31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeविशेषनितीशकुमारांची घुसमट !

नितीशकुमारांची घुसमट !

एकमत ऑनलाईन

भारतीय राजकारणात राष्ट्रीय पक्षांकडून राज्यातील प्रश्नांना, अस्मितांना पुरेसा न्याय दिला जात नसल्याचे लक्षात आल्याने प्रादेशिक पक्षांची संख्या वाढत गेली. साहजिकच यामुळे मतविभागणी होत गेल्याने एकाच पक्षाला पूर्ण बहुमत मिळण्याचे दिवस सरले. कालौघात यातील काही प्रादेशिक पक्षांनी त्या-त्या राज्यात आपली पकड मजबूत केली. मात्र २०१४ च्या मोदीलाटेनंतर या प्रादेशिक पक्षांचा आधार कमी होत गेला. बिहारमध्ये भारतीय जनता पक्ष, जनता दल (संयुक्त) आणि लोकजनशक्ती पार्टी या राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर सध्या अस्थिरतेचे, संकटाचे ढग जमा होऊ लागले आहेत. तिस-या क्रमाकांवरचा घटकपक्ष लोजप हा या आघाडीत आहे की नाही, हे देखील कोणी ठामपणे सांगू शकत नाही. भाजपच्या चष्म्यातून पाहिले तर लोजप हा आघाडीत दिसतो. परंतु जेडीयूकडून पाहिल्यास लोजपचे नामोनिशाण दिसत नाही. विधानसभा निवडणुकत लोजपने जेडीयूच्या सर्व उमेदवारांविरोधात उमेदवार उभे करुन बिहारचे राजकारण तापवले. ११५ जागा लढल्यानंतर जेडीयूच्या पदरात केवळ ४३ जागा पडल्या. त्याचवेळी भाजपविरुद्ध लोजपने एकही उमेदवार दिला नाही. मात्र त्यास ७४ जागा मिळाल्या.

पराभवाचे कारण कोणतेही असो, परंतु आपल्या पराभवाला लोजपच जबाबदार आहे, असे जेडीयूकडून सांगण्यात येत आहे. जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. त्यागी यांनी देखील चिराग पासवान यांनाच पक्षाच्या पराभवासांठी दोषी ठरवले आहे. सध्यातरी चिराग पासवान यांचा पक्ष समाधानी आहे. कारण त्याने जेडीयूची शक्ती चांगलीच ओळखली आहे. भाजपशी निगडीत एका मंत्र्याने काही काळापूर्वी चिरागला आपल्या पक्षाच्या जुन्या संबंधांचा हवाला दिला होता. म्हणूनच चिराग हे स्वतला पंतप्रधान मोदी यांचे हनुमान मानतात. भाजपसाठी बिहारमध्ये सध्या चांदीच चांदी आहे. लोजपचे संस्थापक रामविलास पासवान यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर लोजपाचा उमेदवार असणे अपेक्षित होते. परंतु जेडीयूची भीती दाखवत भाजपने लोजपला झटकले आणि तेथे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना निवडून आणले. यावरुन अनेकांना दोन मांजर आणि माकडाची गोष्ट आठवल्यास नवल नाही.

मुख्यमंत्री नितीशकुमार हे कायद्याने राज्याचे पालक आहेत, मात्र सध्याची स्थिती पाहता त्यांनी आपली पत गमावली आहे, असे दिसते. सरकारकडून राज्याचा गाडा हाकलला जात आहे, मात्र त्यापेक्षा अधिक काहीच घडत नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार रेंगाळला आहे. कॅबिनेटने काही निर्णय घेतले असले तरी ते केवळ निवडणूक काळातील घोषणा वाटत आहेत. बिहारची राजकीय अस्थिरता पाहून राजकीय वर्तुळात मुदतपूर्व निवडणुकीची चर्चा देखील होऊ लागली आहे. विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांनीही पक्षाच्या बैठकत कोणत्याही क्षणी निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली आहे. विशेष म्हणजे नितीशकुमार हे कधीही सार्वजनिकरित्या अशा प्रकारे कधीही खिन्न मनाने वावरले नाहीत. ते अत्यंत संयमी आणि समतोल राजकारणी मानले जातात. परंतु आता ते आपल्याला जबरदस्तीने मुख्यमंत्री केल्याचे वारंवार म्हणत आहेत. या पदावर विराजमान होण्याची त्यांची इच्छा नव्हती, या मतावर कोणीही विश्वास ठेऊ शकतो. कारण अशा बिकट राजकीय स्थितीत त्यांनी मुख्यमंत्रीपदावर बसणे हे त्यांच्या स्वभावाविरोधात आहे आणि ही बाब त्यांना ओळखणारे जाणून आहेत. सध्या राज्यकारभार करताना नितीशकुमार यांच्यासमोर येणा-या अडचणींचा सर्वांनाच अंदाज आहे. त्यांच्या वेदना सर्वांना समजत आहेत. एखादी ताकद जेव्हा जबरदस्तीने तुम्हाला पदावर बसवत असेल तर ती शक्ती तुमच्याकडून कोणतेही काम करुन घेऊ शकते. ही राजकारणातील दहशतच म्हणावी लागेल.

परदेशातून अन्य राज्यांमार्गे येणाऱ्या प्रवाशांचे तेथेच विलगीकरण करा !

राजकीय पेचात अडकलेल्या नीतिशकुमार यांच्या वक्तव्याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. मग राज्यातील नेते असोत किंवा त्यांच्याच पक्षातीलच नेते. अशा हतबल मुख्यमंत्र्यांकडून बिहारची जनता कोणती अपेक्षा कशी ठेऊ शकते? वास्तविक अशा प्रकारच्या गोष्टीची वाच्यता केवळ नितीशकुमारच करु शकतील. सध्याची त्यांची परिस्थिती पाहून ते आपल्या राजकीय कारर्किदीतील सर्वात वाईट काळातून जात आहेत, याचे आकलन होते. नितीशकुमार यांचे वजन त्यांच्याच पक्षात कमी झालेले असावे, असा राजकीय तर्क लावला जात आहे. ते मुख्यमंत्री असण्याबरोबरच पक्षाचे नेते देखील आहेत. त्यांचा कार्यकाल आणखी दोन वर्षे बाकी होता. ते या पदावर पुन्हा येण्यासाठी उत्सुक होते. कारण ते आपले आदरणीय साथीदार आणि नेते शरद यादव यांना बाजूला करून तेथे मोठ्या उत्साहाने बसले होते. पण मनातील राजकीय खदखद त्यांना स्वस्थ बसू देत नसावी.

परिणामी, त्यांनी जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला. जेडीयूचे नवे अध्यक्ष म्हणून राज्यसभेचे खासदार रामचंद्र प्रसाद सिन्हा ऊर्फ आरसीपी सिन्हा यांच्या नावाचा प्रस्ताव देखील त्यांनी मांडला. जेडीयूतील या सर्व घडामोडी या भाजपच्या सूचनेनुसार होत असल्याचे सांगितले जात आहे. यावर फार विश्वास बसत नसला तरी यात थोडेफार सत्य असू शकते. याचा अर्थ जेडीयू हे भाजपच्या हातचे बाहुले बनू लागले आहे, असा निघत आहे. यावर विश्वास ठेवण्यामागे काही कारणे देखील दिसत आहेत. यासाठी आपल्याला दोन वर्षापूर्वीचे नितीशकुमार यांचे वक्तव्य आठवावे लागेल. तेव्हा ते म्हणाले होते की, तत्कालिन भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार प्रशांत किशोर यांना जेडीयूच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नेमले. म्हणजेच जेडीयू हे भाजपच्या इशा-यावर महत्त्वाचे राजकीय निर्णय घेत असल्याचे लक्षात येते. याचाच अर्थ नवीन अध्यक्ष देखील अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार निवडला आहे की काय, अशी शंका उपस्थित होते.

जेडीयूच्या नव्या अध्यक्षांची नेमणूक ज्याप्रकारे झाली आहे, त्याकडेही लक्ष द्यायला हवे. २००४ मध्ये सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकाण्यास नकार दिला होता, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला होता. त्यांना कसे तरी समजावण्यात आले. मात्र नीतिशकुमार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा काहीही खळबळ उडाली नाही. ही बाब सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी आहे. अलिकडेच बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अटलबिहारी वाजपेयी, अरुण जेटली यांचे जन्मदिन साजरे झाले. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. जेडीयूने यापूर्वी कधीही लोहिया, पक्षाचे संस्थापक जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्मदिन अशा प्रकारे साजरा केला नाही. केले असले तरी त्याची माहिती कोणालाच नाही.

या सर्व परिस्थितीचा अर्थ वेगळी राजकीय समीकरणे सांगतात. स्वत:ला समाजवादी म्हणवून घेणा-या पक्षाची अशा प्रकारे उतरंड होईल काय?, असा प्रश्न पडतो. अर्थात नितीशकुमार भाजपमध्ये पूर्णपणे मिसळतील, असे कोणालाही वाटले नव्हते. परंतु सध्यातरी नितीशकुमार यांची राजकीय कोंडी होत आहे. अशा प्रकारची घुसमट किंवा कोंडी सहन करणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग नाही. म्हणूनच बंगालची निवडणूक होईपर्यंत बिहारचा गाडा असाच चालू राहिल, अशी शक्यता आहे. मात्र त्यानंतर बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो आणि त्याचा विपरित परिणाम एनडीएवर होईल. ‘मोठ्या भावा’च्या नावाखाली भाजप वेगळेच राजकारण करत आहे. एकाएका पक्षाला भाजपमध्ये घ्यायचे किंवा त्याचे समूळ उच्चाटन करायचे, अशी रणनिती दिसते. मात्र भविष्यात भाजपमध्ये कोण विलिन होईल आणि कोण इतिहासजमा होईल, याचा अंदाज आताच बांधणे कठिण आहे

अभिमन्यू सरनाईक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या