24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeविशेषबॉलिवूडमधील नवा प्रवाह

बॉलिवूडमधील नवा प्रवाह

एकमत ऑनलाईन

चित्रपटसृष्टीत एखादा ट्रेंड येणे आणि जाणे प्रेक्षकांसाठी नवीन राहिलेले नाही. गेल्या काही महिन्यांत समकालीन व्यक्तींच्या आयुष्यावर चित्रपट काढण्याचा एक नवाच ट्रेंड आला आहे. ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ हा चित्रपट गेल्याच आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित झाला. भारतीय हवाई दलाची पायलट गुंजन सक्सेना हिच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. कारगील युद्धात आपल्या हुशारीने आणि हिमतीने शौर्य गाजवलेल्या वैमानिक म्हणून गुंजन यांची ओळख देशाला आहे. कारगिलच्या युद्धादरम्यान त्यांनी श्रीनगर बेस कॅम्पवरून चाळीस वेळा उड्डाण केले होते.

सीमेवर लढणा-या भारतीय सैन्याला रसद पुरवणे, गोळीबाराने घायाळ झालेल्या सैनिकांना तिथून बाहेर काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांनी ही जबाबदारी अत्यंत उत्तमपणे निभावली आणि शौर्य गाजवण्यात महिला पुरुषांच्या मागे नाहीत हे सिद्धच करून दाखवले. अर्थात भारतीय हवाई दलामध्ये पुरुषांचे वर्चस्व अधिकच आहे, त्यामुळे गुंजन सक्सेना यांना वैमानिक म्हणून तिथे प्रवेश करणे फार सोपे नक्कीच नव्हते. त्यांना बरोबरीच्या वैमानिकांकडून उपेक्षा आणि अपमान सहन करावा लागला. मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही आणि हवाई दलामध्ये यशस्वी लढाऊ वैमानिक म्हणून नाव कमावले. या चित्रपटात जान्हवी कपूरने गुंजन सक्सेना यांची भूमिका केली आहे.

आपापल्या क्षेत्रात मेहनत, सातत्य आणि निष्ठा यांच्या मदतीने उत्तुंग कार्य करून आपली छाप सोडणा-या व्यक्ती लोकांच्या दृष्टीने अढळ ता-यासारख्या असतात. क्षेत्र कोणतेही असो क्रीडा, समाजकार्य किंवा साहित्य, पत्रकारिता असो किंवा कला आणि संगीत असो कोणत्याही क्षेत्रातील वास्तव आयुष्यातील नायकांच्या आयुष्याविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा सामान्य लोकांना नेहमीच असते. सामान्यातील प्रत्येकाला ते कुठे जन्माला आले, या क्षेत्रात कसे आले, त्यांना किती आणि केवढा संघर्ष करावा लागला आणि यश त्यांना केव्हा आणि कसे मिळाले, हे जाणून घ्यायचे असते.

कोरोनाचा कहर सुुरूच, ५ हजाराचा आकडा ओलांडला

आपल्या लाडक्या व्यक्तिमत्त्वांची जीवनगाथा ऐकणे आणि ऐकवणे दोन्हीही आनंददायी असते. त्यामुळेच या सर्व कहाण्या जेव्हा रूपेरी पडद्यावर साकारल्या जातात तेव्हा बहुतांश वेळा हे चित्रपट यशस्वी होतात. ही यशस्वी व्यक्त मागच्या पिढीतील असो किंवा अगदी समकालीन असो, त्यांच्या यशाची गाथा प्रत्येकासाठी प्रेरणादायीच असते. विशेषत: नव्या पिढीला ते जाणून घेण्याची खास उत्सुकता असते. निदान तेवढ्यासाठी तरी बॉलिवूड निर्मात्यांचे आभार मानले पाहिजेत. त्याच त्या नृत्य, हिंसा, प्रेम, बदला या चावून चोथा झालेल्या कथा बाजूला ठेवून असे नवे प्रयोग करताहेत.

सुरुवातीला असे जीवनप्रवास दाखवणारे चित्रपट करणे नक्कीच जोखमीचे होते. कारण जर चित्रपट चालला नाही तर चित्रपटनिर्माता आणि चित्रपटाशी निगडीत प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीला प्रचंड मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागायचे. परंतु आता नेटफ्लिक्स, प्राईम यांसारखे ओटीटी प्लॅटफॉर्म आले असल्यामुळे चित्रपट न चालण्याची भीती कमी झाली आहे. घरातून बाहेर न पडता, तिकिट खरेदी न करता घरात बसल्या बसल्या कोट्यवधी प्रेक्षक जगाच्या कानाकोप-यातून हे चित्रपट पाहू शकतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ठराविक वेळ काढून न बघता आपल्या सोयीने चित्रपट पाहिला जाऊ शकतो. लॉकडाऊनच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मने खूप मोठी बाजी मारली आहे. याचा फायदा या बायोपिक निर्मात्यांना होत आहे.

एखाद्या महान किंवा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट करताना तो शक्य तितका वास्तवाला धरूनच बनवला पाहिजे. त्यामध्ये विनाकारण नाट्यमयता असता कामा नये. कारण प्रत्यक्ष आयुष्यातही कोणी आपल्या प्रेयसीच्या मागे बागेत गाणी गात फिरत नाही. प्रेमाची कबुली देण्याचा हा तद्दन फिल्मी प्रकार चित्रपटकर्त्यांनीच शोधून काढला आहे आणि आजवर तीच परंपरा पुढे सुरू आहे. सामान्य व्यक्ती आपल्या प्रेमाची कबुली साधेसुधे बोलून देतात. त्यामुळेच धावपटू मिल्खा सिंग चित्रपटात प्रेयसीबरोबर गाणे गाताना दाखवला तेव्हा ते कोणाच्याच पचनी पडले नाही. चित्रपटांमध्ये गाणी घुसवली त्यामुळे चित्रपटही लांबला. तरीही प्रेक्षकांनी चित्रपटाला प्रतिसाद दिला कारण मिल्खा सिंग यांच्या आयुष्यात अनेक रंजक प्रसंग घडले होते. चित्रपटसृष्टीतील या नव्या ट्रेंडमुळे प्रेक्षकांची पसंतीही बदलते आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे : राज्यात दिवसभरात बरे झाले ९१३६ रुग्ण

टीव्हीचे आगमन होण्यापूर्वी नाटक, चित्रपट ही तर सामान्य रसिकांच्या मनोरंजनाची साधने होती. टीव्ही आल्यानंतर त्यातही ९०च्या दशकात खासगी वाहिन्या आल्यानंतर मनोरंजन क्षेत्राचा मोठा विस्तार झाला. आता प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीनुसार आपल्या मनोरंजनासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम पाहू शकतात. त्यामुळेच चित्रपटसृष्टीवरही असे बंधन राहिले नाही की त्यांनी केवळ मनोरंजनाचा विचार करून चित्रपट निर्माण करावेत. चित्रपट हे माध्यम मनोरंजन करण्याव्यतिरिक्त माहिती देणे, प्रेक्षकांना शिक्षित करणे आदी गोष्टींसाठीही वापरता येते. आपल्याकडे बॉलिवूड याबाबतीत खूपच मागे पडले होते. आता परिस्थिती बदलते आहे. कारण प्रेक्षकही जागरूक झाला आहे. त्याला इतिहास, धर्म, संस्कृती किंवा वास्तव आयुष्यातील व्यक्तींवरील चित्रपट पाहण्याची गोडी लागली आहे.

समकालीन व्यक्तीवर चित्रपटनिर्मिती करण्याचा आणखी एक फायदा होतो की, आपण त्या व्यक्तीला त्याच्या हयातीतच प्रसिद्धी देऊ शकतो, जी त्याला मिळणे अपेक्षितच असते. मात्र प्रत्येक क्षेत्रात असलेले राजकारण, काका-पुतण्या वाद, लिंगभेद किंवा भ्रष्टाचार या सर्वांमुळे लायक व्यक्तीही प्रसिद्धी मिळवण्यापासून वंचितच राहतात. आजही देशभर प्रत्येक प्रांतात आणि प्रत्येक क्षेत्रात असे लोक आहेत ज्यांच्या आयुष्यावर केंद्रित चित्रपट तयार झाले तर समाजहिताच्या दृष्टीने चांगले आहे. बॉलिवूडमधील बदलते प्रवाह पाहता अधिक उत्साहाने या दिशेने प्रयत्न केले जातील.

सारांश, मनोरंजन करण्याव्यतिरिक्त माहिती देणे, शिक्षण देणे ही जबाबदारीही बॉलिवूड पार पाडू शकते. चित्रपटांतून दिलेले संदेश हे प्रेक्षकांना थेट भिडतात. परंतु ही जबाबदारी निभावण्यात बॉलिवूड खूपच मागे पडले होते. बदलत्या परिस्थितीत सामान्य प्रेक्षक सजग झाल्याने यशस्वी व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांना चांगली पसंती मिळत आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. हा बदलता प्रवाह सकारात्मकच आहे.

सोनम परब

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या