28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeविशेषघनिष्ठ मैत्रीसंबंधांना ‘नवी ऊर्जा’

घनिष्ठ मैत्रीसंबंधांना ‘नवी ऊर्जा’

एकमत ऑनलाईन

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा रशिया दौरा हा दोन्ही देशांमधील घनिष्ट मैत्रीसंबंधांना नव्या उंचीवर नेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरलाच; पण त्याचबरोबर भारताने यातून आपल्या परराष्ट्र धोरणातील स्वायत्ततेचा मुद्दा पश्चिमी जगापुढे पुन्हा एकदा अधोरेखित करुन मांडला. भारत-रशिया यांच्यातील संबंधांना ऊर्जासुरक्षेचा नवा आयाम गेल्या काही महिन्यात जोडला गेला आहे. अमेरिकेच्या निर्बंधांनंतर अडचणीत सापडलेल्या रशियाकडून भारताने सवलतीच्या दरात तेलाची प्रचंड मोठी आयात केली. यामुळे दोन्हीही देशांचा फायदा झाला. गेल्या सहा-सात दशकांत भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री तावून सुलाखून निघाली असून तिला एक नवी झळाळी प्राप्त झाली आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा दोन दिवसांचा रशिया दौरा नुकताच संपन्न झाला. भारत-रशिया संबंधांच्या दृष्टिकोनातून आणि जगाला एक स्पष्ट संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. या दौ-यादरम्यान एस. जयशंकर यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांची एक नवी चौकट अधोरेखित केली. त्यानुसार, भारतीय परराष्ट्र धोरणाचा मुख्य उद्देश सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता करणे हा आहे. भारतीयांना योग्य दरामध्ये आणि अखंडितपणे इंधनाचा पुरवठा करणे, हे शासन म्हणून आमचे कर्तव्य आहे. या कर्तव्याच्या पूर्ततेसाठी परराष्ट्र धोरण हे एक साधन आहे. ही आमची प्राथमिकता असल्यामुळे आम्ही रशियाकडून कच्च्या तेलाची आयात केली आणि ती यापुढेही सुरू
राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. पश्चिमी जगाचा दबाव असतानाही भारताने ही तेलआयात कशी केली, असा प्रश्न एस. जयशंकर यांंना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी ठामपणाने ही बाब सांगितली की, आमचे परराष्ट्र धोरण हे आमच्या हितसंबंधांवर आधारीत आहे आणि आमच्या स्वत:च्या काही चिंता असून त्यानुसारच आम्ही हे धोरण अवलंबले आहे. हे सांगताना त्यांनी भारत-रशिया यांच्यातील मैत्रीचा एक अत्यंत स्पष्ट संदेश पश्चिमी जगाला दिला.

रशियाची अर्थव्यवस्था ही पूर्णत: तेल आणि नैसर्गिक गॅसच्या निर्यातीवर अवलंबून आहे. रशिया-युक्रेन युद्धात रशियाचा पराभव करायचा असेल तर त्याचा एक प्रमुख मार्ग म्हणजे रशियाच्या तेल आणि गॅसवर निर्बंध आणणे. त्यासाठी अमेरिकेने रशियावर हजारो निर्बंध टाकले आणि अन्य देशांवरही रशियाकडून तेलआयात थांबवण्याबाबत दबाव आणला. कारण या इंधननिर्यातीतून मिळणा-या पैशामुळे रशियन अर्थव्यवस्था टिकून राहिली आहे. त्यामुळेच रशिया या युद्धातून कोणतीही माघार घेण्यास तयार नाहीयेत. आजघडीला भारत आणि चीन हे दोन देश रशियाकडून तेल व इंधनाची प्रचंड प्रमाणात आयात करत आहेत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या रशियाला मदतीसाठी भारत आणि चीन धावून गेले आहेत, अशा स्वरुपाचे चित्र पुढे येऊ लागले आहे. त्यामध्ये तथ्यही आहे. पश्चिमी जगाने रशियाकडून तेल व गॅसची आयात करणे जवळपास थांबवल्यामुळे रशिया सध्या नव्या ग्राहकांच्या शोधात आहे. अशा परिस्थितीत रशियाला आशियाई देशांना तेल विकण्याशिवाय पर्याय नाही. आशियामध्ये भारत आणि चीन हे दोन प्रबळ तेलआयातदार देश आहेत.

भारताचा विचार करता, रशिया-युक्रेन युद्ध २४ फेब्रुवारी रोजी सुरू झाले. त्यापूर्वी भारत रशियाकडून आपल्या एकूण तेलआयातीच्या ०.२ टक्के इतक्या कच्च्या तेलाची आयात करत होता. भारताच्या तेल पुरवठादार देशांच्या क्रमवारीत रशिया बाराव्या स्थानावर होता. परंतु युद्ध सुरू झाल्यानंतर भारताची रशियाकडून तेलाची आयात टप्प्याटप्प्याने वाढत गेली आणि ती ०.२ टक्क्यांवरुन २२ टक्क्यांपर्यंत पोहोचली. थोडक्यात भारताची रशियाकडून होणारी तेल आयात जवळपास ५० पटींनी वाढली आणि ती ऐतिहासिक आहे. कारण इतके तेल भारताने रशियाकडून कधीही घेतलेले नाही. मागच्या महिन्यात रशिया हा भारताच्या तेलपुरवठादारांच्या यादीत १२ व्या स्थानावरुन थेट पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. भारताने आतापर्यंत १० अब्ज डॉलर्सचे क्रूड ऑईल रशियाकडून खरेदी केले आहे. याबाबत भारताने उत्तम राजनैतिक धोरण आखणी केली. त्यानुसार भारताला रशियाकडून मिळणा-या तेलावर प्रति बॅरल ३० डॉलर्सची सवलत मिळाली. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात १०० डॉलर्स प्रतिबॅरल असा क्रूड ऑईलाचा दर असेल तर भारताला ते ६८ ते ७० डॉलर्र्सना मिळते. याचा भारताला खूप मोठा आर्थिक फायदा झाला. जवळपास ४० हजार कोटींच्या विदेशी चलनाची यामुळे बचत झाल्याचे सांगितले जाते.

रशिया अडचणीत सापडलेला असताना भारत मदतीला धावून गेला आणि रशियाच्या तेलपुरवठ्यामुळे भारताची अडचण कमी होण्यास मदत झाली. दोघांनाही परस्परांच्या अडचणीच्या काळात एकमेकांचा फायदा झाल्यामुळे अनेक वर्षांपासून चालत आलेले मैत्रीचे बंध आणखी घट्ट होण्यास मदत झाली. ही मैत्री हितसंबंधांच्या परस्पर व्यापकतेवर आधारलेली आहे. या मैत्रीला दीर्घ इतिहास आहे. शीतयुद्ध काळापासून भारतीय अर्थव्यवस्थेला रशियाच्या आर्थिक सहकार्याची फार मोठी मदत झाली आहे. रशिया हा भारताचा संरक्षण क्षेत्रातला सर्वांत मोठा पुरवठादार देश होता. संरक्षण क्षेत्रातील हार्डवेअरच्या ६० टक्के गरजेसाठी आपण आजही रशियावर निर्भर आहोत. २०२० मध्ये गलवानचा संघर्ष झाला तेव्हा भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह दोन वेळा रशियाच्या दौ-यावर जाऊन आले. रशियाकडून काही अत्याधुनिक संरक्षण साधज्ञसामग्री आयात करण्यासंदर्भात काही करार झाले.

दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धानंतर भारताने रशियावर उघडपणाने टीका करावी आणि युक्रेनला समर्थन द्यावे, असा पश्चिमी जगतासह सर्वांचाच दबदबा होता. पण भारताने असा कोणताही दबाव स्वीकारला नाही. गेल्या ७ ते ८ महिन्यांचा काळ हा भारतासाठी परीक्षेचा होता. ही परीक्षा आपण उत्तीर्ण झालो आहोत. या काळात कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची स्वायत्तता अबाधित ठेवली. याबाबत एस. जयशंकर यांनी केलेली अनेक वक्तव्ये पश्चिमी मीडियाच्या हेडलाईन्स ठरल्या. एस. जयशंकर यांनी स्पष्टपणाने सांगितले की, रशिया-युक्रेन हा युरोपचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याची दखल घेऊन संपूर्ण जगाने आपली धोरणे बदलली पाहिजेत असे नाही. त्यामुळे या युद्धामुळे जगाला वेठीस धरले जाऊ नये.

आजवर युरोपचे प्रश्न हे जगाचे प्रश्न मानले जावेत; पण जगाचे प्रश्न युरोपचे प्रश्न मानले जाऊ नयेत, असा एक जणू अलिखित नियमच बनला होता. किंबहुना, युरोपियन देशांची ती पक्क धारणाच बनून गेली होती. या मानसिकतेतून युरोपने बाहेर येणे गरजेचे असल्याचे जयशंकर यांनी स्पष्टपणाने सांगितले. भारतात रशियातून येणा-या तेलाच्या प्रत्येक थेंबावर युक्रेनच्या युद्धात बळी गेलेल्यांचे रक्त आहे, असे सांगून भारतावर प्रचंड दबाव आणला गेला. परंतु या भावनिक, आर्थिक, सामरीक कोणत्याही दबावापुढे भारत झुकला नाही. विशेष म्हणजे हे करत असताना भारताने अनेक प्रसंगी रशियाची कानउघडणीही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष ब्लादीमिर पुतीन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेमध्ये स्पष्टपणाने सांगितले की, आजचा काळ हा युद्धाचा नाही. प्रश्न हे सामोपचाराने शांततेने, चर्चेेने सोडवले पाहिजेत. परंतु संयुक्त राष्ट्रसंघामध्ये ज्या-ज्यावेळी रशियावर आर्थिक निर्बंधांच्या चर्चा झाल्या तेव्हा भारताने आपले राजनैतिक चातुर्य दाखवत त्या बैठकांना अनुपस्थिती नोंदवली. ब-याचदा अप्रत्यक्षपणाने रशियाची बाजू उचलून धरली. यामुळे खुद्द ब्लादीमिर पुतीन यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे तोंडभरून कौतुक केले.

परराष्ट्र धोरणातील स्वायत्तता टिकवून ठेवण्याचा हा उत्तम आणि आदर्श नमुना आहे, अशा आशयाचे गौरवोद्गार त्यांनी काढले. भारत-रशिया यांच्यातील मैत्री जागतिक राजकारणामध्ये सत्तासमतोलाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे. दुस-या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात शीतयुद्धाची रणनीती प्रभावी झाली होती. जगाची विभागणी भांडवलशाही गट आणि साम्यवादी गट अशा गटांमध्ये झाली होती. अशा काळात भारताने आपल्या परराष्ट्र धोरणातील स्वायत्तता टिकवून ठेवली होती आणि दोन्ही गटांशी संबंध ठेवले होते. आता पुन्हा एकदा नवीन अलिप्ततावादाची संकल्पना नव्या रुपाने आकाराला येताना दिसत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या