21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeविशेषनिसर्गाचा प्रकोप : आभाळ फाटलं, डोंगर कोसळला !

निसर्गाचा प्रकोप : आभाळ फाटलं, डोंगर कोसळला !

मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करावा लागला. सलग दुसऱ्या वर्षी चक्रीवादळाचा तडाखा बसलेले कोकण यातून सावरत नाही तोवर पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांना सामोरे जात आहे. हवामानातील बदलाचे परिणाम आता जगभर जाणवायला लागले आहेत. अतिवृष्टी, पूर, पश्चिम घाटातील दरड कोसळण्याच्या घटनांच्या संख्येत सतत वाढ होत असून, निसर्गाच्या प्रकोपला तोंड देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची भूमिका आता सरकारला घ्यावीच लागणार आहे.

एकमत ऑनलाईन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तो संपलेला नाही. तोवर तिसऱ्या लाटेच्या आगमनाचे हाकारे सुरू झाले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन व जाचक निर्बंधांचा फास अजूनही ढिला होऊ शकलेला नाही. यामुळे सर्वसामान्यांचे अर्थकारण बिघडले असून भविष्यावर अनिश्चिततेचे सावट आहे. समोर कोणताही पर्याय नसल्याने हे ‘न्यु नॉर्मल’ स्वीकारून त्यात सर्वांची जगण्याची धडपड सुरु आहे. पण म्हणतात ना संकटं कधी एकटी येत नाहीत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी सरकार सज्ज होत असताना राज्याला तडाखा दिला तो पाण्याच्या / पुराच्या लाटेने. काही दिवस दडी मारून बसलेल्या वरुणराजाने मागच्या आठवड्यात यमराजाचे रूप घेऊन पुनरागमन केले व मुंबई, कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यात प्रलयाची स्थिती निर्माण केली.

निसर्गाच्या या तांडवात पूर व दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या आठवड्यात सुमारे दीडशे लोकांचा बळी गेला असून शंभराहून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना या प्रकोपाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असली तरी याच पाच जिल्ह्यात अजूनही कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. जलप्रलयातून लोकांना वाचवण्यासाठी सुमारे दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले आहे. बचावकार्य व मदतकार्य करताना कोरोनाच्या नियमांचे पालन करणे निव्वळ अशक्य होते. त्यामुळे आपत्तीग्रस्तांना आधार देऊन पुन्हा उभे करताना कोरोनाचा उद्रेक होणार नाही याची दक्षता घेण्याचे प्रचंड मोठे आव्हान राज्यसमोर आहे. एकीकडे या आव्हानाचा मुकाबला करताना निसर्गाच्या ‘हिटलिस्ट’ वर आलेल्या महाराष्ट्राला नैसर्गिक प्रकोपाचा मुकाबला करण्यासाठी काही दीर्घकालीन उपायांचाही विचार करावा लागणार आहे.

भारतातील कॅलिफोर्निया अशी ओळख निर्माण करण्याची आकांक्षा असलेल्या कोकणाला कोणाची नजर लागलीय कोण जाणे. गेल्या काही वर्षांपासून सतत कोणत्या ना कोणत्या संकटाला कोकणाला सामोरे जावे लागते आहे. मागच्या वर्षी ‘निसर्ग’ तर यावर्षी ‘तोक्ते’ चक्रीवादळाचा मोठा तडाखा कोकणाला बसला. ‘तोक्ते’ चक्रीवादळाने कोकणात प्रचंड नुकसान केले. त्याच्या मदतीचे पंचनामेही अजून पूर्ण झालेले नाहीत, तोवर मागच्या आठवड्यात पुन्हा अतिवृष्टी व पुराच्या संकटाला कोकणाला सामोरे जावे लागले. २००५ साली मुंबईसह राज्याने मोठा जलप्रकोप पाहिला. तो पाऊस म्हणजे जगबुडीची ट्रेलर होता असे म्हटले गेले. पण कोकणातील काही गावांमध्ये यावेळी त्याहीपेक्षा भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण शहरांसह अनेक गावं पुराच्या भयाण विळख्यात अडकली होती.

शेतक-यांच्या प्रसंगावधानाने टळला मोठा रेल्वे अपघात

चिपळूनमधील स्थिती तर एवढी भीषण होती की, आपत्कालीन पथकांनाही तेथे पोचणे कठीण झाले होते. पाण्याची पातळी बारा फुटापर्यंत गेल्याने शेकडो घरं पुर्णतः व अनेक इमारतींचे पाहिले मजले पाण्याखाली गेले होते. सगळं गाव झोपेत असताना मध्यरात्री आलेल्या या पुराणे अनेकांचे मोठ्या कष्टाने उभारलेले संसार कायमचे उद्धवस्त केले. तीन दिवसांनी पाणी ओसरल्यानंतर तेथे केवळ चिखल व सडलेले धान्य व कायमच्या निकामी झालेले फ्रीज,टीव्ही आदी वस्तू विखुरलेल्या दिसत होत्या. पावसाचा जोर कमी झाला, पूर ओसरला तरी होत्याचे नव्हते झालेल्या लोकांच्या डोळ्यातील पाणी थांबायला तयार नव्हते. ही दृश्यं हेलवणारी होती, पण प्रकोपाच्या परमोच्च बिंदूने शेजारच्या जिल्ह्यात त्याही वरचे टोक गाठले होते.

गाढ झोपेतच डोंगर कोसळला
अतीव दुःख होते तेव्हा, दुःखाचा डोंगर कोसळला असं म्हणतात. शेजारच्या रायगड, तसेच सातारा जिल्ह्यात काल्पनिक नाही तर मूर्त स्वरूपात दुःखाचा डोंगर कोसळला. डोंगरचे कडे, दरडी कोसळून शंभराहून अधिक लोकांचा बळी घेतला. महाड तालुक्यातील तळीये हे आख्खे गाव डोंगराखाली गाडले गेले. ४० मृतदेह आत्तापर्यंत बाहेर काढण्यात आले असून या गावातील आणखी ४२ लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांमधील दरड दुर्घटनांतील मृतांचा आकडा आतापर्यंत ७४ वर पोहोचला आहे. अजून ११४ लोक बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

सात वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळल्याच्या घटनेची आठवण तळीयेच्या दुर्घटनेमुळे झाली ३० जुलै २०१४ रोजी साखरझोपेत असलेले संपूर्ण माळीण गाव काही क्षणांमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. सुमारे दीडशे लोकांचा बळी या दुर्घटनेत गेला होता. त्याआधी २००५ मध्ये आलेल्या महापुरात महाड तालुक्यातल्याच जुई, दासगाव, कोंडवित, रोहन या गावावर डोंगर कोसळून दोनशेहून अधिक लोकांचा बळी गेला होता. मागच्याच आठवड्यात मुंबईतील विक्रोळी भागात दरड कोसळून ३० लोकांचा बळी गेला. परवाच्या प्रलयात दरड कोसळण्याच्या तब्बल तीस छोट्या-मोठ्या घटना झाल्या.

हवामान बदल,प्रकोपाचा वाढता धोका
कोकणाला सलग दुसऱ्या वर्षी चक्रीवादळाचा तडाखा बसला. पर्यावरणदृष्ट्या अतिशय संवेदनशील म्हणून किंवा ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम घाटातील पावसाचे बदललेले स्वरूप, दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये होणारी वाढ चिंता वाढवणारी आहे. केरळपासून गुजरातपर्यंतच्या या पश्चिम घाटात गेल्या काही वर्षांत दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. मागच्या वर्षी केरळातील इडुकी येथे दरड कोसळून ७०
लोक ठार झाले होते. कर्नाटकातील कुर्ग भागातही अनेक दुर्घटना घडल्या. २०१८ साली एकावर्षात येथे दरड कोसळण्याच्या १०५ घटनांची नोंद झाली. हवामानातील बदल व मानवाचे निसर्गावरील अतिक्रमण ही याची प्रमुख कारणं आहेत. बेफाम वृक्षतोड, खाणींमुळे पश्चिम घाटाचा समतोल बिघडला आहे.

पावसाचा पॅटर्नही बदलला आहे. केराळाच्या वायनाड भागातील गेल्या २८ वर्षाच्या पर्जन्यमानाचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला तेव्हा पावसाचे प्रमाण वाढतेय, पण पाऊस पडण्याचे दिवस कमी होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला. याचाच अर्थ कमी वेळेत ढगफुटीप्रमाणे अधिक पाऊस होतो. महाराष्ट्रातही अतिवृष्टी होणे व ‘ड्राय स्पेल’ म्हणजे पाऊस न होण्याचे दिवस वाढल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पुढील काळात दरड कोसळण्याच्या घटना टाळता आल्या नाही तरी त्यात मनुष्यहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. डोंगरदऱ्यातील सगळ्या गावांचे स्थलांतरण करणे सोपे काम नाही. पण किमान पावसाळ्याच्या दिवसात सुरक्षित राहता यावे यासाठी काही निवाऱ्याची सोय करण्याबाबत गेली अनेक वर्षे फक्त विचारच सुरू आहे, आता त्याची अंमलबजावणी करावी लागेल. मुंबईत डोंगर आहेत हे अशा दुर्घटना झाल्यावरच लक्षात येते. कारण बहुतांश डोंगर अनधिकृत बांधकामे व झोपडपट्ट्यांनी व्यापले आहेत. काही वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात मुंबईत २९९ ठिकाणी दरडीवर वसाहती असून त्यापैकी ६० वसाहती या धोकादायक परिस्थितीत, तर २० वसाहती अतिधोकादायक आहेत.

-अभय देशपांडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या