29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeविशेषनवरात्र : सद्प्रवृत्तीचा जागर

नवरात्र : सद्प्रवृत्तीचा जागर

एकमत ऑनलाईन

नवरात्रामध्ये आई जगदंबेच्या नऊरात्री जागर मोठ्या उत्साहात सुरू असतो. जवळपास संपूर्ण भारत त्या त्या ठिकाणच्या या मातृरूप शक्तिपीठांच्या आराधनेमध्ये रममाण होतो. महाराष्ट्राच्या भूमीमध्येसुद्धा साडेतीन शक्तिपीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरगडची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी असे या साडेतीन शक्तिपीठांचे सामर्थ्य महाराष्ट्राच्या भूमीलाही लाभले आहे. अनादी काळापासून देवी स्वरूपातील या शक्तीची उपासना केली जाते. त्यामध्ये केले जाणारे उपास-तापास, व्रत-वैकल्ये, नऊ दिवसांकरिता घटांची स्थापना केली जाते. नऊ माळा अर्पण केल्या जातात. अनेक ठिकाणी देवीच्या कृपेचे महत्त्व सांगणारे सप्तशतीच्या पाठांचे वाचन होते. अष्टमी ते दशमी या नवरात्रीच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर यज्ञांचेही आयोजन होते. त्या त्या परिसरामध्ये आणि सामाजिक दृष्टिकोनातून परिस्थितीनुरूप देवीची वेगवेगळी रूपे ऐकायला आणि पाहायला मिळत असतात.

परंतु देवी कुठलीही असो तिची साधारणपणे तीन रूपे भक्तांनी आपल्या मनामध्ये साकारलेली दिसून येतात. महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी अशी त्यांची तीन रूपे सांगितली जातात. शक्ती, विद्या आणि संपत्ती यांच्या समन्वयातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्र अशा सर्वांचेच संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी या शक्तिरूप देवींची आराधना सांगितली गेली आहे. भारतीय संस्कृतीत याबाबत उपलब्ध असलेली विविध पुराणे किंवा प्राचीन वाङ्मय याचा आढावा घेतला तर निर्मिती आणि सृजनता हा त्यामधला एक स्थायीभावसुद्धा नजरेसमोर येतो. सगळ्या सृष्टीची निर्मिती ही अशाच शक्ती रूपातून झाली. आणि त्याचे संवर्धन करण्याची व्यवस्थाही निर्माण केली गेली. या सगळ्या विश्वरचनेचा पसारा कुठल्यातरी दैवी शक्तीचा आविष्कार असल्यामुळेच त्या शक्तीचे स्वरूप आपल्या अल्प बुद्धीप्रमाणे समजून घेण्याचा प्रयत्न करणे आणि ते स्वरूप अमर्याद असल्यामुळेच तितक्याच नम्रतेने या शक्तीपुढे शरण जाणे असाही एक भाव त्यातून व्यक्त केला गेला आहे.
ज्याला आपण नवरात्र असे म्हणतो त्या काळात नऊ दिवस जागरण करण्याची एक पद्धत रूढ झालेली दिसून येते. देवीचे स्वरूप, तिची शक्ती आणि कार्य याचे संदर्भ पाहिल्यानंतर तमोगुणी, दुष्ट प्रवृत्तीचे निर्दालन करायचे असेल तर रात्रीच्या अंध:कारामध्ये सज्जन शक्तीचे दर्शन घडले पाहिजे. एवढेच नव्हे तर त्याचा प्रभाव निर्माण झाला पाहिजे. ज्या अंध:कारामध्ये दुष्टप्रवृत्ती किंवा तमोगुण उफाळून येतात त्या काळात या सज्जन शक्तीचे जागरण करण्याची परंपरा पडली असावी. उपलब्ध साहित्यातसुद्धा म्हणजेच अगदी सप्तशती, देवीभागवत किंवा महाराष्ट्रातल्या या शक्तिपीठांचाही इतिहास पाहिल्यानंतर असुरी प्रवृत्तींचा त्यांनी नाश केल्याचे आढळून येते.

म्हणूनच महिषासुरमर्दिनीचे हे रूप शक्तीच्या आराधनेसाठी प्रतीकात्मक मानले जाते. याच्याशी जोडल्या गेलेल्या कथांमधून त्या त्या देवींचे वेगवेगळे रूप भक्तांनी साकार केले. आणि मग कुठे त्याला दुर्गा, अंबा, चंडिका अशी वेगवेगळी नावे दिली गेली. त्या सर्वांचा तुलनात्मक परंतु एकत्रित निष्कर्ष एवढाच निघतो की, व्यक्ती किंवा समाजामध्ये तीन प्रकारच्या शक्ती जपण्याची आवश्यकता व्यक्त झालेली दिसून येते. या तीन गोष्टी जर असतील तर समाजामध्ये किंवा व्यक्तीमध्ये समाधान आणि संपन्नता नांदू शकते. बलहीन आणि शक्तीहीन समाज काहीच करू शकत नाही. अशा या शक्तीची निर्माती म्हणून देवीरूपाला शरण जाण्याची आवश्यकता सांगितली गेली. काही देवी स्तोत्रांमध्ये तर व्यक्तीला किंवा समाजाला आवश्यक असलेल्या ब-याचशा गोष्टी देवीकडूनच प्राप्त होऊ शकतील अशी कल्पना केली गेली आहे. जी देवी मातृरूप आहे तीच शक्तीरूप सुद्धा आहे. तिलाच लक्ष्मीरूपेण संस्थित किंवा विद्यारूपेण संस्थित असे मानून तिची आराधना केलेली पाहायला मिळते. अर्थातच पुत्ररूप भक्ताने मातृरूप देवीकडे मागावे आणि तिने ते तितक्याच उदार अंत:करणाने द्यावे असाही एक भाव दडलेला आहे.

काही का असेना परंतु जगातील सर्व प्रकारच्या सामाजिक व्यवस्था पाहिल्यानंतर भारतीय संस्कृतीचे काही वेगळेच रसायन आहे हे मान्य केल्याशिवाय पर्याय नाही. आजच्या अनेक आधुनिक अभ्यासकांना या सण किंवा उत्सवांमागे नेमके गणितच लक्षात येत नाही. भारतात ३६५ दिवस कुठे ना कुठे काही ना काही आणि कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये सण- उत्सव, व्रत, यात्रा सातत्याने सुरू असल्याचे पाहायला मिळते. मग अगदी काश्मीरच्या वैष्णोदेवीपासून ते थेट कन्याकुमारीपर्यंत किंवा गुजरातमधल्या जगदंबेच्या जागरापासून ते बंगालमधल्या दुर्गा उत्सवांपर्यंत हा सगळा शक्ती आणि भक्ती रूपातला एकात्मभाव जाणवल्याशिवाय राहात नाही. सगळ्याच सण-उत्सवांमधून सातत्याने व्यक्ती आणि समाजाचाच विचार केलेला पाहायला मिळतो. भक्तीच्या माध्यमातून व्यक्ती आणि समाजाची शक्ती टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य व्यक्त झालेले दिसून येते.

-प्रा. मधुकर चुटे
नागपूर, ९४२०५ ६६४०४

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या