26.1 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeविशेषविविधरंगी भावकविता ‘माझेच आकाश’

विविधरंगी भावकविता ‘माझेच आकाश’

एकमत ऑनलाईन

पुणे जिल्ह्यातील कवयित्री पुष्पा सदाकाळ यांचा ‘माझेच आकाश’ हा पहिलाच कवितासंग्रह जरी असला तरी त्यांची विविधरंगी भावकविता आधीच मासिके नि वर्तमानपत्रांमधून वाचकांच्या परिचयाची झालेली आहे. खडतर आयुष्य जगत असताना झालेली परवड, सुख-दु:खाचे वैयक्तिक अनुभव आदींनी कष्टी न होता आयुष्याशी संघर्ष करण्याचा ध्यास घेतला आणि आश्वासक असे कवितेचे बोट धरून तिच्या संगतीत ही खडतर वाट सुस झाली, असा भाव व्यक्त करताना कवयित्री एका कवितेत म्हणते :
आयुष्य वाटा तुडवीत
काट्याकुट्यांतून जात असताना
स्वप्नेही ठेचकाळत होती
तेव्हा तिनं ठरवलं
आकाशच आता कवेत घ्यायचं
आणि भाग पाडलं स्वत:ला लिहायला
या जाणिवेतूनच कवयित्रीने स्वत:ला आलेल्या विभिन्न अनुभूतींमधून तिच्या अंतरीच्या विविध भाववृतींचे निर्देशन करणा-या आत्मपर कविता लिहिल्याचे जाणवते. उदा.जिवाभावाची सखी म्हणून सदैव साथसोबत करणा-या कवितेविषयी कवयित्री म्हणते :
माझी ओळख कविता
फुलविते मनमळा
बरसता शब्द सरी
नष्ट होती दु:ख झळा..
आणि ही अनुभूती घेत असतानाच कवयित्रीला सुखाचा गारवा देणारे केवळ तिचे स्वत:चे असे एक अनोखे भावविश्व निर्माण झाले असल्याचे सांगताना कवयित्री म्हणते:
फक्त माझेच आकाश
तेथे मी शुक्र चांदणी
पंख लेऊन स्वप्नांचे
विहरते नभांगणी..

कवयित्रीने रास्तपणे स्वत:च्या भावविश्वाची नोंद या काव्यपंक्तीत केली असून अगदी हाच प्रत्यय ‘माझेच आकाश’
या संग्रहातील कविता वाचताना आल्याशिवाय राहात नाही.संग्रहात ईश्वराची करुणा भाकणा-या काही भावरचना आहेत, तर स्वत:च्या गाव-शिवाराच्या सार्थ महिम्याची नोंद करणा-याही काही सुंदर कविता इथे आहेत. थोडक्यात कवयित्री पुष्पा सदाकाळ लिखित ‘माझेच आकाश’ संग्रहामध्ये रोजचे जगणे जगत असताना कवयित्रीला ज्या काही मान- अपमान, सुख- दु:ख, हर्ष-विमर्श आदींच्या भल्या-बु-या अनुभूती आल्यात त्या सर्वांचा थेट निर्देश करणा-या अगदी सहजसुंदर भावरचना इथे आहेत आणि विशेष म्हणजे कवयित्रीने या कवितांतून कसलाही उपदेश वगैरे करण्याचा अल्पसाही प्रयत्न न करता त्यांचे आविष्करण साध्या आणि सुलभ शब्दकळेचे उपयोजन करून अगदी अकृत्रिमतेने केले आहे. तसेच या कवितेला प्रतिमा आणि प्रतीकांचा कसलाही सोस नाही, तर ही कविता कधी छंदोबध्द रीतीने, तर कधी थेट मुक्तछंदात प्रकटणारी असून ती वाचक मनाला थेट भिडते. जरी नवखेपणाच्या खुणा या कवितेत जाणवत असल्या तरी ही कविता कवयित्रीच्या अंत:करणातील विविधरंगी भाव-भावनांचा सच्चा आणि उत्कट आविष्कार आहे, हे नक्की! हेच कवयित्री पुष्पा सदाकाळ यांचे यश आहे.
माझेच आकाश – (कविता)
कवयित्री – पुष्पा सदाकाळ
प्रकाशक – ज्ञानसिंधू प्रकाशन,
नाशिक
पृष्ठे -२००
मूल्य – रु. २००/-

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या