16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeविशेषएनसीबी विरुद्ध एनसीपी

एनसीबी विरुद्ध एनसीपी

एनसीबी व आयकर विभागाने मागच्या आठवड्यात घातलेल्या धाडींमुळे सध्या राजकारण तापले आहे. या दोन धाडींचा परस्परांशी संबंध नसला तरी दोन्हीच्या मागे आघाडीच्या नेत्यांना भाजपाचाच हात दिसतो आहे. एनसीबीने क्रूझपार्टीवर धाड घालून सुपरस्टार शाहरुख खानच्या मुलाला केलेली अटक, त्यावेळी साक्षीदार म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती, ताब्यात घेतलेल्या भाजप नेत्याच्या मेहुण्याला सोडून देणे, आदी घटनांमुळे विरोधकांनी संशयाचे काहूर उभे केले आहे. नवाब मलिक यांच्या आक्रमक भूमिकेमुळे एनसीबी विरुद्ध एनसीपी असा संघर्ष रंगला असून यातून अजून काय काय बाहेर येणार याचे कुतूहल वाढत चालले आहे.

एकमत ऑनलाईन

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) २ ऑक्टोबरला मुबंईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया या आलिशान जहाजावर (लक्झरी क्रुझ) छापा टाकून काही जणांना अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी केंद्रीय महसूल संचनालयाने गुजरातमधील मुंद्रा बंदरावर छापा मारून तब्बल २० हजार कोटी रुपये किमतीचे सुमारे ३००० किलो हेरॉईन जप्त केले होते. त्या तुलनेत कॉर्डेलिया क्रुझवरील छापा किरकोळ होता. परंतु या छाप्याने संपूर्ण देशभर खळबळ उडवून दिली.

गेले आठ दिवस देशभरातील मीडिया एनसीबीच्या कार्यालयाबाहेर तळ ठोकून आहे. कारण या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींपैकी एक आहेत सुपरस्टार शाहरुख खान यांचे चिरंजीव आर्यन खान. त्यामुळे स्वाभाविकच मीडियाचा सगळा फोकस इकडे आहे. लखीमपूर खेरी मध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले, अडाणीच्या मालकीच्या मुंद्रा पोर्टमधून २० हजार कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले, यापेक्षा आर्यन खान कोठडीत काय खातो, काय करतो याबाबतच्या बातम्यांमध्ये सर्वांना अधिक रस आहे. प्रसारमाध्यमांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने त्यांनी काय दाखवावे, कशाला महत्व द्यावे हा त्यांचा अधिकार आहे.

तर काय पहायचे व काय नाही पहायचे याचा अधिकार ज्यांच्या हातात रिमोट आहे त्यांना आहे. त्यामुळे याबाबत तिसऱ्यांना तक्रार करायचे काही कारण नाही. एनसीबीने या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक करून अंमली पदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या या रॅकेटची पाळंमुळं खणून काढायचा प्रयत्न चालवला आहे व त्याबद्दल त्यांची प्रशंसा व्हायला हवी. पण क्रूझ धाड प्रकरणात रोज नवनव्या बाबी पुढे येत असल्याने आता केवळ आर्यन खान हा विषय राहिला नसून त्याला राजकीय वळण लागले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

साक्षीदार की साथीदार ?
छापा घालणाऱ्या व आरोपीना पकडून नेणाऱ्या एनसीबीच्या पथकात भाजपचे पदाधिकारी होते, क्रूझवरील छाप्यात भाजपच्या एका नेत्याच्या मेहुण्यालाही पकडण्यात आले होते, पण दिल्लीच्या फोननंतर सोडून देण्यात आले असे खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केले आहेत. तर राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याच्या मुलाच्या मित्रालाही एनसीबीने सोडले असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने याप्रकरणाबद्दलचे कुतुहल वाढत चालले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते व राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी छाप्यानंतर भाजपाचे पदाधिकारी मनिष भानुशाली आर्यन खान यांच्या दंडाला पकडून एनसीबी कार्यालयात नेत असल्याचे फोटो व व्हिडिओच समोर आणले. भानुशाली याच्या फेसबुक अकाऊंटवर त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी मुख्यमंत्री अमित शाह आणि इतर भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत. त्यामुळे हा व्यक्ती क्रूझवरील छाप्यात कसा काय सहभागी झाला असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक होते.

के.पी.गोसावी नावाचा आणखी एक खाजगी व्यक्तीही एनसीबीच्या पथकाबरोबर होता. या गोसावीने आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याच्यासोबत एक सेल्फीही काढला होता. यावरून गोंधळ उडल्यावर हे दोघांना साक्षीदार म्हणून छाप्याच्या वेळी नेण्यात आले होते, असा खुलासा एनसीबीने केला. भाजप नेते मोहित कंबोज यांचा मेहुणा व अन्य दोघांना दिल्लीच्या दबावामुळे सोडण्यात आले असाही आरोप मलिक यांनी केला होता. यावर आम्ही १४ लोकांना क्रूझवरून ताब्यात घेतले होते व चौकशीनंतर सहा जणांना सोडून दिल्याचे मान्य करताना राष्ट्रवादीचे आरोप मात्र एनसीबीने फेटाळले. खरं तर पहिल्या दिवशी जेव्हा आठ आरोपीना अटक केल्याची माहिती दिली तेव्हाच ताब्यात घेतलेल्या आणखी सहा जणांना पुरावे नसल्याने नंतर सोडल्याचे सांगायला हवे होते. तसे केले असते तर अकारण संशयाचे भूत उभे राहिले नसते.

कारवाईच्या वेळी येणाऱ्या साक्षीदारांची पार्श्वभूमी तपासणे शक्य नसते, असा खुलासा एनसीबीने केला आहे. तो पटण्यासारखाही आहे. पण साक्षीदारांचे वर्तन व त्यांच्या पार्श्वभूमीमुळे एका आकारण शंकेला वाव मिळाला आहे. नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीने एका प्रकरणात अटक केली होती. त्यामुळे ते एनसीबीवर सूडबुद्धीने आरोप करत असल्याचा दावा भाजपनेते करतायत. कारण काहीही असले तरी अशा आरोपांमुळे कायद्याने केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्हं उभे राहणार नाही याची दक्षता ते भविष्यात घेतील अशी अपेक्षा आहे.

दोन्ही डोळे वापरणे हिताचे
मुंबई ही मायानगरी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या श्रमिकांपासून ते धनिकांपर्यंत सर्वांना मुंबईचे आकर्षण आहे. बॉलीवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठीही रोज हजारो लोक मुंबईत येतात. काही सुपरस्टार होतात, काही छोटी-मोठी कामं करत संघर्ष करत राहतात. काही निराश होऊन परत जातात, तर काही कळत, नकळतपणे अवैध धंद्यात अडकतात. पैसा व ग्लॅमरच्या जगात चकाकी अशी असते की बऱ्या-वाईटाची लक्ष्मणरेषा दिसेनाशी होते. दुसरीकडे गेल्या काही वर्षांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये क्लब-पब, हुक्काबार यांचे आकर्षण वाढले आहे. यातूनच मुंबई भोवती अंमली पदार्थाचा विळखा पडत चालला आहे.

त्यामुळे या विळख्यातून मुंबईला सोडवण्यासाठी कठोर भूमिका घेणे आवश्यक होते. केंद्रीय अमली पदार्थविरोधी ब्युरो व राज्याच्या अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने गेल्या दोन वर्षात याबाबत निश्चितच चांगले काम केले आहे. विशेषतः सिने अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर एनसीबीने खुप सक्रियता दाखवली. या प्रकरणाला राजकीय रंग आल्याने काही लोकांनी टीकाही केली. परंतु ती टीका म्हणजे रोज हजार लोक विनातिकीट प्रवास करतात, तुम्ही याच चार लोकांना का पकडले ? अशा स्वरूपाची होती. बड्या लोकांच्या बिघडलेल्या पोरांना पकडले व त्यांच्यावर कारवाई होत असेल तर ते योग्यच आहे. पण कारवाई करणाऱ्या संस्थांनी दोन्ही डोळ्यांचा वापर केला पाहिजे, एकाच बाजूच्या लोकांवर कारवाई करून दुसऱ्या बाजूच्या लोकांकडे दुर्लक्ष करू नये ही अपेक्षा चूक नाही. पण तो बचावासाठीचा युक्तिवादही होऊ शकत नाही. मात्र अर्धवट प्रामाणिकता उपयोगाची नसते, ती व्यवस्थेला बदनाम करते, त्यांच्या हेतुविषयी प्रश्नचिन्हं निर्माण करते. सध्या हेच होताना दिसते आहे.

अजित पवार टार्गेट
एनसीबीच्या कारवाईवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना दुसरीकडे प्राप्तिकर विभागाने उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर एकाच वेळी धाडी घातल्याने राजकारण तापले आहे. ईडी ने आधीच राष्ट्रवादी व शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या चौकशा सुरू केलेल्या असताना प्राप्तिकर विभागही सक्रिय झाला आहे.

साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याबरोबरच दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर, संचालकांवर प्राप्तिकर विभागाने धाडी घातल्या. एवढेच नव्हे तर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर, तसेच अजित पवार यांच्या तिन्ही बहिन्यांच्या मालमत्तांवरही प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत.

या कारवाईमुळे अजित पवार चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. आपल्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकण्याला आपला आक्षेप नाही. परंतु केवळ रक्ताचं नातं आहे म्हणून राजकारणाशी, कंपन्यांशी दुरान्वये संबंध नसलेल्या माझ्या बहिणींवर कारवाई केली जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांचे भाजपच्या अनेक नेत्यांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत. निवडणुकीनंतर बंड करून त्यांनी फडणवीस यांच्याबरोबर सरकार स्थापनेचा प्रयत्नही केला होता. परंतु संख्याबळ जमवण्यात अपयश आल्याने ते स्वगृही परतले व ७२ तासात सरकार कोसळले. ठाकरे सरकारची आयुष्यरेषा दिवसागणिक अधिक बळकट होत चालल्याने ऑपरेशन कमळची शक्यताही मावळत चालली आहे. त्यामुळे अजित पवार यांना टार्गेट करून भाजप दबाव वाढवत असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

-अभय देशपांडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या