25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeविशेषअब की बार...?

अब की बार…?

एकमत ऑनलाईन

प्रचंड दोलायमानता असूनही अडथळ्यांची शर्यत पार करत सरत्या आठवड्यात भारतीय शेअर बाजाराने चढती कमान कायम राखण्यात यश मिळवले. जागतिक बाजारात घसरणीचे सत्र सुरू असूनही एफआयआयकडून होणा-या खरेदीमुळे आणि कच्च्या तेलातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांतील उत्साह कमालीचा वाढला आहे. शुक्रवारी अमेरिकन बाजारातही जोरदार तेजी दिसून आली आहे. त्यामुळे चालू आठवड्यात निफ्टी १८ हजारांचा टप्पा पार करण्याची दाट शक्यता आहे. तथापि, या आठवड्यात जाहीर होणारी महागाईची आकडेवारी बाजारासाठी अडथळा ठरू शकते. परंतु कोणत्याही घसरणीच्या काळात खरेदीची संधी साधायला हवी. यासाठी सिमेंट, ऑटो, बँकिंग, आयटी क्षेत्रातील समभागांची खरेदी करा.

मजल-दरमजल करत भारतीय शेअर बाजार आता नव्या उच्चांकाच्या दिशेने सरकताना स्पष्टपणाने दिसू लागला आहे. जागतिक पातळीवर विशेषत: अमेरिका-युरोपियन शेअर बाजारांमधील घसरणीमुळे भारतीय शेअर बाजारात चढ-उतार होत असले आणि दोलायमानता वाढत असली तरी गुंतवणूकदारांचा वाढता उत्साह हा आगामी तेजीचे स्पष्ट संकेत देणारा आहे. सरत्या आठवड्यात याचा प्रत्यय आला आहे. गतसप्ताहाची सुरुवात एसजीएक्स निफ्टीमधील भरीव घसरणीने होऊनही भारतीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक १७,४५० च्या पातळीखाली गेला नाही आणि १७६५०ची पातळी ओलांडल्यानंतर या तेजीला बळकटी आली. शुक्रवारी सप्ताहसमाप्तीच्या दिवशी १७,९२५ पर्यंत पोहोचल्यानंतर काहीशी नफावसुली दिसून आली असली तरी भारतीय बाजार अत्यंत भक्कम स्थितीत आहे. या तेजीला विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची लाभलेली साथ अद्यापही कायम आहे. शुक्रवारी एफआयआयकडू २१३२ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी करण्यात आली आहे. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १०४.९२ अंकांनी वधारून ५९,७९३ वर बंद झाला; तर निफ्टी दिवसाखेरीस ३४.६० अंकांची वृद्धी कायम राखत १७,८३३.३५ वर विसावला आहे. बाजारातील तेजीचा मुख्य निदर्शक असलेल्या बँक निफ्टीने शुक्रवारी ४०६८५ ची पातळी गाठली होती. दिवसाखेरीस २०६.७५ अंकांची वृद्धी कायम राखत ४०४१६.७० या अंकपातळीवर तो बंद झाला. या तेजीला हातभार लावणारा आणखी एक मुख्य घटक म्हणजे कच्चे तेल. जानेवारी २०२२ नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ९० डॉलरच्या खाली आल्या आहेत. या तेजीमध्ये निफ्टी, आयटी, बँक आणि ऑटोमोबाईल, सिमेंट क्षेत्रातील कंपन्यांमध्ये भरपूर तेजी पहायला मिळत आहे.

शुक्रवारी अमेरिकन बाजारामध्येही गेल्या ८ दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला लगाम लागल्याचे दिसून आले. डाऊ फ्युचर्स तब्बल ३६९ अंकांनी वधारला आहे; तर नॅसडॅक फ्युचर्स २६८.६ अंकांनी वधारला आहे. विशेष म्हणजे फेडरल रिझर्व्हच्या पॉवेल यांच्याकडून आगामी काळात व्याजदरवाढीबाबतचा ठामपणा व्यक्त होऊनही बाजाराने याला सकारात्मक कौल दिला आहे. कारण पॉवेल यांनी मंदीच्या शक्यता धुडकावून लावल्या आहेत. एसजीएक्स निफ्टीही शुक्रवारी १७८७० च्या पातळीवर बंद झाला आहे. देशातील प्रत्यक्ष करसंकलनाची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली असून गतवर्षीच्या याच काळातील आकड्यांपेक्षा ती ३५ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चालू आठवड्याची सुरुवात दमदार तेजीने होण्याच्या शक्यता आहेत. आता प्रश्न उरतो तो या आठवड्यातील रणनीतीचा. वास्तविक पाहता गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार १७५०० ते १७९०० या एका रेंजमध्ये अडकला आहे. टेक्निकल चार्टनुसार निफ्टीला असणारा सपोर्ट वर सरकून १७६५० पर्यंत आला आहे. त्याच वेळी १८ हजारांच्या पातळीवर पोहोचल्यास नफावसुली येण्याचीही दाट शक्यता आहे.

अर्थातच या घसरणीमुळे चिंता करण्याची जराही गरज नसून उलटपक्षी ती संधी मानून खरेदीची रणनीती अवलंबावी. अर्थातच यासाठीचा दृष्टिकोन मध्यमकालीन किंवा दीर्घकालीन ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा की, जागतिक पातळीवर महागाई, मंदी आणि अन्य कारणांमुळे कितीही चिंतेची बाब असली तरी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत संपूर्ण जग आज आश्वासक बनले आहे. जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनल्यानंतर गुंतवणूकदारांचा उत्साहही वाढला आहे. ऑगस्टअखेरीस भारतातील डिमॅट खात्यांच्या एकत्रित संख्येने प्रथमच १० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. मान्सूनची दमदार हजेरी, खरिपाची पेरणी आणि आगामी उत्सवाचा काळ यामुळे नजीकच्या काळात निफ्टी उच्चांक प्रस्थापित करण्याची शक्यता आहे. गेल्या तीन-चार आठवड्यांचा विचार करता अमेरिकेतील डाऊ, नॅसडॅक, डॅक्स यांमध्ये तीव्र घसरण होऊनही निफ्टी १७००० च्या खाली गेलेला नाही. दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून मोठी घसरण झालेल्या अनेक समभागांमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. विशेषत: वित्तपुरवठा करणा-या बँकिंगसह अन्य क्षेत्रातील तेजी ही बाजारातील भक्कमपणा दर्शवणारी आहे. त्यामुळे ‘बाय ऑन डिप्स’ या रणनीतीनुसार चालू आठवड्यात रणनीती ठरवा.

समभागांचा विचार करता प्रामुख्याने देशांतर्गत मागणीवर अवलंबून असणा-या क्षेत्रांची निवड अधिक लाभदायक ठरेल. उदाहरणार्थ, कच्च्या तेलातील घसरणीचा फायदा सिमेंट क्षेत्रातील कंपन्यांना होणार आहे. गतसप्ताहात सिमेंट कंपन्यांच्या समभागात १० ते १५ टक्क्यांची तेजी दिसून आली. हे क्षेत्र पूर्णत: स्थानिक मागणीवर अवलंबून आहे. देशातील पायाभूत सुविधांचा विकास आणि रिअल इस्टेटमधील तेजीचा विचार करता या क्षेत्रातील एसीसी, अम्बुजा, श्री सिमेंट यांसह अन्य कंपन्यांच्या समभागांत खरेदी करता येईल. बँकिंग क्षेत्रातील आरबीएल बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, कॅनरा बँक, फेडरल बँक, बँक ऑफ बडोदा या समभागांची खरेदी दमदार नफा मिळवून देईल. जानेवारी महिन्यापासून घसरणीकडे कौल दर्शवणा-या आयटी क्षेत्रात सध्या तेजी दिसून येत आहे. शुक्रवारच्या सत्रात आयटी क्षेत्राच्या निर्देशांकात २.२१ टक्क्यांनी वाढ झाली. हे लक्षात घेता टीसीएस, इन्फोसिस, कोफोर्ज, एचसीएल टेक, टेक महिंद्रा आणि विप्रो या समभागांची खरेदी करता येईल. अदानी समूहावरील कर्जावरून मध्यंतरी संशयाचे धुके पसरले होते. परंतु याबाबतचे दावे खोडून काढत अदानी समूहाने गेल्या काही वर्षांत कजर्फड किती जोरदारपणे केली आहे याची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या आठवड्यात अदानी समूहाच्या सर्वच समभागांत तेजी दिसून येऊ शकते. याखेरीज भारत फोर्जचा समभाग ७८० रुपयांना खरेदी करून ८२० रुपये लक्ष्य ठेवता येईल. धातूक्षेत्रातील समभागांमध्ये पुन्हा खरेदीदारांचा कौल वाढत आहे.

-संदीप पाटील
शेअर बाजार अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या