23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeविशेषराज्यसभेच्या निमित्ताने वेगळीच जुळवाजुळव !

राज्यसभेच्या निमित्ताने वेगळीच जुळवाजुळव !

एकमत ऑनलाईन

राज्यसभा निवडणूक टाळण्याचे महाविकास आघाडीचे सगळे प्रयत्न अखेर निष्फळ ठरले आहेत. भाजपाला विधान परिषदेची एक अतिरिक्त जागा देण्याची तयारी दर्शवूनही भाजपाने आपला तिसरा उमेदवार रिंगणात कायम ठेवल्याने निवडणुकीला राज्याच्या सत्तासंघर्षाचा रंग चढला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपात संघर्ष असल्याने या दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची तर आहेच, पण महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाची आहे. सत्ता स्थापनेच्यावेळी बहुतांश अपक्ष व छोट्या पक्षांनी आघाडीला पाठबळ दिले होते. पण या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न भाजपाने सुरू केले आहेत. यात यश आले तर आणखी दहा दिवसांनी होणा-या विधान परिषद निवडणुकीत भाजप अधिक आक्रमकपणे उतरेल हे उघड आहे.

त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार उतरवून घोडेबाजार करण्यामागे राज्यातील आघाडी सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र असल्याचा संशय आघाडीच्या नेत्यांना येतो आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अपक्ष व छोट्या पक्षाच्या आमदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी भाजपाकडून साम, दाम, दंड, भेद असे सर्व मार्ग अवलंबले जात असल्याचा, केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवली जात असल्याचा आरोप केला. भाजपाची ठाम भूमिका व निवडणूक टाळण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी केलेली धावपळ बघितल्यावर ही लढत केवळ एका जागेसाठीची राहिलेली नाही हे स्पष्ट होते. या निवडणुकीत भाजपाने केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांना, राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल यांना तर शिवसेनेने संजय राऊत यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. स्वाभाविकच या दिग्गज उमेदवारांना विजयासाठी आवश्यक असणारा पूर्ण कोटा मिळणार आहे. याशिवाय भाजपाचे दुसरे उमेदवार अनिल बोंडे व काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना मतांचा पूर्ण कोटा मिळेल. यामुळे सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार व भाजपाच्या धनंजय महाडिक यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. महाविकास आघाडीला १६ मतांची तर भाजपाला २२ मतांची बाहेरून बेगमी करावी लागणार आहे.

अनेकांना १९९८ च्या राज्यसभा निवडणुकीची आठवण होतेय. त्या निवडणुकीत काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय असलेले राम प्रधान पराभूत झाले. यामुळे काँग्रेस नेतृत्व व शरद पवार यांच्यातील अंतर वाढले. त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस नेतृत्वाची अनुमती न घेता अरुण मेहता यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवून निवडून आणले गेले. अरुण मेहता यांच्या उमेदवारी अर्जावर सह्या करणा-या आमदारांना काँग्रेसने नोटिसा बजावल्या. त्यामुळे काँग्रेस नेतृत्व व पवारांमधील दुरावा आणखी वाढला. त्यातच शरद पवार यांच्याकडून विदेशी मूलत्वाचा मुद्दा उपस्थित केला गेल्याने काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली व काँग्रेसची शकले होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. यावेळी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्याने पक्षात काही प्रमाणात नाराजी आहे. या नाराजीचा फायदा घेऊन संजय पवार यांच्याऐवजी काँग्रेसची जागा अडचणीत आणण्याची खेळी भाजपा करेल व त्याचे परिणाम आघाडीवर होतील, असा संशय काही लोकांना वाटतोय. भाजपाकडून खरंच तसा प्रयत्न होतोय का? व त्यात त्यांना यश येईल का? याबाबत वेगवेगळे तर्क व्यक्त केले जात आहेत. मात्र १९९८ च्या परिस्थितीत व आजच्या स्थितीत खूप फरक आहे. १९९८ ची निवडणूक गुप्त मतदानाने झाली होती. यावेळी खुल्या मतदानाने होणार आहे. त्यामुळे पक्षाच्या आदेशाविरुद्ध मतदान करताना राजकीय भवितव्याचा विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे.

सहमतीचा प्रयत्न म्हणजे कमजोरी नव्हे !
भाजपाने तिसरा उमेदवार मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांना विनंती केली. राज्यसभेचा उमेदवार मागे घेतल्यास २० जून रोजी १० जागांसाठी होणा-या विधान परिषद निवडणुकीत भाजपाला एक अधिकची जागा सोडण्याची तयारी दर्शवली. आघाडीकडे पुरेसे बहुमत असताना तडजोडीची धडपड कशासाठी? असा प्रश्न स्वाभाविकच उपस्थित झाला. सहमतीचे राजकारण म्हणजे कमजोरी नव्हे, असे स्पष्टीकरण यावर करण्यात आले. भाजपाकडे केंद्राची सत्ता आहे. ज्यांची नावं ऐकल्यावर भल्याभल्यांना धडकी भरते अशा यंत्रणा त्यांच्या हातात आहेत. त्यामुळे तडजोडीचा प्रयत्न झाला असेल तर गैर काहीच नाही. पण भाजपाने राज्यसभा निवडणुकीत आणखी एक उमेदवार उतरवण्याची केलेली खेळी केवळ एका जागेसाठी नाही हे नक्की. गेल्या अडीच वर्षांत सरकार पाडण्याचे, अस्थिर करण्याचे अनेक प्रयत्न झाले व महाविकास आघाडीने ते यशस्वीपणे परतावून लावले. यावेळीही ते यशस्वी ठरणार की नाही याचा फैसला १० तारखेला होणार आहे.

पुन्हा कोरोनाचे सावट !
दोन वर्षांनंतर आत्ता कुठे जनजीवन रुळावर येत नाही तोवर कोरोनाच्या आणखी एका लाटेचे सावट सध्या राज्यावर पडले आहे. गेल्या दीड महिन्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये सात पट वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून रोज हजारहून अधिक नवीन रुग्णांची भर त्यात पडते आहे. केंद्राच्या आरोग्य सचिवांनी काही राज्यांना पत्र पाठवून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या आठवड्यात कोविड टास्क फोर्सची बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला. निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले आहे. राज्याच्या आरोग्य संचालकांनी मास्क सक्ती आवश्यक असल्याचे पत्र सर्व जिल्हाधिका-यांना पाठवले होते. परंतु आरोग्यमंत्र्यांनी मात्र अजून सक्तीबाबत निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट करून स्वत:हून मास्कचा वापर करा, असे आवाहन लोकांना केले आहे. याचाच अर्थ पूर्वीच्या अनुभवातून शहाणे झालेले सरकार एकदम कठोर निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत नाही हे स्पष्ट होते.

-अभय देशपांडे

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या