21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeविशेषगूढ नि गहिरे... रंग पावसाचे!

गूढ नि गहिरे… रंग पावसाचे!

एकमत ऑनलाईन

मेघ अंधारून आले
वाटे विपरीत थोडे,
काही तरी मर्म भेद
आज पावसात घडे

कधी तरी पावसात असंही वाटून जातं..असंच एक वेगळं पावसाळी रूप. खरं तर पाऊस आणि शृंगार हे समीकरण सर्वांनाच आवडतं पण त्यापेक्षा आयुष्य जसं गहन आहे तसाच पाऊस गहन असतो.. हाच गहिरा रंग.. माझ्या नजरेतून! काळेकुट्ट तुडुंब भरलेले प्रचंड मोठे ढग वायुवेगाने आकाशाच्या रणांगणावर जणू चाल करून आले आहेत..

सोबत त्याचा फौजफाटाही आहे..प्रचंड वेगात वाहणारा सोसाट्याचा वारा..असंख्य हत्तींच्या चित्काराप्रमाणे गर्जना करत ये-जा करणारे महाकाय हत्तीएवढाले ढग….जेव्हा या महाकाय ढगांमध्ये विजा चमकायला लागतात ना तेव्हा असंख्य तलवारींची असंख्य पाती तळपल्याचा भास होतो. मेघांच्या आक्राळविक्राळ रूपापुढे चंद्र आणि सूर्यही कुठेतरी लुप्त होऊन गेले आहेत, असं वाटून जातं. वादळी वा-याच्या आवेगाने मोठमोठे वृक्ष जेव्हा सहज वाकून जातात तेव्हा असं वाटतं जणू ही युद्धभूमीवरील आघाडीवरची झाडांची फौज…शत्रूच्या तलवारीचे वार चुकवण्यासाठीच लीलया झुकत आहे.

काळेकुट्ट गडगडाट करणारे मेघ, कडकडाट करत चमकणा-या विजांचा हल्लाबोल, वा-याचा सुंऽऽ सुंऽऽ असा आवाज, मुसळधार होऊन घुसखोरी करणारा पाऊस, झाडांच्या पानांची रहस्यमयी संगीताप्रमाणे होणारी सळसळ… दुरून कुठून तरी ऐकू येणारी कोल्ह्याची कोल्हेकुई, वातावरण अधिकच भयाण करणारी बेडकांची ड्रांव ड्रांव सगळंच कसं विलक्षण असतं.. ती वेळ खरंच भयंकर असते..रहस्यमय असते. कधी कधी ही अशी वेळ गूढ असे अनामिक संकेत देत असते तर कधी सृष्टीच्या गहनतेचे मर्म सूचक अशी वाटते, तर कधी ही वेळ एखाद्या व्यवच्छेदक गूढ रहस्याची नांदी वाटू लागते…कधी कधी तर ही वेळ अनभिज्ञ गर्द कृष्णवर्णी अकल्प असे काही तरी आहे..जे सामान्य माणसाच्या किंवा अगदी विज्ञानाच्या प्रगत कक्षेतूनही आपणास समजत नाही पण जे आस्तित्वात आहे याची जाणीव मात्र देत राहते.

पावसाळा, रात्र आणि घनगर्द अंधार हे समीकरण गूढत्व वाढवणारंच असतं नाही का..? अशी गूढ वेळ माणसाच्या मानसाचेही मर्म विशद करते, असं मला कैक वेळा वाटून जातं. माणसाचं आणि पावसाचं नातं तसं अगदी जवळचं नि अनिवार्य असं असतं. जितक्या छटा माणसाच्या मनोवस्थेच्या, आयुष्यातील टप्प्यांच्या तितक्याच अवस्था तितकीच रूपं पावसाचीही असतात. पण मला पावसाचं हे गूढ रूप कायम साद घालत आलं आहे. त्यावेळची अनामिकता, उगाच दाटून येणारं उदासीचं सावट..उजागर होणारं कधी असलेलं तर कधी नसलेलं दु:ख ..हे सगळं मुसळधार पावसासोबत येणारं ..म्हणून ज्यांच्या लेखणीला गूढत्वाचे अनेक आयाम दिसून येतात ते कविवर्य ग्रेस…

ती गेली तेव्हा रिमझिम,
पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे,
हा सूर्य सोडवित होता
असे पावसाचे वर्णन करून जातात तर कधी…
घडवीन असे मी वृत्त
प्राणांच्या अलगद खाली
अन् करीन पाऊस इथला
शब्दांच्या पूर्ण हवाली
अशाही ओळी लिहून जातात.
हा पाऊस भयाण असला तरी सुद्धा

तोच आपलाजवळचा वाटतो. पाऊस सखा-सोबती होतो आपला.. आपल्या एकांतात आणि दाटून येतो अंगभर तसाच. कधी कधी कोसळतो आकांताने जगण्यावरच. नात्यांची वीण जशी घट्ट करत जातो तसाच ती उद्ध्वस्तही करतो. विश्वांताच्या पावसाचा आवाज ऐकला तरी छातीत धस्स होऊन जातं. कधी सुखावणारा तर कधी आत आत कळ उमटवून जाणारा, तर कधी दु:खाच्या काठावर नेऊन सोडणारा पाऊस आपल्या आयुष्याला व्यापून राहिलेला असतो कायम.. पाऊस नित्य नेमाचाच.. तरीही भेटतो प्रत्येक वेळी नव्याने एक नवीन न उलगडणारं कोडं होऊन.. म्हणूनच अजय कांडरांसारखा कवी म्हणतो..

पूर्वीसारखाच पाऊस
आताही येतो नियमित
पण सहन होत नाही त्यांना
तुडुंब कोसळतो अंगावर तेव्हा
भिजून घ्यावं लागतं निमूट
आणि वस्त्रावर वस्त्र बदलत
कोरडं व्हावं लागतं सकाळ संध्याकाळ

याचा गर्भितार्थ समजला तर गूढ रम्य पाऊस समजायला नक्कीच मदत होईल. शेवटी एवढंच म्हणेन…
गूढरम्य पावसाची..
काय सांगू आज बात,
कधी कोसळे नभी तो..
कधी दाटे आसवात
कृष्णरंगी जांभळेसे…
मेघ चकवा वाटती,
टपो-याशा सरींमध्ये..
गूढ कोणते सांगती?

रोहिणी पांडे
मो. ९५१८७ ४९१७५

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या