्ञकुंड आहे. त्यापुढे गाभा-यात डाव्या सोंडेची शेंदूर लावलेली चिंतामणीची स्वयंभू मूर्ती आहे. या पूर्वाभिमुख गणेश मूर्तीच्या डोळ्यात माणिक रत्न आहेत. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात.

विनायकाने प्रसन्न होऊन येथील कदंब वृक्षाखाली गानासुराचे पारिपत्य केले. तेव्हा मुनींनी विनायकाच्या गळ्यात ते रत्न बांधले. तेव्हापासून गणेशाला चिंतामणी नावाने संबोधले जाऊ लागले. चिंचवडच्या मोरया गोसावींनी तपश्चर्या केली असता विनायकाने वाघाच्या रूपात त्यांना दर्शन दिले.आख्यायिका ऋषिपत्नी अहिल्येशी कपटाचरण करून निंद्य कर्म केल्याबद्दल गौतम मुनींनी इंद्राला सर्वांगाला क्षते पडतील, असा शाप दिला. तेव्हा इंद्राने ऋषींचे पाय धरून क्षमा मागितली. ऋषींनी मग त्याला श्रीगणेशाची षडाक्षरी मंत्राने तप:पूत होऊन आराधना करून शापाच्या परिणामातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवून दिला. इंद्राने ज्या स्थानी ही तपश्चर्या करून शुद्धी व मुक्ती मिळविली आणि तो चिंतामुक्त झाला त्या स्थानी श्रीगणेशाची स्थापना करून तिथल्या सरोवराला चिंतामणी असे नाव दिले. येथे अनुष्ठान करणा-या साधकाच्या चित्ताला शांती आणि स्थिरता प्राप्त व्हावी असा या क्षेत्राचा महिमा आहे. चिंचवडचे मोरया गोसावी यांनी या थेऊरच्याच अरण्यात उग्र तपश्चर्या केली होती. मोरया गोसावींना याच ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली.

थेऊर क्षेत्राला फार महत्त्व आले ते थोरले बाजीराव पेशवे व त्यांच्या साध्वी पत्नी रमाबाई यांच्या सानिध्यामुळे. माधवराव पेशवे यांची श्रीचिंतामणीवर विलक्षण भक्ती होती. मन:स्वास्थ्य आणि शरीरस्वास्थ्य साधण्याकरिता ते या ठिकाणी येऊन राहत. त्यांनी श्रीचिंतामणीच्या सहवासातच राहून शेवटी आपले प्राण देवाच्या चरणी सोडले आणि लागलीच रमाबाईसाहेब पतीबरोबर तेथेच सती गेल्या. त्या जागी आज सतीचे वृंदावन आहे. मंदिराचा महादरवाजा उत्तर दिशेला असून मंदिर भव्य आहे. चिंचवडचे श्री. चिंतामणी देव यांनी हे गणपती मंदिर बांधले. त्यानंतर थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सभामंडप बांधला. बाजूच्या मुळामुठा नदीच्या डोहाला चिंतामणी तीर्थ असे म्हणतात. येथील श्रीचिंतामणीची मूर्ती डाव्या सोंडेची असून, पूर्वाभिमुख आहे. मांडी घातलेले आसन आहे. थेऊर गाव चिंतामणीस इनाम आहे. येथील गणेश मूर्तीची स्थापना कपिल मुनींनी केली. कपिल मुनींजवळ एक चिंतामणी नावाचे रत्न होते.

हे रत्न त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करीत असे. एकदा गणासुर त्यांच्या आश्रमात आला असता त्यांनी या रत्नाच्या सहाय्याने त्याला पंचपक्वान्नाचे जेवण दिले. हे पाहून गणासुर स्तंभित झाला. त्यास रत्नाचा मोह निर्माण झाला. त्याने कपिल मुनींकडे या रत्नाची मागणी केली व त्यांनी नकार देताच गणासुराने ते रत्न हिसकावून घेतले. कपिल मुनींनी गणेशाची उपासना केली.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या