32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeविशेष‘मंगळा’ची रहस्ये उलगडणार?

‘मंगळा’ची रहस्ये उलगडणार?

मंगळावर धडक देण्यासाठी अमेरिकेबरोबरच रशिया, भारत, चीन, युरोपियन युनियन, संयुक्त अरब अमिराती, ब्रिटन आणि जपान या देशांचेही प्रयत्न सुरू आहेत. मंगळ परिक्रमा करणा-या यानांच्या तुलनेत या ग्रहावर उतरणा-या रोव्हरकडून मोठ्या अपेक्षा आहेत. भारताला या दिशेने खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. २०१३ मध्ये भारताचे मंगळयान प्रक्षेपित झाले आणि सप्टेंबर २०१४ मध्ये या यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला होता. ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली होती. जगातील सर्वांत स्वस्त आणि आशियातील ती पहिली मंगळ मोहीम होती. आता इस्रोकडून मंगळयान-२ च्या प्रकल्पावर काम सुरू आहे. तथापि, २०२२ मध्ये चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणानंतरच ही योजना पूर्णत्वाला जाईल.

एकमत ऑनलाईन

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नासा) या अमेरिकी अंतरिक्ष संशोधन संस्थेने मंगळावर यान उतरवून इतिहास रचला आहे. नासाचे पर्सीव्हरेन्स हे रोव्हर १८ तारखेला रात्री उशिरा मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या उतरले. प्राचीन मायक्रोबियल काळातील जीवनाच्या अस्तित्वाच्या काही खुणा मंगळावर मिळतात का, याबद्दल याचा शोध हे रोव्हर घेणार आहे. सात महिने अंतरिक्षात प्रवास केल्यानंतर नासाचे हे यान मंगळ ग्रहाच्या जजीरो क्रेटर येथे उतरले. या भागावर पूर्वी कधीतरी पाणी भरलेले होते; परंतु आता मात्र तेथे पाणी नाही. मंगळावर जीवनाची काही शक्यता आहे का, याचा वेध हे यान घेणार आहे. वस्तुत: अंतरिक्षातील गूढ गोष्टींनी शास्त्रज्ञांना नेहमीच आकर्षित केले आहे. सूर्यमालेतील नऊ ग्रहांपैकी पृथ्वीखेरीज मंगळ हाच एकमेव असा उपग्रह आहे, ज्यात शास्त्रज्ञांना खास रुची आहे. मंगळावर जीवनाची शक्यता असावी असे शास्त्रज्ञांना वाटते. उपग्रहांमध्ये चंद्राच्या बाबतीत शास्त्रज्ञांनी खूप संशोधन केले आणि ग्रहांच्या बाबतीत मंगळच त्यांना दीर्घकाळ खुणावत आहे.

मंगळावर जीवनाची शक्यता पडताळण्याचे काम केवळ अमेरिकेकडून नव्हे तर संपूर्ण जगाकडून केले जात आहे, कारण संपूर्ण जगाला त्यातून एक नवी उमेद मिळणार आहे. नासाच्या या मोहिमेचे नेतृत्व मूळ भारतीय वंशाच्या स्वाती मोहन यांनी केले असून, भारताला त्याचा सार्थ अभिमान आहे. स्वयंचलित निर्देशित प्रक्रिया निर्धारित वेळेच्या ११ मिनिटे आधीच पूर्ण करण्यात आली. मंगळावर यान उतरल्यानंतर लगेचच पर्सीव्हरेन्स मार्स रोव्हरने पहिला फोटो घेतला आणि पृथ्वीवर पाठविला. नासाची टीम आता यावर संशोधन सुरू करेल. गुरुवार आणि शुक्रवारच्या मधील रात्री सुमारे दोन वाजता जजीरो क्रेटर या मंगळाच्या अत्यंत धोकादायक अशा पृष्ठभागावर यान उतरले. नासाने असा दावा केला आहे की, रोव्हरचे मार्सवरील हे आतापर्यंतचे सर्वांत अचूक लँडिंग आहे. पर्सीव्हरेन्स रोव्हर या ग्रहाच्या दगडांचे नमुनेही घेऊन येणार आहे.

सहा चाके असलेला हा रोबो सात महिन्यांत तब्बल ४७ कोटी किलोमीटरचा पल्ला गाठून मंगळाच्या जवळ पोहोचला. शेवटची काही मिनिटे अत्यंत आव्हानात्मक होती. या काही मिनिटांतच १२ हजार मैल प्रति ७ मिनिट एवढ्या प्रचंड वेगाने चाललेल्या यानाचा वेग शून्य करण्यात आला. त्यानंतर लँडिंग झाले. पर्सीव्हरेन्स मार्स रोव्हर आणि इंजीन्युटी हेलिकॉप्टर हे मंगळ ग्रहावर कार्बन डाय ऑक्साईड निर्माण करण्याचे काम करतील. यामुळे जमिनीच्या खाली जीवनाचे काही अवशेष दबले असल्यास त्याची माहिती मिळेल, तसेच कुठे पाणी असल्यास त्याचाही शोध घेतला जाईल. यानामधील मार्स एन्व्हायर्नमेन्टल डायनॅमिक्स एन्लार्जर (मेडा) हा भाग मंगळ ग्रहावरील हवामान आणि जलवायूचा अभ्यास करेल. जजीरो क्रेटर हेच ठिकाण नासाने रोव्हरसाठी टचडाऊन झोन म्हणून निवडले होते आणि रोबोने त्याच ठिकाणी अचूक लँडिंग केले. आता येथूनच हे यान सॅटेलाईट कॅमे-याच्या आधारे संपूर्ण माहिती एकत्रित करेल आणि नंतर ती नासाकडे पाठवून देईल.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळेना

ही मोहीम म्हणजे आतापर्यंतचे सर्वांत अ‍ॅडव्हान्स्ड रोबोटिक एक्स्प्लोरर मानले गेले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, जजीरो क्रेटर हा मंगळाचा असा पृष्ठभाग आहे, जिथे पूर्वी विशाल सरोवर होते. म्हणजेच मंगळावर पाणी होते याची सबळ माहिती यापूर्वीच मिळाली होती. जर पूर्वी कधीतरी मंगळावर पाणी असेलच तर तेथील जीवसृष्टीचे अवशेष तेथे जीवाश्मांच्या स्वरूपात मिळतील, अशी शास्त्रज्ञांना खात्री वाटते. आता रोव्हर दोन वर्षे जजीरो क्रेटर या पृष्ठभागावर शोधकार्य करेल. एकूण दहा वर्षे हे रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर कार्यरत राहणार आहे. १९७० नंतर नासाची ही पहिलीच अशी मोहीम आहे, ज्याद्वारे मंगळावरील जीवनाचे अंश शोधले जाणार आहेत. यापूर्वी क्युरिऑसिटी रोव्हर २०१२ मध्ये मंगळ ग्रहाच्या दुस-या क्रेटरवर उतरविण्यात आले होते. चीनचे चांग-ई-५ हे यान चंद्राच्या पृष्ठभागावरील दगडगोट्यांचे नमुने घेऊन पृथ्वीवर परत आले आहे. अमेरिकेचे ‘अपोलो’ आणि सोव्हिएत रशियाचे ‘लूना’ ही दोन याने चंद्राला स्पर्शून आल्यानंतर प्रथमच अन्य देशाच्या यानाने चंद्रावरील नमुने आणण्यात यश मिळविले आहे.

मंगळाविषयी जगाला अप्रुप वाटते तसेच भारतीय शास्त्रज्ञांनाही वाटते. भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यान नेण्याचा विक्रम नोंदविला आहे. पहिल्याच प्रयत्नात कोणत्याही देशाला मंगळाच्या कक्षेत जाण्यात यश मिळाले नव्हते. मंगळाविषयी आकर्षण असण्याचे कारण असे की शास्त्रज्ञांच्या मते, सुमारे साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर पाणी होते. आज जसे पाणी पृथ्वीवर आहे, अगदी तसेच! मंगळालाही स्वत:चे घनदाट वायुमंडल होते. मग सूक्ष्म जीवाणूंसह जीवनाचे अन्य अंशही तिथे होते का? पृथ्वी आणि मंगळ यांच्यातील अंतर दर २६ महिन्यांनी कमीत कमी असते. कारण पृथ्वी आणि मंगळ सूर्याभोवती वेगवेगळ्या परिक्रमा मार्गांवरून वेगवेगळ्या वेगाने भ्रमण करतात. पृथ्वी सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा ३६५ दिवसांत पूर्ण करते; मात्र मंगळाला सूर्याभोवती एक चक्कर मारायला पृथ्वीवरील कालमापनानुसार ६८७ दिवस लागतात. म्हणजेच, आपल्या कालगणनेनुसार सुमारे दोन वर्षे लागतात.

पर्सीव्हरेन्स आणि एक्सोमार्स या दोन रोव्हरचे मंगळावरील कथित जीवसृष्टीचा शोध घेण्यात खूपच महत्त्व आहे, असे जर्मनीच्या एक्सोमार्स मोहिमेतील तज्ज्ञ एर्न्स्ट हाउबर आणि निकोल श्मित्स यांनीही अधोरेखित केले आहे. या दोन्ही शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मंगळ ग्रहाचा आकाशीय पिंडांच्या धडकेमधून निर्माण झालेला जेजेरो नावाचा क्रेटर म्हणजे भूभाग अत्यंत गूढ आहे. ४९ किलोमीटर व्यासाच्या या क्रेटरच्या किना-यावर अनेक प्रकारच्या भूवैज्ञानिक घडामोडींमुळे एक रंगीबेरंगी मनोहारी दृश्य निर्माण झाले आहे. साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी या क्रेटरमध्ये पाणी असण्याची शक्यता आहे, कारण या क्रेटरच्या पश्चिम भागात नदीच्या उगमापाशी असतो तसा डेल्टा आहे. त्यामुळेच अमेरिकी पर्सीव्हरेन्स हे रोव्हर आपल्यासोबत ‘कॅप्सूल’ नावाने ओळखली जाणारी रिकामी पात्रे घेऊन गेले आहे. या पात्रांमध्ये तेथील दगड, मातीचे नमुने गोळा केले जाणार आहेत. निकोल श्मित्स यांनी सांगितले की, पर्सीव्हरेन्स या अमेरिकी रोव्हरकडून गोळा केले जाणारे दगडगोटे पृथ्वीवर आणण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे, पृथ्वीवरील प्रयोगशाळांमध्ये उत्तम तंत्रज्ञानाच्या आधारे त्यावर सखोल परीक्षण आणि अध्ययन केले जाईल. त्या परीक्षणांमधूनच आपल्याला तेथे पूर्वी पाणी होते का, याविषयीही माहिती मिळू शकेल.

नव्या अमेरिक रोव्हरमध्ये अनेक अशी उपकरणे आहेत, ज्यामुळे मंगळ ग्रहावर पूर्वी असू शकणा-या सूक्ष्मजीवांच्या खाणाखुणा तपासता येऊ शकतील. पर्सीव्हरेन्स या रोव्हरकडून पृथ्वीवर पाठविण्याजोगे जे नमुने गोळा केले जातील, ते पृथ्वीपर्यंत आणणार कसे, हा प्रश्न येथेच उपस्थित होतो. निकोल श्मित्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे काम दोन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात अमेरिकी रोव्हर जमा केलेल्या नमुन्यांच्या कॅप्सूल तेथेच सोडून देईल, जिथून हे नमुने घेतलेले आहेत. त्यानंतर एक रोव्हर तेथे जाऊन या कॅप्सूल उचलून पृथ्वीवर आणेल. हे रोव्हर एसा या युरोपीय अंतरिक्ष संशोधन संस्थेमार्फत तयार केले जाणार आहे. हे दुसरे रोव्हर मंगळ ग्रहापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि तेथे उतरविण्यासाठी नासालाही २०२६ च्या पूर्वी एक नवीन ‘मार्स एसेन्ट व्हेईकल’ म्हणजेच ‘मंगळ अवतरण वाहन’ तयार करायचे आहे. या वाहनाला घेऊन जाणारे यान ते मंगळावर अशा ठिकाणी सोडेल, जिथे कॅप्सूलमध्ये नमुने जमा करणारे रोव्हर उभे आहे. कॅप्सूल घेऊन हे वाहन आपोआप उड्डाण करेल आणि मंगळ ग्रहाच्या प्रदक्षिणा करू लागेल.

प्रा. विजया पंडित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या