Sunday, September 24, 2023

आषाढी एकादशीनिमित्त…..ते हे ब्रह्म विटेवरी

नेणो ब्रह्म मार्ग चुकले। उघडे पंढरपुरा आले।
भक्ते पुंडलिके देखिले। उभे केले विटेवरी।। ज्ञा. अ. ४५७

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ब्रह्म मार्ग चुकून पंढरीस आले की काय कोणास ठाऊक! पण आले खरे! ते उघडे आलेले ब्रह्म भक्त पुंडलिकाने ओळखले़ पुंडलिकराय हे एक महान संत होते़ त्या ब्रह्माला पाहिल्याने एकल्या पुंडलिकाचे कल्याण झाले असते़ परंतु पुंडलिकाला अज्ञान जिवांच्या कल्याणाची ओढ होती़ जगाच्या कल्याणाचीच वेळ आली आहे, असे पुंडलिकाला वाटले. ते ब्रह्म पुंडलिकाच्या दारात येऊन पुंडलिकाकडे प्रसन्न दृष्टीने पाहू लागले.

तया पुंडलिकासाठी । येऊनि उभे वाळवंटी।
दोन्ही कर ठेऊनि कटी। प्रसन्न दृष्टि पाहातसे।। ना.अ. १०२८

तेव्हा पुंडलिकाने विचार केला आपण याला बोलावे तर बोलल्यानंतर हे ब्रह्म निघून जाईल़ पुन्हा जगाचे कल्याण कसे होणाऱ आपण तर आई- वडिलांच्या सेवेत आहोत़ आई-वडिलांची सेवा सोडून देवाकडे जाता येईल़ तेव्हा पुंडलिकाने परमात्म्यापुढे वीट फेकली़ तेव्हा देवानी काय केले?

पुढे देखोनिया वीटे। चरण ठेविले गोमटे।।
दोन्ही हात कटावरी। ठेऊनी परमात्मा श्रीहरी।।
निळा म्हणे जगदोद्धार । करीत उभा निरंतर।। निळोबा ३२३

ब्रह्म पंढरपूरला आले पण पुंडलिकाच्या भक्तीत भुलून गेले़ वैकुंठात राहणाºया परमात्म्याला काय कमी असणाऱ हा परमात्मा काय कमी म्हणून इथे आला असेल. वैकुंठात सर्व काही आहे परंतु तिथे भजन नाही, भाव नाही़ म्हणून नामदेवराय म्हणतात ‘वैकुंठी जाऊनि काय बा करावे।’ तसेच तुकाराम महाराज म्हणतात ‘वैकुंठी तो ऐसे नाही।’ किंवा ‘नको वैकुंठीचा वास।। थोर प्रेमाचा भुकेला।। हाचि दुष्काळ तयाला।।’ नेमकी देवाला हीच वस्तू कमी पडली़ भाव, भक्ती, प्रेम पाहिजे असेल तर भक्ताच्याच ठिकाणी संताच्याच ठिकाणी मिळतो़ आता भक्ती, प्रेम पाहिजे असल्यास जिथे संत असतात तिथे जावे लागते़ मग पुंडलिकराय पंढरपूरला रहात होते, म्हणून देव पंढरपूरला आले आणि पुंडलिकाने आपल्या भक्ती-प्रेमाने देवाला भुलवून टाकले.

अनिर्वाच्य ब्रह्म निगम म्हणती।
शिणले वेवादति अठरा साही।।
ते हे पुंडलिके चोहोटा उभे केले।
भावे भुलविले पंढरीये।।
घ्यारे घ्यारे तुम्ही कैवल्याचे पीक। देतो पुंडलिक सकळ जिवा।। न. ग़ा. १०२९

वेदांती, सिद्धांती, धादांती तसेच श्रुति, शास्त्र, पुराणे यांची एकांचीही बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी चालेना़ ब्रह्म असे आहे, तसे आहे असे का नाही,तसेच का नाही़.असे म्हणून सर्व थकून गेले़ एकमेकांबरोबर वाद घालू लागले़ परमात्मा शहाण्या लोकांचा वादाचा विषय झाला तर भक्ताचा प्रेमाचा विषय झाला़ वाद म्हटल्यानंतर द्वैत आलेच़ प्रेम म्हटल्यानंतर अद्वैत आले आणि परमात्मा तर अद्वैत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पुंडलिकाच्या भक्ती- प्रेमाने देवांना गोकुळाहून ओढून आणले.

पुंडलिकाच्या भावार्थ। गोकुळीहुनी जाला येता।
निज प्रेम भक्ती भक्ता। घ्या घ्या आता म्हणतसे।। ज्ञा. अ. १५०

त्याचप्रमाणे तुकाराम महाराज देखील म्हणतात, पुंडलिकाने बरे केले. देवाला पंढरपूरला आणले. त्यामुळे आम्हीही धन्य झालो.

धन्य पुंडलिका बहु बरे केले।
निधान आणिले पंढरिये।।
तुका म्हणे धन्य झालो।
भुमी वैकुंठ आणिले।।  तु ग़ा.
त्याचप्रमाणे निळोबाराय देखील म्हणतात,
पुंडलिके आणिला घरा। त्रैलोक्य सोयरा कुटुंबाळू।।
सोळा सहस्त्र आता पुरे। कन्या कुमरे दास वासी।।
गाई गोधनाचे वाडे। गोपाळ सवंगडे समवेत।।
निळा म्हणे वस्ती दाट। केली वैकुंठ पंढरी।। निग़ा.अ. २६४
जनाबाईसुद्धा आपल्या अभंगामध्ये म्हणते,
विटेवरी ब्रह्म दिस। साधुसंताचा रहिवास।
वेष भावाचा अंकित। जाणे दासाचे ते चित्त।। ज. अं. १६२
अनंत ब्रह्माचे निज ब्रह्म असणारा परमात्मा पंढरीच्या ठिकाणी चंद्रभागेच्या काठावर विटेवर उभा आहे़
ते हे ब्रह्म विटेवरी। उभे चंद्रभागे तिरी।।
अनंत ब्रह्माचे जे का निज ब्रह्म। ते हे परब्रह्म विटेवरी।। ना. अ.  ७१
ज्ञानेश्वर महाराज देखील असेच वर्णन करतात़
ज्ञानदेव म्हणे जोतीची निजजोत।
ते हे उभी मूर्ती विटेवरी।।

तुकाराम महाराज म्हणतात़, ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी।’ विटेवर उभा असलेल्या परमात्म्याचे वर्णन केले आहे़ देवाने आपले हात कमरेवर ठेवून विटेवर उभा आहे़ ते ध्यान, ते रूप अतिशय मोहक, सुंदर आहे. गळ्यात तुळशीचे हार, कमरेला पितांबर असलेला मला हे ध्यान अखंड आवडते. कानात मकरकुंडले तळपत आहेत आणि गळ्यात कौस्तुभमणी शोभत आहे़ त्याच्या मुखावरून कोट्यवधी चंद्र-सूर्य ओवाळून टाकावेत़ त्याच्या कपाळी कस्तुरीचा मळवट आहे़ अंगात चंदनाची उटी आहे़ असा घननीळा सावळा देव माझे सर्व सुख आहे.

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख।
पाहीन श्रीमुख आवडीने।।
आवडे हे रूप गोजिरे सगुण।
पाहता लोचन सुखावले।। तु.अ. १४

परमात्म्याचे सुंदर रूप या त्रिभुवनात एकच एक आहे़ ते विठोबारायाचे रूप जगातील सर्व मंगल मिळून मंगलदायक झाले आहे़ किंवा प्रेमाने ओतले आहे़ ते ब्रह्मरसाचे घोस ज्याला आले आहे किंवा ब्रह्मविद्येचे सार काढून त्याचे रूप बनले आहे़ सर्व शास्त्रे त्याचे वर्णन करण्यास निमग्न झाली आहेत़ असे ते परमात्म स्वरूप रखुमादेवीवर जो श्रीविठ्ठल असे नाव घेऊन मंडित झाले आहे़ म्हणजे त्याचे नाव घेऊन प्रगट झाले आहे.

कि ब्रह्मरसाचे वोतिले घोसुले।
ब्रह्मविद्येचे सार मथिले।। ज्ञा. अ.

पंढरीत उभा असलेल्या देवाचे एवढे सुंदर रूप नामदेवाला कोठेही दिसले नाही़ ते म्हणतात वैकुंठ देव आहे़ परंतु ते चतुर्भुज आ़हे़ क्षीरसागरी निद्रिस्त आहे़ द्वारकेला देवाचे पाय पाताळात आहेत़ हृदयामध्ये पाहिले तर अव्यक्त आहे़ परंतु सर्वगुण संपन्न पंढरीत विटेवर उभा आहे.

नामा म्हणे ऐसा सर्व गुण संपूर्ण।
पंढरीये उभा शोभतसे।। ना ग़ा. १०४५

तो विटेवर उभा असलेला पांडुरंग विटेवर उभा राहून काय करत आहे़ ‘वाट पाहे उभा भेटीची आवडी। कृपाळू तातडी उताविळ।। तु. अ.

तर तो उताविळ होऊन वाट पहात आहे़ देवाला वाटते माझे भक्त केव्हा येतील आणि मुक्त होतील़ एकनाथ महाराजांनी परमात्म्याचे वर्णन सगुण आणि निर्गुण रूपामध्ये केले आहे़ ‘सगुण निर्गुण मूर्ती उभे असे विटे।’ तेथे कोटी सूर्यप्रभा दाटलेली आहे़ सुंदर सगुण मूर्ती चतुर्भुज पाहिल्यानंतर पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो़ परंतु तो परमात्मा दिसायला सगुण असला तरी ‘व्यापूनी जगी तोच उरला।’ जगाला व्यापून तो उरला आहे तोच मी विटेवर पाहिला़ चतुर्भुज पितांबरधारी, गळ्यात वैजयंती माळ शोभत आहे, हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहे़ असा मदनाचा पुतळा असणारा श्री विठ्ठल मी डोळ्यांनी पाहिला़
जनाबाई म्हणते,

पाय जोडूनि विटेवरी। कर ठेऊनी कटावरी ।।
रूप सावळे सुंदर । कानी कुंडले मकराकार।।
गळा माळ वैजयंती। पुढे गोपाळ नाचती।। ज ग़ा.

निळोबारायांनी देवाचे वर्णन सगुण आणि निर्गुण रूपामध्ये केले आहे़ ते म्हणतात, देव दिसायला सगुण डोळ्याला दिसणारा आहे़ परंतु मुळात असायला कसा आहे? तर तोे चराचरामध्ये व्यापून उरला आहे़ (देव दानवादी मानव असूर। याविण उरला ऐसा नाही तृणांकुरतो।।) सगुणाच्या सेवेनेच निर्गुणाचा साक्षात्कार होत असतो़ ते ब्रह्म म्हणजे विटेवर उभा आहे़ आपल्याला सोडून काही अंतरावर आहे़ म्हणून ते हे म्हणजे जे आपल्याजवळ आहे असे, परमात्मा सर्वांच्या हृदयात अंतर्यामी आहे़ (सर्वस्व चाहं हृदयी संनिविष्ट:) गीता १५-१५. तोच विटेवर उभा आहे़ म्हणून ते ब्रह्म विटेवरी। असा अठ्ठावीस युगापासून भक्ताकरता तिष्ठत आहे.

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा।।
जयदेव जयदेव जय पांडुरंगा।
रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा।।

विठ्ठल महाराज हसेगाववाडीकर
दत्त मंदिर, प्रकाश नगर, लातूर

Read More

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या