27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeविशेषराष्ट्रउत्थान आणि शिक्षकांची जबाबदारी

राष्ट्रउत्थान आणि शिक्षकांची जबाबदारी

एकमत ऑनलाईन

शिक्षक हा ज्ञानाची साधना करणारा आणि सतत ज्ञानाची तृष्णा राखणारा वर्ग आहे. ज्ञानसंपन्नता हाच शिक्षकांचा गुण आहे. त्यामुळे अखंड ज्ञानसाधना करणारा शिक्षकच अखंड ज्ञानसाधना करणारा विद्यार्थी निर्माण करू शकतो. शिक्षक हा वर्तमानातील व्यवस्थेपेक्षा काही दशके पुढे असतो. त्याचे हे पुढे असणेच त्याला समाजात आदराचे स्थान प्राप्त करून देत असते.

चार भिंतींच्या आत असलेल्या विद्यार्थ्यांची मने प्रज्ज्वलित करण्याचे काम शिक्षक करीत असतात. समाजात शहाणपण आणि विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्न पेरणी करण्याचे काम शिक्षक करत असतात. बालकांच्या मनावर संस्कार करीत जीवनाला आकार देण्याचे कामही शिक्षकच करीत असतात. वर्गात केल्या जाणा-या विचाराच्या पेरणीवरच बालकांच्या जीवनाचा डोलारा उभा असतो. बालकांच्या जीवन प्रवासात पेरलेल्या विचार बीजांवर विद्यार्थी भविष्यात भरारी घेत असतो. ती भरारी किती उंच घ्यायची हे शिक्षकांनी पेरलेल्या विचारावर अवलंबून असते. शिक्षक हाच जीवनाचा आधार असतो. प्रत्येक बालकाचे आयुष्य चार भिंतींच्या आत घडत असते. त्या संस्काराची वाट निर्माण करणा-या या संस्कारदूताच्या आजवरच्या कार्याबद्दल त्यांना आपण ‘थँक्स’ म्हणायलाच हवे. समाजात उत्तमतेने आणि ध्यास घेऊन काम करणा-या शिक्षकांच्या समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षकदिनाचे औचित्य असते. कोणत्याही राष्ट्राची प्रगतीची भरारी हे दाखवते आहे की, भूतकाळात शिक्षणातून पेरले आहे म्हणून यशाची भरारी घेता आली आहे. शिक्षक जे पेरतात त्यातून माणूस घडत असतो. शिक्षकांच्या समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी व्यवस्था नेहमीच अस्तित्वात आहे.

आपल्याला उद्याचा भारत कसा हवा आहे त्या स्वप्नाच्या दिशेने प्रवासासाठी शिक्षणातून सातत्याने पेरणी करावी लागते. उद्याच्या प्रकाशासाठी वर्तमानातच प्रकाशाची पेरणी करावी लागते. त्या प्रकाशासाठी शिक्षकांनाच प्रकाश व्हावे लागते. ते जितके प्रकाशमान असतील तितक्या वाटा उजळून निघतात. शिक्षक हा प्रकाशमान असेल तरच तो प्रकाश वाटणार आहे. त्या प्रकाशाची पेरणी करणारा आणि भोवतालमधील अज्ञानाचा अंध:कार नष्ट करणारा शिक्षक हा कोणत्याही देशासाठी महत्त्वाचाच असतो. शिक्षकपेशा हा नोबेल पेशा असल्याचे सर्व जगाने मान्य केले आहे. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी तर जगात शिक्षक पेशाइतका समाजाच्या उन्नतीसाठी दुसरा कोणताही महत्त्वाचा पेशा नाही असे नमूद केले आहे. शिक्षक हा मूल्यांचा प्रवाह जिवंत ठेवणारा आणि सतत प्रवाहित ठेवण्यासाठी कष्टत राहणारा समूह आहे. समाजात आनंद पेरणारा, मुलांच्या मनात सर्जनशीलता, कल्पकता, आत्मविश्वास, विवेक, चिकित्सकता निर्माण करणारा शिक्षक असल्याने समाजाला चांगली माणसं मिळतात. त्यांच्यामुळेच आपल्याला आनंददायी समाज निर्माण करता येतो.

शिक्षक हा ज्ञानाची साधना करणारा आणि सतत ज्ञानाची तृष्णा राखणारा वर्ग आहे. ज्ञानसंपन्नता हाच शिक्षकांचा गुण आहे. त्यामुळे अखंड ज्ञानसाधना करणारा शिक्षकच अखंड ज्ञानसाधना करणारा विद्यार्थी निर्माण करू शकतो. अखंड ज्ञानसाधना करत असलेला समाज प्रगत आणि महान ठरतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी निरंतर ज्ञानसाधनेचा वसा जपला होता. भारतीय तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास, त्याबद्दलचे चिंतन, तत्त्वज्ञानाबद्दलच्या मानवी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगभरासमोर केलेल्या मांडणीने देशाची प्रतिमा उंचावली गेली. त्याचबरोबर जगाचा आपल्या तत्त्वज्ञानाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातच बदल झाला होता. एक शिक्षक काय करू शकतो त्याचेच हे प्रतिबिंब होते.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षकांना सल्ला देताना सांगितले होते की, शिक्षकांनी नेहमीच बौद्धिक एकात्मता व सार्वत्रिक अनुकंपा यांचा पाठपुरावा केला पाहिजे. शिक्षकांवर किती मोठी जबाबदारी असते याची जाणीव या सल्ल्यातून सहजपणे होत राहते. शिक्षकांनी आपली संस्कृती, मूल्य यांचा सतत विचार करायला हवा. मूल्य, कौशल्य, भारतीय परंपरा यांचा विचार अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत करायचा असतो. शेवटी मूल्यांचा विचार शिक्षणात महत्त्वाचा असतो. मार्कावर सतत गुणांचा वरचष्मा असायला हवा आहे. राधाकृष्णन यांनी भारतीय तत्त्वज्ञानातील मूल्यांचा विचार अत्यंत महत्त्चपूर्ण मानत त्या दिशेने जाण्यासाठीचा आग्रह धरला होता. त्यात समाज व राष्ट्राचे भले आहे. त्यासाठी पुस्तकातील आशय अधिक जिवंत करण्यासाठी शिक्षकांनी आपल्या जगण्याचे अनुभव समृद्ध करायला हवेत. त्या अनुभवाशी मूल्य, जीवनकौशल्य, गाभाघटक यांची सांगड घालायला हवी. शिक्षणातून मूल्यं हरवली तर उद्याचा जो समाज आपल्याला अनुभवावा लागेल तो अत्यंत कृतघ्न असेल. तो कृतघ्न समाज हिंसक असेल हेही लक्षात घ्यायला हवे. शिक्षकांना स्वत:च्या कंपूत राहून शिक्षण परिणामकारक करता येणार नाही. शिक्षक हा जेव्हा समाजापासून तुटेल तेव्हा समाजातील सर्वच हरलेले असेल. जगभरातील अनेक चळवळींत शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे हा इतिहास आहे.

-संदीप वाकचौरे, शिक्षणतज्ज्ञ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या