प्रतिभाताई पाटील आणि द्रौपदी मुर्मू या दोन्ही राष्ट्रपतींची निवड आश्चर्यकारक मानली गेली. या दोन्ही महिला राज्यपाल, आमदार आणि मंत्री राहिलेल्या आहेत. प्रतिभाताईंच्या निवडीने देशात महिलांच्या आत्मसन्मानात सुधारणा झाली. आता नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समुदायात कायापालट घडवून आणण्याचा प्रयत्न करू इच्छित आहेत. दोन्ही महिला या महिला सशक्तीकरणाच्या प्रतीक आहेत. परंतु हे प्रतीक उच्च पदावर पोहोचण्यासाठी सर्वसामान्य जनतेची स्वप्नं साकार करावी लागतील.
नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख कशाप्रकारे करायला हवा? काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी त्यांना ‘राष्ट्रपत्नी’ असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडले. अर्थात त्यांनी या वादावर माफी मागितली आणि बोलताना जीभ घसरल्याचे ते सांगत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी या शब्दाला तीव्र आक्षेप घेतला. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील (२००७ ते २०१२) यांनी पदभार सांभाळला तेव्हा शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना ‘राष्ट्रपत्नी’ असे म्हटले होते. तेव्हा पाटील यांनी ही गोष्ट हसण्यावर नेली. शेवटी प्रतिभा पाटील यांचा राष्ट्रपती असा उल्लेख केला गेला.
राष्ट्रपती की राष्ट्रपत्नी हा वाद जुना आहे. घटनात्मक परिषदेतील सदस्यांनी महिला राष्ट्रपतीला ‘राष्ट्रपत्नी’ म्हणायचे की नाही यावर विचार केला आहे का?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. परंतु पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्पष्ट केले की पुरुष असो किंवा महिला असो राष्ट्रपतीला ‘राष्ट्रपती’ म्हणायला हवे. प्रतिभा पाटील या महाराष्ट्रातील प्रभावशाली मराठा कुटुंबातील आहेत. त्यांचा विवाह राजपूत कुटुंबातील व्यक्तीशी झाला. त्याचवेळी द्रौपदी मुर्मू यांचा संबंध ओडिशातील गरीब आणि आदिवासी कुटुंबाशी आहे. त्यांचे पालनपोषण मागास भागात झाले. तेथे वीज नव्हती आणि रस्ताही नव्हता. शाळेत त्या अनवाणी जात होत्या. त्यांच्याकडे एकच ड्रेस होता आणि तोच ड्रेस वर्षभर घालायच्या. यावरून त्यांची आर्थिक स्थिती लक्षात येते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण नशिबाने त्यांना राजभवन आणि नंतर राष्ट्रपती भवनापर्यंत पोचवले. दोन्ही राष्ट्रपतींची निवड ही आश्चर्यकारक होती. शिकलेल्या पण मागास भागातील असल्याने मुर्मू यांना अनेक लाभ मिळणार होते. प्रतिभा पाटील या गांधी कुटुंबीयांतील विश्वासू असल्याने त्या राष्ट्रपतिपदापर्यंत पोचल्या. या दोन्ही महिला राज्यपाल, आमदार आणि मंत्री राहिलेल्या आहेत.
प्रतिभाताई वकील होत्या तर द्रौपदी या शिक्षक. दोन्ही महिला आध्यात्मिक विचारांच्या आहेत आणि ब्रह्मकुमारींवर त्यांची असीम श्रद्धा आहे. ब्रह्मकुमारी संस्थेची स्थापना १९३७ मध्ये झाली. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांच्या साधेपणाचे व्हीडीओ व्हायरल होऊ लागले. एका व्हीडीओत त्या पूजा करण्यापूर्वी पूर्णदेश्वरी शिव मंदिराच्या परिसरात साफसफाई करत असल्याचे दिसतात. ते पाहून लोकांना आश्चर्य वाटले. दुसरीकडे प्रतिभाताई पाटील यांच्यावर बाबा लेख राज यांचा आशीर्वाद राहिला आहे. त्यांचा मृत्यू १९६९ रोजी झाला. बाबा लेख राज यांनीच प्रतिभा पाटील यांना म्हटले, की आगामी काळात एक मोठी जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. प्रतिभा पाटील या महिला सशक्तीकरणावर विश्वास ठेवतात. त्यांनी विद्या भारती शिक्षक प्रसारक मंडळाची स्थापना केली आहे. या संस्थेची अमरावती, जळगाव आणि मुंबईत शाळा व महाविद्यालये आहेत. पाटील यांनी श्रम साधना ट्रस्टची देखील स्थापना केली. हे ट्रस्ट दिल्ली, मुंबई, पुण्यात काम करणा-या महिलांसाठी वसतिगृह चालवते. मुर्मू यांनी उरिया भाषेतील मासिकात विचार मांडले आहेत. त्या म्हणतात, की पुरुषांचा प्रभाव असणा-या राजकारणात महिलांसाठी आरक्षण असणे गरजेचे आहे. अशा स्थितीत राजकीय पक्ष उमेदवारांची निवड करणे किंवा निवडणूक लढण्यासाठी तिकिट वाटपाच्या माध्यमात बदल करू शकतात.
प्रतिभा पाटील यांच्या डोक्यावर तुम्ही कायम पदर पाहू शकता. ही एक परंपरा आहे; तर मुर्मू यांनी साधी पारंपरिक पांढ-या साडीचा पेहराव करण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींनी आपल्या नातेवाईकांना नवी दिल्लीतून सुमारे डझनभर साड्या आणण्यास सांगितले आहे. दोन्ही महिलांत प्रचंड आत्मविश्वास आहे. कारण या पदापर्यंत पोचण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला आहे. दोन्ही महिला राष्ट्रीय पक्षाशी निगडीत आहेत. तीस वर्षांपर्यंत आमदार राहिलेल्या प्रतिभा पाटील यांनी पराभव कधीही पाहिलेला नाही. त्या विरोधी पक्षाच्या नेत्याही राहिल्या आहेत. राज्यसभेत उपसभापती (१९८६ ते ८८) राहिल्या आहेत. द्रौपदी मुर्मू या शाळा तसेच महाविद्यालयात ‘टूडु’ या टोपण नावाने ओळखल्या जात. श्याम चरण टूडु हे बँक अधिकारी होते. विवाहानंतर त्यांना मुर्मू नावाने अेळखले जाऊ लागले. त्यांच्या एका शालेय शिक्षिकेने त्यांचे नाव द्रौपदी ठेवले. २००० मध्ये रायरंगपूर आणि २००९ मध्ये मयुरभंज येथे भाजपच्या आमदार म्हणून निवडून आल्या. ओडिशात भाजप-बीजेडी आघाडी सरकार असताना द्रौपदी मुर्मू यांनी वाणिज्य, परिवहन, मत्स्य आणि पशुसंवर्धन खात्याचा पदभार सांभाळला.
राष्ट्रपतिपद स्वीकारणा-या प्रतिभा पाटील यांच्याबाबत काही वाद चर्चिले गेले. कुटुंबासह परदेश दौ-यापोटी त्यांच्यावर सरकारचे २०५ कोटी रुपये खर्च झाल्याविषयी काहींनी नाराजी व्यक्त केली. तसेच निवृत्तीनंतर एका बंगल्याचे बांधकाम करण्यासाठी संरक्षण खात्याची जमीन हडप केल्याचाही आरोप ठेवण्यात आला होता. द्रौपदी मुर्र्मू यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्यांनी पती आणि दोन मुलांना गमावले. एका मुलाखतीत त्यांनी म्हटले की, एकवेळ मी असा विचार केला होता की, मी कोणत्याही क्षणी मरेन. तेव्हा त्या ईश्वरीय प्रजापति ब्रह्मकुमारीशी जोडल्या आणि योगसाधना सुरू केली. ‘संथाली’ ला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतात संथाली हा सर्वांत मोठा आदिवासी समुदाय असून तो झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशात आढळतो. प्रतिभा पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होतील, असा कोणीही विचार केला नव्हता. त्यामुळे देशात महिलांच्या आत्मसन्मानात सुधारणा झाली. आता नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समुदायात कायापालट घडवून आणण्याचा प्रयत्न करू इच्छित आहेत. दोन्ही महिला या महिला सशक्तीकरणाच्या प्रतीक आहेत. परंतु हे प्रतीक उच्च पदावर पोहोचण्यासाठी सर्वसामान्य जनतेची स्वप्नं साकार करावी लागतील.
-कल्याणी शंकर,
ज्येष्ठ पत्रकार, विश्लेषक