23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeविशेषआता यांच्या नावाचे पुरस्कार कोणाला द्यायचे हो...!

आता यांच्या नावाचे पुरस्कार कोणाला द्यायचे हो…!

एकमत ऑनलाईन

१३ अॉगस्ट २०२२ आचार्य अत्रे यांची १२४वी जयंती. १३ अॉगस्ट १८९८ चा त्यांचा जन्म. १३ ऑगस्ट १९९८ ला जन्मशताब्दी वर्ष साजरे करताना वरळीच्या चौकात आचार्य अत्रे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभा राहिला. त्याचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. त्यावेळचे सांस्कृतिक कार्य मंत्री प्रमोद नवलकर यांच्या पुढाकाराने हा पुतळा उभा राहिला. बाळासाहेब ठाकरे, त्यांची शिवसेना आणि आचार्य अत्रे यांच्यात उभा वाद होता. शिवसेना निर्माण करावी, हा आग्रह अत्रेसाहेबांचाच होता. संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू असतानाच १९५९ साली दैनिक ‘मराठा’चे मुख्य शीर्षक ‘महाराष्ट्रात शिवसेना उभारा’ हे अत्रेसाहेबांच्या लेखणीतून उतरलेले होते. अग्रलेखही त्यांनीच लिहिला होता. पुढे १ मे रोजी संयुक्त महाराष्ट्र झाला.

१३ अॉगस्ट १९६० ला म्हणजे अत्रेसाहेबांच्या वाढदिवसा दिवशी ‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले. असे ठाकरे आणि अत्रे कुटुंबीयांचे संबंध. पण हे संबंध पुढे बिघडले. अत्रेसाहेब १९६७च्या लोकसभा निवडणुकीत मध्य-मुंबई लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना प्रखर विरोध केला. ६००० मतांनी अत्रेसाहेब पडले. शिवसेनेने पाठिंबा दिला असता तर अत्रेसाहेब खासदार झाले असते. पण ते होणे नव्हते. साहेबांना दिल्लीतून ‘व्हाईस ऑफ महाराष्ट्र’ हे इंग्रजी दैनिक काढायचे होते. पण ते ही होणे नव्हते. बिघडलेले संबंध साहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायमच होते. पण नंतर बाळासाहेबांना आतून कुठेतरी वाटत राहिले की, एवढे ताणायला नको होते. १९८५ साली युतीचे सरकार आले. प्रमोद नवलकर हा उमदा माणूस, मुळातला पत्रकार, ‘भटक्याची भ्रमंती’ हे सदर त्यांनी गाजवलेले. त्यांनी पुढाकार घेतला आणि अत्रेसाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहिला. आज वरळीच्या नाक्यावर हा पुतळा उभा आहे. मेट्रोचे जाळे मुंबईत पसरले तेव्हा वरळीवरून जाणा-या मेट्रोसाठी हा पुतळा हलवायचे ठरवले होते. परंतु त्यावेळच्या मेट्रोप्रमुख अश्विनी भावे यांनी मार्ग काढला… पुतळ्याच्या बाजूने मेट्रोचा मार्ग गेला. आणि वरळीच्या मेट्रो स्टेशनला ‘आचार्य अत्रे स्टेशन’ असे नावही दिले गेले. आता ही मेट्रो जेव्हा सुरू होईल तेव्हा ती रिकामी धाओ किंवा भरलेली..

१३ जून १९६९ ला अत्रेसाहेब गेले. मला त्यांच्या सहवासात तब्बल एक तप राहता आले. त्यांच्यासोबत वावरता आले, प्रवास करता आला. त्यांच्या ३०० सभा कव्हर करता आल्या. मिडास राजाच्या स्पर्शाने हात लावील त्याचं सोनं होत होतं…. असे सांगितले जाते… ते बघायला कोणी गेलेले नाही. पण, अत्रेसाहेबांच्या स्पर्शाने एका २० वर्षांच्या तरुणाच्या आयुष्याचे सोने झाले, हे मी सांगू शकतो. साहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत होतो. अगदी रुग्णालयातसुद्धा… साहेबांच्या जाण्यानंतर शिरीषताई पै आणि व्यंकटेश पै यांनी हिमतीने सहा वर्षे ‘मराठा’ त्याच ताकदीने चालवला. पण कुणाचीतरी दृष्ट लागली. कामगारांचा संप घडवला गेला… खोटे मृत्युपत्र झाले… कोर्ट-कचे-या झाल्या आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती करणारा एक प्रचंड वणवा शांत झाला.

१९७१-७२ पासून
आचार्य अत्रे फाऊंडेशनतर्फे ‘साहित्यसम्राट आचार्य अत्रे पुरस्कार’ सुरू करण्यात आला. अत्रेसाहेब कवी होते… विडंबन कवी होते. नाटककार होते…चित्रपटनिर्माते होते… पत्रकार होते… वक्ते होते… नेते होते… आमदार होते… काय नव्हते? एका आचार्य अत्रे यांच्यामध्ये १० अत्रे दडलेले होते. सगळ्या विषयांत त्यांचा प्रचंड आवाका होता. प्रस्तावनाकार म्हणून ते थक्क करणारे होते. कवी बी. यांच्या (मुरलीधर गुप्ते) ‘फुलांची ओंजळ’ या काव्यसंग्रहात जेमतेम ६० कविता आहेत. गाजलेली आणि लताबाईंनी गायिलेली ‘चाफा बोलेना’ ही त्यातलीच कविता. या काव्यसंग्रहाला अत्रेसाहेबांची ७६ पानांची प्रस्तावना आहे. अमर शेख यांच्या ‘कलश’ काव्यसंग्रहाला ३० पानांची प्रस्तावना आहे. तर असे हे अत्रेसाहेब यांच्या नावाचा पुरस्कार द्यायचा… ज्याला पुरस्कार द्यायचा तशा तोडीचा माणूस शोधताना दमछाक व्हायला लागली. नवीन पिढीला माहिती नाही…. मराठी चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक एकदाच मिळाले. आणि ते अत्रेसाहेबांनी निर्मिती केलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाला. त्यावेळचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी सुवर्णपदक अत्रेसाहेबांच्या गळ्यात घातले आणि इकडे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये शिरीषताईंनी पुत्ररत्नाला जन्म दिला. गळ्यात घातलेले पदक घेऊन अत्रेसाहेब दिल्लीहून मुंबईला आले. विमानतळावरून थेट हॉस्पिटलला गेले. छोट्या बाळाच्या गळ्यात राष्ट्रपतींचे ते पदक घातले आणि बारसे होण्यापूर्वीच त्याचे नाव ठेवले… ‘राजेंद्रप्रसाद’ तेच आजचे अ‍ॅड. राजेंद्र पै.

‘जैन इरिगेशन’चे अध्यक्ष अशोकबाबू जैन यांच्या हस्ते महानोर यांना सन्मानित केले जाईल. आमदार शिरीष मधुकरराव चौधरी प्रमुख पाहुणे आहेत. महानोर खरा रानातला कवी. त्यांचा ‘वही’ हा कवितासंग्रह वाचून यशवंतराव चव्हाणांनी त्यांना विधान परिषदेत आमदार केले. पण, महानोर आमदार झाल्याने मोठे नाहीत. हा कष्टकरी शेतकरी आहे. डोंगरातले झरे आडवून या शेतक-याने टाक्या बांधल्या आणि आपल्या शेतीला मे महिन्याच्या अखेरपर्यंतचे पाणी मिळवले. आज पळसखेडला कष्टातून त्यांनी शेती फुलवली. इकडे शब्दांतून कविता फुलवली.
या नभाने या भुईला दान द्यावे
आणि मातीतून या गीत गावे
कोणती पुण्ये येती फळाला….
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे.
असा हा आगळावेगळा कवी. शेतात राहणारा… कवितेत रमणारा… साधा पायजमा आणि शर्ट हा वेश कधी बदलला नाही. कवितेसाठी शब्दाला कधी आडला नाही आणि निसर्गाला कधी विसरला नाही.

यावर्षी अत्रेसाहेबांचा पुरस्कार द्यायला महानोर यांच्यासारखा एक मोठा कवी आहे. पुढच्या वर्षीचा पुरस्कार कोणाला द्यायचा हे आतापासून माणूस शोधायचा म्हटलं तरी त्या ताकदीचा माणूस समोर येत नाही. मोठ्या मनाची माणसं गेली… मोठ्या कर्तृत्वाची माणसं गेली… मोठ्या नेतृत्वाची माणसं गेली… माणसं उंचीने खुजी झाली.. कामाने लहान झाली… मनाने तर खूपच लहान झाली. समंजस, सुसंस्कृत महाराष्ट्र आज धटिंगण होत चालला आहे. अत्रेसाहेब नाहीत, या दु:खापेक्षाही याचेच भय जास्त आहे. या उंचीच्या माणसाचे पुरस्कार द्यायला तेवढ्या उंचीची माणसं आहेत कुठे? आज देशात गांधी आहेत… पण महात्मा नाहीत…. नेहरू आहेत पण जवाहर नाहीत…. आझाद आहेत… पण मौलाना नाहीत… नायडू आहेत… पण, सरोजिनी नाहीत…. पटेल आहेत… पण सरदार नाहीत…. चव्हाण भरपूर आहेत… पण यशवंतराव नाहीत… अत्रे आडनावाचेही आहेत… पण आचार्य नाहीत…. काय करायचे… ? यावर्षी महानोर यांच्या उंचीचा माणूस मिळाला. पुढच्या वर्षी कोण? आतापासूनच शोधाशोध करायला हवी!

-मधुकर भावे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या