27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeविशेषनितीनभाऊ, तुम्ही राजकारणातही हवेत, सत्ताकारणातही हवेत!

नितीनभाऊ, तुम्ही राजकारणातही हवेत, सत्ताकारणातही हवेत!

एकमत ऑनलाईन

२३ जुलै रोजी नागपुरात एक बहारदार सत्कार समारंभ झाला. नागपूर-विदर्भातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री. गिरीश गांधी यांनी ७५व्या वर्षात पाऊल ठेवले म्हणून हा सत्कार समारंभ होता. गिरीश गांधी हे नाव विदर्भात सर्वांना माहिती आहे. ३०-३५ वर्षे ते सार्वजनिक जीवनात आहेत. समाजकारण, राजकारण, पर्यावरण यातील जे जे चांगले आहे, त्याचे ते पुरस्कर्ते आहेत. एवढेच नव्हे तर विदर्भाचे ते कायमचे ‘सांस्कृतिक मंत्री’ आहेत. ‘वनराई’ या मोहन धारिया यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे विदर्भाचे ते प्रमुख आहेत. आजचे हिरवेगार नागपूर याचे बरेचसे श्रेय वनराईला आहे. मग गणपती टेकडी असो, सीताबर्डीची टेकडी असो…. ही सगळी हजारो झाडे गिरीशबाबू यांच्या नेतृत्वाखाली लावली गेली. वाढवली गेली. सत्तेत कधीही न राहता गिरीशबाबूंनी अनेक वनराई बंधारे बांधले.

‘जलसंधारण आणि पर्यावरण’ या विषयात जीव घालून काम करणारे जे थोडे नेते आहेत, त्यात गिरीशबाबू आहेत. हिवरेबाजारचे पोपटराव पवार महाराष्ट्रात जसे उशिरा प्रसिद्ध झाले. प्रसिद्धीसाठी काम न करता त्यांनी दुष्काळी भाग हिरवागार केला. पळसखेडच्या ना. धों. महानोरांनी वाहणारे ओढे आडवून मेअखेरपर्यंत पाणीसाठा केला आणि आपली शेती फुलवली. शिवाय त्या शेतीत आणि रानात कविता केल्या. यशवंतराव चव्हाण यांनी महानोर यांचा ‘वही’ हा कथासंग्रह वाचला आणि या कष्टक-याला महाराष्ट्र विधान परिषदेची आमदारकी दिली. गिरीशबाबूंना शरद पवार यांनी अगदी चार महिन्यांकरिता का होईना, आमदार केले. टिळा लावण्यापुरतेच. पण, गिरीशबाबूंना त्याचा फरक पडला. वर्षातील ३६५ दिवसांत किमान ३०० कार्यक्रम नागपुरात करून या कर्तबगार समाजसेवकाने हजारो माणसे जोडली. कितीजणांना मोठे केले. प्रकाशात आणले.

प्रख्यात कवी सुधाकर गायधनी जागतिक कीर्तीचे आहेत. पण नागपुरात त्यांचा पहिला सत्कार गिरीशबाबूंनी केला. यशवंत मनोहर असतील…महेश एलकुंचवार असतील… जे जे सामाजिक जीवनात महत्त्वाचे लोक आहेत त्यांच्यामागे गिरीशबाबू ठामपणे उभे आहेत. असे गिरीशबाबू ७५व्या वर्षात प्रवेशकर्ते झाले म्हणून, त्यांच्या मनाविरुद्ध या सत्कार समितीचे आयोजन झाले. नितीन गडकरी सत्कार समितीचे अध्यक्ष झाले. नागपुरातील हा राजकारणी पण उमद्या मनाचा नेता. असा माणूस होणे नाही. मंत्रिपद असो-नसो, मनाने मोकळा… समाजात जे जे चांगले आहे, त्याचा पुरस्कार करणारा… भाजपामध्ये काम करताना वाजपेयी परंपरेतील. भाजपाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचलेला. मनाने निर्मळ…अशा नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली गिरीशबाबूंच्या सत्काराला काँग्रेसचे नेते, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे स्वत: आले. त्यांच्याच हस्ते सत्कार झाला. त्यांच्या बाजूला होते दत्ता मेघे, राष्ट्रवादीचे अरुण गुजराथी… या महाराष्ट्राची ही परंपरा आहे. पक्षाच्या सगळ्या भिंती ओलांडून चांगल्या कामाला, चांगल्या व्यक्तींचा सत्कार करताना या परंपरेने संकोच केला नाही. ही यशवंतरावांची परंपरा आहे. जात-धर्म- भेद गळून पडले पाहिजेत आणि सामाजिक जीवनात समानतेचा पुरस्कार करणारांना शक्ती दिली पाहिजे, ही त्यामागची भावना आहे.

त्यामुळे यशवंतरावांना प्रखर विरोध केलेले एस. एम. जोशी यांचा पंचाहत्तरीचा सत्कार यशवंतराव चव्हाण करतात. आयुष्यभर राजकीय विरोधात राहिलेले थोर नेते उद्धवराव पाटील यांचा सत्कार यशवंतराव करतात. त्या उद्धवराव पाटील यांचा पुतळा विलासराव देशमुख औरंगाबादमध्ये उभा करतात… अशा या निकोप परंपरेतील तो महाराष्ट्र, आजच्या घाणेरड्या राजकारणात परवा नागपूरच्या सत्कारात पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला. सगळ्यांच्या भाषणाने कार्यक्रम एका उंचीवर गेला. माझे मानसपुत्र बाळ कुलकर्णी यांच्या खुमासदार सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम सतत रंगत गेला. योगायोग असा की, २३ जुलै रोजीच बाळ कुलकर्णी या संपादक, पत्रकाराचा ६७ वा वाढदिवस. पण, चूक मोठी झाली की, तो उल्लेख करण्याचे त्या दिवशी कसे राहून गेले ते समजत नाही. त्याबद्दल बाळची क्षमाच मागितली पाहिजे. पुढच्या वर्षी हा दिवस लक्षात ठेवीन आणि त्याची भरपाई करेन. ‘लोकमत’मध्ये माझ्यासोबत बाळ २५ वर्षे सहकारी होता. गिरीशबाबू हा फार मोठा माणूस आहे. यशवंतराव चव्हाण केंद्राचे विदर्भाचे प्रमुख, वनराईचे प्रमुख, मानव मंदिर संस्थेचे प्रमुख, मारवाडी फाऊंडेशनचे प्रमुख, स्मिता-स्मृती (अभिनेत्री स्मिता पाटील) यांच्या नावाने सलग २९ वर्षे स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर वार्षिक अंक काढणारे संपादक…. एक सामाजिक कार्यकर्ते… सच्चे काँग्रेस कार्यकर्ते, अशा अनेक रूपांनी गिरीशबाबूंना विदर्भ पाहात आहे.

हा माणूस पश्चिम महाराष्ट्रात असता तर पत्रकारांनी यांना डोक्यावर घेतले असते. पण प्रसिद्धीसाठी त्यांचे काम नाही. असा हा आगळावेगळा माणूस….त्यांच्या ७५ वर्षांवर जो गौरवग्रंथ निघणार आहे त्यामध्ये लेख लिहिण्याची स्पर्धा आहे. गिरीशबाबूंच्या सत्कारात सुरुवातीचेच भाषण करताना मी या विषयाला थोडासा स्पर्श केला की, ‘आम्हाला यशवंतरावांचा महाराष्ट्र हवा आहे….’ जात- धर्म-पक्ष या नावावर राजकारण न करता, समाजकारण निकोप राहिले पाहिजे, हाच विचार देशाला तारणार आहे. या सत्कार कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे, अरुण गुजराथी, गिरीशबाबू सगळ्यांचीच भाषणे छान झाली. खचाखच भरलेल्या सभागृहातील गिरीशबाबूंवर प्रेम करणारे नागपूरकर साक्षीला होते. सर्वांत उत्तम भाषण झाले ते नितीन गडकरी यांचे. नितीन गडकरी हा राजकीय माणूस नाही. पक्षीय तर अजिबात नाही. हा विधायक माणूस आहे. विकासपुरुष आहे. राजकारण एका हद्दीपर्यंत करावे. समाजकारण जास्त करावे. विरोधकांना शत्रू न मानता मित्र मानून काम करावे, या संस्काराचे गडकरी आहेत. महाराष्ट्रात मंत्री होते. विधान परिषदेत विरोधी पक्षेनेते होते. केंद्रात सगळ्यात प्रभावी मंत्री आहेत. भाजपाचे अध्यक्ष होते. त्यांना कसे दूर केले, हे सगळ्या देशाला माहिती आहे.

त्यांच्याच अध्यक्षतेखाली गिरीशबाबूंची सत्कार समिती स्थापन झाली. भाषणात त्यांनी एक प्रभावी मुद्दा मांडला. समाजकारण, राजकारण याची भेसळ होऊन आज ‘सत्ताकारण’ प्रभावी ठरलेले आहे. अशा सत्ताकारणात किती दिवस राहावे, असा विचार त्यांनी बोलून दाखवला. आजची सत्तेची स्पर्धा किळसवाणी आहे. विरोधकांना संपवण्यासाठी योजले जाणारे उपाय हुकूमशाही देशातही न शोभणारे आहेत. इथली लोकशाही निवडणुकीपुरती आहे. विरोधक हतबल आहेत. बहुसंख्य वाहिन्यांवर एकाच विचाराचा प्रभाव आहे. वाहिन्यांचा टी. आर. पी. त्यामुळेच आहे. अशावेळी सुसंस्कृत, सभ्य समाजकारण करणा-यांना या सत्ताकारणाचा उबग येणे अगदी स्वाभाविक आहे. गडकरी यांनी त्याच हताश भावनेने ‘या सत्ताकारणात रहावे का?’ असा प्रश्न विचारला… पण, त्यांना हे सांगणे आहे की, नितीनभाऊ, ‘तुम्ही असा विचार मनात आणूच नका…. तुमच्यासारखे लोक जर बाजूला झाले तर, आजच्या राजकारणातील धटिंगणांना रान मोकळे मिळेल….तुमच्यासारखे सुसंस्कृत, सभ्य राजकारणी भाजपामध्ये असलेच पाहिजेत तरच काही आशा आहे. तुम्ही वाजपेयी परंपरेतील आहात.’ ‘राजधर्म का पालन करो’, असे मोदींना वाजपेयींनी त्यावेळी खडसावून सांगितले होते. त्या वाजपेयींची परंपरा ही लोकशाही परंपरा आहे.

तुम्ही त्याचे वाहक आहात. महाराष्ट्रात तरी पूर्वीचा जनसंघ किंवा नंतरचा भाजपा आज राहिलेला नाही. अशावेळी तर तुमची जास्त गरज आहे. त्यामुळे तुम्ही सत्कारसभेत जो विचार मांडलात तो विचार मनातून काढून टाका. तुमच्यासारख्या नेत्याची देशाला गरज आहे. आजची देशातील वाहतुकीची सगळ्यात उत्तम व्यवस्था तुमच्या अथक प्रयत्नाने झालेली आहे. विकासकामात तुम्ही राजकारण कधी आणले नाही. कोणाला संपवण्याची भाषा केली नाहीत. सभ्य, सुसंस्कृत राजकारण कसे करावे, याचे जे या महाराष्ट्रात आदर्श आहेत, त्यात तुम्ही आहात. राजकीय मतभेद असतील आणि आहेतही. पण, त्याच्या मर्यादा जाणणारे तुम्ही आहात. म्हणूनच मोकळेपणाने गिरीशबाबूंच्या सत्कारात तुम्ही बोलू शकता. हे नितळपण हाच खरा महाराष्ट्र आहे. सत्ता येईल आणि जाईल…. पदे येतील आणि जातील पण माणुसकीचे नाते सर्वश्रेष्ठ आहे. ते ज्या दिवशी संपेल, त्या दिवशी या देशाच्या अध:पतनाला सुरुवात होईल. तुम्ही समाजकारणात रहा, राजकारणात रहा, सत्ताकारणातही रहा…. आणि गिरीशबाबूंना बरोबर ठेवा… अशा सगळ्या चांगल्या संस्कारांचे नेतेच देशातील आजचे घाणेरडे वातावरण बदलू शकतील. गिरीशबाबूंच्या सत्कारातून हाच संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे.

-मधुकर भावे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या