27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeविशेषनवरात्रीचा संदेश

नवरात्रीचा संदेश

एकमत ऑनलाईन

नवरात्रीच्या उत्सवामागे कोणता विचार आहे, संस्कार आहे हे आपण जाणून घेत नाही. नवरात्रीच्या उत्सवामागे स्त्रीशक्तीचे पूजन करण्याचा, स्त्रीशक्तीला आदर देण्याचा उदात्त विचार आहे. स्त्रीशक्तीला दुय्यम लेखू नका. स्त्रीमुळेच ही सृष्टी घडली आहे हे आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न या उत्सवातून केला जातो. नारीकडे असलेली नवनिर्मितीची शक्ती पुरुषांकडेही निसर्गाने दिलेली नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्यावे लागते. म्हणूनच सृजनशक्ती असलेल्या, सृष्टीची उद्गाती असलेल्या नारीला सन्मान देणे हे सर्वांचे आद्यकर्तव्य ठरते. उत्सवामागचा हा विचार बारकाईने आणि गंभीरपणे जाणून घेतला पाहिजे.

गणपतीनंतर येणारा नवरात्रोत्सव हा भारतीय संस्कृतीत मानाच्या स्थानावर आहे. देशभरात प्रामुख्याने दोन नवरात्री मोठ्या प्रमाणावर साज-या केल्या जातात; मात्र नवरात्र उत्सवांची संख्या पाच आहे. थंडीच्या सुरुवातीला म्हणजे अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हटले जाते. मार्च-एप्रिलमध्ये म्हणजेच उन्हाळा सुरू होण्यापूर्वी येणा-या नवरात्रींना वसंत नवरात्री म्हणून ओळखले जाते. हा उत्सव साजरा करताना त्यामागच्या संस्कृतीचा आणि उद्देशांचा अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे. नवरात्री उत्सवाला असणारी परंपरा लोकजीवनाची संस्कृती विचार करून तयार केलेली आहे. या संस्कृतीमागे अनेक उद्देश आहेत. माणसाची आध्यात्मिक दृष्टी विकसित व्हावी असा उद्देश या उत्सवांमध्ये असतो. मात्र त्याबरोबरच या उत्सवांमागे वैज्ञानिक दृष्टीही आढळून येते. भारतीय संस्कृतीत माणसाच्या आयुष्यातील अनेक छोट्या छोट्या घटनांचा विचार करून त्या दृष्टीने असे उत्सव तयार केले गेले आहेत. हे उत्सव साजरे करण्यामागचा उद्देश अनेकजण लक्षात घेत नाहीत. त्यामुळेच अशा उत्सवांवर भरपूर खर्च करणे एवढेच आपले काम आहे.

यादृष्टीने अनेकजण वागत असतात. भारतीय संस्कृतीत जे वेगवेगळे सण, उत्सव साजरे होतात त्यामागे मनुष्याच्या मनावर संस्कार करण्याचा हेतू असतो. पृथ्वीतलावरील अनेक घटनांशी मनुष्यप्राण्याला जोडण्याचा हा विधी असतो. नवरात्रोत्सवही त्याला अपवाद नाही. या उत्सवामध्ये दुर्गामातेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीला पूजले जाते. स्त्रीशक्तीला, नारीशक्तीला, मातृशक्तीला सन्मान, आदर देण्याचा विचार नवरात्र उत्सवातून सांगितला गेला आहे. स्त्रीशक्तीविषयीची भावना भारतीय संस्कृतीने या उत्सवाद्वारे जपली आहे. भारतात कृष्ण जन्माष्टमी, रामनवमी, शिवरात्री यांसारखे सण फक्त एक दिवस साजरे केले जातात. मात्र नवरात्री हा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो. यावरूनच भारतात स्त्रीशक्तीची पूजा करण्याच्या संस्कृतीला किती महत्त्व आहे हे लक्षात येते. स्त्री ही प्रामुख्याने शक्ती आहे, ऊर्जा आहे आणि या शक्तीची आपण पूजाच केली पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे. हा संस्कार आपल्यावर या उत्सवातून होतो. सध्या समाजात स्त्रीचा अनादर करणा-या, स्त्रीवर अत्याचार करणा-या अनेक घटना आपण पहात असतो. स्त्रीला हीन, निर्दयी वागणूक देताना तिचा उपभोग्य वस्तू एवढ्याच हेतूने वापर केला जातो असे आपण अनुभवत असतो. नवरात्रीच्या उत्सवातून स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचा उदात्त विचार सांगितला आहे. त्यातून आपण स्त्रीला सन्मान देणे शिकले पाहिजे.

नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गामातेची उपासना करत असतो. या उपासनेतून दुष्ट शक्तींचे निर्दालन करण्याची शक्ती आपल्याला मिळो अशी प्रार्थना आपण करत असतो. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे विजयादशमीला सर्वत्र रावणदहन केले जाते. रावणाने सीतेचे हरण केले होते. रामाने लंकेत जाऊन रावणाच्या सैन्याचा नि:पात करून सीतेला मुक्त केले. सीता ही केवळ श्रीरामचंद्राची पत्नी नव्हती तर ती मूळ एक स्त्री आहे. स्त्रीचे रक्षण करणे हे पुरुषाचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य प्रभु रामचंद्रांनी बजावले म्हणून विजयादशमीला श्रीरामचंद्राचा रावणाच्या सैन्यावरील विजय साजरा केला जातो. यातून स्त्रीच्या रक्षणाचा विचार सांगितला गेला आहे. उत्सव आणि सणांमधून सांगितले जाणारे विचार, केले जाणारे संस्कार आपल्या आचरणातून प्रत्यक्षात आणण्याची आपली जबाबदारी असते.

नवरात्रीमध्ये दुर्गामातेची एका रूपात पूजा केली जात नाही. दुर्गामातेची नऊ वेगवेगळ्या रूपांमध्ये पूजा आणि उपासना केली जाते. हिंदू संस्कृतीत कोणत्याच देवाला असे महत्त्व मिळालेले नाही. स्त्रीशक्तीला दुय्यम लेखू नका कारण ही सृष्टी स्त्रीमुळेच घडली आहे हे आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न या उत्सवातून केला जातो. स्त्रीला जननी म्हणतात. कारण तिच्यामुळेच आपण जन्माला येतो. ही जन्म देण्याची अथवा नवनिर्मितीची शक्ती पुरुषांकडेही निसर्गाने दिलेली नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्यावे लागते. म्हणूनच सृजनशक्ती असलेल्या, सृष्टीची उद्गाती असलेल्या नारीला सन्मान देणे हे सर्वांचे आद्यकर्तव्य ठरते. उत्सवामागचा हा विचार बारकाईने आणि गंभीरपणे जाणून घेतला पाहिजे.

दुर्गामातेने नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला. दुर्गामाता ही मनुष्यजातीच्या रक्षकाच्या रूपात आलेली आहे. मनुष्यजातीला दानवांपासून मुक्त करण्याचे काम दुर्गामातेने केले. त्यासाठी तिने घेतलेले रौद्ररूप कसे असते हे मूर्तींमधून आपण पहात असतो. दुस-या दिवशी आपण कालीमातेची पूजा करतो. तिस-या दिवशी दुर्गामातेला संपूर्ण जगाची आई म्हणून पूजले जाते. जिने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली त्या देवीची पूजा करून तिचे ऋण फेडण्याचा हा छोटासा प्रयत्न असतो. त्यासाठी तिस-या दिवशी आंबेमातेची पूजा केली जाते. चौथ्या दिवशी ही जगदंबा अन्नपूर्णेचे रूप घेते. आपण निर्माण केलेल्या सृष्टीतील मनुष्यजातीचे पोट भरण्याएवढे अन्न उपलब्ध केल्याबद्दल अन्नपूर्णेची पूजा केली जाते. सहाव्या, सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशी सर्वमंगल, भैरवी, चंडीका, ललिता आणि भवानी या रूपात दुर्गामातेची पूजा केली जाते.

नवरात्रीचा उत्सव संपूर्ण देशात साजरा केला जातो. पहिल्या तिन दिवशी नवरात्रीनिमित्ताने दुर्गामातेचे पूजन करण्याबरोबरच कन्यापूजनही केले जाते. कुमारी मुलींचा सन्मान करण्याची परंपरा या निमित्ताने जपली जाते. नवरात्रीमध्ये आपल्या घरी कुमारी मुलींना बोलावून त्यांची पूजा करण्याचा प्रघात आहे. दोन ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींची या उत्सवात पूजा केली जाते. आपल्या घरी या वयातील मुलींना बोलावले जाते आणि त्यांचे पाय धुऊन त्यांची पूजा केली जाते. होम, जप, दान वगैरे करूनसुद्धा देवी प्रसन्न होत नाही. मात्र कन्यापूजन केल्यामुळे देवी प्रसन्न होते असे समजले जाते. विधीवत आणि सन्मानपूर्वक केल्या जाणा-या कन्यापूजनामुळे भारतीय संस्कृतीत स्त्रीला असणारे महत्त्व अधोरेखित होते. कन्यापूजनामागे असलेला हा उदात्त विचार प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे असते.

नवरात्रात पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. पहिल्या दिवशी मातीच्या वेदीवर घटावर पसरलेल्या ताम्हणात कुलदेवतेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना केली जाते. घटाभोवती पसरलेल्या मातीमध्ये गहू, ज्वारी अशी सात धान्ये पेरली जातात. पहिल्या दिवशी घटाजवळ नंदादीप लावला जातो. हा नंदादीप नऊ दिवस रात्रंदिवस तेवत राहणार असतो. नवरात्रीत आठव्या दिवशी दुर्गामातेच्या नावाने कोरडा शिधा जोगवा म्हणून मागण्याची पद्धत अनेक ठिकाणी आढळून येते. यामागेही एक विचार आहे, संस्कार आहे. नवव्या रात्रीला खंडेनवमीची माळ असे म्हणतात. या दिवशी शस्त्रे पूजली जातात. शस्त्राचा बदलत्या काळानुसार अर्थ आपण ज्या व्यवसायातून अर्थार्जन करतो त्या व्यवसायातील हत्यारे, अवजारे, यंत्रे यांची पूजा केली जाते. या पूजेद्वारे या यंत्रांचे, अवजारांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा प्रघात आहे. नवरात्रोत्सवाची सांगता विजया दशमीदिवशी सीमोल्लंघन करून केली जाते. या दिवशी शस्त्रपूजन केले जाते. शस्त्रपूजनाद्वारे निर्भयतेचा आणि पुरुषार्थाचा संस्कार केला जातो. विजयादशमीला आपट्याची पाने सोनं म्हणून वाटण्याची प्रथा आहे. असा हा ऊर्जेचा, शक्तीचा उत्सव आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या