22.6 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home विशेष माझे संविधान, माझा अभिमान!

माझे संविधान, माझा अभिमान!

एकमत ऑनलाईन

काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनेलवर ‘भारतीय राज्यघटने’विषयी डिबेट पाहत होतो. डिबेटचा मुख्य विषय होता, ‘राज्यघटना : बदल व दुरुस्ती’. मुळात हा विषय चर्चेत घ्यावाच कसा वाटला याचे आश्चर्य वाटले. चार लोक विरोधातील, तर चार लोक समर्थक म्हणून चर्चा करत होते. चर्चा कशाची निव्वळ द्वंद्व! जो संयोजक पत्रकार होता, त्याला मिळालेल्या अभिव्यक्तीचा वारेमाप वापर करत होता. अभिव्यक्तीच्या नावाखाली दोन मतप्रवाहात भांडण लावून शो पाहत होता. एक-दुसरा पॅनलिस्ट सोडला तर राज्यघटनेविषयी व मूल्यांविषयी कोणालाही काहीच पडले नव्हते. न्यूज चॅनेलवाले त्यांच्या टी.आर. पी. साठी दररोज भडकावू चर्चा होतील असे विषय आणतच असतात. मुद्दा तो वाद शमविण्याचा नसतोच. त्या आगीत ठिणगी जरूर पडते. आणि मला एक भारतीय म्हणून लाज वाटली की, राज्यघटनेसारख्या संवेदनशील मुद्याला केवळ एक टी. आर. पी.साठीचा सोर्स म्हणून वापरण्यात आले. एखादा बंडल चित्रपट चालवण्यासाठी आयटम साँग टाकतात त्या पातळीला नेऊन ठेवण्याचे महापाप करतायत हे लोक. घटना आमची जगण्याची रीत अन् मानवी मूल्यांचा शीर्ष आहे.

आता हे सगळे आठवण्याचे कारण हे, की २६ नोव्हेंबर हा भारतीय इतिहासातला सुवर्ण आणि वंदनीय दिवस. अर्थात ‘संविधान दिन’! घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षी सन २०१५ पासून भारत सरकारच्या अधिसूचनेनुसार संपूर्ण भारतात अर्थात सर्व शासकीय ठिकाणी हा दिवस साजरा करण्यात येतो. या वर्षीचा तो सहावा संविधान दिन आहे. २६ नोव्हेंबर १९४९ ला प्रत्यक्ष घटना स्वीकृत करण्यात आली. म्हणजे ती एक प्रास्ताविक, ३९५ कलमे, ८ परिशिष्टे आणि २२ भागासह तयार होती. आता जानेवारी २०२० नुसार त्यात ४४८ पेक्षा जास्त कलमे, १२ परिशिष्टे आणि २५ भाग आहेत. तांत्रिकदृष्ट्या २५ भाग वाटत असले तरी प्रत्यक्षात २२ च भाग आहेत. म्हणजे काही भागांत सुधारणा करण्यात आली आहे. जसे, भाग- ४ ए, भाग- ९ ए, भाग- ९ बी, भाग – १४ ए हे सुधारित नव्याने अंतर्भूत करण्यात आले, तर १९५६ च्या ७ व्या राज्यघटना संशोधनानुसार ७ वा भाग वगळण्यात आला आहे. त्यामुळे सगळे मिळून भाग सध्या २५ आहेत असे आपण म्हणू शकतो.

एक उल्लेखनीय बाब अशी की, घटनेच्या कलम ३९४ नुसार घटनेतील एकूण १६ कलमांची अंमलबजावणी २६ नोव्हेंबर १९४९ पासूनच करण्यात आली. ती कलमे म्हणजे, कलम ५, ६, ७, ८, ९, ६०, ३२४, ३६६., ३६७, ३७२, ३७९, ३८०, ३८८, ३९१ व ३९३ इ. एखाद्या सार्वभौम लोकशाही देशाची राज्यघटना तयार करण्यासाठी लोकांच्या प्रातिनिधिक संस्थेची गरज असते. त्या संस्थेला संविधान सभा म्हणतात. या संविधान सभेची सर्वप्रथम मागणी महात्मा गांधीजींनी केला होती, परंतु ‘संविधान सभा’ हा शब्दप्रयोग केला नव्हता. असा शब्दप्रयोग करून सर्वप्रथम संविधान सभेची मागणी १९३४ ला साम्यवादी चळवळीचे अग्रणी मानवेंद्रनाथ रॉय यांनी केली होती. राष्ट्रसभेच्या ब-याच अधिवेशनांत ही मागणी वेळोवेळी १९३४, १९३८ ला करण्यात आली होती. १९४० च्या लॉर्ड लिनलीथगो घोषणेनुसार ब्रिटिशांनी पहिल्यांदाच भारताची घटना भारतीयांनीच तयार करावी हे तत्त्व मान्य केले. शेवटी १९४६ च्या कॅबिनेट मिशननुसार संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली होती.

गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन फोडले

संविधान सभेसाठी १० लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी ‘एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या’ पध्दतीने अप्रत्यक्ष निवडण्यात आले. हे प्रतिनिधी सुरुवातीला ३८९ होते. नंतर भारत-पाकिस्तान फाळणी, संस्थाने विलीनीकरण यामुळे २४ जानेवारी १९५० च्या संविधान सभेच्या शेवटच्या सभेत प्रत्यक्ष २८४ सदस्यांनी संविधानावर स्वाक्ष-या केल्या होत्या. राज्यघटनेची भौतिक माहिती थोडक्यात अशी, भारताची घटना ही जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना आहे. ते सम्पूर्ण काम करण्यास २ वर्षे ११ महिने १८ दिवसांचा कालावधी व ६४ लक्ष रुपये खर्च आला होता. घटनेचे इंग्रजी व हिंदीत हस्तलिखित तयार करण्यात आले आहे. हे हस्तलिखित १६ बाय २२ इंच आकाराच्या कागदावर लिहिण्यात आले होते. हे उत्कृष्ट लिखाणाचे काम पं. नेहरू यांचे निकटवर्तीय प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना ) यांनी केले आहे. यामध्ये २५१ पाने असून, वजन ३.७५ किग्रॅ. आहे. प्रेम बिहारींना हे लिहिण्यास ६ महिन्यांचा कालावधी लागला होता.

या हस्तलिखिताच्या प्रत्येक पानाची सजावट शांतिनिकेतनचे नन्दलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. घटनेच्या प्रत्येक भागावर देव-देवता व ऐतिहासिक व्यक्तींची चित्रे आहेत. ही मूळची हस्तलिखित घटना नवी दिल्ली येथे संसदेत हेलियम भरलेल्या काचेच्या डब्यात ठेवलेली आहे. संविधानातील प्रत्येक कलम व प्रत्येक भाग खूप विस्तारित आहे. ते समजून घेण्यासाठी व आपण भारताचे नागरिक आहोत या दृष्टीने संविधानाचे घरोघरी, प्रत्येक कार्यालयात वाचन होणे अपेक्षित आहे.

अमोल चंद्रशेखर भारती
हिंगोली, मोबा.: ८८०६७ २१२०६

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या