अलीकडच्या काही दशकांचा विचार केला तर आपली भारतीय जीवनशैली झपाट्याने बदलताना दिसतेय. चटपटीत, चमचमीत आणि फास्टफूड अशा खाण्याच्या बदलत्या सवयींचा मोठा दुष्परिणाम हा मानवी आरोग्यावर होताना दिसतोय. जंकफूड आणि फास्टफूड अशा चुकीच्या आहारामुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे अगदी छोट्यांपासून ते जेष्ठांपर्यंत लठ्ठपणा हा आजार वाढताना दिसतोय . लठ्ठपणा म्हणजे केवळ वजन वाढणे इतकाच मर्यादित अर्थ नसून वाढत्या वजनामुळेच हृदयविकार, मधुमेह, लैंगिक अक्षमता वाढणे, फुफुसाचे विकार, किडनीचे आजार अशा प्रकारचे विविध स्वरूपाचे शारीरिक दुष्परिणाम देखील उद्भवतात. हा लठ्ठपणा आजार म्हणजे नक्की काय? आणि लठ्ठपणा टाळण्यासाठी उपाय काय? लठ्ठपणा कायमचा घालवून विविध शारीरिक आजारांपासून मुक्ती मिळवायची असेल तर आधुनिक उपचार पद्धती नेमक्या कोणत्या आहेत? या संदर्भात जे. टी. फाउंडेशनच्या संचालिका आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या लठ्ठपणाच्या विरुद्ध सुरु असलेल्या अभियानाच्या मार्गदर्शिका आणि भारतातील पहिल्या महिला बेरियाट्रिक सर्जन डॉ. जयश्री तोडकर यांच्याशी केलेली बातचीत .
लठ्ठपणा किंवा स्थूलत्व म्हणजे आजार आहे का ?
होय वैद्यकीय शास्त्राच्या संशोधनानुसार लठ्ठपणा किंवा स्थूलत्व हा नक्कीच एक आजार मानला गेला आहे. पूर्वीच्या काळी लठ्ठपणा म्हणजे केवळ सौंदर्याशी संबंधित गोष्ट होती. परंतु बदलत्या भारतीय जीवनशैलीमुळे विशेषत: खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि प्रकार आणि व्यायामाचा अभाव यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण वाढत जाते आणि शारीरिक संस्थेची कार्यप्रणाली बिघडते. चयापचय क्रिया देखील बदलते. त्याचाच दुष्परिणाम म्हणजे हृदयविकार, मधुमेह, शरीरातील हार्मोन्समध्ये चुकीचे बदल घडणे, लैंगिक क्षमता कमी होणे, फुफुसाचे विकार बळावतात. लठ्ठपणाचा हा आजार मानसिक तणाव देखील निर्माण करतो त्यामुळे लठ्ठपणावर आपल्या तज्ज्ञ डॉक्टारांकरवी वेळीच उपचार करण गरजेचं आहे .
वाढत्या शारीरिक वजनाचे शारीरिक दुष्परिणाम कोणते?
माणसाचे म्हणजे स्त्री किंवा पुरुषाचे वजन हे त्याच्या उंचीनुसार अवलंबून असत. मात्र हे शारीरिक वजन हे खूप फसवे असते अगदी वेगाने ते वाढते आणि त्यानंतर प्री डायबिटिक त्रास सुरु होतो. थायरॉइडच्या ग्रंथी देखील काम करेनाशा होतात . शरीरातील मेटाबॉयलिझम कमी होतो. व्यक्ती जसजशी जाड होत जाते तसं तसं शरीरातील इन्सुलिन कमी होत जात. परिणामत: अधिक भूक लागणं,सतत तहान लागणं, एकदा जेवल्यानंतर देखील पुन्हा खाण्याची इच्छा होणं असे विकार बळावू लागतात अनेकदा मानेभोवती आणि जांघेत व काखेत काळपटपणा येतो,चामखीळ येतात ही सगळी प्री डायबिटिकची लक्षणं असतात.
याशिवाय हृदयविकार, किडन्याचे विकार, रक्तवाहिन्या जाडसर होणे आणि शरीरातील हार्मोन्सची लेव्हल कमी झाल्यामुळे वीर्यातील शुक्राणूंची संख्या कमी कमी होत जाणे असे अनेक दुष्परिणाम वाढत्या वजनामुळे शरीरावर होऊ लागतात . सर्वसाधारण व्यक्तीचे वजन हे किती असावे? वजन हे वयानुसार वाढत जातं. सर्वसाधारण मनुष्याची उंची ही १५० ते १६० सेंटीमीटर असते. अर्थात या उंचीमधून १०० वजा केले की जी संख्या उरते ते आपले वजन असायला हवे. वैद्यकीय शास्त्रानुसार अतिरिक्त वजन म्हणजे मनुष्य शरीरावर ओझे बाळगत असतो. मात्र त्यामुळेच अनेक प्रकारचे शारीरिक दुष्परिणाम उद्भवू लागतात. आपला बॉडी मास इंडेक्स हा ३० पर्यंत असेल आणि अशा व्यक्तीचे वजन वाढले असेल तर योग्य पद्धतीने व्यायाम करून आणि योग्य तो आहार घेऊन हे वाढते वजन नियंत्रित ठेवता येते. मात्र बॉडी मास इंडेक्स हा ३० च्या पुढे असेल तर शस्त्रक्रिया करून चरबी कमी करून वजन कमी करता येते .
बेरियाट्रिक सर्जरी नेमकी काय आहे ?
लठ्ठपणा हा शरीरावर शस्त्रक्रिया करून चरबी कमी करून कमी करता येतो. मात्र शरीरातील मेटाबायलिझम कमी करण्यासाठी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करता येते. या शस्त्रक्रियेत जठरात जी टोपी असते त्याभागात फॅट न जळल्यामुळे अतिरिक्त चरबी वाढते ज्यामुळे हार्मोन्स बिघडतात ती चरबी काढून टाकली जाते आणि मेटाबायलिझम कमी करता येतो व पर्यायाने वजन देखील कमी होते. ज्यामुळे शरीरावरील होणारे इतर दुष्परिणाम टाळता येतात. ही सर्जरी दुर्बिणीद्वारे केली जाते आणि २ दिवसांत तो रुग्ण नेहमीच्या कामाला लागू शकतो. ही सर्जरी म्हणजेच बेरियाट्रिक सर्जरी. लठ्ठपणा टाळायचा असेल तर चमचमीत स्वरूपाचे जंक आणि फास्ट फूड खाण बंद करावं. तळलेल्या पदार्थांचा देखील आहारात समावेश टाळावा.
-संकलन-संयोजन : सुशीलकुमार
मोबा. ९६१९५ ८२८३५